परीघ नात्यांचा
परीघ नात्यांचा


रविवारची रम्य सकाळ मराठी इंग्रजी newspaper मधून रेंगाळत पुढे सरकत होती. मागल्या वीकएंडला बायकोला आवडेल इतकी आणि खिश्याला परवडेल इतकी शॉपिंग झाली होती. त्यामुळे हा रविवार घरी TV समोर लोळून काहिही बघण्याची मुभा मिळाली होती. अश्या निवांत क्षणी जवळच्या मित्राची आठवण यावी साहाजिक आहे पण त्याचा फोन यावा हा योगायोग.
अभिने १० वा फोन केला. नव्या रिवाजानुसार घरीच आहेस ना, कुठे जाणार का? असले प्रश्न झालेत. मी खडसावलो तेव्हा "येतोच! " अस म्हणून फोन ठेवला. नंतर परत एकदा फोन केला १५ मिनीटांनी. पार्कींग मिळत नाही म्हणून चिडलेला होता.
"अरे पुण्यात कुठे आलं व्हीजीटर पार्किंग?? पाहुणे आलेले चालत नाहीत." मी त्याला ऊगाच चिडवत होतो.
हश्श हुश्श करत स्वारी घरात आली. वैताग काही कमी नव्हता झाला. मी जरा अवांतर विषय चघळले. तोपर्यत चहा घेवून बायको पण आमच्यात सामिल झाली.
एव्हाना तोही विषयाकडे सरकला होता. एरंडवण्यात त्याच्या बायकोचा भाऊ राहतो तिकडे आला होता. बायकोच्या माहेरी आलाय म्हणूनच चिडचिड करतोय अस म्हणून मी देखील चिमटा काढला.
"अरे तस नाही रे. पण तिथे आज एक गेट-टुगेदर आहे. बायकोचे मामा-माऊशी, त्यांची मुलं, जावई, आत्या -काका त्याची वंशावळ. आणि फक्त सख्खे नाही. चुलत, आत्ये, मामै सगळे. जवळपास ५०-६० जण आहेत. सोसायटीच्या क्लबहाउस मध्दे धूमाकुळ आहे आज."
"छान आहे की मग. सगळ्यांच्या गाठीभेटी होतील." बायकोला त्यात काही वावग दिसत नव्हतं.
"की बायकोच्या माहेरचे......"
"वहिनी तस नाही. प्रश्न बायकोच्या माहेरच्यांचा नाहीये.पण इतका पसारा हवाच कशाला.२-३ वर्षातून होणाऱ्या एखाद्या लग्नात भेटीगाठी होतातच की. आणि आमच्या कडे नाही का आम्ही भावंड भेटतं वर्षातून २-३ वेळा."
मी तोच धागा पकडला " अरे हा. दादा कुठे असतो आणि कसा आहे??"
दादा गेली १० वर्ष झालीत गुरगावला आहे एका मोठ्या कंपनीमध्ये. गणपती आणि दिवाळीला येतो पुण्याला अगदी न चुकता ! त्याच्या मोठ्या मुलाला माझी खूप आठवण येते."
"बर आहे. वरच्यावर भेटी होतात सगळ्यांच्या "
" आपल्या मुलांनी हि सगळी नाती समजावित म्हणून अस भेटण गरजचं आहे ना."
" अभि, तुमची next generation थोडीच हे सगळ समजू शकणार ना !!"
" अरे म्हणूनच तर आम्ही नेहमी कटाक्षाने भेटतो. मोठा भाऊ आणि धाकटी बहिण न चुकता येतात. सगळ्या भावंडांची भेट होते आणि त्यांना नातीगोती कळतात.
" मला वाटत काहीतरी चुकतंय अभि. अरे त्यांना फक्त हेच कळतंय कि सख्खी नाती कशी पाळायची. मामेभाऊ व बहिण, आत्याची मुलं भेटतात पण नंतर हि नाती खूप दूरची वाटतील कारण तुम्ही पण ती जोपासली नहित. आणि आज कालच्या काळात बऱ्याच लोकांना एकच अपत्य असत. मग तर नाती पुढे कळतील कुठे ??"
"…"
" अभि, त्यांनी ही नाती जोपासावी अस वाटत असेल तर पहिले तुम्हाला जोपासावी लागतील, ती महत्वाची आहेत अस पहिले तुम्हाला वाटलं पाहिजे ना."
अभिचा चेहरा बदल होता तो खूप गंभीर वाटत होता. त्याला पटलं की नाही माहित नव्हत पण तो बऱ्याच वेळ शांत बसला. काही बोलणार तेवढ्यात त्याचा mobile खणखणला. त्याच्या तुटकश्या बोलण्यावरून आणि चौकशीला सामोरे जाणाऱ्या माणसाचा चेहरा असतो तश्या चेहऱ्यावरून नक्कीच बायकोचा फोन होता हे पटलं.
तो फक्त एवढंच म्हणाला की सगळे नातेवाईक भेटताहेत म्हणून काहीतरी गोड पदार्थ आणायला टिळक बागेत आलो होतो.
फोन बंद करून थोडा शून्यात बघत इतकच बोलला की नाती समजावयाला आधी ती जोपासावी लागतील आणि नात्यांचा परीघ वाढवायला हवा . वसुधैव कुटुंबम मानणारी आपली संस्कृती एका घरात गुदमरून जायला नको !!!
अभिला कळल फक्त थोडा वेळ लागला !!!!