STORYMIRROR

Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

आमचा पहिला विमान प्रवास

आमचा पहिला विमान प्रवास

10 mins
133

सत्तावीस मे 2022...!

आमचा पहिला विमान प्रवास...!

मला असं कधीच वाटलं नव्हतं की माझ्या नशिबात सुद्धा विमान प्रवास असेल..! विमानाचा आणि माझा संबंध आजवर लहानपणापासून फक्त आकाशात धुराची रेघ संध्याकाळी पाहण्या पुरता,आवाजाने एखादे विमान खालून जाणारे पाहण्यासाठी जेवणाच्या ताटावरून अंगणात येऊन आकाशात त्या विमानाचा शोध घेण्यापुरता,चित्रपटात पाहण्यापूरता, नाहीतर अगदीच कागदाचे विमान करून उडवण्यापुरता इतकाच. पण नशीब पालटले हळू हळू आकार घेऊ लागले आणि बघता बघता विमान प्रवासाचे सौख्य परमेश्वर कृपेने लाभले म्हणून हा शब्द प्रपंच...!

लग्न झाले,मुलं झाली हळू हळू शिकली आणि माझा मुलगा पुष्करला परदेशात शिक्षणासाठी पाठवणे जमले.हा हा म्हणता वर्ष सरले आणि त्याने मायदेशी येण्याचा घाट घातला.पहिल्यांदाच तो आमच्या पासून दूर शिक्षणासाठी गेलेला एम एस मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स करण्यासाठी,त्याला सारेच नवीन.प्रथमच दूर जाणे,प्रथमच घरापासून एकटे राहणे,हे सारे त्याने लीलया अंगीकारले.

तो येणार म्हंटल्यावर स्वाभाविकपणे तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जायचे ठरले आणि त्याने सर्व काकांना किंबहुना अख्ख्या कुटुंबाला बरोबर घेऊन जाण्याचा मनसुबा रचला आणि प्रवासाची आखणी केली.आणि एक एक क्षण मोहरून गेला. विमानाची तिकिटे बुक करणे ,तारीख ठरवणे मोठे जीकिरीचे काम होते.पहिल्यांदा बालाजी दर्शनाची तिकिटे बुक करायचे ठरले आणि एक एक दिवस,आठवडा ,महिना पुढे सरकत गेला.त्यात मुलाची परीक्षा,मुलीची रजा,बायकोच्या शाळेची सुट्टी हे सर्व ध्यानात घेऊन एकदा चोवीस मे 2022 ही तारीख दर्शनाची फिक्स झाली.सोळा मे ला परीक्षा संपली आणि पुष्कर इकडे मायदेशी भारतात येण्यास निघाला.जसा तो तिकडून निघाला तसा इकडे उर्वरित कामांनी वेग घेतला.दैव कृपा काय हे प्रत्येक क्षणी जाणवले.मुख्य म्हणजे विमानाची तिकिटे बुक करणे आणि तिरुमलाला येथे राहण्यासाठी रुम बुक करणे.रुम बुक करणे काही आमच्या हातात नव्हते, ते तिथे गेल्यावरच करावे लागणार होते.विमान प्रवास निश्चित झाल्यामुळे कोल्हापूर तिरुपती की बेळगाव तिरुपती याचा विचार सुरू झाला.कोल्हापूर तिरुपती पहिल्याच प्रयत्नात नाहीसे झाले आणि मग बेळगाव तिरुपती प्रवास करण्याचे ठरले. 23(तेवीस) मे 2022 ची तिकिटे स्टार एअर वेजची बुक केली आणि हाता बरोबर येण्याची 25 (पंचवीस) मे ची तिकिटे बुक केली.

चि. पुष्करच्या इच्छेनुसार मी, वैशु,पियुषा,ति. दुष्यंत दादा,ति. मामादादा, सौ.संजीवनी वहिनी, ति. अंतुदादा, सौ.अनुजा वहिनी आणि चि.पुष्कर अशी नऊ तिकिटे बुक झाली.जीव भांड्यात पडला. दिवस भर भर सरकत होते.त्याच बरोबर मग रामू ,मधु आणि सौ.शर्वरी वहिनी पण तिरुपतीस येण्यास तयार झाले. त्यांनी पण आपला दौरा आखला आणि दुधात साखर पडली.

कोठे माशी शिंकली देव जाणे.अंतू दादाच्या तब्येतीच्या तक्रारीने तोंड वर काढले.पटापट घटना घडत गेल्या आणि त्याची एन्जोप्लास्टी यशस्वी पणे पार पडली. वैदयकीय असुविधेमुळे दादा वाहिनीचे येणे रद्द झाले पण दैव कृपेने मोठे संकट टळले आणि विमान तिकिटाचे पैसे बालाजी चरणी अर्पण करून मनस्वी समाधान पदरी पाडून घेतले..!ति. अंतू दादा सौ अनुजा वहिनी विश्रांती साठी कोल्हापूरहून बंगलोरला सायली कडे गेले आणि इकडे तिरुपतीला जाण्याची तयारी सुरू झाली.

माझ्या गार्डनच्या मित्रमंडळीत तिरुपती विमान प्रवासाचा मनसुबा फुटला तसा सूचनांचा बडीमार झाला.अनुभवी आणि अनअनुभवी मित्रांनी सूचना केल्या.अगदी डोमेस्टिक विमान प्रवासात पासपोर्ट लागतो पासून ते वजन मर्यादित असायला पाहिजे,विमानात आताशा एअर होस्टेस नसतात,इथपर्यंत साऱ्या सूचना मनापासून देऊन मित्रांनी चांगलीच मौज लुटली.

एअर होस्टेस नसते म्हंटल्यावर निम्मा उत्साह तिथेच कमी झाला.एअर होस्टेस नाही तर कसली मजा येणार म्हणत जड अंतःकरणाने घरी आलो. घरी आल्यावर मनात विमान प्रवासाचे मनसुबे रुंजी घालीत होते. दिवास्वप्ने मन पहात होते.मुलांची पण मानसिक उत्साहित तयारी सुरू झाली होती.आई वडील,काका,काकू आणि सर्व कुटुंब विमानाने प्रवास करणार होते आणि त्या सर्व प्रवासाची जबाबदारी पियुशा पुष्करच्या खांद्यावर होती ,त्यामुळे ते जरा जास्तच ऍक्शन मोडवर काम करत होते.

मोजकेच साहित्य नेण्यापासून ते वजन मर्यादित सामानाची बांधाबांध सारे सूचना फलक झळकले.खाण्याचे पदार्थ कोणते किती घ्यायचे याचेही विवरण पार पडले आणि प्रत्येकाच्या घरी विमान प्रवासाचे जणू बारसेच पार पडले.फोनाफोनी,तिकिटांची आणि इतर कागदपत्रांची वरचेवर उजळणी व जमवा जमव झाली.आधार कार्ड,पासपोर्ट,रेशन कार्ड,मतदान कार्ड आणि पॅन कार्ड याच्या झेरॉक्स काढून झाल्या,.आणि एकदाचा तिरुपतीस जाण्याचा दिवस उगवला.

तारीख होती 23 मे 2022. सकाळी आंघोळ पूजा आटपली आणि कपडे घालून तयार झालो, इतरांचेही आवरले,बॅगा भरल्या आणि पोट पूजा करून फोन फोनी केली.दोन एक तास आधीच विमानतळावर बोर्डिंग पास घेण्यासाठी आणि चेकिंग साठी हजर रहायचे होते म्हणून हजर झालो.पहिला प्रवास म्हणून पुष्करचे मित्र अथर्व आणि ऋत्विक सोडण्यासाठी गाडी घेऊन आले होते.आम्ही एकूण दुष्यंतदादा, मामा दादा(सुमंत),त्याची बायको सौ.संजीवनी वहिनी, माझी बायको सौ. मृणालिनी,मुलगा पुष्कर आणि मुलगी पियुशा आणि मी असे सातजण होतो.थोडे थांबायचे होते म्हणून तिथेच बाकड्यावर बसलो आणि सहज पुष्करच्या मित्रांनाही तिरुपतीस येण्याचा आग्रह केला.त्यांच्या चेहऱ्यावर तीव्र इच्छा स्पष्ट दिसत होती म्हणून थोडा जोर लावला.योगायोग इतका प्रबळ होता की आम्हालाही आश्चर्य वाटले.तेथूनच त्यांच्या घरी फोन लावून आई वडिलांची परवानगी घेतली आणि तात्काळ तिकीट बुक करून त्यानाही आमच्या बरोबर सामील करून घेतले.मुले खुश झाली आणि आम्हालाही कंपनी मिळाली.

