आयुष्य शोधताना..
आयुष्य शोधताना..
जीवनाच्या सोबत्याचा हात
हातून निसटला
ठेवली मी आस जयाची
डावच तो उधळला
स्वप्नांचे अश्रू झाले
अन डोळे झाले रिते
सूर आणि शब्द हरवले
हरवली जीवन गीते
आसवांच्या धारांनीच
कुंकू माझे पुसले
अन धुराळ्यात साऱ्या
संसार सुख झाकोळले
पक्ष्याची झाली शिकार
पिले पोरकी झाली
घरट्यातल्या पक्षिणीला
बिलगून घट्ट राहिली
दारिद्र्याची शुभ्र रेषा
रंगांनी होती दडवली
रंग वादळासवे उडाले
रांगोळी पांढरी उरली
चीतेसोबतच सख्याच्या
स्त्री म्हणून मी राख झाले
जगवण्या कोवळी स्वप्ने
पुन्हा आई म्हणून जन्मले
हाताचा चरखा झाला अन
नजरेपलीकडे हे पाय धावती
थांबायला वेळ नाही
जीवनचक्राने घेतली गती
