तू भेट असा सख्या रे
तू भेट असा सख्या रे
हे जीवना तुजसवे असे जुळावे नाते,
मायेच्या मातीसंगे गर्भातील अंकुराचे,
नकोस फक्त मित्र, नकोस फक्त सखा,
गर्भांकुर बनुनी माझ्या गर्भात तू रुजावा,
माझ्यातील माझ्यामध्ये तू एक होऊनी राहावा,
हर एक क्षण तुझ्या अंकुरण्याचा मी अंतरी जपावा,
माझे श्वास तुझे श्वास, दोघांच्या हृदयाचे ठोके,
असे संगीत ते उपजावे, अवघे जगणे गाणे व्हावे,
ना हिरावेल तुज कोणीही, ना पडेल कधी मनी अंतर,
तुटता अखंडित होई असे, जडो नाते नाळेचे सुंदर,
आईची थोरवी जी प्रेयसीत नसे मुळात,
गुणावगुणासह तुज जीवना, घेईन मी पदरात,
तू भेट असा सख्या रे, भेटशील पुन्हा तू जेव्हा,
नाळेचे घेऊनी नाते, या गर्भात घे विसावा...

