अवती भवती
अवती भवती
गावकुसाच्या वेशीमध्य,आनंदाने नांदत होती नाती गं
हरवून गेल्या शामल सुंदर,सांजवेळ च्या वाती गं
माणसाची पाहून रूपे,आज भेगाळली ही माती गं
असा कसा हा काळ बदलला,दुभंगल्या या जाती गं
सन्मानाने होता अविन्मुख आला, पाहुणा दारा गं
ना मागता ही मिळत असे, वाटसरूला थारा गं
चढताना ही थांबत नाही, आज वसुंधरेचा पारा गं.
असा कसा हा काळ बदलला, बदलत जातो वारा गं
उजळ भाळी शोभत होत्या, कष्टाच्या त्या धारा गं
दिसत नाहीत चिमण्यांनी, भरलेल्या त्या तारा गं
डोक्यावरचा कुठे हरवला, गवताचा तो भारा गं
असा कसा हा काळ बदलला,गाय शोधते चारा गं
स्वप्नाचा वाटतो काळ कालचा, आज पावलोपावली गं.
अवतीभवती आज पाहते, संशयाने ही सावली गं
मदतीला धावायचे हात हजारो, धावायचा गाव सारा गं
असा कसा हा काळ बदलला, आटला माणुसकीचा झरा गं.