विमान स्टार एअरव्हेजचे इन टाइम टेकऑफ करणार होते त्यामुळे चेकिंग करून आतल्या वेटिंग हॉल मध्ये आम्ही जाऊन बसलो. पहिली वेळ ,प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज आणि हुरहूर जाणवत होती.फोटो काढणे ,गप्पा मारणे,कयास बांधणे सुरू होते.विमाना पर्यंत जाण्यासाठी भर उन्हात त्यांची गाडी आली,गाडीत बसून विमाना पर्यंत गेलो आणि एकदाचे विमानात पहिले पाऊल पडले. फर्स्ट इम्प्रेशन म्हणतात ते काय?हे अनुभवले.छोटे पत्र्याचे ब्यारल सारखे ते विमान आणि कमी जागेत केलेली आसन व्यवस्था. छोट्या खिडक्या ,डोक्याला लागेल अशी उंची ,सारे कसे आश्चर्य वाटण्या सारखेच.

टेकऑफची वेळ झाली .विमानाचे दार बंद झाले.एक परिचारिका एक केअर टेकर यांनी आपले काम सुरू केले.

सूचनांचा बडीमार इंग्लिश आणि हिंदीतून झाला.धडधड वाढली, विमान सुरू झाले ,आवाज वाढत गेला ,थोडे प्रेशर जाणवले ,पट्टे आधीच बांधले होते त्यामुळे काळजी नव्हती.घुघु आवाज करीत विमान हवेत झेपावले.

थोडे पुढे गेल्यावर आम्ही खिडकीतून डोकावून पाहिले,गचके देत विमान हळू हळू उंच उंच झेपावू लागले तशी वेगळीच जाणीव मनास स्पर्श करू लागली.घरे लहान लहान दिसू लागली,रस्त्यांचे पट्टे नजरेत भरू लागले.मोठे जलाशय डबके भासू लागले, नदी नाला वाटू लागली,डोंगर टेकड्यात रूपांतरित झाले आणि शेतांचे तुकडयांचे कोलाज तयार झाले. क्षितिज आपली कक्षा आखून विमानाभोवती कडे करून स्थिरावले,ढगांची चादर पसरली आणि विमान स्थिर झाल्याचे जाणवू लागले.बस,रेल्वे किंव्हा इतर वाहनांचा वेग जाणवतो,अंतर कापल्याचे जाणवते पण विमानात तसे काहीच जाणवत नाही.डबा फक्त हवेत तरंगत राहतो आणि हळू हळू विमान प्रवासाचे स्वप्नवत सौख्य विरून जाते.केंव्हा एकदा विमान लँड होते याची मन वाट पहात असताना परिचारिका पाणी घेऊन आली.बरे वाटले,पाणी घेतले .पाठोपाठ मुलाने ऑर्डर दिलेला चहाचा पेला पण आला.सर्वांनी चहा घेतला.विमानतला पहिला चहा,तो ही फिका...गोड मानून घेतला.तशी परिचारिका तोऱ्यात आपल्या जागे कडे गेली..आणि मी समोर ठेवलेले दरपत्रक पाहिले.पाणी बॉटल पाच रुपयांची मोफत,चहा शंभर रुपये, अरे बाप रे, सहज जीभ चावली गेली.पण काय करणार,चिरंजीवच म्होरक्या होते. जरा इकडे तिकडे नजर फिरवली,कोणी खिडकीतून पाहतोय,कोणी शेजऱ्याशी गप्पा रंगवतोय,कोणी काय तर कोणी काय.ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर अप्रुप आणि कुतूहल,आनंद आणि हुरहूर.कोणी कानास हेड फोन लावतोय तर कोणी उगाचच चुळबुळ करतोय.

