अश्रू
अश्रू
थांबवता आले तर थांबव तू
अश्रु त्या माऊलीचे!
जन्म दिलेल्या जननीचे
तुझ्या रे पूजनीय आईचे!!
वाढवले रे तुला गर्भात
भार सोसला नऊ महिने!
न्हानले, पाजले, खेळवले अन्
घावही सोसलेत कित्येक तिने!
पोटाचा गोळा म्हणून जपला
चटकेही तिनेच रे सोसले!
धरुन मायेचा पदर डोईवर
तुझ्या सर्व संकटाना रोखले!
शिकवले, वाढवले तुला
तुझे आयुष्य उजाळून दिले!
तुझ्या एका एका हट्टासाठी
तिने काळीजही ओवाळून टाकले!
तिचीच का रे परवड होते
आज तुझ्या नसलेल्या घरात!
आयुष्यभर तिने तुकडेच मोडले
तरीही तुकडे तोडते ती डोलात!
सुवासिनीचे मरण मागितले
तेही नाही दिले देवाने!
आयुष्याचा जोडीदार हिरावून
चटके दिले तिला कर्माने!
गरिबीने हसू दिलेच नाही
हसू झाले होते तिचे जगात!
माझ्या लेकराच्या जीवावर
म्हणे मी ही हसेल उद्या जोरात!
विरले रे ते स्वप्न माऊलीचे
जशी लक्ष्मी आणली तू घरात!
टीचभरही जागा उरली नाही
तिला तिच्या रे हक्काच्या घरात!
थांबली नाही, हटली नाही
मर्दानी सारखी वागली जगात!
साथ नव्हती येथे कुणाचीही तरी
हात टेकले नाही तिने कुणाच्या दारात!
त्या मर्दानीला घरच नाही
टाकले जाते आहे लांब डोलात!
काय वर्णावी महती श्रावणा तुझी
तुला आईच नको वाटते घरात!
तिच्या प्रेमाला उपमा नाही
तिच्या हृदयात ममता जीवंत असते!
कितीही वाहू तिच्या डोळ्यांतून धारा
तरीही ती तुझेच अश्रू पुसते!
