ट्रेन,ती आणि पाहिलं प्रेम !
ट्रेन,ती आणि पाहिलं प्रेम !
अमरावती शहराच्या एका टोकाला असलेल्या गाडगेनगरहून बडनेरा स्टेशन असा लांबलचक प्रवास करून अनिकेत आणि त्याचे ३-४ मित्र महाराष्ट्र एक्प्रेस मध्ये शिरले. सामान जागेवर ठेवलं, गाडी चालू झाली आणि अनिकेत दाराजवळ उभं राहून दिसणाऱ्या बाहेरच्या सरकत्या गोष्टींकडे बघत राहिला.
बोरिंग सुरवात झालीय ना ??
पण घडलं असच होतं. त्याला शोधत गाडीच्या दाराजवळ मित्र आलेत. एकाने खान्द्यावर हात टाकला आणि म्हणाला की, "जाऊ दे रे. ही नाही तर ती. कोणीतरी भेटणार ना"
(खरंतर तो दुसरी मिळणार असं म्हणाला कारण आमच्या विदर्भात माणसं मिळतात आणि वस्तू भेटतात असं बोलायची पद्धत आहे. पुण्याच्या शुद्ध मराठीत हे नेमकं उलट असत. आमच्याकडची माणसं माणसात मिसळतात म्हणून असेल कदाचित असा शब्दांचा घोळ, असो ).
अनिकेत बोलला, "अरे पण मला ती आवडते आणि हे माझं पाहिलं प्रेम होत, I mean आहे !!"
अनिकेतने ट्रेनमधून तोंड थोडं बाहेर काढलं. अचानक मित्राने त्याला आत ओढून घेतलं आणि म्हणाला बावळटा असा काही करू नकोस. अभ्यास कर चांगली नोकरी मिळावं आणि मग अश्या छप्पन्न पोरी तुझ्याकडे स्वतःहून चालत येतील (तेव्हा अनिकेतच्या यादीत ५-६ च चांगल्या पोरी होत्या हे याला देखील माहित होत. या गाढवाने मधली "-" काढली आणि त्याला जोडून छप्पन्न हा आकडा सांगिलला असावा)
अनिकेतने त्याचा हात झटकला तर त्याने बाकीच्या एक दोन जणांना आवाज दिला.
---
दोन दिवसांपूर्वी अनिकेतला कळले की उद्या रेवतीचा वाढदिवस आहे. त्यावेळी फेसबुक नसल्यामुळे हे असले तपशिल मिळणे आणि मिळवणे फार अवघड प्रकार असायचा. तो या कामाला एक वर्षापसून लागलो तेव्हा कुठे रेवतीच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी बातमी हाती पडली. आता ही माहिती कशी काढली ही एक मोठी गोष्ट आहे . तो जाम हवेत होतो की तिच्या वाढदिवसाचे निमित्य काढून तिला wish करायचं आणि मग कसा "Response " मिळतो हे बघून काय बोलायचं याचे चांगले A to Z असे प्लॅन्स देखील बनवले.पण ती college मधली सगळ्यात सुंदर मुलगी असल्यामुळे(प्यार अंधा होता है - म्हणून फक्त त्याला वाटायची नाही तर तिच्या मागे college मधले आणि बाहेरच्या कॉलेजची पण मुलं असायची) अनिकेतला थोडी भीती पण होती की कुणीतरी आपल्याआधीच try नको मारायला. तिच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्याने तिला गाठले. तिच्या class मधला एक शांत (?) सुस्वभावी आणि अभ्यासात गती (तिच्यापेक्षा बरीच जास्त) असलेला अनिकेत तिच्यासाठी काही नवीन नव्हतो. तिला विचारले की उद्या येणार आहेस का ?
"?"
"अग सहज विचारले. माझ्याकडे एका टॉपिकवर notes आहेत"
(त्याने सगळ्यात कठीण विषय निवडून ठेवला होता).
ती हो म्हणाली आणि घेऊन ये नक्की हे पण बोलली. भेटण्याची शाश्वती मिळाल्यावर त्याने काय असतो तो एक प्लॅन बनवला. तयारी म्हणून एक चांगला शर्ट आणि जीन्स निवडली (जीन्स म्हणजे प्रीमियम प्रकार असायचा त्यावेळी).
एक छानस ग्रीटिंग निवडलं, गिफ्ट देण्याचा विचार देखील होता पण इतकी इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा नव्हती आणि परतावा (म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हो ) किती असेल याची काही कल्पना नव्हती.(मनात कितीहि आलं की ती होच म्हणेल तरीपण थोडी रिस्क होतीच ना !)
छान मजकूर असलेलं एक ग्रिटींग घेऊन अनिकेत घरी आला आणि बहिणीकडून त्यावर एक स्वतःचा आणि विशेष असा संदेश लिहिण्याचा मानस होता. पण हे बहीण किंवा भाऊ हे प्रकार खूप रिस्की असतात म्हणून तो पर्याय त्याने निवडला नाही. नंतर तिच्या पण भावंडांचा (विशेषतः भावाचा) विचार आला आणि हस्तलिखित कुठलाही मजकूर नको असा निर्णय घेतला. तसा ग्रीटींगवरचा मजकूर मैत्रीच्या चौकटीत बसत होता म्हणून स्वतःच बाकीचं बोलून दाखवायचं असा अतिधाडसी निर्णय त्याने घेतला.
आणि तो दिवस उजाडला ! सकाळी नेहमीच्या वेळे आधीच अनिकेत कॉलेज मध्ये पोहोचलो. त्यांचे classes चालू व्हायला थोडा अवधी होता. ती नेहमीच्या जागी म्हणजे गार्डनच्या बाजून असलेल्या खिडकी जवळ असलेल्या दुसऱ्याच बाकावर बसली होती.
प्रसंग देखील बाका होता. या आधी कधीच या असल्या प्रकारचा अनुभव नव्हता.
ती खूप सुंदर दिसत होती असे अनिकेतला भासले. आकाशी रंगाचा एक कुर्ता तिने घातला होता. त्यावर केशरी रंगाची ओढणी होती जिला थोड्या [पांढऱ्या रंगाची किनार होती. कुर्त्याच्या बाह्या मोठ्या होत्या ज्यांना एक-दोन घुंगरू नेहमीप्रमाणे लावलेले असायचे. केसांची जरा वेगळी आणि आजच्या दिवसाला साजेशी अशी रचना केली होती. निळ्या रंगाची पण ड्रेस पेक्षा थोडी फिक्कट रंगाची टिकली होती आणि गळ्यात एक मोत्यांची सुरेख माळ होती. तिच्या डोळे भलतेच नक्षीदार भासत होते आणि या सगळ्यावर मत म्हणजे तिचं ते विलक्षण आणि बेभान करणार हसू. तशीपण ती खूप गोड आणि खूप जास्त हसायची पण आज काहीतरी निराळं होत हे मात्र खरं. कदाचित त्याच्या मनातल्या विचारांमुळे ती आज जास्त वेगळी आणि सुंदर भासत होती. म्हणतात ना सौंदर्य बघण्याच्या डोळ्यात नसत तर त्याचा मनातल्या विचारांत असत. असल्या विचारात पुढला period कधी चालू झाला हे कळलंच नाही. तो तसाच खिडकीच्या समोर असलेल्या एका झाडाखाली आणि तिच्याकडे बघत बसला. तो एक तास एका क्षणाएवढा वाटला.
पुढला period होणार नाही अशी बातमी आली आणि अनिकेत सुखावला. नशीब त्याच्या बाजूने आहे याची खात्री झाली. (ओम-शांती-ओम हा पिक्चर तेव्हा नव्हता अन्यथा कायनात की काय म्हणतात ते नमूद केलं असत). ती बाहेर येण्याच्या वेळचा अंदाज घेऊन अनिकेत दाराजवळ पळाला आणि योगायोगाने तिच्या समोर आलोय असा अभिनय केला.
" अनिकेत ? तू क्लास मध्ये नव्हतास ? बाप रे , तू आणि दांडी ?"
" अगं तसं काही नाही! आज जरा विशेष काम होत." (क्लास ला दांडी मारल्याने इम्प्रेशन कमी तर नाही झाला ना अशी धास्ती वाटली).
" हं ! तू माझ्यासाठी काहीतरी आणणार होतास ना ? ( तिला अभ्यासाबद्दल काहीच लक्षात राहात नाही - मलाच आता काळजी घ्यावी लागेल !!)
" हो आणलाय ना. पण मी माझी बॅग गार्डनच्या बाजूला ठेवलेल्या bikeवर आहे. चल जाऊ या तिकडे ?"
त्यावेळी एका मुलीने जरा बाजूला होऊन एका मुलाशी गप्पा मारणं म्हणजे मोठी गोष्ट. इतक्या बोलण्यावरू
न एक -दोन जणांना वाटलं की त्यांचं जमलं सुद्धा. (त्यांच्या तोंडात साखर पडो असा विचार आला अनिकेतच्या मनात). तो आणि रेवती हळू हळू चालायला लागलो. ते दोन-तीन मिनिटांचं अंतर कधीच संपू नये असं वाटत होत. थोड्या अवांतर गप्पा मारत ते दोघे तिथे पोहोचलो आणि त्याने बॅग मधून ते ग्रिटींग काढलं. ती एकदम आश्चर्य चकित झाली. तिने ग्रीटिंग उघडलं. कुठल्याही प्रकारचा धक्का (मनाला व गालावर)बसायला नको म्हणून त्याने ग्रीटिंगवर आपल्या नावाखेरीज काहीही लिहिलं नव्हतं.
अनिकेतने फार तयारी केली होती याविषयावर. ती काय काय म्हणू शकते आणि त्याचा अर्थ काय घ्यायचा आणि काय उत्तर द्यायचं याचा खूप प्रगल्भ असा विचार अनिकेतने करून ठेवला होता. एक यादीच म्हणा ना -
मी तुझ्या कडे तश्या नजरेनं .... = मग आता बघ आणि ठरावं . हवं तर अजून वेळ घे !
मला तू भावासारखा ( आमच्यावेळी हा खूप भयंकर प्रकार अस्तित्वात होता) = आत्येभाऊ समज. मामांशी ( म्हणजे तुझ्या बाबांशी बोलायला मी येतो !!
थोडा मोठा हो अजून = माझी माँटुरिटी बघ ( मिशी नाही)
मला खूप मोठं व्हायचंय = हो ना ! दोघेही होऊ या !
माझे घरचे नाही म्हणतील = मला हो म्हण मग बाकीच मी बघतो.
मला तुझा मित्र आवडतो = ठीक आहे ! त्याला बोलावतो लगेच हो म्हण. तुमचा संसार सुखाचा होवो.
माझी एक मैत्रीण आहे जी तुला like करते = आत्ता बोलावं तिला इथे. जर ती नाही म्हणाली तर तुला हो म्हणावं लागेल.
असले बरेच पर्याय तो तिच्या समोर ठेवू शकतो असा विचार करून तो तिला त्याच्या मनातली गोष्ट सांगायला पुढे सरसावला. एकदम साधी सुरुवात केली की मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ती मात्र अजूनही ग्रीटिंग बघण्यात मग्न होती. तो काही बोलणार तेवढ्यात तिची मैत्रीण तिथे आली आणि ओरडली,
" अरे तुह्मी दोघे इथे काय करताय? तिकडे क्लास चालू झाला. दीक्षितसर आलेत आणि सगळ्यांना बोलावलंय. अनिकेत तुझा तर direct उल्लेख झालाय !चल लवकर."
च्यायला ! हे सर कुठून आलेत आणि हिला आपण का दिसलो? अनिकेतच्या मनात राग आला पण दाखवायची सोया नव्हती.
रेवती एवढंच बोलली की आम्ही सगळ्या मैत्रिणी कॉफी प्यायला जाणार आहोत संघ्याकाळी तू पण ये तेव्हाच बोलू.
पहिल्यांदा असं झालं की अनिकेतचं क्लास मध्ये मुळीच लक्ष नव्हतं. सगळं कस रुक्ष रुक्ष वाटत होत. तिच्याकडे बघावं कि नाही हा विचार करण्यात एक दोन periods तसेच गेलेत. तो संध्याकाळ होण्याची आतुरतेने वाट बघत होतो.
मधल्या काही वेळात रेवती आणि त्याचे प्रॅक्टिकलचे क्लास वेगळ्या जागी होते त्यामुळे ती दिसत नव्हती, त्याला पण थोडा अवधी मिळाला आणि डोक्याला दुसरा विचार !
ती अनिकेतला घेऊन सगळ्या मैत्रिणीसोबत कॉफी प्यायला नेणार होती तरी देखील त्याला असे वाटत होते की हे क्षण माझ्या वाट्याला मिळावे.
तिने सगळ्यांना सांगितले कि अनिकेतला एक difficulty विचारते आणि मग आपण जाऊया.
"बोल अनिकेत. असा कोणता प्रश्न तुझ्याकडे असेल ज्याचं उत्तर मी देऊ शकेल?"
"आजचा दिवस खास आहे"
"हो माझा वाढदिवस आहे! पण ..."
"आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस म्हणून त्याला जास्त महत्व आहे."
" बाप रे अनिकेत हे काय म्हणतोय ? गंमत आहे!"
" यात कसली गम्मत गं ?
" काय सांगू ? तू मला मोठ्या कोड्यात टाकलंस !"
" अगं सोप्प आहे . तुला मी आवडतो की नाही फक्त एवढंच ठरवायचं आहे. तुला उत्तर माहित देखील असेल फक्त ते बोलायचं आहे. "
" माझ्या बाबतीत असा प्रसंग येईल असं वाटलं नाही."
"तू सुंदर आहेस हे तर सगळ्यांना माहित आहे. तुला सांगण्याचं धाडस माझ्यात आज आलंय हाच तो फरक. "
"फक्त तुझ्यात नाही रे. तुमच्या तिघांत!"
"म्हणजे?"
" आज मला तू, अनुराग आणि आशिषने propose केलं आणि तिघांनी एकच ग्रीटिंग आणलंय"
असे म्हणून ती जोरात हसायला लागली. हसता हसता तिने बॅग मधून तीनही ग्रीटिंग्स काढलेत आणि मला दाखवले. खरंच खाली टाकलेली नावच काय ती वेगळी होती. मला पण हसू आलं होत पण मी टाळलं.
" तू मग उत्तर काय द्यायचं ठरवलं?"
" मला सगळ्यात पाहिलं तू ग्रीटिंग दिलस पण त्यामागचा हेतू स्पष्ट व्हायला उशीर झाला. अनुराग ने प्रॅक्टिकल ला जातांना गाठलं आणि ग्रीटिंग सोबत त्याच्या मनातली गोष्ट देखील सांगितली. मला थोडा अंदाज आला होता कि तू असं काहीतरी सांगशील पण सगळ्यात पहिले अनुराग बोलला आणि मी त्याला हो म्हटलं"
" हो, अग पहिले जो विचारील त्याला हो म्हणणार होतीस का? "
"अनिकेत, मला काय माहित रे तीन -तीन propose येतील म्हणून. जे पाहिलं आलं आणि चांगलं वाटलं त्याला मी हो म्हणाले."
" कप्पाळ. दे माझं ग्रिटींग."
तो तसाच निघाला. फर्स्ट कम बेसिस वर प्रेम निवडणारी मुलगी म्हणून तिचा तात्विक राग आला होता.
अनिकेत खूप दु: खी झाला होतो , पाहिलं propose सपशेल फेल झालं होत.
-----
पण दुसऱ्या दिवशी मित्रांसोबत लास्ट इयरचा प्रोजेक्ट शोधायला पुणे आणि मुंबईला जायचा प्लॅन होता. त्याने निमूटपणे बॅग भरली आणि सकाळचे दोन periods आटोपून बडनेरा स्टेशनला पोहोचलो. गाडीत चढला आणि सोबतचे मित्र कालच्या प्रसंगाबद्दल विचारतील म्हणून दरवाज्याजवळ जाऊन उभा राहिलो. मित्राला वाटले की प्रेमभंगाच्या दुःखात तो जीव देणार कि काय? त्याने सोबतीला अजून एक दोन मित्रांना बोलावले.
ते अनिकेतला समजावत होते की जावू दे रे.
" अरे मी गाडीतून बाहेर तोंड काढतोय कारण .....
जोऱ्याची हवा असली कि माझ्या डोळ्यात पाणी येत. साल्यांनो पाहिलं प्रेम वा propose काही असो पण मला थोडंही वाईट वाटत नाहीय !! डोळे ओले नको का व्हायला? मी थोडा सिरीयस नको का वाटायला?"
सगळ्यांनी मला उचलले आणि बाहेर फेकण्याची action करून पाठीवर आणि बसण्याचे प्रॉब्लेम होतील अश्या जागेवर पायाने बदडले.
कुठल्यातरी एका ट्रेन मध्ये आपल्यासाठी एक सीट नक्कीच असते पण reservation करणारा कुणीतरी दुसराच असतो, सीट मिळली नाही म्हणून रडायचं नाही. एक गयी तो दुसरी आयेगी !! ट्रेन भी और .....