दोनचार सीट सोडून,मागे मामा दादा म्हणजे माझा भाऊ आणि त्याची बायको बसले होते.बायकोचे म्हणजे माझ्या वाहिनीचे नाव संजीवनी.अगदी सराईतदार पणे डोळ्याला चष्मा लावून व्यंकटेश स्तोत्र पुटपुटत होती आणि त्याच पुस्तका खाली विष्णू सहस्त्र नामाच्या पुस्तकाचा नंबर लावून तिचे आराधनेचे कार्य चालू होते. इतक्यात मला लावलेले पोहे खायची लहर आली आणि पिशवीतून पोहे बाहेर काढून,माझे खाणे सुरू झाले. तसे सर्वांनीच हात पुढे करून पोह्याचा फडशा पाडला.मग एक एक पदार्थ बाहेर पडले, शेंगदाणे,बाकरवडी,पापडी,भडंग,राजिगऱ्याचे लाडू,काही काही म्हणून शिल्लक ठेवले नाही.फुकटचे म्हणून पाणी मात्र सर्वांनी मागून मागून घेतले आणि मनमुराद विमान प्रवासाचा आनंद लुटला.

हे सगळे होता होता तिरुपती विमानतळ आले परत पट्टे बांधले आणि नजर खाली खिडकीतून फेकली.धडक धकधक आणि घर्षणाचा तीव्रआवाज करीत विमानाच्या टायरी आपल्या खुणेवर स्थिरावल्या.विमानातून उतरताना उगीचच आपण vip असल्याचा भास झाला.दारात परिचारिका बाय बाय करीत होती ते पाहून जरा बरे वाटले.नाहीतरी आपल्याला इतका कोण मान देतंय म्हणून थोडे सौख्य मनास चाटले.बाहेर पडलो आणि थोडी निराशा झाली.सांबरा विमानतळावर विमाना पर्यंत त्यांनी बस सेवा पुरविली होती आणि आता चालत जावे लागणार होते.त्यात दुपार सरल्या नन्तरचे ऊन्ह अजून आपली दाहकता दाखवत होते.आणि चालता चालता वहिनी विष्णू सहस्त्र नाम का वाचत असावी याचे कुतूहल घर करत होते.

वेटिंग हॉल मध्ये स्वयंचलित पट्ट्यावरच्या बॅगा घेतल्या आणि बाहेर पडण्यासाठी वळलो. तिरुपतीची भव्य मूर्ती स्वागताला उभी असल्या सारखे वाटले. ईकडे तिकडे पाहून सर्व विमानतळ पाहून घेतले.एक वेगळेच वातावरण तोपर्यंत आवती भवती निर्माण झाले होते.बाहेर पडलो आणि थेट TTD च्या बसने तिरुमला डोंगरावर गेलो.

राहण्याची सोय आधी केली नसल्याने आणि भाषेचा मोठा प्रश्न त्यामुळे भलतीच तारांबळ उडाली. शेवटी सरळ उत्तराधी मठाच्या लॉकरला साहित्य टाकले आणि प्रथम पोटपूजा रस्त्यावर उभे राहुन करून घेतली.

दुसरे दिवशी आंघोळ वगैरे आटोपून दर्शनासाठी बाहेर पडलो.नाष्टा केला,दुपारची वेळ मिळाली होती म्हणून बाराच्या सुमारास अंग सेवेची तिकिटे काढण्यासाठी पाळीत जाऊन उभे राहिलो.दहा दहा रुपयांच्या तिकिटावर अंगसेवा करण्याचे भाग्य लाभले,ते पण दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता ओल्याने ती अंग सेवा करावयाची होती.अंग सेवा म्हणजे सोळ्यात सर्व गाभाऱ्या भोवती लोळण घेत परिक्रमा करायची आणि बालाजीचे म्हणजे व्यंकटेशाचे दर्शन घ्यायचे.

थोडा टाईम पास करून महाप्रसाद घेतला आणि दुपारी तीन वाजता तिनशेहे रुपये तिकिटाच्या रांगेत जाऊन दर्शनासाठी उभे राहिलो.महाप्रसाद म्हणजे भरपूर भात, सार,आणि ताक.मन प्रसन्न झाले.बायकांना सलवार कमीज आणि पुरुषांना लुंगी ड्रेसकोड होता. हळू हळू गोविंदा गोविंदा म्हणत रांग पुढे सरकत होती. कोण पुढे कोण मागे करीत मार्गक्रमण सुरू होते. वेळेचा अंदाज येत नव्हता.हॉलमध्ये थोडे थांबावे लागले आणि शेवटी सर्वजण मुख्य दरवाजा जवळ आलो.या आधी आधार कार्ड ,दर्शन तिकीट चेकिंग,प्रसादाच्या लाडू साठी टोकन सगळे पार पडले होते. निव्वळ दर्शन बाकी होते आणि इथूनच खरी कसरत सुरू झाली.गर्दीत सगळी पांगली.प्रत्येकांनी आपले कुटुंब सांभाळले आणि उजव्या बाजूच्या कड धरून मार्गक्रमण केले.रेटारेटीने चांगलेच अंग दाबून निघाले.लाकडी घसरण चढलो आणि व्यंकटेशाचे दिव्य दर्शन झाले.

