भिती
भिती


माणूस प्राणी तसा भावनिकच; आंनद , दुःख, राग रोष, भीती अशा भावनांचा संचय घेऊन तो फिरत असतो.
मी काही वेगळा प्राणी नसल्यामुळे माझ्यातही भावना आहेत; मी सुद्धा भावनिक आहेच. परंतु होत काय; सर्वांगीण गैरसमजामुळे निव्वळ आंनद, दुःख, राग वगैरे व्यक्त करणाऱ्यालाच 'भावनिक' असल्याचा मान दिला जातो. भीती हि भावना व्यक्त करणाऱ्याला 'भावनिक ' न मानताच त्याची चेष्टा केली जाते. तरीही भीत भीत का होईना, मी भीती ह्या भावनेने 'भावनिक' आहे हे व्यक्त करतो.
जन्मल्यानंतर श्वास घेण्यासाठी मी रडलो असेल ते भीतभीत च ह्यावर माझा खंबीर विश्वास आहे. त्यांनतर पहिलं पाऊल, पहिला शब्द, शी-सु वगैरे पहिल्या गोष्टी भीतभीतच पार पाडल्या. चिऊ-काऊ, हम्मा-बिंम्मा, भूभू-बिभू, कुकगाडी ह्यांचं अप्रूप नाहीतर कुतूहल वाटण्यापेक्षा, भीतीच जास्त वाटली. त्यात भोकाडीबाबा, बागुलबुवा, दाढीवाला बाबा, अंधारंधरी! हि जनता तर माझ्या आसपास थैमान घालून असायची. सकाळी उठल्यापासून हागण-मुतणं, खाण-पिणं, खेळणं-पडणं करून रात्री झोपेपर्यंत ह्यांची भीती असायची. "दात घासून घेरे; नाहीतर भोकाडीबाबा येईल अन दात काढून घेईल. " ते रात्री, "झोप! अंधारंधरी येईल " असं चालू असायचं. जरा कुठं पाय मोकळे करायचे म्हणून जायला लागलो की पुढं
'दाढीवाला बाबा ' बसलेलाच असायचा.
बरं! हि गॅंग होतीच तर होती पुढं जाऊन भरीस भर म्हणून शाळा, गुरुजी, बाई, छडी-शिक्षा! ह्यांची पलटण अंगावर आली; म्हणजे काय! त्याची वेगळी भीती. " शाळेत जाणारं नाही !" असं अण्णांना म्हणायची वेगळी भीती! तशी अण्णांबद्दल आदरापोटी भीती कि भीती पोटी आदर हे कधीच कळलं&nb
sp;नाही; फक्त ह्यात भेटी कुठूनतरी होती, हे नक्की. अगदी अण्णा, "काय रे ....!!!! " इतकं जरी बोलले जी पोटात भीती यायची.
शाळेतले धडे, कविता, पाढे हे सर्व भितभितचं पाठ केले. घरचा अभ्यास वगैरे सगळं छडी-शिक्षा ह्यांच्या भीतीनेच पूर्ण व्हायचे. "माने भित्रा!!" असा शाळेत सुरु झालेला प्रवास, "मानेची फाटते !!!" असा इथं पर्यंत मला कॉलेजला घेऊन आला. कॉलेजात मुलींकडं बघणं-लाईन मारणं हे सोपस्कार भीतभीतचं पार पडेल. प्रेमपत्र लिहिणं, गुलाब देणं हे मात्र भीतभीत माझ्याजवळचं ठेवलं.
"असं कशालापण घाबरायचं नसतं रे माने !!" म्हणत गजभिये उर्फ गज्या माझ्या आयुष्यात आला तो ऑफिस कलिंग म्हणून. गज्याला कोणत्याच अंगाने भीती शिवत नाही "कशाला भितोसरे माने! दे ह्याच्यावर सोडून " गज्या म्हणजे गजकर्णाला लोशन लावून इलाज करावा तसा माझ्या भीतीवर इलाज करायचा, नाही काय तर, "दे ह्याच्यावर सोडून !!" हे तरी रेटून सांगायचा.
वर्ष- दीड वर्षात मी सुद्धा बऱ्याच गोष्टीं, 'ह्याच्यावर' सोडून द्यायला लागलो. एखाद्याचा राग आला कि त्याच्या आई-वडील, बहीण-भाऊ सगळ्या नात्यागोत्यांना एकत्र करून शिव्या घालू लागलो. साहेबासमोर रुबाबात रिपोर्ट-फाईल ठेवू लागलो, न भिता सुट्टी घेऊ लागलो. बसरेल्वे ह्यांत कशाचीच अन कोणाचीच भीती न बाळगता प्रवास करू लागलो. न भिता सिग्नल क्रॉस करू लागलो. सगळं काही न भीतभीत चालू होत. गज्यासारखी भीती मला कोणत्याच अंगाला शिवत नव्हती. "आपण कोणाच्या बापाला भीत नाही !!" असं चार चौघात बऱ्याचवेळा बोलू लागलो.
आणि एक दिवस माझं लग्न ठरलं; अन झालं!!