टपरीवाला
टपरीवाला
माणगावहून पुण्याकडे जाताना लागतो तो ताम्हिणी घाट. पावसाळ्यात ह्या घाटात निसर्ग आपल्य सौंदर्याचं अप्रतिम प्रदर्शन घडवतो. सर्वत्र हिरवंगार पसरलेला गवताचा गालिचा, डोंगरमाथ्याला टेकलेल ढग आणि वळणाच्या रस्त्याने उतरणाऱ्या गाड्या .ह्या घाटात पावसाळ्यात अनेक लोकं पर्यटक म्हणून येतात. सर्वत्र धबधबे आणि त्यात मजा
लुटणारे पर्यटक. असं म्हणतात इथे घाटात रस्ता होण्यापूर्वी जंगलाची पायवाट होती. माझे आजोबा सांगायचे त्या डोंगराच्या पलीकडे पुणे आहे. तिथले आदिवासी लोकं पायीच पुण्याला जायचे. पण हे जंगल खूप घनदाट असल्यामुळे गावातले लोकं ह्या रस्त्याने जायला घाबरायचे. अनेक आदिवासींना वाघाने किंवा काही जंगली प्राण्यांनी खाल्ल्याच्या गोष्टी इथे खूप प्रचलित होत्या. पण आत्ता सरकारने मोठा रस्ता बनवला आहे, सतत गाड्यांची रेलचेल असते.
सखाराम हा होता बिबवेवाडी गावात राहणारा एक गरीब माणूस. बिबवेवाडी म्हणजे ह्याच घाटातल्या डोंगरावर असलेलं एक गाव. गाव तसं रस्त्यापासून किमान ५ किलोमीटर आतमध्ये जंगलात होतं. रस्त्यापासून गावात जाणाऱ्या फाट्यावर सखारामने एक छोटीशी चहाची टपरी टाकली. बायको आणि हा दिवसभर टपरीवर असायचे, संध्याकाळ झाली की बायको गावात घरी निघून जायची. पावसाळ्याच्या मोसमात खूप पर्यटक असायचे म्हणून सखाराम संध्याकाळी अगदी ९ वाजेपर्यंत टपरी चालू ठेवायचा.
त्या दिवशी पाउस रिमझिम होता. श्रावण महिना... ऊन-पावसाचा खेळ दिवसभर चालू होता.संध्याकाळ होता होता संपूर्ण घाटात धुकं पसरलं. इतकं दाट की रस्त्याने जाणाऱ्या गाड्यापण कमी झाल्या. घाटात दूरदूर नजर टाकली की जाणवायचं अनेक गाड्या रस्त्याच्या बाजूलाच उभ्या आहेत. कारण त्यांचे लाईट हलेनासे होते. धुकंच एवढं दाट होतं. सखारामची बायको एव्हाना आपल्या घरी निघून गेली होती. संध्याकाळ झाली, अंधार पडायला लागला, सखारामने वर वाश्याला अडकवलेला पेट्रोमास काढला. खाली जमिनीवर बसला आणि पंप मारून तो पेटवला. वर स्टोव्हवर चहा उकळत होता. नजर टाकावी म्हणून तो उठला. समोर एक माणूस अंगावर घोंगडी घेऊन उभा होता. तो दिसायला एवढा विचित्र होता की सुरवातीला सखाराम मनातून घाबरला. पाऊस अजिबात नव्हता पण थंडगार वारा सुटला होता. त्या माणसाच्या घोंगडीला घाण वास येत होता. माणूस तसा तीस-पस्तीशीतला असावा. पण दिसायला एकदम विद्रूप.
काय कुठं निघालास? सखारामने आपल्या बोलक्या स्वभावाने विचारलं.
चहा दे रं... तो माणूस बोलला.
त्याच्याकडे बघून वाटत नव्हतं की तो पैसे वगैरे देईल.
४ रुपये होतील... सखाराम हळूच बोलला.
देतो रं...
सखारामने चहामध्ये चमचा घोटवला आणि बाजूलाच असलेल्या प्लास्टिकच्या कपमध्ये किटलीतून चहा भरला. हात पुढे केला हा घे...
त्या माणसाने घोंगडीतून हात बाहेर काढला. त्याचा हात बघून सखाराम घाबरला, त्याने पटकन हातात चहा असलेला आपला हात मागे घेतला आणि थोडा मागे सरकला...
