त्रिकोणी चंद्रग्रहण भाग 2
त्रिकोणी चंद्रग्रहण भाग 2


वसंत आपले डोळे मिटून मंत्रांचा जप करतो. आणि निकुडा रक्तपिशास ला करमुदा जंगलातुन आमंत्रित करतो.निकुडा ला बघून अमोल भीतीने थरथर कापतो.निकुडा रक्तपिशास हा ७ फूट उंच, चेहरा एकदम कालाकूट चेहऱ्यावर फक्त टोकदार दात दिसत होते.हातात काटेरी तलवार सारखे हत्यार,डोक्यावर गुंतललेल्या केसाची रास आणि पायाची व हातची लाब लचक नखे. निकुडा हा माणसाचे नुसते रक्त पित नाही तर मांसा बरोबर हाडचा भुसा करून खाणारा,बघतास क्षणी माणूस जागेरच गार पडेल असे रूप.
निकुडा बोलतो -काय हुकूम आहे मालक
वसंत फक्त लवचा फोटो दाखवतो आणि निकुडा समजून जातो. निकुडा जाताना गगन भेंदी आसुरी किंचाळी मारतो. एक मोठ्या आलीशान थ्री स्टार हॉटेलमध्ये एका शानदार पार्टीचे आयोजन केले होतं. हॉटेल पूर्णपणे भरलेलं होतं. वेळ संध्याकाळची होती. सर्व लाईट चमकत होत्या. त्यातूनच एक तरुण मुलगी वाट काढत पार्टीत शिरली. मध्यम उंची, गोरापान रंग, दिसायला अगदी सुंदर. बघताच श्रणी कुठलाही मुलगा आपले हृदय हरून बसेल असी. तिने गुलाबी रंगाचा स्लीवलेस टॉप व खाली नीली जीन्स घातली होती. एकदम स्वीट आणि ब्युटीफूल ती तरुणी दरवाजातून आत आली. आत मध्ये येऊन ती एका सोप्या वर बसली. समोर एक वीस बावीस वर्षाचा मुलगा उभा होता. त्याच्या हातात वाइन होती व तो आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारत होता. तो सगळ्यात वेगळा व हँडसम दिसत होता. त्याची नजर त्या तरुणीवर पडते. व त्याची नियत बिघडते. आज काही झालं तरी हे पाखरू सोडायच नाही हे तो मनातल्या मनात बोलतो. मित्राबरोबर च्या गप्पा मध्येच थांबून तो सरळ ती बसलेल्या सोपा कडे वळतो. एस्क्युज मी माझं नाव राजू, माफ करा मी आपल्या ओळखले नाही आपण कोणाकडून आला आहात.
आम्ही लक्ष्मण करे यांच्या कंपनीचे कर्मचारी आहोत.मिस्टर करे यांनी आम्हाला रात्रीच्या भोजनासाठी आमंत्रित केले आहे. ती बोलली.
हो का लक्ष्मण करे हे माझे वडील आहेत पण तुम्हाला कधी मी ऑफिसला बघितले नाही राजू बोलतो.
मी एका महिन्यापूर्वीच कंपनीला जॉईन केले आहे ती तरुणी बोलते.
ओके तुमचे नाव काय आहे राजू बोलतो.
मी सारा गोडबोले.
राजू - तुम्ही एकटाच आलात बाकीचे कर्मचारी कुठे आहेत.
सारा - मी नवीन असल्यामुळे माझी अजून कोणाशीही मैत्री झाली नाही आणि मला जास्त कोणाशी बोलायलाही आवडत नाही. ते लोक दुसऱ्या बाजूला पार्टी एन्जॉय करत आहेत.
राजू - माझे पण तसेच आहे मलाही जास्त गर्दी आवडत नाही. तुम्हाला कंपनी दिली तर चालेल ना.
सारा- हो चालेल तशी मी एकटी कंटाळून गेली होते.
ते दोघे खूप वेळ गप्पा मारत राहतात. पुढे होऊन राजू बोलतो मी खूप वैतागलो आहे आपण फेरफटका मारण्यासाठी बाहेर जाऊया का तुमची काही हरकत नाही ना.
हो आपण जाऊया मी पण खूप वैतागली आहे. मला सवय नाही अशा पार्ट्यांची.
दोघेही पार्टी मधून बाहेर पडतात व एका आलिशान गाडी मधून फेरफटका का मारायला निघतात.
राजू - काय मॅडम कुठे जाऊया आपण फिरायला.
सारा -तुम्ही नाही जाऊ शकत तिकडे.
राजू - का खूप लांब आहे का,गाडी जाण्याचा रस्ता नाही का
सारा - रस्ते खूप आहेत. पण तुम्ही नाही जाऊ शकत.
राजू - हे बघा मी एक चांगला मुलगा आहे. मला घाबरण्यासारखे काही कारण नाही. मला सांगा आपण तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरायला जाऊया.
सारा - मी नाही घाबरत माणसांना.
तिचे असे उत्तर ऐकून राजुला कळत नव्हते काय बोलावे.
सहज राजुची नजर तिच्या हातावर गेली.. तिच्या हाताच्या एका बोटावर, कसलेतरी जखम झालेली दिसत होती आणि बोटातून रक्त येत होतं.
न राहवुन राजुने विचारलं
राजू - तुमच्या बोटाला काय झालं आहे
सारा - काही नाही वाईन चा ग्लास हातातून खाली पडला आणि तो उचलताना त्याची काच लागली.
राजू - निदान औषध लावायचं.
सारा - औषधाची गरज नाही. मला रक्त आवडत.
खरंतर राजुला हे सगळं विचित्र वाटत होते. त्याला भीती पण वाटत होती पण तीझ्या सौंदर्यात तो पूर्णपणे अडकला होता.
