न पाठवलेले पत्र...
न पाठवलेले पत्र...


प्रिय ढम्प्या,
तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे, अगदी सगळंच तुला सांगावस वाटतं.. पण का कुणास ठाऊक कधी व्यक्तच होता येत नाही तू समोर असलास कि, तू समोर असलास कि तुला नीट पाहताच येत नाही अरे.. मला माहितीये आज पर्यंत आपण कधीच एकमेकांशी बोललो नाहीत. तू मला फक्त दिसायचास आणि दोन, पाच सेकंद आपण एकमेंकांकडे पाहायचो आणि निघून जायचो. पण त्या प्रत्येक दोन, पाच सेंकंदाने मला तुझ्यावर प्रेम करायला लावलं आणि मी पडले तुझ्या प्रेमात कळत-नकळत का होईना.
मला माहित नाही कि तुला हि मी आवडते कि नाही पण मला तू माझ्या आयुष्यात हवा आहेस कायम.. मग प्रियकर म्हणून असो वा मित्र. बऱ्याचदा कुठेतरी भिती असते कि जर मी तुला सांगितलं तर तू कसा वागशील ?माझ्याशी बोलणं टाकलंस तर.. किंवा मला कधी पाहून सुद्धा न पाहिल्या सारखं केलंस तर.. नको नको ते प्रश्न मनात येतात आणि मनातलं मनातच राहून जातं. तू आज पर्यंत जेव्हा केव्हा माझ्या समोर आलास किंवा बाजूने जात असलास ना कि मला धडधडायला होतं.आधी तरी तू मला नुसतं दिसायचास तरी बरं वाटायचं पण आता तर ते दिसणं हि बंद झालाय.तुला बघायचं आहे रे मला.. तुझ्याशी तासनतास गप्पा मारायच्या आहेत.
मी आजकाल फार वेंधळटासारखा वागायला लागली आहे.. अशी वावरते कि तू माझ्या आसपास आहेस.. किंवा रस्त्याने चालताना तू कुठून तरी पाहतोयस कि काय असं वाटतं. गेलं वर्षभर मी तुझ्या प्रेमात आहे पण असा एकही दिवस तुझ्या आठवणी शिवाय गेला नाहीये. आपल्या विषयी वेगवेगळ्या कल्पना करायला लागलीये.मी लिहिलेली आठवणीतलं प्रेम हि कथा सुद्धा माझ्या ह्या कल्पनेचाच एक भाग आहे. मला आता कॉलेज सोडून महिना झालाय आणि तुला पाहिलं नाहीये तर बऱ्याचदा चिडतेय मी स्वतःवरच.. कुठेतरी असं वाटतंय कि एक दिवस तू स्वतःहून मला मेसेज करशील आणि बोलशील माझ्याशी.मी जेव्हा त
ुझ्या प्रेमात पडायला लागले ना तेव्हा मनाला फक्त तूच हवा होतास पण मेंदू मात्र ऐकत नव्हता..त्याला भिती आहे अजूनही कुठेतरी कि जर हे प्रेम कधी पुढे गेलं नाही तर त्याच्या मित्राला(मनाला)खूप त्रास होईल. आणि ह्या गोष्टीवरून दोघांचं जरा वाजलं.. मग दोघेही माझ्याकडे आले.. मी त्यांचं ऐकून घेतलं आणि हृदयाला म्हटलं एकदा मनाला प्रेम करुदे कि.. हृदय तयार झाला. मग मनाला म्हटलं कि "तू प्रेम कर, अगदी जीवापाड प्रेम कर.. पण तुलाही त्या व्यक्ती कडून प्रेम मिळेलच असं नाही म्हणून खचून जाऊ नकोस"..त्याने हे मान्य करताना दोन गोष्टी सांगितल्या.. "ज्याच्यावर प्रेम करेन त्याला आयुष्यभर एका कोपऱ्यात सांभाळून ठेवीन"आणि दुसरं वाक्याने मला कोड्यात पाडलंय कि "आपण ज्या व्यक्तीवर एवढं प्रेम करतो अगदी आयुष्यभर सोबत असण्याची पण मग असं का होत कि साधं एक दिवशी त्या व्यक्तीसोबत जगता येत नाही ".
असं का होत असेल रे कि ज्या व्यक्तीला एकदा पाहण्यासाठी अनेकदा माझा जीव कासावीस झाला.. ज्या एकदा पाहिलं तरी मन समाधानी असायचं पण तुझ्यासोबत आयुष्यभर सोबत असण्याची स्वप्न पाहताना मला तुझ्या सोबत एक दिवसही जगता आलं नाही ह्याची खंत राहिलं. आणखीन अशी बरीच पत्र लिहिली आहेत तुला पण कधी पाठवताच नाही आली.
तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी,
उर्मिला