हे हे काय... त्याचा हात म्हणजे फक्त हाडांचा सापळा होता आणि त्यामधून रक्त गळत होतं.
आरं आस्वलानं खाल्ला...
सखारामची बोबडी वळली. चहा दे रं...
सखारामने ग्लास पुढे टेबलावर ठेवला आणि तो पुन्हा मागे सरकला. त्या माणसाने तो ग्लास उचलला आणि सखारामकडे पाठ करून उभा राहिला. ह्याला समजेना नक्की हा काय प्रकार आहे. गावात आपण खूप ऐकलं होतं ह्या घाटात भुताटकीचे प्रकार आहेत.
आत्ता मात्र सखारामला घाम सुटायला लागला.
धारिष्ट करून त्याने विचारलं... कुठं कधी खाल्ला?
लय वारसां झाली.
अरे पण रक्त अजून गळतंय.
तो माणूस पुन्हा वळला आणि सखारामकडे बघून हसायला लागला. डोळे मोठे केले त्याने आणि अंगावरच्या घोंगडीत आत शिरला. आत्ता सखारामसमोर फक्त घोंगडी दिसत होती. त्यातला माणूस गायब झाला त्या घोंगडीत. सखाराम तसाच तिथून पळाला, रस्त्याने धावता धावता त्याची एक चप्पल पायातून निघायला आली, मागे वळून बघतो तर तो
हाडांचा सापळा ह्याच्या मागे उभा होता. जोरजोराने आजूबाजूच्या झाडांमधून विचित्र आवाज काढायला, जीव घेऊन सखाराम पळाला, धावतधावत धापा टाकत रस्त्याने बोंबलत "वाचवा वाचवा भूत भूत भूत वाचवा..." करत सखाराम कसाबसा घरी आला.
आल्याआल्या तो घरात शिरला आणि त्याने दरवाजा खाड करून बंद केला, वरची कडी लावली आणि घाबरून भिंतीला पाठ टेकून खाली बसला.
डोक्याला हात लाऊन काहीतरी तोंडातल्या तोंडात बडबड करत होता, बायको चुलीपाशी भाकऱ्या टाकत होती. ती पण झटकन उठली नवऱ्याजवळ आली.
तिने विचारलं, काय व काय झालं?
सखाराम म्हणाला, फक्त भूत भूत टपरीवर भूत भूत व्हतं टपरीवर...
काय झालं सांगा
सखारामने बायकोला झालेली हकीकत सांगितली.
पन ग्यासबत्ती तिथंच टाकून आलात काय, आनं स्टोव्ह पन तसाच टाकून आलात... आवं काय म्हनावं तुम्हाला... जावू दे, बायको म्हणाली
आपण सकाली जाऊन बघू...
दुसऱ्या दिवशी दोघेपण टपरीवर जायला निघाले. बायको रस्त्याने जाताना भेटेल त्या बाईला सांगत होती... भूत दिसलं काल टपरीवर, ग्यासबत्ती बी टाकून आलं तिकडं.
दोघेपण टपरीवर पोहोचले, समोर बघतात तर टपरीचा अर्धा भाग कोसळला होता, स्टोव्ह आणि टोपं खाली पडलेली, पेट्रोमासच्या काचेचा चुराडा झालेला, बाकडा रस्त्याच्या बाजूला गेला होता... त्या टपरीची संपूर्णपणे नासधूस झाली होती. पण त्या टपरीच्या जागेपासून पुढे रस्त्यापर्यंत जमिनीवर कोणाचं तरी रक्त सांडलेलं दिसत होतं. गावातल्या खूप लोकांना फाट्यापासून गावाच्या वेशीपर्यंत असे रक्ताचे सडे अधूनमधून दिसले होते, लोकं बोलायचे पण त्यांना वाटायचं एखाद्या प्राण्याने कोणाचीतरी शिकार केली असावी.
आत्ता दोघांनी पुन्हा नवीन टपरी टाकली आहे, पण गावाच्या फाट्यावर नाही, जवळच झालेल्या एका Restaurant च्या बाजूला. आत्ता सखाराम आणि त्याची बायको अंधार पडायच्या आधीच घरी निघून जातात.