आज उद्याचा विचार...
आज उद्याचा विचार...
आज उद्याचा विचार?...फार झाले!
कालचक्रा आली गती
प्राण देहा नाकारती
जीव जीवनारती... भार झाले!
आली 'कोरोनाची' लाट
फुटे पावलांना वाट
आणि नदी नाले घाट... पार झाले!
नाही जीवनाची क्षिती
जगण्याची रणनीति
मग उपेक्षांचे किती... वार झाले!
सुटे धीराची संगती
झाला दीन मूढमती
आले नकार सोबती... यार झाले!
विश्वरूप विश्वेशाचे
हात झाले आधाराचे
तिथे डोळा आसवांचे... हार झाले!
मन जाईना माघारी
नको भाकरी चाकरी
निश्चयाचे वारकरी... ठार झाले!
खबर कानोकानी
आता भेटावे दुरुनी
बंद एकमेका झणी... दार झाले!
काळ सर्वांशी समान
राखावे हे अवधान
धुंडाळावे समाधान... सार झाले!
आता स्विकारले म्हणे
काही नवे काही जुने
जीवनावरी नव्याने... स्वार झाले!
अस्त उदयी साकार
येराझारा अनिवार
आज उद्याचा विचार?... फार झाले!