बापाचा एकटेपणा
बापाचा एकटेपणा
हसू लागलो रडू लागलो
दिवस एकटा मोजू लागलो
उडून गेल्या मुक्त पाखरांची
उगाच अपेक्षा करू लागलो
पैसा झाला मोठा
नाही अर्थ रक्ताच्या नात्याला
जन्म घेतला म्हणून लावला
नायतर बाप ठेवला नावाला
लांबलाय रस्ता चालायला
पैशांची काठी आधाराला
नाही जमलं पण पैशाला
कसं रोखणार झुरणाऱ्या मनाला
बांधून नवीन घरटं
पाखरं लागली संसाराला
नाही अपेक्षा फार माझ्या फक्त
एकदा हाल विचार या बापाला
जपली तळहाताच्या फोडासारखी
वाढवली जी फुलासारखी
केला प्रयत्न बोलायचा तर
बोलू लागली न बोलल्यासारखी
झालीय सवय आता या अंधाराची
या भिंतीची या आसवांची
नाही इच्छा आता पुढच्या प्रवासाची
डोळ्यात आस आता परतीच्या प्रवासाची