थोडे अंतर कापून गेल्यानंतर गाडीमध्ये अचानक बिघाड झाला व गाडी बंद पडली. खूप प्रयत्न करूनही चालू गाडी चालू होत नव्हती. मग दोघांनी गाडी तिथेच सोडून आजची रात्र घालवण्यासाठी निवारा शोधू लागतात. रात्रीचे अकरा वाजले होते. अमावस्या आज असल्यामुळे सगळीकडे काळोख होता.वातावरण मध्ये बदल होऊ लागला गुलाबी थंडीचे प्रमाण वाढू लागले. वातावरणाच्या बदलामुळे राजू मध्ये रोमान्स वाढू लागला. थोडे पुढे गेल्यानंतर त्यांच्या कानावर रेडिओ च्या गाण्याचा आवाज येऊ लागला.गाण्याच्या दिशेने गेल्यानंतर त्यांना थोड्या अंतरावर एक दुमजली आधुनिक घर दिसले. राजूने दारावर टकटक केली. आतून मधून एका तरुण मुलीने दरवाजा उघडला.
आजच्या रात्री साठी आम्हला निवारा मिळू शकेल का. कारण की माझी गाडी बंद झालेली आहे व आमचे घर ही खूप लांब आहे. व रात्र ही खूप झालेली आहे राजू एका दमात तिला बोलला.
ठीक आहे तुम्ही राहू शकता काही हरकत नाही ती बोलली. तुम्ही दुसऱ्या मजल्यावर राहू शकता ती दुसऱ्या मजला कडे बोट दाखवत ती म्हणाली.
तसे दोघे दुसऱ्या मजल्यावर जातात. सारा बोलते मी फ्रेश होऊन येते नंतर आपण बोलत बसुया.
साराला खाली जाताना बघून राजूक्या मनात अनेक प्रेमलहरी उठत होते. व तो मनात गाणी गुणगुणत होता."आज मौसम बडा बेइमान है आने वाला कोई तुफान है.
तेवढ्यात त्याच्या डोक्यावर जोराचा प्रहार होतो व तो बेशुद्ध पडतो. शुद्धीत आल्यावर त्याला जाणवते की आपल्याला दोरखंडाने एका खुर्चीत घट्ट बांधून ठेवलेले आहे.
समोरील दृश्य बघून तो भयभीत होतो.आता ते घर पहिल्या सारखे नवीन दिसत नव्हते त्याची जागा आता जुन्या , मळकट व पडीक घराणी घेतली होती. हातात सुरा घेऊन ती वेड्यासारखी मान फिरून मागून पुढून राजुला न्याहाळत होती.
नको मारु मला मी काय बिघडले आहे आणि सारा कुठे आहे एक बोट कट झाल्यावर जिवाच्या आकांताने राजू ओरडत होता. बोल तुटल्यामुळे भसाभसा रक्त वाहत होतं. राजू भीतीने थरथर कापत होता. राजुचे तुटलेले बोट हातात पकडून तिने एका दरवाजावर वर्तुळ काढले. एक-दोन-तीन करत तिने राजुचे सर्व बोटे कट केली. मग तिने त्या वर्तुळात खाली टोक असलेला एक त्रिकोण काढला. पुढे त्या त्रिकोणाला आडवी रेख ओढली. आता त्या आकृतीत एकूण पाच भाग झाले. सर्वात वरच्या भागात अग्नि , डावीकडच्या भागात हवा, उजवीकडच्या भागात पाणी व मधल्या आडव्या रेषेत वरच्या बाजूस आकाश व खालच्या बाजूस धरती असे तिने रक्ताने अक्षर कोरली. अचानक तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिने विव्हळत बसलेल्या राजुकडे बघितल. राजू घाबरला ती ने सुरीने राजुच्या अंगावर सपासप वार केले. राजू किंचाळू लागला. प्राणाची भीक मागू लागला. डोळे बंद करून तीने काहीतरी मंत्र म्हंटले. डोळे उघडून तिने राजुच्या गळ्यावर शेवटचा वार केला. त्याचा जीव व वासना रक्ता बरोबर बाहेर पडले. तिने आपल्या शरीराकडे बघितले राजू चे रक्त कपड्याला लागलेले होते. तिने आपल्या शरीरावरील सर्व कपडे काढले व जाळून टाकले. साराने तिला दुसरे कपडे घालायला दिले. तिने मंत्र म्हटले व रक्ताने रंगवलेला दरवाजाचा आकार अगदी लहान झाला व तीने तो दरवाजा एका छोट्या पेटीत ठेवला.
ही तीच लव ची सारा असते. पण सारा असे आघोरी कार्य का करते याचे उत्तर पुढे मिळेल.
बस स्टँपवर लव साराच्या आठवणीत मग्न बसलेला होता. त्या रात्री त्याला ( त्रिकोणी चंद्रग्रहण) सारा चा होकार समजलेला नव्हता. सारा कुठे आहे आणि आपल्या प्रिय मित्राचा खुन कोणी केला ( उमेश व वीणा ) याचे उत्तर त्याला अजून भेटले नव्हते त्यामुळे तो खूप चिंतीत बसलेला होता. थोडयावेळाने संदेश बस स्टँवर येतो
संदेश- अजून किती दिवस लव तू असा उदास बसणार आहेस.
लव -काय करू संदेश हे विचार माझ्या मनातून जात नाही. आपल्या मित्राचा खून , सारा आणि ही देवी शक्ती हीचा वापर कसा करू काहीही समजत नाही.
संदेश-देवावर विश्वास ठेव आतून नक्कीच मार्ग निघेल.
अचानक बस स्टँपच्या छतावर धम असा मोठा आवाज येतो.