हात वर करून जोडले आणि गोविंदा गोविंदा बेंबीच्या देठापासून ओरडत आपोआप देवासमोर येऊन पोहचलो.काय मागायचे हे मनोमनी ठरवून सुद्धा सर्व विचार विरून गेलेले आणि मी आणि तो इतकेच काय ते उरले होते.डोळ्यात व्यंकटेशाची मूर्ती साठवतो म्हंटले तरी साठत नव्हती.मनाची काय अवस्था। होती ते शब्दात सांगणे कठीण.ते रूप किती पाहू आणि किती नको असे झाले. डोळ्यांची पावणी सुद्धा लवली नाही.आणि डोळ्यातून घळाघळा अश्रू पाझरू लागले.मन,अंतःकरण खरोखरच भरून आले.सगळे श्रम नाहीसे झाले.आणि पुन्हा उल्हसित होऊन शरीर पुढे सरकले.

न राहवून शरीर झुकले आणि जमिनीला स्पर्षले.खूप खूप छान वाटले.सगळे डाव्या बाजूला बाहेर आलो,थांबलो आणि कळसाला पाहून साष्टांग दंडवत घातला.प्रदक्षिणा पूर्ण केली.प्रसाद घेतला आणि बाहेर पडलो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दर्शन छान झाल्याचा आनंद ओसंडून वहात होता.जो तो कृतकृत्य झाल्याच्या आणि दर्शन सार्थकी लागल्याच्या अवस्थेत होता.,थोडे मंत्रमुग्ध होऊन थांबलो आणि प्रसादाचे लाडू घेण्यासाठी पुन्हा रांगेतून जाऊन लाडू घेऊन आलो.

जवळ जवळ आता रात्रीचे नऊ वाजले होते,गप्पा मारत राहण्याचे ठिकाण गाठले.दुसरे दिवशी दोन रूमची जागा मधूने बुक केली होती तिथे गेलो आणि दुसरे दिवशीच्या अंग सेवेच्या दर्शनाची ओढ लागली. रात्री झोपणे झालेच नाही,मी ऋत्विक,पुष्कर आणि अथर्व चौघेच अंग दर्शनासाठी गेलो.रात्री साडे अकरा बारा वाजताच रांगेत उभे राहिलो आणि तीन साडे तीन वाजता लोटांगण घालण्यासाठी गाभऱ्या जवळ येऊन पोहचलो. ही गर्दी आणि सगळे उघडे आडवे झालो आणि लोळण घेणे सुरू झाले.काय ती गडबड,एका पाठोपाठ एक धडकणे आणि पुढे सरकणे.इतका सुखद फरशीचा स्पर्ष अंग अंग पुलकित करून गेला.प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि दर्शनासाठी पुन्हा त्या अलौकिक तेजा समोर नतमस्तक होण्यासाठी उभे ठाकलो.खूप खूप छान वाटले. दर्शन प्रसाद घेऊन सहा वाजता रूमवर आलो.

एव्हाना सर्वजण उठून आवरून बसले होते.आम्ही चहा घेतला आणि बसने तिरुपतीत बसने डोंगर उतरून खाली आलो.एक वेगळाच आनंद अंगात वास करत होता.खाली आल्यावर गोविंदराज पट्टणम केले.मी आत देवळात दर्शनासाठी गेलो नाही.सगळ्यांच्या चप्पल सांभाळत बसलो. नन्तर पद्मावती दर्शन घेऊन थोडा बाजारहाट केला,खाणे पिणे करून पुन्हा सारेजण विमानतळावर येऊन पोहचलो.तिरुपतीतून मधु,रामू आणि शर्वरी वहिनी (दुष्यंत दादाची बायको) ते सगळे बंगलोरला रवाना झाले.

पुन्हा विमानतळावर लगेज देणे,चेकिंग वगैरे करून घेणे पार पाडले आणि वेटिंग हॉल वर बसलो. विमान येण्या साठी अजून अवधी होता म्हणून विमानतळ पाहून घेतले,फोटो काढले,पोटपूजा केली सारे मस्त मजेत एन्जॉय करून विमानात बसलो.आणि चेकिंग ची कवायत आठवली.घड्याळ,पाकीट,पट्टा सगळं साहित्य ट्रे मध्ये ठेवून त्या इलेक्ट्रॉनिक चौकटीतून बाहेर पडायचं आणि परत सुरक्षा रक्षक अंगाभोवती त्यांचा इलेक्ट्रॉनिक आकडा फिरवतो तो फिरवून घ्यायचा.अंगा भोवती तो आकडा फिरताना खूप ब मजा वाटली.पाणी आले आणि विमानात काही ही घ्यायचे नाही हे मनासी पक्के केले.पट्टे बांधले आणि विमान हवेत झेपावले.परतीचा प्रवास सुरु झाला.पुन्हा खिडकीतून पाहणे आणि उंच उंच झेपावणे जाणवत होते. हवाई सुंदरी उगीचच काहीतरी उंचीची माहिती देत होती. यथावकाश पुन्हा सांबरा विमानतळ आले तसे पट्टे बांधले.तासा दिड तासाचा प्रवास , भुर्रकन वेळ निघून गेला.म्हंटले पूर्ण तिकिटाचे पैसे वसूल झाले पाहिजेत म्हणून सगळ्यात शेवटी उतरायचे ठवले.तितक्यात टॉयलेट बघून घेतले.जागेचा काटेकोर पणे केलेला उपयोग जाणवला.उतरताना हवाई सुंदरीची आणि तिच्या सहकाऱ्याची चेष्टा केली.दोघे तरुण आणि मुख्य म्हणजे कोकणातलेच होते.आता जवळीक निर्माण झाली होती आणि अतिसभ्यतेचा बुरखा गळून पडला होता।

मी म्हंटले किती लवकर आणलात, जर फेरफटका मोठ्ठा घेतला असता तर बरे झाले.तसा तिचा सहकारी म्हणाला ,थांबा साहेब,विमान आपलंच आहे,चला एक राऊंड मारून आणतो.

मी म्हणालो,इतके म्हणालास यातच हौस भागली.आपण सेल्फी काढुया का?तसे दोघेही तयार झाले आणि त्यांच्या बरोबर आठवण म्हणून सेल्फी काढला.

विमानतळावरून साहित्य पडलो आणि उन्हात वाट पहात बसलेल्या गाडीतून सर्वजण घरी सुखरूप पोहचलो.कुलूप काढून प्रथम पंखा लावला,हात पाय धुतले आणि चहा घेतला.मनातुन ती तिरुपती दौऱ्याची ग्लानी अजून शांत झाली नव्हती.अप्रुपता टिकून होती.त्यातच अंतरात घर करून बसलेला प्रश्न सारखा चुळबुळ करू लागला,तसे मी द्राक्षायणी वहिनींना विचारले..

वहिनी,विमानात तुम्ही का विष्णू सहस्त्र नामाचे वाच करत होतात.तशी ती पटकन निर्मळ मनाने म्हणाली, काय जरा परमेश्वर इतक्या उंचीवर जरा जवळ येतोय म्हणजे लवकर त्याच्या पर्यन्त आपला आवाज पोहचेल म्हणून वाचन केले.

मी ही तितक्याच मिश्किल पणे खुलासा केला,म्हंटले

अहो तुमचा प्रयत्न आणि पुण्याई सफल झाली नाही ते बरे झाले,कारण इथे वरच्या वर कनेक्शन नाही आधी खाली आणि सगळेच वर परमेश्वरा जवळ...सगळे हसले,आणि आमचा असा पहिला सर्व कुटुंबाबरोबरचा पहिला विमान प्रवास सफळ सम्पूर्ण झाला.

परमेश्वराशी झालेली ही भेट कधीच विसरली जाणार नाही.

गोविंदा गोविंदा म्हणून सारे आपापल्या घरी परतले....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Action