STORYMIRROR

Yogita Dashmukhe

Abstract

3  

Yogita Dashmukhe

Abstract

मुक्ता

मुक्ता

1 min
90

मला मुलगी झाली तर

तिचे नाव मी मुक्त ठेवीन!!!

मुक्ता -मुक्ता ज्ञानदेवाची नाही

मुक्ता-चांगदेवाची नाही

मुक्ता-बहिणाबाईंची नाही.

मुक्ता-माझ्या काळजाचा अंग

     माझ्या कुशीचा वंश

     माझ्यातून निघून माझ्यासमोर आलेली

     माझ्यातल्या मीची सावली झालेली

मुक्ता-मोठा नाही होता आलं

     तरी मुक्त हो....!!!

मुक्त हो स्त्री नावाच्या बंधनातून

कारण तू माणूस आहेस

मुक्त हो जगाच्या फसव्या व्युहातून

तुझं जग तुला घडवायचं आहे.

मुक्त हो बरबटलेल्या मुखवट्यातून

कारण तुला निष्पाप पिढ्या घडवायच्या 

मुक्त हो आभाळासारखी

 कारण आभाळाला कुंपण नाही

मातीशी मात्र इमान राख

कारण माझ्या नंतर तीच तुला कुशीत घेईल

मुक्त हो सागरासारखी

कारण सागराला बेड्या नाहीत

किनाऱ्याशी मात्र भांडू नको

कारण प्रत्येक लाटेचा विसावा तेथेच आहे

मुक्ता-जप माणूस पण मुक्तपणातलं

     जग माणूस पण मुक्तपणान

होशील कठोर, पण हरवू नको हळवेपणा तुझ्यातला 

जगून घे बेपर्वा जगाच्या गणिती शिवाय

हरवू नको संस्कारांचा कणही तुझ्या रक्तातला

मुक्ता माझ्यातली तू म्हणून सांगते तुला

पाठीशी नव्हतं कुणी मला

आता तुझ्या पाठीशी मी आहे

हाच वसा तुला धीराने सांभाळायचा 

तुझ्याच कुशीतून मुक्त माणसांच्या पिढ्या जन्माच्या आहे

तेव्हा लक्षात ठेव-

तुला वारसा चालवायचा आहे

एका कुशीच्या मुक्त पणाचा

इतिहास घडवायचा आहे

जगातल्या माणूसपणाचा

मुक्ता, मुक्ता राजा ऐकतेस ना

एका कुस न उजवलेल्या

आईचं गाऱ्हाणे


Rate this content
Log in

More marathi poem from Yogita Dashmukhe

Similar marathi poem from Abstract