निकुडा ला स्टँपच्या छतावर वर बघून दोघांच्या आंगावर सरसराटून काटा आला.ते इतके घाबरले कि भीतीने त्याचें पाय लटलट कपु लागले.संपूर्ण शरीर घामाने भिजून गेले. बस स्टँपवरून उलटी गोल उडी मारून निकुडा दोघांचा बरोबर समोर येऊन उभा राहतो. डाव्या हाताचा जोरदार फटका संदेश ला मारतो तसा संदेश जमिनीवर जोरात कोसळला व जवळ जवळ दहा ते बारा फूट लांब पर्यंत घसरत गेला आणि एका झाडाला धडकून तिथेच पडला. निकुडा आता समोर उभा असलेल्या लव कडे रोखून पाहत होता. लवला समजून चुकले होते की आता पण काही जिवंत राहू शकत नाही.लव पुढे जनावरांप्रमाणे दिसणारा एक माणूस उभा होता. त्याच्या चेहर्यावर क्रूर हास्य होतं
लव पूर्ण आपली शक्ती लावून प्रतिकार करतो पण निकुडापुढे त्याची ताकत कमी पडते. निकुडा लवला चेंडूसारखा हवेत फेकून देतो. तसा लव जमिनीवर दाणकन आदळला जातो. निकुडा आपल्या जीबाळ्या चाटत लवच्य्या छाताडावर जाऊन बसतो व आपले लांबलचक नखे लवच्या पोटात खूपचनार तेवढ्यात संदेश निकुडाच्या डोक्यावर लाकडी फळीने जोरदार प्रहार करतो. फळीचा एक तुकडा बाजूला मोडून पडतो तसा निकुडाला राग अनावर होतो. तो लव च्या छातीवरून उठून उभा राहतो व दातांचा करकर आवाज करत संदेशच्या दिशेने जाऊ लागतो. संदेश चे पाय थरथर कापायला लागतात तसा तो मागे सरकत होता.व पण अचानक त्यांच्या चेहर्यावर स्मित हास्य दिसू लागते ते बघून निकुडा गोंधळतो. संदेश नजरेने निकुडला मागे बघायला सांगतो. लव आता हवेत तरंगू लागला होता एखादा पक्षी जसा आपले पंख पसरून हवेत तरंगतो त्याचप्रमाणे लव ही हवेत तरंगत होता.हे बघून निकुडा दोन पाऊल मागे सरकतो. लवने आपला हात निकुडा दिशेने केला तसाच त्याच्या हातातून एक पांढरी रंगाची ऊर्जा निघू लागली व त्या राक्षसाला जकडू लागली. लवणे हात वरती करून गदा प्रकट केली व गदा एकाच प्रहरात निकुड ला ठार केले
संदेश बोलतो - अचानक तुझ्यात शक्ती कशी आली व तुझे हे घाव कसे भरले.
लव- निकुडा माझा छाताडावर बसला होता त्यावेळी मला वाटले की माझा आता अंत होईल मग मी देवाचे नामस्मरण केले .तेव्हा मला आतील शक्तीची जाणीव झाली.
आता पुढे काय संदेश बोलतो.
लव - आता त्याच शक्तीचे नामस्मरण करतो व त्यांना पुढील मार्गदर्शनासाठी मदत मागतो.
लव डोळे मिटून - हे देवा मला पुढील वाटचालीसाठी मार्ग दाखव आम्हला मदतीची गरज आहे.
लव ला एक तेजस्वी आवाज एकु येतो. " धनगरवाडी गावाला जा व तिथे जावून सोमनाथ ला भेट "
लव- चल संदेश धनगरवाडी गावाला जावू आपल्या तिथे मार्ग सापडेल पुढील वाटचालीचा.
हे सर्व अमोल झाडामागे लपुन बघत असतो त्याला खूप आश्चर्य व भीती वाटते.
अमोल लगबगीने वसंतकडे जातो व त्याला सर्व हकीकत सांगतो.
वसंत- हे कसं शक्य होईल एखादा सामान्य मुलगा नि कुडाला कसा ठार करू शकतो.
वसंतच्या आतील शैतान बोलू लागतात अरे तो सामान्य मुलगा नाही. त्याच्याकडे आता देवदूत ची शक्ती आहे व तो आपल्यापेक्षा शक्तिवान आहे. त्याला हरवणे सोपे नाही.
वसंत- मग आपण शक्ती नाही तर कपटगिरीने त्याला हरवू.
हसण्याचा मोठा मोठा आवाज घुमू लागतो. त्यातील एक सैतान बोलतो आता समीरा पण परत आली आहे. नव्या जोमाने आणि शक्तीने. तिने आपली शक्ती वाढवण्यासाठी बळी चे सत्र सुरू केले आहे बस आता दोन बळी अजून पाहिजे. मलविष आता लवकरच ह्या भूलोकावर येईल व आपले साम्राज्य स्थापित करेल.
वसंत अमोल ला आज्ञा करतो जा तू लव बर रहा आणि आम्हाला प्रत्येक गोष्टी बद्दल माहिती दे.मलविष तुलाही शक्ती प्रधान करतील फक्त जे मी सांगतो तसं काम कर न काही विचारता.
आता लव चा खात्मा करण्यासाठी वसंत जळकी हडळ ला स्मशानभूमीत आमंत्रित करतो. जळकी हडळ क्षणात प्रकट होते.
जळाळले शरीर,कबरेपर्यत केस,पांढरे डोळे व त्यावर बाजरीच्या दाना सारखे काळे ठिपके, कुत्राऱ्यासारखी तोंडातूनन सतत गळणारी लाल.
वसंत लव चा फोटो दाखवून जळक्या हडळ ला आज्ञा करतो जा नरडीचा घोट घे तुझ्या शिकारीचा.
