दुखावलेले मन
दुखावलेले मन


लॉकडाउन होऊन जवळ-जवळ 20 -22 दिवस झाले होते, घरात बसून कंटाळा आला होता, वर्तमानपत्र येत नसल्याने जुनी पुस्तके पुन्हा वाचून काढली. दुपारी वामकुक्षी घेणार तितक्यात मोबाईल वाजला बघितलं तर रिक्षा चालक जाधव काका (नाव बदलले आहे)फोन उचलला, काका भडकलेलेच वाटले, तसे काका खूप मनमिळाऊ आणी प्रेमळ, कधी चिडणं नाही,कोणी भांडत असेल तर प्रेमाने भांडण सोडवत म्हणून रिक्षा स्टॅन्डवर सगळ्यांचे लाडके. मी विचारले - "काय झाले काका? अचानक फोन?" काका :-" कुठे आहेस मनिष लवकर भेट जरा अर्जेन्ट काम आहे, बाकी भेटल्यावर सविस्तर बोलू", मी लगेच तैयार होऊन 2 मिनिटांवर असलेल्या काकाच्या बिल्डिंग मध्ये गेलो काका आणी त्यांची नर्स असलेली मुलगी गेट जवळ उभे होते, काका चेहेऱ्यावरून अजूनही चिडलेलेच, काकांना कारण विचारल्यावर मला देखील संतापजनक धक्का बसला.....
काकांची मुलगी ज्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करीत होती त्या हॉस्पिटल मध्ये कोरोनाचे रुग्ण ठेवले होते, ती आपली सेवा बजावून घरी येत होती तर सोसायटीमधल्या सुशिक्षित (?) लोकांनी तिला आत येण्यासाठी मनाई केली होती.. कारण सोसायटीमधल्या इतर लोकांनाही करोना होईल म्हणून.
माझे डोकं चक्रावले कारण काहीच दिवसांपूर्वी जाधव काकांनी आमच्या सोशल मीडियाच्या ग्रुप वरती डॉक्टर, नर्स, पोलीस आणी सफाई कर्मचारी ह्यांच्या साठी आभार म्हणून टाळ्या - थाळ्या वाजवताना आणी काही दिवसांनी पणत्या - मेणबत्ती लावताना त्याच सोसायटीचे फोटो टाकले होते! आणी आता?....... किती हा विरोधाभास?
सोशल मीडिया वर कोरोनाच्या संकटामध्ये सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किती गुणगान गायचे... आणी स्टेटस ठेऊन लाईक्स आणी कॉमेंट्स मिळवायच्या...आणी प्रत्यक्ष कृती...?
म्हणतात ना *शिवाजी पुन्हा जन्मावा पण शेजारच्या घरी* म्हण खरी ठरली त्या दिवशी.
आम्ही पोलिसांत तक्रार केली ते आले सोसायटीवाल्याना दम देऊन पुन्हा असे केल्यास कारवाई करू म्हणून निघून गेले,काकांची मुलगी घरी आली.... *पण*.... सोसायटीच्या प्रत्येक कामात - समारंभात उत्साहाने वय झालेले असूनही तरुणांना लाजवेल असे हिरारीने काम करणाऱ्या जाधव काकांचे मन दुखावलं गेले ते कायमचेच !... *"ह्या कोरोना मुळे आपले कोण ते कळलं रे मनिष "* काकांचे पाणावलेल्या डोळ्यांनी बोललेले शब्द माझ्या काळजात कायमचे कोरले गेले... !