जोडीदार
जोडीदार
दिवसाच्या साथीला राती,
दिव्याच्या साथीला वाती
अभंग तशीच सजना........
तुझी नि माझी प्रीती !।।धृ।।
आले सोडून आईबाप,
जणू भाताचे मी रोप
डोळ्यात सुखाची स्वप्ने......
नको उडवू माझी झोप ! (१)
नको बंगला आणिक गाडी,
नको मजला पैठणी साडी
दे प्रेम आणि सन्मान.......
घेऊ काळजी थोडी थोडी ! (२)
मुरलेली लोणच्याची फोड,
थोडी आंबट थोडी गोड
सोडून आपलाच हेका.......
करू दोघेही तडजोड! (३)
नको वचने सात जन्माची,
हवी साथ याच जन्माची
कधी हसणे अन् कधी रुसणे.....
वाढेल गोडी प्रेमाची ! (४)
या संसार वेलीवर,
भिरभिरतील फुलपाखरं
चिवचिवाट हा चिमण्यांचा......
गोकुळ होईल मग घर ! (५)
करू इतके समर्पण,
बघता एक दर्पण
एकमेकांच्या प्रतिबिंबाचे.......
बघ होईल दर्शन ! (६)
नाही करीत अपेक्षा फार,
तू जगण्याचा आधार
संसाररूपी विश्वात......
तू आदर्श जोडीदार ! (७)

