सामुहिक काडीमोड
सामुहिक काडीमोड
जुलै महिन्यातले दिवस. मस्त पाऊस पडतोय , डोंगर ढगांनी माखून गेलेत, नद्या-नाले पाण्याने नाहून गेलेत आणि अश्या romantic वातावरणात मला हाच विषय सुचवा ?? कारण हेच तसं ! बर हा विषय सध्या दिसणाऱ्या घटस्फोटाच्या trends शी संबधित नाही.
मागल्या आठवड्यात नागपूरहून येतांना train मध्ये एक तरुण तरुणींचा मोठ्ठा group होत. साधारण ६०-६२ (!!) वयाचे असतील पण एकंदरीत उत्साहावरून असे वाटत होते कि अगदी collegeची एखादी सहल असावी. ६ आजोबा आणि ७ आजी होत्या. आमच्या दोघांच्या seats त्यांनी काबिज केलेल्या दोन कुपेमधेच होत्या. एका आजोबांनी होणाऱ्या त्रासाबद्दल अगदी प्रवास चालू झाल्यावरच दिलगिरी व्यक्त केली.
"अहो आजोबा तसं काही नाही. तुम्ही enjoy करा आणि त्रास कुठे होतोय !!"
आजोबा म्हणाले, " अरे आम्ही अजून दंगा चालू कुठे केलाय ??"
त्यांच्या असल्या बोलण्याने खर तर आम्हाला खूप काळजी वाटत होती. दिवसभराच्या दगदगीमुळे आता कधी झोपतोय असं झाल होत.
पुढल्या संभाषणातून कळल कि हा group नागपूरच्या एका शाळेचा आहे. १९७१-७२ ला दहावी पास झालेल्या मुला मुलींचे गेट-टुगेदर पुण्याला plan केल होत. नागपूर, मुंबई आणि अजून एक दोन शहरातून हि फौज उद्या पुण्याला पोहोचून २ दिवस मस्त धम्माल करणार. कुणी त्या वर्गाचे विद्यार्थी होते तर कुणी आपल्या जोडीदार बरोबर आले होते. आता आमची चांगली गट्टी जमली होती. वयाने म्हातारे असूनही कुठेही तब्येतीच्या तक्रारी आणि आमची-तुमची पिढी या विषयांना थारा नव्हता. पण जशी रात्र होत होती तसे विषय बदलत होते. आता मी आजोबांच्या group मध्ये आणि बायकोने आजींच्या group मध्ये गप्पांचा रतीब चालू केला होता. विषय बायको वर येवून ठेपला आणि सगळे आजोबा एक साथ पेटून उठले. जो तो बायको या विषयावर तोंड भरून बोलत होते.
जोशी काका खूप गप्प होते, ते आधी पण बोलले नाही आणि बायको या विषयावर पण नाही बोलले. सगळ्यांची निजानीज झाल्यावर मी आणि जोशी काकाचं जागे होतो. बिछाना टाकून झाल्यावर मी आणि काका बोलायला लागलो. मी मगाशी त्यांना observe करत होतो हे काकांना कळल होत. आता काका बोलायला लागले होते. बायको या विषयावर झालेला परिसंवाद काकांना आवडला नसावा असा कयास होता. अनोळखी व्यक्ती सोबत आपण काही खासगी आणि विशेष बोलायला मनावर दडपण येत नाही. काका बोलायला लागले.
" माझं लग्न २३ व्या वर्षी झाल, बायकोच वागण घरच्यांना पटायचं नाही म्हणून मी दुसऱ्या गावात बदली करून घेतली. तरी पण तिच्या वागण्यात जास्त फरक पडला नाही. मुले झालीत संसार म्हणायला पुढे सरकत होता पण तिच्या वागण्यात जास्त फरक पडला नाही."
"- "
" थोडासा पण वाद झाला कि माहेरी जायचं आणि घरच्यांना काही पण कारण सांगायची. अगदी माझ बाहेर काही प्रेम प्रकरण आहे या पासून ते मी वेशिपार जातो ……
आधी मी जोमाने भांडायचो मग ती घरी यायला अजून उशीर करायची. दिवसांच्या गोष्टी आठवड्यामध्ये आणि मग महिन्यांमध्ये गेल्यात. मुल लहान असतांना सुद्धा हे प्रकार घडलेत. दुध पिण्याऱ्या बाळाचे हाल बघूनही कधी तिच्या मनाला पाझर फुटला नाही."
" हे सगळ मी निमूट पणे सहन केल. माझ मन, माझे छंद, माझ आयुष्य, माझे ध्येय ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात पण होत्या असे कधी वाटले नाही. दिवस न रात्र एक संघर्ष होता जो मी अनुभवत होतो. "
" काका हे खूप भयंकर आहे !! तुम्ही सहन … "
" सहन करण्याशिवाय काय पर्याय होता?? मुले असतांना कुठे जाणार ?? आई जरी आईच कर्तव्य पार पाडत नव्हती मी बाप म्हणून सगळ बघायला हव ना !! मी आई आणि बाप दोन्ही झालो पण माझ्या तला नवरा कधीच धारातीर्थी पडला होता. संसार फुलायायाची स्वप्न बघितली पण रात्रीला गंध देणारी ती फुले शृंगाराची नव्हती तर माझ्यातल्या प्रियकराच्या प्रेतावर टाकलेली होती."
"-"
" पण ती गेली तेव्हा मी सुटलो. आता जोडीदाराची गरजच नाही पण मन प्रसन्न ठेवायला खूप कारण आहेत. त्यामुळे मी बायको या विषयवार काहीच बोललो नाही."
मी सुन्न होईल ऐकले पण मला बऱ्याच वेळ झोप आली नाही. सकाळी पुण्याला उतरून घरी जातांना बायकोला हि गोष्ट सांगणार तर taxi मध्ये बसल्या बसल्या बायकोने खांद्यावर डोके ठेवले. मला वाटले थकली असेन प्रवासाने.
" काय झाले ? थकली का ??"
" तू खूप छान आहेस"
" बाप रे काय झाले ?? शोप्पिंग ला जायचं का ??
" नाही रे !! तू माझी खूप काळजी घेतो. "
" नीट सांग !! कौतुक करतांना पण दाखले दे , बाकीच्या वेळी देतेस तसे !!"
" गाडी मध्ये त्या हिरव्या साडीतल्या आज्जी आठवतात ?? त्यांनी तुला लोणचे आणि चटणीचा आग्रह केला होता ??"
" हो पण त्यांचा आणि माझ्या चांगल असण्याचा काय संबंध?? "
"त्या पटवर्धन आजी !! काका आले नाहीत कारण त्यांना अस गेट टुगेदर ला जाणे पटत नाही. आजींना गाण्याची वाचनाची खूप आवड ! त्यांच्या लहानपणी त्या गाण शिकल्या आणि शाळा college मध्ये सगळ्या समारंभात गायच्या पण ! आजोबांनी लग्न झाल्याबरोबर आजींनी सोबत आणलेली पेटी दुसऱ्यादिवशी भंगार मध्ये विकली. गाणे बंद झाले , इतकेच नाही तर गुणगुणणे पण बंद झाले. स्वर रुसलेत शब्द पण हरवले. संसार पुढे ढकलायचा म्हणून काकूंनी सगळं सोडले. तरी पटवर्धन आजोबा बदलले नाहीत. मन जुळण्यासाठी इच्छा आकांक्षा आणि संवेदनांची आहुती देवूनही संसाराचा तो दाह सहन करत आजी आज पर्यंत जगत आल्यात. पण खर जगल्या की श्वास घेवून दिवस काढले. आज सगळ्या जवाबदाऱ्यातून मुक्त होवूनही त्या नवरा या पाशात गुरफटतल्या आहेत. समाज काय म्हणेल हा विचार नसता तर गाण्याच्या साहित्याची बोली होण्याचा वेळेत मी निघून आली असती अस म्हणाल्या. मुले मोठी झाली कि त्यांची लग्ने झालीत कि अथवा संसार मार्गी लागली कि मग सोडून जावू. खर्जातला का होई ना पण एक सूर लावून बघू असा विचार केला. पण आता तेही शक्य नाही. सहवासात नि:प्राण वस्तूंमध्ये जीव जडतो. इथे तर एक माणूस आहे - जन्मभराच्या सोबतीचा !!"
खूप बोलल्या आजी !! त्याचं दु:ख बघून मला रात्र भर झोप नाही लागली . किती भयंकर आहे हे ??
मी पण सुन्न झालो !! मी बायकोला जोशी आजोबांची गोष्ट सांगितली. आज जेव्हा कुठल्या तरी शुल्लक कारणावरून घटस्फोटाच्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि हि लोक आयुष्यभर नुसती सहन करतात. वाटत त्यांना अस वेगळ होण्याची गरज पण होती !!
आता वाटायला लागलाय कि असे किती जण असतील ज्यांना सोबत राहण म्हणजे मरणप्राय यातना असतील आणि फक्त लोक काय म्हणतील किंवा
जवाबदाऱ्या या गाष्टींमुळे ते फक्त एका छताखाली राहत असतील !! फक्त मनातल एकदा ओठावर येण्याची ती काय वाट पहावी लागेल !! ती हिम्मत आणि आपल स्वतःच आयुष्य जगण्याच्या अधिकाराची जाणीव.उगाच समाजाने टाकून दिलेल्या बेडी मध्ये आयुष्यभर अडकून बसायच. आणि दुर्भाग्य म्हणजे तो समाज नंतर सगळ सावरायला येतोही पण संसाराची नाही तर शरीराची राख!!
जन्मभर नवरा आणि त्याच्या घरच्यांसाठी अविरत झडणारी स्री असो वा बायकोने कधी साथ दिली नाही म्हणून कुढणारा पुरूष असो. प्रश्न का सोडायच जोडीदाराला हा नाहीय. कारण नाही तर सोसल्याची भावना पराकोटीला गेली की आणि सोबत राहण म्हणजे फक्त एका छताखाली राहण झाल की विचार करावा. संवादच होत नसेल तर वाद न होणारा संसार हा आदर्श संसार होवू शकत नाही. वेगळ्या वाटा शोधायला काय हरकत आहे मग???
सामुहिक काडीमोड असा एक program करायला पाहिजे अश्या सर्वांसाठी!!
एखाद मैदान मिळेल का भाड्याने ??