तुला भेटायला आलो
तुला भेटायला आलो
सये जिंकून काळाला तुला भेटायला आलो
तुझ्या प्रेमात आहे मी तुला सांगायला आलो
नको भांडूस माझ्याशी चुकांचीही नको चर्चा
तुझ्याशी गोड नाते मी पुन्हा जोडायला आलो
जराशी हास ना आता अशी नाराज का आता
तुझ्या गालामधे राणी खळी पाडायला आलो
गुलाबाची कळी माझी डुलेना आज वाऱ्याने
अबोला जीवघेणा हा तुझा तोडायला आलो
तुझी प्रेमातली शिक्षा मला मंजूर केव्हाही
उभा ठेवून मृत्यूला क्षमा मागायला आलो