बाई
बाई
बाई जगण्याचा आधार
बाई युद्धाचं कारण
बाई खोळंबा अडचण
बाई रंगमंच अकारण
बाई कुटूंबास शरण
बाई पुरुषाचं मरण
बाई ज्ञानेश्वरी नेक
बाई ग्यानबाची मेख
बाई अनाकलनीय गारुड
बाई एकनाथांचं भारुड
बाई सुखाची हिरवळ
बाई अत्तराची दरवळ
बाई शंकाच वारूळ
बाई घोंगावणार वादळ
बाई दुःखाचं माहेर घर
बाई मायेचा पदर
बाई शकुनीची चाल
बाई पुरुषाची ढाल
बाई सूर ताल लय
बाई गुंता तंटा भय
बाई वजा गुणिले प्रमेय
बाई सुमधुर कविता गेय
बाई पळण्याचा दोर
बाई वेदनेचे घर
बाई हसते खिदळते
बाई दिव्यापारी जळते
बाई संसार सावरते
बाई घरभर दरवळ्ते
बाई ताई माई आक्का
बाई मेनका उर्वशी रंभा
बाई मंथरा मंदोदरी
बाई इंद्र दरबार
बाई भांडते कांडते
बाई संसार मांडते
बाई फाटले सांधते
बाई होत्याचे नव्हते
बाई रामायण महाभारत
बाई अवघड घाट
बाई गंगा भगीरथ
बाई प्रेम त्याग समर्पण
बाई नाती सांभाळते
बाई नाती गुंढाळते
बाईविना जगणे थांबते
बाई सुई धागा होते
बाई हंबरनारी गाय
बाई दुधावरची साय
बाई समस्यांची जड
बाई समस्यांचा उपाय
बाई आकर्षणाचं मोहोळ
बाई अशांती अराजक अमंगळ
बाई सांभाळते सान-थोर
बाई समृद्ध जगण्याची अडगळ
