पानगळीच्या शय्येवरती
पानगळीच्या शय्येवरती
नितळत्या पावसाच्या आठवांचे मंथन पानगळीच्या शय्येवरती
निर्वस्त्र पहुडल्या चांदण्याचे उगा मैथुन पानगळीच्या शय्येवरती !
थैमानल्या यौवनाच्या कवेत लपेटलो कधी भर माध्यान्हीसही
बर्फाळल्या स्फंदनांचा नको टाकूस डाव पानगळीच्या शय्येवरती !
चित्कारल्या स्वप्नांच्या रातीस प्राशून शुष्क केला काळाशार डोह
निचोडल्या आसवांचे कोरडेच आता गाणे पानगळीच्या शय्येवरती !
उसवल
्या जखमांच्या ओलेत्या कौतुकाची पुरे झाली ना पारायणे
जिभेवर रेंगाळणाऱ्या गोडव्याचे निर्माल्य हे पानगळीच्या शय्येवरती !
नजरबंदीच्या अवलिया खेळात गुंफली कितीक हुमाने आसमानी
न उकलल्या नात्यांच्या गडद सावल्या या पानगळीच्या शय्येवरती !
अलबत गोजिरवाणा विसावा लाभला या अनादि अपार प्रवासात
नको हताश उसासे नि वांझ कैफियत मग पानगळीच्या शय्येवरती !