Neelima Deshpande

Tragedy Others

3  

Neelima Deshpande

Tragedy Others

वाट पाहणारे दार ©®

वाट पाहणारे दार ©®

7 mins
121



ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. असे असले तरी कुठेही हे दर्शवण्याचा प्रयत्न नक्कीच नाही की, जगात सगळीकडे असेच घडते. एकविसाव्या शतकाकडे जात असताना अनेक 

पालक मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद करत नाहीत आणि तो करूही नाही. खरतर ही 

गोष्ट फार पुरातन काळात सुद्धा ज्यांना समजली होती, त्यांनी तेव्हाही तसा भेदभाव केलेला नव्हता, हे मी जाणते. पण तरीही कधीतरी, कुठेतरी... समाजात आपण अशा घटना ऐकलेल्या, पाहिलेल्या किंवा जवळून अनुभवलेल्या असतात. त्यांना शब्दबद्ध केले आहे. अशा काही कथा/कविता यानंतरही प्रकाशित केल्या जातील. त्यामुळे वाचकांनी...त्यांना जगातील काही अपवाद समजून अशा कथांना कवितेला फक्त साहित्य समजून वाचावे व त्यातील फक्त चांगल्या गोष्टी आणि त्या कथेतील पात्राची/ व्यक्तिमत्त्वाची पुढे जाण्याची जिद्द आणि कष्ट लक्षात घेऊन फक्त तीच गोष्ट जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे याची खात्री बाळगावी. 


आज लग्नानंतरच्या दिवाळीचा तिचा पहिला पाडवा! त्यामूळे अगदी आतुरतेने ती सकाळ पासून सारखी दार उघडून बाहेर तिला घ्यायला कुणी माहेरहून आले आहे का? हे बघतं होती. पण संध्याकाळ झाली तरी कुणी आले नाही. अगदी रडवेली होऊन ती मग दाराशीच वाट पहात उभी राहिली. इतकी वर्ष झाली तरी तिला तिच्या काही प्रश्नांची उत्तरं सापडली नाहीत.


दुसरी मुलगी झाली यात तिचा काय दोष होता ? तिच्या आई वडीलांनी पहिली लेक झाली तेंव्हा तर सगळे लोक म्हणाले, ” पहिली बेटी धनाची पेटी !”


बापाने आणि आईने पहिल्या लेकिला जपली. ती दिसायला छान होती अगदी गोरी पान आणि नाजुक. तिच नाव खुप लाडाने शुभ्रा अस ठेवल त्यानी. ओठ लाल चुटूक आणि चाफेकळी नाक. आई बापाची लाडा ची लेक होती ती. मुलगा व्हावा यासाठी ते वाट पाहत असताना लवकरच मग दुसऱ्या बाळाची चाहूल लागली आणि नेहमीप्रमाणे सगळे लोक बोलायला लागले,


“आता मुलगा व्हावा म्हणजे वंशाला दिवा मिळेल” म्हणून. पण दैवाला काही वेगळेच चित्र दाखवायचे होते. दुसरी मुलगी झाली ही बातमी मग…."दुसरीही मुलगीच झाली !"….


अशी काही जणू संकट आल्या सारखी पसरली. बापानं सहा महिने तोंड पाहिले नाही की बारशाला ही आला नाही. आठ, नऊ महिने झाले तेंव्हा माहेरचेच मग सोडायला आले, तिला, तिच्या आईला आणि मोठ्या शुभ्राला. जन्मभर मग एक आवडती शुभ्रा आणि एक नावडती निशां अशा दोन्ही लेकी एकाच घरात पण 

अगदी वेगळ्या प्रकारच्या वागणूकीत मोठ्या झाल्या.


जेम तेम सहा महीने निशा आई वडीलांच्या सोबत राहू शकली. तान्ह्या बाळाला सगळे आपल्या पेक्षा जास्त बघायला येतात आणि लाड करतात हे काही शुभ्राला सहन होत नव्हते म्हणून ती मग बाळाला त्रास देऊ लागली. खेळणी लपव, हलकेच हात मार नाहीतर उगाचच काहीतरी मोठे आवाज काढ. आजवर घरात नेहमी तीच केंद्रस्थानी असल्याने आता बाळाचे म्हणजे निशाचे जराही लाड झाले की शुभ्रा रडायला सुरुवात करायची.


एकदा तिने रडून ताप काढला आणि वडीलांनी निर्णय घेतला……एक वर्षा पेक्षाही छोट्या निशाला आजी कडे पाठवण्याचा! ती लहान होती त्यामुळे तिला काही कळत नसल्याने आपण आजीकडे पाठवू असे ठरले. “शुभ्राला आता सवय झाली आहे आमची आणि ती तब्येतीने पण नाजुक आहे तेंव्हा तिला आम्ही सांभाळतो आणि तुम्ही निशां ला मोठ करा” सांगून त्यानी तिला तिच्या आजीच्या म्हणजे तिच्या आईची मावशी जी नर्स होती तिच्याकडे नेऊन सोडले कुणाचेही न ऐकता.


नर्स आजी बाल विधवा होती. तिला मुल बाळ नसल्यामुळे निशां च्या आईलाही त्यानीच लहान पणा पासून सांभळले होते आणि लग्नं पण तिनेच लाऊन दिले होते. आजीने निशा ला खूप छान सांभाळले आणि आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला. चांगल्या सवई लावल्या. सगळया भाज्या खायला आणि नीट नेटक छान रहायला, वागायला शिकवले. काही वर्षानी नर्स आजी सेवानिवृत्त झाली.


शाळेत नाव घालण्यासाठी आजी निशाला घेऊन तिच्या आई वडिलांकडे शहरात आली. निशाने कधीच तिच्या आई – वडीलांना बघितले नव्हते कारण ते मधल्या काळात कधी आलेच नव्हते पाच- सहा वर्षात तिला भेटायला.


निशांला घेऊन आजी जेंव्हा पहिल्यांदा शहरात आली त्यावेळी त्यांना घरी न्यायला निशाचे वडील आले होते बस स्टँड वर. पण निशा त्यांच्या कडे ओळख नसल्याने गेलीच नाही. निशाला त्या सगळयाची सवय लागे पर्यंत आपल्याला आता थांबावे लागेल हे आजी च्या लक्षात आले होते. वडील सुद्धा निशाला बघुन हसले आणि म्हणाले, ” ही एकदम गावाकडची वाटते आहे.” घरी आल्यावर आजीला ते तसे का म्हणत होते हे लक्षात आले.


शुभ्राचे केस बॉब कट केलेले होते आणि शहरात शोभेल अशा छान फ्रॉकमध्ये ती होती तर आजीने निशांला दोन वेण्या घातल्या होत्या त्याही वर लाल रिबनने बांधून आणि फ्रीलचा, मोठ्या फुलांचे डिझाईन असलेला फ्रॉक घालून आणले होते.


तिचा थोडा सावळा रंग आणि वेगळं रुप बघितलं आणि शुभ्रांने तिला बहिण म्हणून स्वीकारन तर दूर उलट चिडवायला सुरुवात केली होती. त्या दिवशी खर तर पहिल्यांदा शुभ्राला समजावल गेल पाहिजे होत पण त्या वेळी आई वडीलांचा तिला पाठिंबा मिळाला.


आजी समजावत असताना त्यानी थांबवले आणि नेहमीप्रमाणे “शुभ्राच्या नाजुक तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे, ती मनाला चट्कन लावून घेईल आणि आजारी पडली तर कसं सांभळणार?” म्हणत तिला पाठीशी घातले ते कायम तसे राहिले आणि निशां मग आयुष्यभर आई वडीलांच्या प्रेमाला पारखी झाली. त्यांचे दोन गोड काळजीचे आणि कौतुकाचे बोल ऐकण्यासाठी झटत राहिली.


शुभ्रा आणि निशांला काही वर्षानी एक भाऊ झाला. आणि सगळे आनंदले. घराण्याला कुलदीपक मिळाला होता. त्याचे नाव थाटात बारसे करुन भूषण असे ठेवले.


आजी मग तिथेच राहीली ह्यां सगळ्याना सांभाळायला आणि आपल्या निशां च्या प्रेमा पोटी.

शुभ्रा वडिलांचा जीव की प्राण होती आणि छोटा भाऊ भूषण हा आईचा अत्यंत लाडका. खुप वेळा निशाला तिच्या रंगा वरुन नाहीतर काहीही बहाणे काढून चिडवलं जायचं, “कधी काळी तर कधी भिकारनीने आमच्याकडे सोडून दिलेली !” अस म्हणत हिणवल जायचं. आजी आई वडील देखील यावर काही न बोलता गप्प बसले की निशा बिचारी आजीकडे बघायची. आजी मग “सगळ खोटं आहे” हे सांगून निशाला शांत करायची. असं नेहमीच घडत असे. मिळणारी वागणूक पण तशीच होती मग निशां एकटं बसून विचार करी यांच मन कस जिंकता याचा.


त्या दोघी खेळायला बाहेर गेल्या की शुभ्रा खेळून घरी परत यायची वडील येण्याच्या आधी आणि निशा मात्र कायम बोलणे ऐकून घेत होती आणि घराबाहेर अंगठे धरुन तास भर तरी रोज बाहेर उभी रहायची. आजी मग वडिलांना जाऊन समजावत असे आणि तिला घरात घेई.


एकदा मग आजीच्या सांगण्यावरून निशां खेळायला गेलीच नाही आणि सगळा प्रकार घरच्यांच्या लक्षात आला. रोज स्वतःचे डाव खेळून झाले की शुभ्रा लपून पळून घरी यायची आणि मग निशाला शुभ्रा ने अर्धवट सोडलेला डाव पुर्ण करण्यासाठी आणि तिच्या बहिणीचा खेळात न दिलेला राज्य देण्यासाठी सगळे पकडून ठेवत. डाव पुरा केल्याशिवाय घरी सोडत नसत.


रोज सारखी शुभ्रा त्या दिवशी पळून आली आणि तिच्या पाठोपाठ सारे तिच्या घरा बाहरे जमले. वडीलाना सारे लक्षात आले होते तरी त्यानी हेच म्हटले की, "शुभ्रा मोठी आहे पण नाजुक आहे. तिची काळजी कायम निशालाच घ्यायची आहे लहान असली तरी आणि तिला मोठ्या बहिणीचा मान ही द्यायचा कायम!"


जन्माने भावंडात तुम्ही 'मधले' असाल तर तुम्हांला नेहमी झुकावच लागत.मोठे भावंड असो की लहान कुणालाच तुम्ही काम सांगू शकत नाही कि रागवू शकत नाही!आणि इथे तर ‘दुसरी मुलगी’ बनून निशाने तिचे सगळे हक्क अगदी सहज जे बालपणी सगळ्यांना मिळतात ते ही गमावले होते.


नवा ड्रेस असो वा ईतर काहीही,…. आधी निवड करण्याची संधी शुभ्राला मिळायची आणि नंतरही तिला वाटले तर ती परत निवड केलेले बदलू शकते अशी मुभा होती तिला. या भौतिक गोष्टीत रमण्यापेक्षा मग निशां ने स्वतः ला सिध्द करण्याची संधी शोधत मेहनत घेणे चालू केले.


तिने शाळेत सर्व स्पर्धां मधे भाग घेण्याचे ठरवले. त्यातून तिला ‘ती’ कशात उत्तम आहे हे समजले. अभ्यासा बरोबर बऱ्याच गोष्टीत निशां नाव कमवत होती. शाळेत आणि घरीही आता तीने तिची दखल घ्यावी इतपत बाजी मारली होती. आणि हळूहळू आता ती आई वडीलांच्या अपेक्षा पूर्ण करणारी लेक बनली तिच्या कष्टाने!


भूषण त्या दोघीच्या मानने बराच लहान होता. त्याला सांभळणे, दळण आणणे, सायकल वर जाऊन दूर असणाऱ्या लायब्ररीतून पुस्तके बदलून आंणने, बँकेत जाऊन आजीची पेन्शन घेऊन येणे, पहाटे थंडीत जाऊन दूध घेऊन येणे, पाणी भरायला मदत करणे अशी बरीच काम निशां करु लागली. लहान भावाचा अभ्यास घेणे असो वा धुणी भांडी करणे असो ती कशातच मागे राहीली नाही.


मागे राहुन गेलं ते फक्त तिचे घरात कौतुक होणं!


या सगळ्या प्रकारात आणि काम करण्यात ती स्वयंपाक घरात मदत करू शकत नव्हती कारण वेळा जमून यायच्या नाहीत कधीच. बाहेर ची काम आटोपून येणे होइपर्यत शुभ्रा आईला पोळी करायला मदत करायची.


अस म्हणणं योग्यच आहे की, “एखाद्या च्या मनात शिरण्याचा रस्ता त्याच्या पोटातून जातो!”..तो रस्ता नेमका शुभ्रा ने मिळवला होता. त्यामुळे तिचे खुप कौतुक व्हायचे. ‘Survival of the fittest’ हा नियंम यांच्या घरात ‘Survival of the weakest’ मधे बदललेला होता. म्हणूनच स्वयंपाक घरात न मदत करण्यावरुन निशांला खूपदा बोलणी बसत. विषय वाढत जात इथपर्यंत जाई की,


" निशां चे लग्नं कसे जमेल? ना रंग ना रुप…स्वंयपाक पण येत नाही…सासरी काय हिचा बाहेरची सारी काम करता येतात म्हणून सत्कार करतील?”…..आणि असे बरेच काही! पण एव्हाना निशां पक्की झाली होती. काहीएक मनाला लावून घेत नव्हती. आजवर तिला, “आळशी,लोक-धार्जिनी, शिकवणाऱ्या मैडम ते थेट हिटलर” अश्या अनेक उपाध्या घरात सगळ्यांच्या कडून मिळाल्या होत्या.


एकटी आजीच होती जिला निशाचे खुप कौतूक होते. ती स्वतः खूप कष्टाळू होती. तिच्या काळात ती बालपणीच्या सुखी जगात न रमता आणि बालविधवा झाल्यावरही घरात इतरांवर अवलंबून न रहाता शिक्षण घेवून ती नर्स आणि नन्तर डॉक्टर झाली होती. शिक्षणाचे आणि बाहेरची कामे करता येण्याच महत्व तिला चांगलेच ठाऊक होते.


ती मात्र शांतपणे सगळ्याचे ऐकून बोलायची, " निशां च्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका. एखादा राजकुमार येईल तिला न्यायला. तिचे गुण कळतील असचं घर मिळो तिला…माझा मनापासून आशीर्वाद आहे तसा! तुम्ही आधी मोठीच्या लग्नाच बघा आणि पैसा साठवा हुंड्या साठी. निशा तिच्या स्वतच्या लग्नाचाही खर्च करेल इतकं कमवेल लग्नाआधीच! आणि नंतरही गरज पडली तर घरी स्वयंपाक करायला माणूस ठेवल. तुम्हाला सर्वाना पण तीच सांभाळेन शेवटी हे लक्षात ठेवा! ते लेकरू जन्मभर तुमच्या प्रेमा साठी आणि मायेसाठी धडपडत आहे पण तुम्हाला तिची किंमत कदाचीत ती दूर जाईल तेंव्हाच कळेल. एक दिवस ती इतकी मोठी होइल की तुम्ही वाट पहाल तिने तुमच्या साठी परत याव तुमच्या जगात म्हणून. जेंव्हा असा दिवस येईल त्या वेळी ती बांधलेली असेल तिच्या कर्तव्यानी आणि घेरलेली असेल तिच्या वर जीव ओवाळून टाकणाऱ्या माणसानी.! कधी हे आठवल तर मोठेपणा दाखवा मनाचा आणि कबूल करा की निशां ही तुमच्या घरातला मुलगा आहे. मुलगी, आणि तेही नको असलेली दुसरी मुलगी असूनही तिने सगळे कर्तव्य पूर्ण केले आणि शेवट पर्यंतही करेल याची खात्री आहे तुम्हाला म्हणून! इतकं एकदा जरी करू शकलात तरी निशां खुप आनंदी होइल मनापासून…जितकी ती आजवर अनेक पदव्या आणि पुरस्कार मिळवूनही झाली नसेल.”


शेवटच हे बोलता बोलता आजीने जगाचा निरोप घेतला.


आजीच्या जाण्याने निशाच्या आयुष्यात खुप मोठी पोकळी निर्माण झाली होती. पण स्वत:ला घडवण्यात आणि कर्तव्य पूर्ण करण्यात तिने स्वत:ला बुडवून टाकले. मोठ्या बहीणीच्या लग्नाची सारी काम आणि जमेल ती आर्थिक मदतही तिने केली. सर्वाना आपलं करुन घेण्याचा हा प्रयत्न सफल झाला.


नन्तर तर घरात सगळं तीच बघत होती. सुरुवातीची नोकरी आता तीने बदलली आणि एका मोठ्या पदावर चांगल्या कंपनीत ती सन्मानाने प्रमोशंनस मिळवत आजीने भाकित केले होते तशी खुप व्यापून गेली होती.


तिची प्रसिद्धी एव्हढी झाली होती की खरचं एक रुपया ही हुंडा न घेताआणि तीच रुप आणि स्वयंपाक कौशल्य न पहाता एक राजकुमार आणि त्याच्या घरातल्या सगळ्यांनी एकत्र मिळून एकमुखाने निशांला पसंती कळवत सून म्हणून स्वीकारलं होतं.


नुकत्याच सासरी गेलेल्या निशांला आज तिच्या माहेरचे सगळे लग्ना नंतरच्या पहिल्या दिवाळीतल्या पाडव्याला आणि भाऊ बिजे साठी घरी न्यायला येणार होते.


आयुष्यभर वाट पाहिलेला क्षण आला होता. वाट पाहणाऱ्या दारा समोर निशां च्या घरच्यांची गाडी थांबली. तिचा आदर्श असलेल्या तिच्या आजीची आठवण काढत निशांने सर्वाना आनंदाने तिच्या नव्या हक्क्का च्या घरात घेतले. वाट पाहणारे दारही आज फुलांच्या माळां पेक्षा तिचे आंनद अश्रू पाहून खुष झाले होते.



“बेटी बचाव ! बेटी पढाओ!! मुलगा हा वंशाचा दिवा असेल तर मुलगी देखील देवघराचा कोपरा अखंड ऊजळत ठेवणारी समई आहे.” हे निशांने दिवाळीचे दिवे अधिक तेजस्वी करुन सिद्ध केले.



सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy