# परिवर्तनाच्या उजेडाची वाट...
# परिवर्तनाच्या उजेडाची वाट...
थकलेल्या जीवाला विसावा मिळावा
म्हणून जातो जलाशयाकाठी,
बसतो पाण्यात पाय टाकून
तेव्हा मनाला मोहून टाकणाऱ्या
वातावरणातही येतात
दिशाहीन झालेल्या चळवळीचे विचार,
शांत वाहणाऱ्या त्या प्रवाहासोबत ऐकू येतो अहिंसेचा कल्लोळ
उडणाऱ्या पक्षांचे थवे पाहताना
डोळ्यासमोर उभी राहतात
रक्तपात करणारी हरामखोर माणसे,
खडकातील एकमेकांना ओढणाऱ्या खेकड्यांना पाहून
आठवतात समाजातील नीच प्रवृत्तीची लोकं
परततांना रंगीबिरंगी फुलांना पाहून वाटतं
असाच दरवळावा दररोज मानवतेचा सुगंध
हताश मनाने घरी येऊन,
चहूबाजूंनी पसरलेला काळोख गिळतो
अन् वाट पाहतो परिवर्तनाच्या उजेडाची
