माणुसकी
माणुसकी
जगाकडे या नव्याने
चला बघूया जरासे,
दु:ख जाणूनी वंचितांचे
डोळ्यातूनी गळू जरासे...
भविष्य नागडे रस्त्यावर
विकासाकडे वळू जरासे,
अमाप भरली कोठारे
भुकेल्यांसाठी दळू जरासे...
बेलगाम स्वार्थास आपुल्या
जाणिवेतूनी टाळू जरासे,
मानवता उभी करण्या
आपणही मळू जरासे....
तथागतांच्या करुणेतूनी
दु:खालाही माळू जरासे,
अंधार आतला संपावया
स्वप्रकाशाने जळू जरासे....