Urmila More

Others

4.6  

Urmila More

Others

रेशीमगाठी

रेशीमगाठी

8 mins
364


अनेकदा आपण अस ऐकत असतोकी, कि रेशीमगाठी या वर जुळलेल्या असतात. मला हे खर कधी वाटलंच नाही, पण आत्ता मात्र पटलंय. आणि ज्यांना हे अजूनही खर वाटत नाही त्यांना सुद्धा मी पटवून देईन. ह्या कथेतून हि कथा माझ्या आई वडिलांची आहे. माझ्या आई बाबांचा जन्म होण्या अगोदरची परिस्थिती मी लिहीत आहे. (वडिलांची आई ) माझी आजी मूळची चाकणची. आणि आजोबा महाडचे. आजी लहान पानापासून फार हट्टी होती. आणि तिचे वडील कडक शिस्तीचे. इकडे मात्र आजोबा कडक शिस्तीचे (तत्ववादी ). 10 वर्ष आर्मीत होते. आणि मग तिथून येऊन गावी शेती करायला लागले. आजीच्या वडिलांनी आजी साठी मुलं पाहायला सुरुवात केली. आणि आजोबांचं मागणं आलं. म्हणजे त्यांच्या घरच्यांकडून. मुलगा चांगला आहे म्हंटल्यावर लग्नही झालं. त्याकाळी लग्न खूप लवकर आणि कमी वयात व्हायची. आजी 12 वर्ष तर आजोबा 30 वर्ष. आजी वयाच्या 15 व्या वर्षी गरोदर राहिली. एका पाठोपाठ चार मुलं आणि एक मुलगी झाली. पण तिकडे मात्र काम येत नसल्याने तिचे हाल व्हायचे.

             एक दिवस ती कंटाळून मुलांना घेऊन घरातून निघून मुंबईला आली. माझे बाबा 3 नंबरचे. मुंबईला आल्यावर वय 7 वर्ष होत. दादर च्या 4 नं च्या प्लॅटफॉर्म वर झोपून दिवस काढले. आणि मग तिघे भाऊ कुठेतरी काम करायचे. माती टाकायचे, लादी पुसायचे, घर काम करायचे. आत्या 5 वर्ष आणि सगळ्यात लहान काका 6 महिने. आत्या लहान भावाला सांभाळायची. आज्जी पण कामाला जायची. कसेबसे पैसे गोळा करून बांद्र्याला आले. तिथे एक जागा घेऊन झोपडं बांधल. कित्येक वर्ष तिकडेच राहिले. सुरवातीला 2 मुलांची लग्न करून दिली. त्यांनी त्यांची दुसरी खोली घेऊन राहिले. सगळ्यात लहान काका मात्र कष्ट करून शिकायचे. त्यांनी शिक्षण पूर्ण केले. आणि ज्यांच्या कडे काका भांडी काम करायचे..त्या बाईने त्यांना दुबईला पाठवले. ते तिथेच राहायचे कित्येक वर्ष. तिनेही काकांना अगदी मुलासारखं पहिले.

इकडे माझ्या आईची गोष्टही सारखीच होती. शाळेत आई वडिलांनी तिला शिकायला घातले खरे, पण घरातल्या परिस्तिथी मुळे तिला शिकता नाही आले. शाळेत जाण्याची आवड होती पण फक्त दुसरी पास झाली. आणि ती सुद्धा वयाच्या सातव्या वर्षीच घरकामाला लागली. जी मिळेल ती काम करायची. त्या फ्लॅट मधल्या लोकांची बाथरूम घासून फिनेल मुळे इवल्याश्या हातांना जखमा व्हायच्या. सकाळी लवकर निघायची आणि रात्री उशिरा घरी यायची. दुपारी कोणी जेवण द्यायचा तर पोट भरायच. आणि नाही दिला तर उपाशीच. पैसे असले तर आठाण्याचा वडापाव घ्यायची. कित्येकदा घरी काहीच नसायच. पण आजोबांनी कधी मुलांना उपाशी नाही ठेवले. 5 मुली आणि एक मुलगा (लाडाचा ). अगदी मुले गाढ झोपेत असले तरी त्यांना उठवून खाऊ घालायचे.

               एक वेळ अशी अली होती कि राहायच स्वतःच घर सुद्धा न्हवत. पण सगळेच चेंबूरच्या मैदानात अंगावर गोण्या घेऊन झोपले. उघड्या मैदानात 5 मुली 1 मुलगा आणि बायको यांना आजोबांनी उघड्यावर झोपवले. आणि भयंकर प्यायले असतानाही त्यांच्या जवळच बसून होते. कितीही प्यायले होते तरी त्यांच्या मुलींसाठी (सुरक्षिततेसाठी ) ते झोपले नाही. कसबस एक पत्र्याच घर बांधल. आणि तिथेच राहायला लागले. पुन्हा तेच रुटीन चालू झालं. घरकामाला लागले सगळे. आजोबा दारू प्यायचे, त्यामुळे ते घरात जास्त बसायचे. माझ्या आईला वडापाव खूप जास्त आवडायचा, त्यासाठी तिने आजीचा भयंकर मार खल्ला होता. आजी मारायला लागली कि काहीच बघायची नाही. लाटणं धोपटणं काहीही असो. तिला खूप साद राहायला आवडायचं. सण असेल तर केसात चारण्याचा गजरा हवा असायचा. कधी कामावरून आलेले एखादे चांगले कपडे दिसले कि जपून ठेवायची आणि मग तेच सणांना घालायची. आजीने मारला कि बाहेर बसायची. चेंबूरच्या ज्या भागात ते राहायचे तिथे बिहारी लोक, तेलगू लोक जास्त राहायची आणि आईला सगळे ओळखत होते. मग ते तिला जेऊ घालायचे. कधी कधी ती दमून जेऊन त्यांच्याच घरी झोपायची. काही दिवसांनी आईच्या मामांनी तिला बांद्र्याला बोलावून घेतले. कारण तिथे तिचे हाल व्हायचे. मामांनी आईला सांगीतले, इथे पण काम कर आणि मजेत राहा. तेव्हा तिचे वय साधारण 13 14 असेल. मामांकडे नेहमी एक काठी असायची. मामा कडक शिस्तीचे होते. त्याने ते प्रत्येकाला (त्यांच्या नजरेत जो चुकीचा ) मारायचे. मामांकडे आई मजेत राहायची. थोडा त्रास तिथेही होता, पण करायची सहन. त्याकाळी प्रत्येक वस्तू किलोवर कमी आणि वाट्यावर जास्त मिळायची. बाजार आणायला माझी आईच जायची कारण तेव्हा मामाची मुलं लहान होती. त्यांच एक चिकनच दुकान ठरलेल होत. आई नेहमी त्याच दुकानावरून वाट्यावर चिकन घ्यायची. माझे बाबा वयाच्या सातव्या वर्षी कामाला लागले. ते सतत बाजारातच लोकांच्या हाताखाली त्यांना मदत करायचे.

          एकदा हे एका मुसलमान माणसाने पहिल, आणि त्याने बाबांना बोलावून त्यांच्या दुकानावर काम करायला सांगीतले. त्या बदल्यात पैसे देईन, आणि एक वेळ जेवण पण. मग बाबा तिथेच काम करायचे. तो माणूस बाबांना अगदी स्वतःच्या मोठ्या मुलासारख प्रेम देत होते. आणि त्यांची बायकोही. बाबा त्यांना पण आई बाबाच म्हणायला लागले. आज्जी दिवस भर रस्ते खोदायची, पाइपलीनची काम करायची. त्यामुळे दमून आल्यानंतर कित्येकदा बाबा, आज्जी, दोन्ही काका उपाशीच झोपायचे. त्याकाळात लग्न लवकर व्हायची. आईच्या मामांनी आई साठी एक मुलगा बघितला होता. आणि लग्न ठरवून सगळे मोकळे झाले होते. मामांना एवढच वाटत होत कि बास झालं तीच काम करण , तिथे तरी अराम भेटेल तिला.

           आईसुद्धा लग्नाला तयार होती. पण तिने मुलाला अजून पहिलेच नव्हते. माझ्या आज्जीला (आईच्या आईला ) हे लग्न मान्य नव्हत. ती आईला म्हणत होती कि लग्न नको करूस. तू लग्न केल्यानंतर मला पैसे कोण पाठवणार. पण तरीही आई तयार होती लग्नाला. लग्न ठरलं म्हणून घरी चिकनचा बेत ठरला. आणि आई बाजारात आली. ठरलेल्या दुकानात गेली चिकन घ्यायला. तिथल्या माणसासोबत भाव करून चिकन घेत होती आणि त्या माणसाला म्हटली कि 5 रुपयाला 6 वाटे द्याना. आणि त्या माणसाने तिला हसत हसत 6 वाटे दिले. घरी आल्यावर घडलेला प्रकार तिने घरच्यांना सांगितला. आणि मामांनी विचारल कोण माणूस ग ? आई म्हणाली तो नाहीका थोडा जाडा आहे आणि गोरा गोरा त्याने दिले. घरातले सगळे तिच्याकडे बघून वेड्या सारखे हसत होते, तिला आधी कळलं नाही मग मामांनी तिला सविस्तर सगळं समजावत म्हणाले कि तोच तुझा होणार नव्हरा आहे. आत्ता माझ्या बाबांना ज्या मुसलमान माणसांनी स्वतःच्या दुकानात काम करायला सांगीतले, त्याच ते दुकान चिकनच होत आणि आई नेहमी त्यांच्याच दुकानातून चिकन घ्यायची. त्या दिवशीचा तो गोरा गोरा आणि जाडा ज्याचं वर्णन आईने घरच्यांना सांगीतले ते म्हणजे माझे बाबाच होते. बाबांना तेव्हा माहित होत कि हिच्याशी माझं लग्न ठरलय. म्हणून त्यांनी त्या दिवशी तिला पाच रुपयाचे सहा वाटे दिले. आणि ह्या सगळ्यात गम्मत म्हणजे त्या दिवशी आई बाबांच्या दुकानात स्कट टॉप घालून गेली होती. अशी होती त्यांची पहिली भेट. त्या दिवसापासून तिने पुन्हा कधीच स्कट टॉप घातलाच नाही. आणि बाबांच्या दुकानात सुद्धा गेली नाही. लग्न काही महिन्यातच होणार होत. लग्नाआधी दोघे कुठे फिरायला सुद्धा गेले नाहीत. काही दिवसांनी बोलण्याचा कार्यक्रम होता. मोठ्यांची बोलणी सुरु होती. लग्नात काय देणार घेणार ?

                आजीने ( बाबांच्या आईने ) सांगीतले आम्ही एक वाटी दोन मणिंच मंगळसूत्र देऊ. मामांनी सांगीतले आम्ही आमच्या ऐपती प्रमाणे लग्न लावून देऊ. मुहूर्ता प्रमाणे हळदीचा दिवस होता. हळद सकाळी 10. 00 च्या मुहूर्तावर लावण्याची ठरली होती. म्हणून आई त्या दिवशी पण कामाला गेली आणि 10 वाजेपर्यंत काम करून घरी आली. तिकडे बाबा पण 10 वाजेपर्यंत दुकानावर काम करून हळदीला बसले. दुसरा दिवस लग्नाचा आला. आईने तिच्या पैश्याने एक नाकातली फुल्ली लहानशी घेतली होती. आजीने जोडव्या आणि मामानी कन्यादानाची भांडी घेतली. बोलणी मध्ये आईच्या घरच्यांनी सांगीतले होते कि, आम्ही मुलीला एकाच साडीवर पाठवू. आणि लग्नात आईला एकाच साडीवर ( ज्या साडीवर लग्न झालं ) त्याच साडीवर पाठवले. आईने सोबत तिचे ड्रेस घेतले होते. पण एकही साडी न्हवती. सुरवातीला आजोबांकडे खूप पैसे असायचे, घरात दागिने, पितळेची भांडी, 3, 4 घरं स्वतःची पण पिण्याच्या नादात सगळं विकून टाकल होत. सासरची पहिली रात्र. घरी आल्यावर आजीने बाबांना आईला खडसावून सांगितलं, कि ड्रेस घालायचे नाहीत, काजल, गजरा, पावडर काहीही लावायचं नाही. 17 व्या वर्षीत लग्न झालेली ती लग्न झाल्यावर पहिल्याच रात्री तिच्यावर बंधने लादण्यात आली. अजून तर अख्ख आयुष्य यांच्या सोबत घालवायचं आहे. त्या दिवशी आजीने तिले 2 जुन्या साड्या दिल्या. आणि सांगितले ह्याच दोन साड्या घालायच्या, ड्रेस नाही.

            आईने सगळे ड्रेस पुन्हा माहेरी पाठवले. आईला तेव्हा स्वयंपाक करता येत नव्हता. तिला भात कसा शिजवायचा हेही माहित नव्हतं. आजी सतत टोमणे मारायची, पण मग तिला दाखवायची सुद्धा कसं बनवायचं. हळू हळू आई शिकत होती, ज्या झोपड्यात सगळे राहायचे तिथली शेजारीची माणसं फार चांगली होती. त्यांना आजीचा स्वभाव माहित होता.