नीलिमा च्या घरी
लव घराची बेल वाजवतो. आतून निलिमाची आई दरवाजा उघडते. खुप दिवसानंतर आला तुम्ही दोघे, या घरात. आज अमोल सुद्धा घरी आला आहे. जा भेटा एकमेकांना तोपर्यंत मी नाष्टा व चाय बनवते. एवढे बोलून नीलिमा ची आई किचनकडे निघून गेली.
नीलिमा सोप्यावर शांतपणे पुस्तक वाचत बसली होती. व अमोल न्यूज पेपर वाचत बसला होता.
लव मागील सर्व हकीकत अमोल व नीलिमा ला सांगतो.
नीलिमा - लव खरच तुझ्याकडे सुपर पॉवर आहे का. मला तर विश्वास बसत नाही.
संदेश - हो ग नीलिमा मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले आहे. त्याची सुपर पॉवर.
लव आपला पुढील प्लॅन सर्वांना समजतो. व दोन दिवसानंतर जाण्याचे ठरते.
धनगरवाडी कडे जाण्याचा दिवस उजाडतो.
चौघांनी जाण्याआधी आपल्या घरच्यांचा निरोप घेतला आणि लवकरात लवकर येऊन असे सांगून निघाले. त्या गावाकडे जाण्याचा प्रवास मार्ग चौघांनाही अनोळखी होता.
ट्रेन पकडून कुठल्या गावी जायचं एवढेच माहित होतं. लव नीलिमा अमोल आणि संदेश एकेक करून ट्रेनमध्ये चढत असतात. तेवढ्यात एक मुलगी धावत धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होती. आणि आधार म्हणून संदेश च्या खांद्याला पकडले. त्या स्पर्शाने संदेशला काहीतरी जाणवतं.LIKE AS MAGIC... तो काही क्षणासाठी आपले डोळे बंद करतो.जसा तो मागे बघण्याचा प्रयत्न करतो ती बाजूनी पुढे निघून जाते. तिला पाहून संदेश आपली मती हरवून बसला होता. कमरे पर्यंत येतील एवढे केस, गोरा रंग, नाजूक बांधा, सुंदर डोळे..
ट्रेनमध्ये तशी बरीच गर्दी होती. पण रिझर्वेशन असल्यामुळे ( चौघांना) त्यांना त्या गर्दीचा काही फरक पडला नाही. तिला बघून संदेश विंडो सीट ला जाऊन बसतो. कारण ती बरोबर समोरच्या विंडो सीटला बसलेली होती. ती बाहेरील निसर्ग सृष्टी पाहण्यात रमून गेली होती. नकळत तिची नजर समोरच्या विंडो सीटवर बसलेल्या संदेश कडे गेली. व तिची नजर दोन मिनिट त्याच्यावर रोखली गेली. पण ती पटकन भानावर आली व तिने नजर विंडो कडे वळवली. पण तिची नजर वळल्यानंतर सुद्धा संदेश तिच्याकडेच बघत होता. त्याला कारण पण तसेच होते. दोघे एकमेकांना ओळखत होते. ओळखत होते म्हणण्यापेक्षा दोघे एकाच शाळेत होते व एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा होते.दहावीनंतर त्यांनी वेगवेगळ्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले होते. पण आज अचानक दोघे खूप वर्षांनी पुन्हा एकमेकासमोर होते. नजरानजर होऊन बराच वेळ शांततेत गेला. मग संदेश ने हळूच तिला विचारले. विसरलीस का?
तिने संदेश कडे एक नजर टाकून पुन्हा विंडो कडे वळवली.
परत संदेश बोलला ठीक आहे ओळख पटत नसेल तर राहू दे. आणि तिच्या तोंडून एकदम नाही निघाले. ते नाही ऐकताच संदेशच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.
थोडावेळ शांततेत निघून गेला. हळूहळू गप्पांना सुरुवात झाली. नंतर समजले की दिपालीलाही धनगर वाडी ला जायचे होते.कारण तिला आपला एक प्रोजेक्ट तयार कराचे होते. विषय होता धनगर त्यांची वस्ती.
हा अमोल ही नीलिमा आणि हा लव संदेश ने आपल्या मित्रांची ओळख दीपालीला करून दिली.तसेच दीपालीने आपल्या मित्रांची ओळख संदेशला करून दिली . (वरून,हरीश,काजळ आणि क्रांती)
संदेश नेहमीच्या अंदाजामध्ये गप्पा मारत बसला होता
सगळेजण मजा मस्ती करत असतात. लव मात्र आपल्या विचारात गुंग असतो.
५-६ तासानी ट्रेन लोणंद रेल्वे स्टेशनला येऊन थांबते. लोणंद पासून चार किलोमीटर अंतरावर धनगरवाडी हे गाव. निसर्गाच्या गर्द खुशीत वसलेल्या त्या गावाचा मार्ग मिळणे एवढे कठीण वाटत नव्हते कारण सोबत प्रवासाला निघालेले काही प्रवासी त्याच गावी जायला निघाले होते.
धनगरवाडी धनगरवाडी चला लवकर शेवटची वडाप ( काली व पिवळी रंगाची प्रवासी गाडी) ड्रायव्हर ओरडत होता.
आवाजाने तसे सगळे रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडले व समोर पाहिल तर तीन वडाप उभ्या होत्या. मुले वडाप मध्ये चढले व मागच्या सीटवर जावून बसले. व मुली मधल्या सीटवर जाऊन बसल्या. ड्रायव्हरने ९ आसन असलेल्या वडाप मध्ये १६ जणांना कोबुन बसवले. काहीजण गाडीच्या टपावर जाऊन बसले. काहीजण दरवाजा पकडून प्रवास करू लागले. गाडी पुढे जाऊ लागली पक्का रस्तातून गाडी आता ओबडधोबड रस्त्याला लागली होती. त्यामुळे गाडी धीम्या गतीने पुढे जात होती. रस्त्याच्या आजूबाजूला गर्द झाडी होती. अचानक एका मुलीचा आवाज ऐकू येतो वाचवा वाचवा.
लव जोरात ओरडतो गाडी थांबवा. आपल्याला तिला वाचवायला हवी. गाडीचा ड्रायव्हर बोलू लागतो. तुम्ही इथे नवीन आला आहात तुम्हाला येथील काही माहीत नाही तर कृपा करुन त्या वनात जाऊ नका.जे लोक त्या वनात गेले ते जिवंत कधी परत आले नाहीत. ते दोघे राक्षस कोणालाही जिवंत सोडत नाहीत.
नको जाऊस ना वनात लव बाहेर धोका आहे नीलिमा लव ची
विनंती करत असते. तसेच गाडीतील इतर लोकही त्याला समजत असतात. लव कुणाचे काही नाही ऐकत नाही व तो गाडीच्या बाहेर पडतो व त्याबरोबर संदेश उतरतो. संदेश अमोल ला बोलतो तुम्ही पुढे जा आम्ही मागून येतो.
तिकडे वनाच्या मधल्या वाटेतून एक १८-१९ वर्ष वय असलेली एक तरुणी पळत होती त्याच्या मागावर २ सावल्या पाटलाग करत होत्या. त्यांचे अर्धे शरीर नग्न होते. कमरेपासून वरती उघडे व कमरेपासून खालच्या गुडघ्यापर्यंत सफेद कापड. त्यांचे शरीर पूर्णपणे काळे होते जसा की कोळसाच. त्यांचे संपूर्ण डोळे लाल व वटवाघुळ सारखे तोंड आणि पाठीवर पंख होते. ती पुढे पळणारी तरुणी त्यांच्यापासून वाचून आपला जीव मुठीत धरून कशीतरी जिकडे वाट भेटेल त्या देशाने पळत होती. पण त्या मागच्या दोघाचा वेग जास्त होता. कारण तो तरुणी पळत होती व ते दोघे उडत होते. वाचवा वाजवा ती ओरडत होती व जागा भेटेल तिकडे ती पळत होती.
लव आता आवाजाच्या दिशेने जोरात पळू लागला.. त्याचा वेग एवढा होता की जणू एखादी गाडी रस्त्यावरून ताशी ७०-८० वेगाने जात आहे. आणि त्याचा वेग वाढत चालला होता.. धन..धन.. करून त्याचे पाय जमिनीवर आपटत होते.
संदेशही लव च्या मागे धावत होता पण लव वेग फार जास्त होता.
पळता पळता ती तरुणी ठेच लागून खाली पडली. भितीने थरथर कापत होती. तिच्या घशाला कोरड पडली होती
ती पूर्ण घामाघूम झाली होती. ती पूर्णपणे थकून गेली होती.
मागून उडत येणारे ते दोघे आता तिच्या डोक्यावर गिरक्या घालत होते. ते दोघे तिच्यावर तुटून पडणार तेवढ्यात लव तिथे पोचला.लव ची चाहूल लागताच ते दोघे मागे वळून बघतात. पुढील दृश्य बघून लव दचकतो व त्याचे हृदय मोठ्याने धडकू लागते. कारण ती तरुणी दुसरी कोणी नव्हती तर सारा होती. लव लगेच भानावर येतो कारण दोन राक्षस त्याच्या भोवती गिरक्या घालत असतात. लवने आपले दोन्ही हात वर करून दोन आगीचा लाल गोळे तयार केले व गिरक्या घालणाऱ्या राक्षसांच्या दिशेने फेकले. पण त्या गोळ्यांचा काही उपयोग झाला नाही. कारण ते दोघे पारदर्शक होते. गोळे त्यांच्या शरीराच्या आरपार जात होते. त्या दोघांनी मिळून एका झाडाची फांदी लव च्या दिशेने फेकली. लवणे तो वार वाचवला. लव त्यांच्या दिशेने गोळ्या फेकत होता. पण ते पारदर्शक असल्यामुळे त्याचा काही फरक पडत होता. ते दोघे राक्षस लव वर घातक वार करत करत होते.जवळजवळ पंधरा वीस मिनिटं असा चालू होता. लवला एक-दोन जबरदस्त वार लागले होते त्यामुळे तो घायाळ झाला व जमिनीवर कोसळला. आता ते दोघे एकमेकांना पाहून हसत होते. तेवढ्यात हसता हसता ते दोघे दचकले व मागे सरकले. कारण तिथे तो आला होता त्याच्या चाहुलीने घाबरेल जंगल आता शांत झाले होते.अंधारातून धुके चिरत एक व्यक्ती घोड्यावर स्वार होऊन येत होता. भगवे कपडे , कपाळावर भस्स चोळलेला, दोन्ही दंडाला रुद्राक्ष माळा बांधली. छातीपर्यंत काळी दाढी व पीळदार मुशा..
त्याने आपला हात त्या दोघांच्या दिशेने केला तसाच त्याच्या हातातून एक निळा रंगाची ऊर्जा निघू लागली.एका क्षणात ते दोघे बर्फ गोठतात तसे गोठून गेले. लगेच त्यांने विजेचा वार त्या दोघांवर केला आणि त्या दोघांच्या असंख्य तुकडे झाले व विखुरले गेले.
तो तेजस्वी पुरुष घोड्यावरुन उतरून लव च्या दिशेने गेला. लव पुढे हात देतो तसा लव हाताचा आधार घेऊन उठतो.
तेवढ्यात संदेश धापा टाकत तेथे पोहोचतो. लव सारा व त्या तेजस्वी व्यक्तीला बघून तो चकित होतो.
तुझ्याकडे अपार शक्ती आहे फक्त त्याची जाणीव होणे जरुरी आहे तेजस्वी पुरुष लवला बोलतो.
माझ्याकडे कोणती शक्ती आहे व कोणत्या कार्यासाठी माझी निवड देवदूत यांनी केली आहे मला हे अजून समजले नाही लव बोलला.
आज तुला तुझ्या तील शक्तीची जाणीव करून देतो असे बोलून त्यांनी डोळे मिटले व मंत्र फुटफुट लागला अचानक एक पुस्तक प्रकट झाले. पुस्तक लवला देत तो बोलला हे पुस्तक वाचून घे तुला तुझ्यातील शक्तीची जाणीव होईल.
लव मांडी घालून बसला व ते पुस्तक वाचू लागला. तोपर्यंत संदेशने साराला सावरले व दोघे एका झाडाखाली बसले. तब्बल दोन तासानंतर लव पुस्तक वाचून उठला. व ते पुस्तक त्या तेजस्वी पुरुषाला देत तो बोलला धन्यवाद .तेवढ्यात त्या पुस्तकांची पेट घेतला व ते जवळून राख झाले.
ते पुस्तक फक्त एकदाच वाचू शकतो त्यानंतर ते पुस्तक जळते. त्या राख कडे बघत तो तेजस्वी पुरुष बोलला.
आता तुला तुझ्या शक्ती माहिती झाली आहे व ती शक्ती तु चांगल्या कामासाठी वापर करशील अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.
लव त्या तेजस्वी पुरुषाला प्रणाम करतो व बोलतो धन्यवाद आमचे प्राण वाचवल्याबद्दल आणि मला माझ्या शक्तीची जाणीव करून दिल्याबद्दल.आणि मी तुम्हाला वचन देतो की या शक्तीचा वापर मी चांगल्या कामासाठीच करेल.
यापुढेही संकटकाळी आमचे असेच रक्षण करा.
लगेच तो तेजस्वी पुरुष बोलला मी तुझा रक्षक नाही तर तूच आमचा रक्षक आहे. फक्त तुला तुझ्या शक्तीची जाणीव नव्हती ती आज तुला झाली आहे.
लव पूर्णपणे गोंधळतो म्हणजे मी रक्षक आहे.
तो : हो तू रक्षक आहेस पंच महा शक्तीचा व त्या कार्यासाठीच तुझी निवड झाली आहे.
लव : मी समजलो नाही कोणती पंच महा शक्ती व कोणत्या शक्ती पासून त्यांचे रक्षण मला करायचे आहे.
तो : पंच महाशक्ती म्हणजे हवा पाणी अग्नि आकाश व धरती. प्रत्येकाची ची शक्ती अपार आहे व त्यांना हरवले सोपे नाही पण...
लव : पण काय... अशी कोणती शक्ती आहे त्या पासून पंच महा शक्तीला धोका आहे.
तो : सैतानाचा सम्राट मलविष... पंच महा शक्तीची शक्ती आपल्याकडे खेचून घेऊन त्याला महा शक्तिषाली बनायचे आहे.
लव : मग तुम्ही नक्की कोण आहात
तो: माझं नाव कमलेश आहे व मी पंच महाशक्ती मधील पाणी या शक्तीचा वारस आहे. ही शक्ती जपण्याचा कार्यकाळ शंभर वर्षाचा आहे. त्यानंतर ही शक्ती योग्य वारस भेटल्यानंतर त्याच्याकडे सोपवली जाते.
लव: म्हणजे अजून चार रक्षक आहेत या पंच महा शक्तीचे.
हो व वेळ आल्यानंतर तुला पंच महा शक्तीचे रक्षण करायचा आहे एवढे बोलून घोड्यावर स्वार होऊन तो निघून जातो.
आता लव सारा च्या दिशेने जाऊ लागतो. हृदय त्याचे धडधडत होते व डोक्यात अनेक प्रश्नांचे काहूर माजले होते. त्यांची नजरेला नजर भिडते.
लव: इतक्या दिवस कुठे होतीस सारा व कुठल्या अवस्थेत होतीस. आम्ही तुला शोधण्यात दिवस-रात्र एक केले. तरीही तुझा तपास काही लागला नाही. आणि आज अचानक तू येते कशी.
सारा: लव मला काही आठवत नाही मी कुठे होती. पण मी जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा मी बघितले की एका वनात आहे. आणि नंतर हे भुते माझ्या मागे लागले.
सारा रडू लागते. लव तिला सावरतो बोलतो. जाऊदे काही हरकत नाही तू जिवंत आहेस हेच आमच्यासाठी खूप आहे. तुझ्याबरोबर जे काय झाले व त्याच्या पाठीमागे कोण आहे त्याला मी सोडणार नाही.
लव आपला हात प्रेमाने साराच्या खांद्यावर ठेवतो. व ते धनगर वाडी च्या दिशेने जाऊ लागतात. पुढे ते दोघे व मागून संदेश चालत असतो. झाडाच्या मागे एक व्यक्ती दबा धरून बसली होती त्या व्यक्तीने सर्वकाही जे तिथे घडले होते ते त्याने पहिल्यापासून पाहिले होते. अचानक त्या व्यक्तीचे रूपांतर एका पांढऱ्या ऊर्जेत झाले व ती ऊर्जा हवेत तरंगत जाऊन थेट त्याने संदेशच्या शरीरात प्रवेश केला. धक्का लागल्यासारखा तो खाली पडतो.
