विश्वासघात
विश्वासघात


सुनिल, एका खेड्यामधला एक होतकरू तरुण, जे खेडं आता हळूहळू शहरामध्ये रूपांतरित होत होते, त्याला कोणाच्या हाताखाली काम करायची इच्छा नव्हती, त्याला स्वतःचा धंदा करायचा होता.
गावात M.I.D.C. आल्यामुळे मुंबईवरून खूप लोकवस्ती यायला लागली होती, त्याने थोडासा अभ्यास केला आणि जाणवलं की चायनीजचे हॉटेल चांगले चालेल.. इन्व्हेस्टमेंट पण कमी होती. लगेच भांडवल उभे करून चायनीजचे हॉटेल सुरु केले. हॉटेल व्यवस्थित चालू झाले. मुंबईचे लोक जास्त असल्यामुळे ऑर्डर खूप प्रमाणात येत होत्या, सुनिलही मेहनत घेत होता. अशातच एके दिवशी एक मुलगी सायकलवरून हॉटेलमध्ये आली.
ती - "लॉलीपॉप मिळतील का?"
सुनिल- "हो मिळतील ना..."
ती -"एक प्लेट लॉलिपॉप आणि एक फुल्ल ट्रिपल राईस पाहिजे, किती वेळ लागेल?"
सुनिल -"20 मिनिट लागतील, तुमचे काही काम असेल तर करून या, तितक्यात मी बनवून ठेवतो."
ही पहिली भेट, त्यानंतर ती एक दिवस आड नेहमीच हॉटेलमध्ये येत होती. एक दिवस ती हॉटेलमध्ये चालत आली आणि ऑर्डर देणार तितक्यात सुनिलने विचारले - "आज चालत? सायकल कुठे आहे?"
ती -"अहो काय सांगू काल रात्री माझी सायकल चोरीला गेली... तुम्ही होम डिलिव्हरी करता का?"
"करतो ना..." सुनिलचे तात्काळ उत्तर, "तुम्ही घरी जा मी पार्सल पाठवतो, तुमचे नाव आणि ऍड्रेस द्या येईल पार्सल..."
ती -"माझे नाव स्वीटी." आणि हीच ती प्रेमाची सुरुवात...!
सुनिल स्वतः हॉटेलचा मालक असून स्वीटीच्या घरी डिलिव्हरी द्यायला जायचा. एक दिवस संधी साधून त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला.
सुरुवातीला फोन वरून चायनीजच्या ऑर्डर घेतल्या जायच्या, नंतर हळूहळू सुनिलला तिच्यावर प्रेम कधी झाले कळलेच नाही. सुनिल पूर्णपणे स्वीटीच्या प्रेमात बुडून गेला होता. पण तिला विचारायचे धाडस होत नव्हते, स्वीटीला देखील हे सर्व कळत होते पण ती सुनिलची विचारायची वाट पाहत होती. सुनिलच्या वागण्यातल्या फरकामुळे त्याच्या मित्रपरिवारामध्ये त्याच्या प्रेमाची चर्चा सुरु झाली होतीच.
स्वीटी तशी चांगल्या घराण्यातली होती, वडील रेल्वेमध्ये तर आई शिक्षिका होती. एकूण घरचे चांगले होते आणि मुख्य म्हणजे ती एकुलती एक होती. एक दिवस सुनिलने धीर करून तिला प्रपोज केला आणि ती त्याला हो म्हणाली..... सुनिलला तर त्यादिवशी अस्मान ठेंगणं झाले होते.... त्याने सर्व मित्रांना जंगी पार्टी दिली.
सुनिल आणि स्वीटीचे चोरून भेटणे सुरु झाले... कधी त्याच्या हॉटेलवर, कधी जवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यावर, कधी बाईकवर राउंड मारायच्या निमित्ताने तर कधी कधी लॉजवरसुद्धा...!
म्हणतात ना प्रेम जास्त वेळ लपून राहत नाही. तसेच झाले संपूर्ण एरियामध्ये लोक या दोघांच्या प्रेमाची वार्ता चघळायला लागले. पण इकडे सुनिल आणि स्वीटीला या सगळ्या गोष्टीची अजिबात फिकीर नव्हती, ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते.. खुश होते.
स्वीटी आणि सुनिल प्रेमात एवढे जवळ आले की एक दिवस नको ते घडले.... स्वीटीने सुनिलला फोन केला, "सुनिल मला या महिन्यात मासिक पाळी नाही आली... प्लीज काहीतरी कर..." सुनीलने मेडिकलमध्ये जाऊन प्रेग्नन्सी टेस्टची किट घेऊन स्वीटीला दिली, स्वीटीने टेस्ट केल्यावर कळले की ती प्रेग्नन्ट आहे...
ते दोघेही दुसऱ्या दिवशी भेटले, स्वीटी खूप घाबरलेली होती, सुनीलने तिला धीर दिला व म्हणाला, "तू घाबरू नकोस तसे पण आपण लग्न करणार आहोतच ना, आपण आता अबॉर्शन करू, माझ्या घरच्यांना सांगून आपल्या लग्नाची तारीख पक्की करतो..."
स्वीटी - "अबॉर्शन नको ना, आपलेच बाळ आहे ना? राहुदेत ना, तू तुझ्या फॅमिलीला समजाव..."
सुनील - "नाही नको त्यामुळे आपल्या दोघांच्या फॅमिलीचे नाव खराब होईल प्लीज तुला माझी शपथ आहे. आपण अबॉर्शन करूया..."
हो-ना करताना शेवटी स्वीटी तयार होते, सुनिल ओळखीच्या डॉक्टरकडे जाउन नाव नोंदवतो आणि अपॉइंटमेंट घेतो. अपॉइंटमेंटच्या दिवशी तो स्वीटीला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये जातो, ऍडमिट करण्याच्या आधी नर्स एक फॉर्म भरायला सुनिलला देते. सुनील टेन्शनमध्ये असल्यामुळे नर्सला तो फॉर्म भरायची विनंती करतो. नाव - वय -पत्ता -मोबाईल नंबर वगैरे माहिती भरल्यानंतर नर्स विचारते की, "हे पहिल्यांदाच अबॉर्शन करताय ना?"
सुनील - "हो..."
स्वीटी - "नाही... याआधीही माझे अबॉर्शन झालेय..."
नर्स डोळे विस्फारून दोघांकडे बघते... सुनिल रागाने स्वीटीकडे बघत असतो तर स्वीटीची नजर जमिनीकडे असते. स्वीटी सुनिलच्या नजरेला नजर न देताच सांगते, "माझे याआधीही अबॉर्शन झाले आहे... मला तुला सांगायचं होते पण तू सोडून जाईल याची भीती वाटत होती... मुंबईला माझे एका मुलावर प्रेम होते. मी प्रेग्नन्ट झाल्याचं समजल्यावर तो मला सोडून निघून गेला.. म्हणून माझ्या आई-पप्पानी माझे अबॉर्शन करून मला इकडे आणले... मला माफ कर..."
सुनिलने त्या फॉर्मवर सही केली आणि वॉशरूममध्ये जाऊन मनसोक्त रडून घेतलं, त्याला स्वीटीच्या आयुष्यात आधी काय घडले त्याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं, वाईट वाटले ते तिने ही गोष्ट लपवून ठेवल्याचं.
बाहेर येऊन स्वीटीला तो काहीही बोलला नाही तिला ऍडमिट केले... हॉस्पिटलचे होणारे बिल भरून तो निघून गेला तो कायमचाच..... परत तिच्या आयष्यात न येण्यासाठी.....