श्रावण धारा
श्रावण धारा
1 min
109
रिमझिम बरसती श्रावण धारा
कुपीत जतन करावा सारा
हा मृद्गंधाचा दरवळ न्यारा
साठवावा वाटे सुगंध प्यारा ।।१।।
रिमझिम बरसती श्रावण धारा
करती आवाहन जणू सप्तसुरा
विजेसवे मग नाचतो वारा
मन मोराचा फुले पिसारा ।।२।।
रिमझिम बरसती श्रावण धारा
नेसून हिरवा शालूच धरा
खेळे पंचमीचा झुला माहेरा
झोंबता वारा,आनंदाचा शहारा।।३।।
रिमझिम बरसती श्रावण धारा
प्रतीक्षा राखीची सहोदरा
बंधु माझा सुखदुःखाचा सहारा
विरघळल्या भावनेच्या गारा।।४।।
रिमझिम बरसती श्रावण धारा
मनात दाटलेला किती पसारा
मेघाच्या नयनी उतरती धारा
होई निरभ्र आकाशाचा चेहरा।।५।।