काय झाले संदेश व खाली कसा कोसळला लव बोलतो.
मला कोणी धक्का दिला सारखे वाटले. जाऊदे रे बाबा या वनातून लवकर बाहेर निघू येते मला काही खरं वाटत नाही.
संदेशेचे डोळे कधी पांढरे तर कधी काळे असे रंग बदलत होते पण संदेशला ते जाणवत नव्हते.
तसे ते तिघे झपाझप पावले टाकत धनगरवाडी च्या दिशेने जाऊ लागतात.
धनगर समजा बद्दल मला जे माहीत आहे ते मी तुम्हाला सांगतो.
धनगर समाज हा एक आदिम मेढपाळीचा व्यवसाय करणारा आदिम समाज. महाराष्ट्रातील विठ्ठल, खंडोबा, जोतिबा, मायाक्का ही दैवत. धरगरांची एक वैशिष्ट्यपुर्ण संस्कृती आहे.
धनगरी समाज गजनृत्य हा नृत्य प्रकार सादर करतो. धनगरी नृत्य म्हणजे एक प्रकारची पूजा आहे. म्हणजे हा समाज आपल्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी धनगरी गाजा सादर करतात. हे नृत्य गोलाकार फेर धरून ढोलाच्या तालावर केलं जातं. या गजनृत्यासाठी धनगरी पारंपरिक वेशभूषा वापरली जाते. पायात घुंगरू चाळ, फेटे, चोळणा, रंगीत रुमाल, घाटन्या आदी वस्तू वापरल्या जातात, त्याला ढोल आणि काठीनं साथ दिली जाते.खेळ' (जत्रा)हा त्यांचा मोठा उत्सव कुलदैवतांच्या आराधनेसाठी साजरा केला जातो.
सकाळच्या सहाच्या सुमारास ते तिघे धनगर वाडीच्या वेशीत पोचतात. वेशीच्या जवळच एक चहा टपरी होती. तिथे अमोल, नीलिमा आणि दिपाली व तिचे मित्र त्यांची आतुरतेने वाट बसलेले होते. त्या तिघांना येताना बघून सगळे खुश होतात. नीलिमा व अमोल सारा बघून खूप खुश व चकित होतात. लव जंगलात झालेली सर्व हकीकत सर्वांना सांगतो.
संदेश टपरी वरील पोराला:- हे छोट्या ऐक जरा मला सांगशील सोमनाथ कुठे भेटतील.
भूत पकडणार की सायकल वाल सोमनाथ तो छोटा मुलगा बोलला.
संदेश: भूत पकडणार सोमनाथ
मंग असं करा वरच्या अंगाला जाऊन पलीकडच्या बांधावरून सरलं चालत जा आन जी पहिलं घर लागेल ती बघा सोमनाथ बाबाच हया .
सर्वजण बांधावरून दहा-पंधरा मिनिटे पुढे चालत जातात . पुढे त्यांना कौलारू घर दिसते. आज खेळ ( जत्रा) असल्यामुळे घराला सजावट करण्यात सगळेजण मग्न असतात. लव पुढे होऊन तेथील एका व्यक्तीला विचारतो. आम्हाला सोमनाथ बाबांना भेटायचे आहे.
ती व्यक्ती घरात जाऊन सोमनाथ यांना बाहेर घेऊन येते.
सोमनाथ हे कोणी मांत्रिक, देव शक्ती असलेले असे कोणी नव्हते. त्यांना देवी व शैतानी शक्तीचे रहस्य यांचे प्रचंड ज्ञान होते. त्याचे कारणही तसे होते. मेंढ्यांना पाळण्यासाठी त्यांना गावोगावी भटकंती करावी लागत असे. त्यातूनच त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले.
पिवळा सदरा, डोक्यावर केसरी फेटा, कपाळाला भंडारा , खाली पांढरे धोतर, खांद्यावर घोंगडी व हातात दहा फूट लांब काठी. अंगापिंडाने मजबूत असलेले सोमनाथ बाबा लव समोर येऊन उभे राहतात.
काय काम आहे माझ्याकडे सोमनाथ बोलले.
लव सर्व हाकिकत सोमनाथ यांना समजून सांगतो.
असा प्रकार आहे तर पण जरा दोन दिवस थांबा पोरांनो आज महाशिवरात्र असल्यामुलं बिरोबाचा खेळ ( जत्रा )आहे लांबून पाहुनी घरी आले आहेत. तोपर्यंत खेळाचा आनंद घ्या आणि आराम करा लांबून आले आहे तुम्हीपण सोमनाथ बोलले.
घरातून दोन-तीन सदस्य येतात व सर्वांना आग्रह करतात आणि त्यांचे सामान घेऊन त्यांना घरात घेऊन जातात.
सोमनाथ यांचे कौलारू घर नसून एक भला मोठा वाडा होता. वाड्यामध्ये भाविक व भक्तांसाठी अनेक खोली बनवल्या होत्या. त्यामुळे सर्वांची राहण्याची सोय व्यवस्थित झाली.
वेळ संध्याकाळची. लव , संदेश बाकीचे पालखीच्या मिरवणुका साठी खूप आनंदीत दिसत होते. कारण त्यांच्यासाठी हे सगळं नवीनच होते.
