आद्यक्रांतिवीरराजे उमाजी नाईक
आद्यक्रांतिवीरराजे उमाजी नाईक
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले. अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरले गेले.
ते म्हणजे 'राजे उमाजी नाईक'.
आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक
उमाजीराजे नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादाजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे झाला.वडिल दादाजी खोमणे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते.त्यामुळे उमाजीराजेंचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजीराजे जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरे आणि करारी होते. त्यांनी पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. जसे उमाजीराजे मोठे होत गेले तसा त्यांनी वडील दादाजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरू केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचे व संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजीराजे बेभान झाले. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठोजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बापू सोळस्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
उमाजीराजे नाईक यांनी इंग्रज, सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर ते भावासारखा धावून जाऊ लागले. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीराजेंना सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्यांनी त्याकाळात तुरंगात लिहिणे वाचणे शिकले .या घटनेचे इंग्रज अधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस याने फार आश्चर्य व कौतुक केले.आणि तुरूंगातून सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्यांचा कारवाया आणखी वाढल्या. उमाजीराजे देशासाठी लढत असल्याने जनताही त्यांना साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजीराजेंना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिनटॉस याने सासवड-पुरंदरच्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीराजेंच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीराजेंचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका सैन्य तुकडीत जवळ जवळ ५ हजार सैनिक होते.
२८ ऑक्टोबर १८२६ साली उमाजीराजेंविरुद्ध इंग्रजांनी १ला जाहिरनामा प्रसिद्ध केला.त्यात उमाजीराजे व त्यांचा साथीदारांना पकडणाऱ्यास मोठ्या रकमेची बक्षिसे व इनाम जाहिर केले व या क्रांतिकारकांना मदत करणाऱ्यास शिक्षा जाहीर केली.पण जनतेने इंग्रजांना मदत केली नाही.
उमाजीराजेंचा भारताचा स्वातंत्र्यासाठी असनाऱ्या लढ्यास सर्व राजे-रजवाडे,संस्थानिक,जनता पाठिंबा देत होते.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीराजेंना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्यांना ३५ दिवस ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजीराजे असताना त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस दररोज महिनाभर त्यांची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीराजेंची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीराजेंवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर राजे उमाजी यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिले नरवीर उमाजीराजे नाईक ३ फेब्रुवारी १८३२ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४३ व्या वर्षी हसत हसत फासावर चढले.
