Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

Niranjan Niranjan

Tragedy

3  

Niranjan Niranjan

Tragedy

वेडा बाळू - भाग दोन

वेडा बाळू - भाग दोन

8 mins
306


         त्या रात्री रावसाहेबांना झोपच लागली नाही. मनात बकुळाच्या आठवणींचा पूर आला होता. त्यांनी घड्याळात पाहिले. सकाळचे आठ वाजून गेले होते. बाळूदेखील गाढ झोपला होता. ती पेंटिंगमधली बाई त्याच्या स्वप्नात आली होती. ती बिछान्यावर पहुडली होती व बाळूकडे लडिवाळ हसत पाहत होती आणि बाळू एकेक पाऊल टाकत तिच्या जवळ जात होता. आता बाळू तिच्या अगदी जवळ आला होता इतक्यात त्याच्या पाठीत वेदना उसळली व पाठोपाठ रावसाहेबांचे तिखट शब्द त्याच्या कानावर आदळले. “भाsssssडया उठतोस की हणू अजून एक लाथ पाठीत!” रावसाहेब कडाडले, तसा बाळू पाठ चोळतच उठला व थेट स्वयंपाकघरात गेला व पाचच मिनिटात हातात चहाचा कप घेऊन आला. चहा पिल्यावर रावसाहेबांना जरा बरं वाटलं.


       रावसाहेबांच्या मनावर बकुळाने पूर्णपणे कब्जा केला होता. कित्येक दिवस त्यांना रात्री झोपच लागत नव्हती. रोज वेगवेगळी स्वप्न पडायची आणि मध्यरात्री अचानक जाग यायची. सगळ्या स्वप्नातला विषय एकच असायचा – बकुळा. सतत होणाऱ्या जागरणामुळे त्यांची तब्येत खालावली होती. आता त्यांना डॉक्टरांकडे जाण्यावाचून पर्याय नव्हता. इतक्या वर्षात सर्दी-खोकला सोडून त्यांना कसलाही आजार झाला नव्हता. पण हे काहीतरी भलतंच होतं.


        रावसाहेब तालुक्याच्या दवाखान्यात पोहोचले. त्यांनी डॉक्टरांना रोज रात्री पडणाऱ्या स्वप्नांबद्दल सांगितलं, अर्थातच बकुळाचा उल्लेख न करता. डॉक्टरांनी त्यांना झोप लागण्यासाठी काही गोळ्या लिहून दिल्या व थोडे दिवस या गोळ्या घेऊन बघा तरीही उपयोग नाही झाला तर मात्र तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं लागेल असं डॉक्टर रावसाहेबांना म्हणाले. औषधांचा योग्य तो परिणाम होत होता. आता स्वप्न पडायची थांबली होती व गाढ झोपही लागत होती. रावसाहेबांची तब्येतही आता बऱ्यापैकी सुधारली होती. 


       एक दिवस रावसाहेब व्हरांड्यातल्या खुर्चीत बसले होते. त्यांच्या एका हातात वर्तमानपत्र तर दुसऱ्या हातात चहाचा कप होता. त्यांना कसलातरी आवाज ऐकू आला म्हणून त्यांनी समोर पाहिलं. समोरून एक स्त्री चालत येत होती. त्या स्त्रीने अंगणात प्रवेश केला व ती थेट वाड्याच्या दरवाजापाशी येऊन आत पाहू लागली. तिला पाहताच रावसाहेबांच्या हातातून वर्तमानपत्र निसटलं. दुसऱ्या हातातला चहाचा कपही निसटून खाली जमिनीवर आपटून फुटला व कपातला चहा थेट दरवाजापर्यंत वाहत जाऊन त्या स्त्रीच्या पायांना टेकला. गरम चहाचा पायांना स्पर्श होताच तिने पाय झटकला. रावसाहेबांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. समोर बकुळा उभी होती ती सुद्धा जशी त्यांनी शेवटचं तिला पाहिलं होतं अगदी तशीच्या तशी. तिला पाहताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थरथरत्या हाताने त्यांनी डोळे पुसले. “मला आत बोलवनारे का हितच उभी करनार?” बकुळा ठसक्यात थोड्या लटक्या रागात म्हणाली. “ये ना.” रावसाहेब कसेबसे म्हणाले. बकुळा आत येताच रावसाहेबांच्या बाजूला खुर्चीवर बसली.


        रावसाहेब अजूनही धक्क्यातून बाहेर आले नव्हते. एका बाजूला त्यांना बकुळाला पाहून प्रचंड आनंद झाला होता पण तितकच आश्चर्यही वाटत होतं. बराच वेळ झाला तरी ते ते काहीच बोलेनात हे पाहून बकुळाच त्यांना म्हणाली, “तुमी कायच बोलनार नसाल तर मी जाते हितुन.” हे ऐकताच रावसाहेब अचानक जागे झाल्यागत म्हणाले, “नाही….नको जाउस तू!” “खरं सांगायचं तर तू परत आलीयेस यावर माझा विश्वासच बसत नाहीये आणि इतक्या वर्षांनंतर देखील तू एवढी तरुण कशी?” “तुमी मात्र लैच म्हातारं दिसाया लागलाय.” बकुळा म्हणाली आणि दोघेही खळखळून हसले. त्यांच्या गप्पा बराच वेळ चालू होत्या. शेवटी बकुळा म्हणाली, “आता मला निघाय पायजे.” “एवढ्यात निघालीस?” रावसाहेब थोड्या नाराजीच्या सुरात म्हणाले. “उद्याला परत येत्येकी” असं म्हणून बकुळा खुर्चीतून उठली व वाड्याबाहेर पडली. रावसाहेब तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात खुर्चीत बसून राहिले. ते मनाने पुन्हा तरुण झाले होते. 


        बाळू रावसाहेबांना शोधत व्हरांड्यात आला. अजूनही रावसाहेब खुर्चीत बसले होते. त्यांच्या चेहेऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. ते स्वतःच्या मनोविश्वात हरवले होते. “मम्माल्लक जेववववन.” बाळूच्या आवाजाने ते भानावर आले. त्यांनी हातातील घड्याळात पाहिले दुपारचा एक वाजला होता. त्यांनी बाळूच्या हातात पैसे दिले आणि त्याला दुकानातून श्रीखंड आणायला सांगितले.


        दुसऱ्या दिवशी सकाळी रावसाहेब नेहमीप्रमाणे व्हरांड्यात चहा पित बसले होते. आजही त्यांच्या हातात वर्तमानपत्र होतं पण त्यांचं सारं लक्ष समोरच्या रस्त्याकडे होतं. बकुळा आज पुन्हा येईल असं त्यांना मनोमन वाटत होतं. तिचीच वाट पाहत ते बसले होते. मात्र त्यांना फार वेळ वाट पहावी लागली नाही. पैंजणाचा आवाज येताच त्यांनी हातातील चहाचा कप खाली ठेवला व ते खुर्चीवरून उठले. समोर दारात बकुळा उभी होती. ती आत येऊन खुर्चीवर बसली. रावसाहेबही बाजूच्या खुर्चीवर बसले. दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. अचानक बकुळा म्हणाली, “रावसाहेब एक विचारू का?” “विचार ना?” “तुमी लगीन का केलं नाय?” “तू गेलीस आणि दुसऱ्या कोणा मुलीशी लग्न करायची मला इच्छाच झाली नाही?” रावसाहेब अगदी सहजपणे बोलून गेले. 


       रस्त्यावरनं जाणारे लोक वाड्यापाशी येताच आत डोकावून पाहत होते. व्हरांड्यात खुर्चीवर बसून बाजूच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहून एकटच बोलणाऱ्या रावसाहेबांना पाहून हसत होते व पुढे जात होते. एक मात्र खरं होतं, रावसाहेबांना इतकं आनंदाने हसताना यापूर्वी कोणीच पाहिलं नव्हतं. 


       रावसाहेबांना वेड लागलंय ही बातमी आता गावभर पसरली होती. कोणी म्हणे बकुळाच्या आत्म्याने त्यांना पछाडलं आहे तर कोणी म्हणे वेड्या बाळूसोबत इतकी वर्षे राहिल्यामुळे रावसाहेब वेडे झाले आहेत. इतकी वर्षे लोक ज्या वाड्याला रावसाहेबांचा वाडा म्हणून ओळखायचे त्या वाड्याला ‘वेड्यांचा वाडा’ हे नवं नाव मिळालं. गावातले लोक आपल्याबद्दल काय काय बोलतात ते रावसाहेबांना कळत होतं पण आता त्यांना कशाचीच फिकिर राहिली नव्हती. त्यांच्या जगात फक्त एकाच व्यक्तीला स्थान होतं, बकुळाला. त्यांना वेडा न समजणारी गावात फक्त एकच व्यक्ती होती, ती म्हणजे वेडा बाळू. कारण तो स्वतःच वेडा होता.


       गज्याला रावसाहेबांची फार काळजी वाटत होती. त्याने रावसाहेबांना भेटायचं ठरवलं. तो जेव्हा वाड्यावर पोहोचला तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. समोर रावसाहेब त्यांच्या नेहमीच्या खुर्चीवर बसले होते. ते बाजूच्या खुर्चीकडे पाहून बोलत होते. मध्येच ते मोठमोठ्याने हसत होते. गज्या तिथून जाणार होता तेवढ्यात त्यांनी गज्याकडे पाहिलं व ते गज्याला म्हणाले, “अरे गजा ये ना. अरे बकुळा परत आलीय थांब तुला तिला भेटवतो.” असे म्हणून ते खुर्चीवरून उठले. गज्या नाईलाजाने आत आला. रावसाहेब समोरच्या रिकाम्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाले, “ओळखलस ना हिला. ही बकुळा.” गज्या काहीच बोलला नाही ते पाहून रावसाहेब म्हणाले, “अरे लाजतोस काय असा बोल की तिच्याशी.” अजूनही गज्या काहीच बोलत नाही हे पाहून त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहात ते म्हणाले, “जरा लाजतोय तो.” “रावसाहेब मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. जरा आतल्या खोलीत चल.” असे म्हणून गज्याने रावसाहेबांना ढकलतच आत नेले.


आत येताच तो रावसाहेबांना म्हणाला, “हे बघ रावसाहेब आता मी काय सांगतोय ते अगदी शांतपणे ऐकून घ्यायचं.” रावसाहेबांनी नुसती मान हलवली. गज्या पुढे बोलू लागला – “बकुळा परत आलेली नाही. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. ती फक्त…” “अरे पण ती रोज इथे येते. माझ्याशी गप्पा मारते. ती खरच परत आली आहे.” गज्याला मध्येच अडवत रावसाहेब म्हणाले. “आधी माझं पूर्ण ऐकून घे मग तुला काय सांगायचंय ते सांग.” एवढे बोलून गज्या पुढे बोलू लागला, “रावसाहेब, जसं आपलं शरीर आजारी पडतं तसं आपलं मनही आजारी पडु शकतं. यात चुकीचं कींवा लाज वाटण्यासारखं काहीच नाही. तू तुझं बहुतांश आयुष्य एकट्याने जगला आहेस. आता उतारवयात माणसाच्या शारीरिक गरजा जरी कमी झाल्या तरी भावनिक गरजा तितक्याच वाढतात. तुझं बकुळावर किती प्रेम आहे हे साऱ्या गावाला माहित आहे आणि या प्रेमामुळेच तुला तिचे भास होतायत. जर बकुळा खरच परत आली असती तर ती मला, गावातल्या इतर लोकांनाही दिसली नसती का?”


“मला वेड लागलं आहे असंच तुला म्हणायचं आहे ना?” रावसाहेब उदासपणे म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य जाऊन चेहेरा जास्तच उदास दिसत होता. “तसं मला म्हणायचं नाही पण तुला मानसोपचाराची गरज आहे हे मात्र खरं.” गज्या समजावणीच्या सुरात म्हणाला. आता रावसाहेब चांगलेच संतापले व म्हणाले, “असं बायकांसारखं अडून काय बोलतोस सरळ सांग ना की मला वेड लागलंय !” आता गज्याचाही संयम सुटला व तो बोलून गेला, “होय तुला वेड लागलंय, बकुळापायी ठार वेडा झालायस तू.” असे म्हणून गज्या पाय आपटत तिथून निघून गेला. रावसाहेबांचा संताप अनावर झाला होता. बराच वेळ त्यांचं अंग थरथरत होतं. नेमका तेव्हाच बाळू हातात जेवणाचं ताट घेऊन रावसाहेबांसमोर आला. त्याच्या चेहेऱ्यावरच ते वेडगळ हसू पाहून तर रावसाहेबांना अजूनच राग आला. “मला हसतोस!” असे म्हणून त्यांनी थरथरत्या हाताने बाळूच्या कानाखाली लगावली. त्या धक्क्याने बाळूच्या हातातलं ताट खाली पडलं व ताटातले सर्व पदार्थ जमिनीवर पसरले. 


           रावसाहेबांचं वेड हे गावातल्या उनाड मुलांसाठी एक करमणुकीचं साधन झालं होतं. ते रोज वाड्यासमोरच्या झाडामागे लपून रावसाहेबांचे वेडे चाळे पाहत चेष्टा मस्करी करत बसायचे. रावसाहेबांची त्यांच्याकडे नजर जाताच तीथून पळ काढायचे. या मुलांनी रावसाहेबांना चांगलंच भंडावून सोडलं होतं. एक दिवस ते बकुळाला म्हणाले, “आपण इथे नको भेटायला. आपल्याकडे सारखं कोणतरी पाहतंय असं मला वाटतं. इथून पुढे आपण नदीकाठी भेटुयात. उद्या पहाटे सूर्योदयापूर्वी नदी काठावर ये.” बकुळाही तिथे भेटायला तयार झाली. 


           दुसऱ्या दिवशी पहाटे ठरल्याप्रमाणे रावसाहेब नदीकाठावर पोहोचले. थोड्याच वेळात बकुळाही तिथे पोहोचली. इथे त्यांना कोणाचाच त्रास नव्हता. अजून उजाडायचं होतं. रावसाहेब बकुळाला म्हणाले, “तुला आठवतय का या इथेच मी पहिल्यांदा तुझ्या ओठांचं चुंबन घेतलं होतं.” हे ऐकून बकुळा लाजली आणि तिने दोन्ही हातांनी स्वतःचा चेहेरा झाकून घेतला. “एवढी काय लाजतेयस!” रावसाहेब म्हणाले आणि त्यांनी हळूच बकुळाचे हात अलगदपणे तिच्या चेहेऱ्यावरून हटवले. बकुळाचा चेहेरा लाजून लाल झाला होता. रावसाहेबांनी तिचा नाजूक चेहेरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरला व ते तिच्या ओठांचं चुंबन घेण्यासाठी थोडं पुढे झुकले, इतक्यात “ए वेड्या” हे शब्द त्यांच्या कानांवर आले आणि त्यांचा रसभंग झाला. काही अंतरावर गावातली टारगट मुलं उभी होती व ती रावसाहेबांकडे पाहून एकमेकांशी काहीतरी बोलत होती व फिदीफिदी हसत होती. हे पाहून रावसाहेब चांगलेच संतापले आणि त्या मुलांच्या दिशेने पळत सुटले. पण थोडं पुढे गेल्यावर रावसाहेबांना धाप लागली आणि ते तिथेच खाली बसले. उनाड मुलं आता पळाली होती. थोडा दम खाल्यावर रावसाहेबांनी मागे वळून पाहिले पण बकुळा कुठेच दिसत नव्हती. निराश मनाने रावसाहेब परत वाड्यावर आले. 


        दुसऱ्या दिवशी देखील ते नदीकाठावर गेले. त्या टारगट मुलांकडे लक्ष द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. काहीही झालं तरी संतापायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. काही वेळातच बकुळा तिथे आली. “तुमास्नी येक सांगायचं हुतं.” आल्याआल्या ती रावसाहेबांना म्हणाली. आज ती फारच गंभीर दिसत होती. “मग बोल की! वाट कसली बघतेस!” रावसाहेब म्हणाले. “बाळू आपला पोरगा हाय.” “काssssय?” रावसाहेब जवळजवळ किंचाळले. स्वतःला सावरत ते पुढे म्हणाले, “काय बोलतीयेस तू? तुझं तुला तरी कळतंय का?” “व्हय, मला चांगलं कळतंय, बाळू तुमचा नी माजा पोरगा हाय?” बकुळा अतिशय शांतपणे म्हणाली. “अगं पण कसं शक्य आहे. तो वेडा बाळू माझा मुलगा कसा असेल?” रावसाहेब वैतागून म्हणाले. “ठिकाय तुमचा माज्यावर इश्वास नसल तर म्या इथून जाते.” असे म्हणून बकुळा जाऊ लागली. “थांब.” रावसाहेबांचे शब्द ऐकताच ती थांबली. “तू जाऊ नकोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.” एवढे बोलून रावसाहेबांनी बकुळाच्या कंबरेला विळखा घातला व तिला मिठीत घेऊन ते हुंदके देउ लागले. 


(क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Niranjan Niranjan

Similar marathi story from Tragedy