आजीने कधी आईला उंबरठ्या बाहेर येऊच दिले नाही. सगळ्यांचं जेऊन झालं कि जे उरेल ते तू खायचं. आईला भूख खूप होती आणि भाता शिवाय जेवणच नाही जायचं. कित्येकदा घरात एक दीड चपाती आणि थोडीशी डाळ, किंवा भाजी उरायची. तेच ती खाऊन झोपायची. घरातल्या कपाटाला हात लावायचा नाही. अशी ताकीद आईला दिली होती. आजी कधी बाहेर गेली तर शेजारचे आईला बाहेर येऊन बसायला सांगायचे. आणि आजी येताना दिसली कि आईला आत पाठवायचे.

                 बाबा रोज आईला 2रु देऊन जायचे. त्याने ती पाव आणायची आणि चहा सोबत खायची. हे आजीला कळल्यावर आजी घरातला सगळा चहा संपवून टाकायची. आणि कधी-कधी पाव घेऊन काकांना द्यायची. त्यामुळे मग आई पाव पदराला बांधून ठेवायची. आणि आजीच लक्ष नसताना लपून खायची. लग्नानंतर आई बाबांना मामांकडे जेवायचं निमंत्रण आलं. आई बाबा मामांच्या घरी जेवायला गेले. घरातल्यांना आईची भूख माहित होती. त्यामुळे आईला सुरवातीला जास्तच भात दिला होता. बाबा पण जेवत होते. जेव्हा आईने दोन वेळा भात मागितला, तेव्हा हे पाहून बाबांना आश्चर्य झालं. कि हि घरी का एवढी कमी जेवते. तेव्हा बाबांनी आईला सत्य काय ते विचारले. आईने बाबांना सगळं सांगीतले. आणि तेव्हा पासून बाबा आईला त्यांच्याच ताटात जेवायला बसवायचे. आणि आजीला नेहमी जास्त भात वाढायला सांगायचे. ते थोडं खाऊन उठायचे. आणि बाकीचं आईला ठेवायचे. त्या दिवशी पासून ती पोट भर जेवायला लागली. काही वर्षांनी बाबाला वाटले कि आपण स्वतःच घर घ्यावं. कारण दोन मुलं झाली होती. घरात आधीच एवंडी माणसं बाबांनी जवळच एक पक्क घर घेतलं. शेजारची माणसं सोन्यासारखी होती. आईला पण थोड्या दिवसांनी वाटू लागले कि बाबांच्या एकट्याने घर चालणार नाही. म्हणून ती सुद्धा घरकाम करू लागली. ती अजूनही करतच आहे. दादा आणि ताई शाळेत गेले कि आई मला बाजूच्या मावशींकडे ठेवायची. त्या मावशी मला अगदी आईसारख सांभाळायच्या. आत्ता मात्र सगळं बदललेलं आहे.... आणि सोबत आई वडिलांच्या गुढग्याचा त्रास हि वाढत चालला आहे. पण त्या दोघांच असं म्हणणं आहे, जो पर्यंत होईल तो पर्यंत स्व: कष्टाने जगायचं. मुलांवरही अवलंबून राहायचं नाही. जर आम्ही कोणत्या गोष्टी साठी हट्ट केला कि ते लगेच पुरवतात. कारण त्यांचं असं म्हणणं असत कि, आपल्याला काही मिळाले नाही पण मुलांना ते द्यायला हवे. माझ्या आई बाबांचं अरेंज मॅरेज होत पण त्यांचं नातं आत्ता पहिला तर अगदी लव्ह मॅरेज झालेली वाटतील. जर कधी आईला काही खावेसे वाटले तर ते बाबांना नकळत कसं कळत कुणास ठाऊक ? ते त्या दिवशी कामावरून घरी येताना बरोबर ती वस्तू आणणार !! त्यांचं बालपण सुरु झालं होत घरकाम आणि चिकनच दुकान.... वयाच्या 55 व्या वर्षी सुद्धा तेच काम करतात.

रोज सकाळी लवकर उठून कामाला त्याच उत्साहाने जातात. कारण त्यांना त्यांच्या मुल्लांना आयुष्यातलं ध्येय गाठताना पाहायचे.


Rate this content
Log in