STORYMIRROR

Akshay Gaikwad

Tragedy

3  

Akshay Gaikwad

Tragedy

मृत्युपत्र

मृत्युपत्र

1 min
278


१७ गुंठं जमीन,

लग्नाला आलेली पोर

पदराला सलाचं निखारं बांधून

साडे सात फेरं घेतलेली

माजी बाय,

सर्जा राजाची येक जोडी,

सावळ्या कौलांचं छप्पर,

आण् इमानीनं गंजलेलं नांगर,

असं हे एवढं माझ्या राशीला ए,

समदं कसं बैजवार,

तरी बी उद्याचा भरोसा न्हाय..!!


जमिनीचं तीन हिस्सं करा

एक माज्या पोरीच्या नावावर,

दुसरा माज्या बाईच्या,

आणि तिसरा सर्जा-राजाच्या..

मी गेल्यावर माझ्या मागं 

तसल्या धर्माच्या अघोरया 

इधी करू नका..

तशी अवयवदानाची 

लय्य विच्छा व्हती

पण आता ते बी जमायचं नाय !!

बाकी चंदनाच्या सरणाचा मोह हायच,

पर मोह आपल्या जिंदगीला पुजल्यालंच कुठं ?


माळ्यावर फाटलेल्या 

पानांची एक व्हई ए,

त्यात माज्या शिवारावर 

तोडक्या मोडक्या शब्दांनी 

लिहलेली येक कविता ए..

ती वही माळ्यावरून काढा 

त्याच्यावरचा धुराळा झटका 

आन् परत ती माळ्यावरंच ठिवा..

तिची जागा तिथंच ए !!


माझ्या पोरीचं शहरातल्या 

पोराबरोबर लगीन लावा,

पण शेतकऱ्याबरं लगीन लावून 

तिच्या सुद्धा पदराला 

सलाचं निखारं बांधू नगा.. 

माज्यावर असलेलं कर्ज 

माज्या बाईकडं मागू नका,

आण् मी तुम्हाला दिलेलं

कर्ज परतही करू नगा !!


इठ्ठला समोरचा दिवा इझू देऊ नगा,

सर्जा राजा ला जो पतुर

खायला घालता येतंय तो पतुर घाला,

जेव्हा जमणार नाही 

तेव्हा द्या रानावनात सोडून,

पण कसायाला इकू नगा..!

मी गेल्यावर वरसानं 

माझं पित्र घालू नगा,

आन् खिडकीबाहेर बसलेल्या या 

काळ्याला अवतानही धाडू नगा !! 


इतक्या लवकर हा परसंग येईल 

असं वाटलं नव्हतं,

पण इतकं बोलून

मी माझं मृत्युपत्र इथंच संपवतो !!


- एक सिरीयस कोरोनाग्रस्त 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy