STORYMIRROR

सुरेश तारे

Fantasy

4.5  

सुरेश तारे

Fantasy

मावळतीचे सोनेरी रंग

मावळतीचे सोनेरी रंग

1 min
12

उन्हात न्हालो, पावसात भिजलो, 
आता सावलीची ओढ आहे,
दिवसभराच्या कष्टांनंतरची 
ही संध्याकाळ खरंच गोड आहे. 

कपाळावरच्या आठ्या आता 
अनुभवांच्या रेघा झाल्या,
आयुष्याच्या पुस्तकातल्या 
कितीतरी गोष्टी साध्य झाल्या. 

खूप धावलो, खूप पळालो, 
सुटले मागे कितीतरी रस्ते,
आता उमजले, जे जवळ आहे, 
तेच आयुष्यात खरे असते. 

स्वार्थासाठी कधी भांडलो, 
कधी प्रेमासाठी रडलो होतो,
कधी शून्यातून जग उभं करायला, 
जिद्दीने नडलो होतो. 

लेकरांच्या हसण्यात आता 
स्वतःचं बालपण दिसतं,
त्यांच्या पंखात बळ येताना पाहून, 
मन कसं तृप्त असतं. 

घरच्या चौकटीत राबताना, 
कधी स्वतःलाच विसरलो होतो,
आज निवांत बसलोय तिथे, 
जिथे स्वप्नांसाठी विखुरलो होतो. 

केस पांढरे झाले तरी, 
मनाचा कोपरा अजून हिरवा आहे,
जुन्या मित्रांच्या गप्पांमध्ये, 
तोच जुना गारवा आहे. 

हातातल्या काठीपेक्षा, 
आठवणींचा आधार मोठा वाटतो,
मावळतीचा हा शेंदरी रंग, 
आता काळजात छान साठतो. 

नको आता कसली घाई, 
नको आता कशाची आस, 
उरलेला प्रत्येक क्षण, 
असावा जणू सुगंधी श्वास. 

मावळतीचा हा नूर जणू, 
कृतज्ञतेची एक ओळ आहे, 
आयुष्याची ही संध्याकाळ, 
खरंच खूप गोड आहे! 

आयुष्याची ही संध्याकाळ, 
खरंच खूप गोड आहे! 
____________________ 
सुरेश अनंत तारे🖋️ 
छत्रपती संभाजीनगर.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy