ट्रेनिंग
ट्रेनिंग


माझ्या जवळच्या मित्राची काळजी, किंवा व्यथा समजू शकतो या भावनेने कॉल करण्याऐवजी मी त्याला मेसेज केला, "कसा आहेस?" या आशयाचा! कारण त्याचं नुकतंच लग्न झालं होतं म्हणून! त्यानेही फार भारावून न जाता स्पष्टपणे सांगितले की, "सध्यातरी सगळं छान छान असं मजेत आहे. मी खूप काही शिकलो." हे त्याचं दुसरं वाक्य. खरंतर हे वाक्य 'मी' आणि 'खूप' या दोघांच्या मध्ये 'लग्नानंतर' हा विश्वव्यापी समंजसपणा दर्शवणारा शब्द नसलेलं होतं. त्याने त्याची ही चूक सुधारली अन, "मी लग्नानंतर खूप काही शिकलो." असा मेसेज पुन्हा केला.
नाकाला कितीही वेसण आवळून धरलेली असली तरी गवताची एक काडी तरी जिभेने ओढणाऱ्या बैलाप्रमाणे मी त्याला, "काय काय शिकलास?" असा आगाऊ प्रश्न केला. त्यावर त्याने, "झाडू मारताना पुढे पुढे जायचं असतं, फरशी पुसताना मागे मागे सरकायचं असतं, भांडी धुताना तवा असा दाबून धरायचा असतो....." इथपासून ते कोथिंबीर-मेथीची निवडायची काडी, कुकरला होणाऱ्या दोन शिट्ट्या, दूध गरम करताना अंडी उकडून घेताना लागणारा वेळ, बेडशीट कशी टाकायची, चादरींची घडी कशी करायची, कपडे वाळत घालण्यासाठी असलेली दोरी, मटणाचा मसाला, कांदा-लसूण अशा बऱ्याच मोठ्या कोर्सेसची लिस्ट मला सांगितली. इतकं छान छान अन मजेत मनोगत व्यक्त केल्यावर तो "नंतर बोलतो" म्हणाला, कारण भाजी करायची होती म्हणे.
त्याला "टेक केअर" म्हणत मी त्याची रजा घेतली. मोबाईल बाजूला ठेवला. मी शांतपणे उशीला टेकून उजवा हात डोक्यावर आडवा ठेवून मनातल्या मनात विचार करत स्वतःला म्हणालो, "माने थोडक्यात ट्रेन झाला तू! याच्यासारखं छान छान ट्रेनिंग मिळालं असतं तर...." अख्या वर्गाला बाई जेव्हा धोपटून काढायच्या तेव्हा आपल्यापेक्षा मित्राच्या टिरीला दोन छड्या जास्त बसल्याचा आनंद जो असतो तोच आनंद आज मला खूप दिवसांनी झाला होता.
बाकी लग्न करणं सोपं असतं; खरा कसं लागतो तो नवरा होताना.