वातावरणात थंडीचे प्रमाण हळूहळू वाढू लागले होते. संपूर्ण धनगर वाडा बिरोबाच्या पालखीच्या मिरवणूकी साठी सज्ज झाला होता. नाशिक ढोल, ढोल ताशा, हलगी, सनई आणि तुतारी यांचा मंजुळ आवाज वातावरण प्रसन्न करून टाकत होते. बिरोबा ची पालखी धनगर वाड्यात निघून मंदिराच्या दिशेने जाऊ लागली. पालखीबरोबर देवाची काठी व झेंडा ही मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होत होते. ढोल , हलगीच्या व पिपाण्या ठेक्यावर काठी पकडणारे नाचत होते. कोण पाठीवर तर कोण डोक्यावर घेऊन देखील काठी नाचवत होते. नाचणारा दमला किंवा काठी कळायला लागली की सवाई सर्जा च चांगभलं म्हणत नाचण्याला नवसंजीवनी दिली जात होती. अन त्याच आवेशाने पुन्हा काठीचा ठेका धरला जायचा. काठीची दोरी सांभाळणाऱ्या तर मोठी कसरत करावी लागत होती. देवाचा झेंडा हवेत शानदारपने भाविक मिरवत होते. लहान मुली व मुलाची तर पालखी जाणाऱ्या मार्गावर रांगोळी काढण्यासाठी व फटाकडे फोडण्याची लगबग चालली होती. भाविक नवस म्हणून काठीवर नारळाचे तर कोण पैशाची माळ बांधत होते. नुकतीच ४-५ महिने झालेल्या पोरांच्या अंगावरून आशीर्वाद म्हणून पालखी व काठी नेहली जात होती. गुलाल व खोबरं भाविक मोठ्या भावनेने उधळण करते होतें. पालखी च्या पाठीमागे बायका आरतीचे ताट घेऊन मंदिराच्या दिशेने जात होत्या. पालखी व काठी यांची मंदिराला एक प्रदक्षणा घालून झाल्यानंतर काठी मंदिराच्या प्रवेश दाराला बांधली गेली. व पालखी मंदिराच्या गाभार्यात गेली नंतर देवाला पोशाख केला गेला. पोषाखा नंतर देवाची आरती झाली व बायकांनी आपल्याबरोबर आणलेल्या आरतीच्या ताटने देवाची ओवाळणी केली.
देवाच्या आरती नंतर....
आंगी शुभ्र सफेद तीन बटणी सदरा, धोतर, डोक्यास गुलाबी फेटा आणि प्रत्येकाच्या हाती रंग-बिरंगी रूमाल असा एकसारखा कपड्यांचा पेहराव केलेले तीस ते चाळीस (गजी)खेळाडू गोल रिंगण करून ढोलाच्या ठेक्यात, सनई पिपाणी, झांजाचा निनाद आणि भोंग्याच्या वाद्याच्या सुरात बेभान होऊन नृत्यात रंगलेल्या पारंपरिक गजीनृत्याच्या डावाने बिरोबा मंदिराचे आवार फुलून गेले होते.
सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं
सुंबरान मांडलं गं, सुंबरान मांडलं गं।
ही ओवी कानावर पडताच बरेच हौशी भाविक गजांच्या मागे नाचू लागले.
हे सगळं बघून लव व संदेश व बाकीच्या जणांना आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याचा भास होत होता. लव तर विसरून गेला होता की आपण येथे का आलोय. दिपाली व तिचे मित्र मिरवणुकीचे बारकाईने अवलोकन करत होते. आणि त्याचबरोबर कॅमेरा सर्व मिरवणुकीचे शन टिपत होते
गजनृत्य झाल्यानंतर लव व बाकीचे सोमनाथ यांच्या वाड्यावर गेले व वाड्यावर जाऊन पंगतीत बसून पुरण पोळीचा जेवण करू लागले. जेवण करत असताना वरून ( दिपालीचा मित्र ) सारा कडे बघत होता व गालातल्या गालात हसत होता. व सारा ही त्याला साथ देत होती. जेवण झाल्यानंतर ते सर्वजण त्यांना दिलेल्या रूम गेले व दिवसभर थकल्यामुळे सर्वजण लगेच झोपी गेले.
मस्कोबा देवाच्या खेळाची दुसऱ्या दिवसाची पहाट सूर्याच्या तांबूस किरणांनी झाली होती. दुपारी मस्तपैकी तांबडा पांढरा रस्सा याचा मनसोक्त स्वाद घेऊन लव व त्याचे मित्र सोमनाथ यांची वाट बघत बसले होते. सगळ्या पाहुण्यांचा पाहुणचार करून सोमनाथ लवकडे आले. तर लव मी तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देतो असे बोलून सोमनाथ यांनी आपले डोळे मिटून बिरोबा नामस्कर करून ध्यानस्थ बसले. एक तासानी सोमनाथ यांनी आपले ध्यान सोडले व पुढे बोलू लागले.त्या तीन सैतानांचा अंत करायचा असेल तर तुला रुद्राक्ष माळा व बाभळी तलवार ची गरज पडेल.बाभळी तलवार तुला कवठी खेडच्या डोंगरात मिळेल. व रुद्राक्ष माला तुला मुरुड जंजीरा किल्ल्यावर मिळेल. पण लक्षात ठेव त्याचा अंत येणाऱ्या अमावस्या आत करायचा आहे .नाहीतर ते आपल्या सम्राटला या भुलोकात घेऊन येतील.
लव: धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आम्ही त्या सैतानाचा अंत जरूर करू
सोमनाथ : बिरोबा तुम्हाला मार्ग दाखवेल.आणि हा बिरोबचा गुलाल ठेवा तुमच्याकडे बीरोबचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीसी राहील.
लव कवठी खेडला उद्या जाण्याचे ठरवतो.
रात्रीची ११:३० वाजून गेले होते. वरून ( दिपालीचा मित्र ) झोपला होता. पण त्याला माहित नव्हत एक मुलगी त्याला पाहत पलंगा शेजारीच बसली होती. काही वेळाने वरून असा भास झाला कोणीतरी त्याच्या पायावरून हात फिरवत आहे. तो उठला. तसं त्याला कोणीतरी जोरदार धक्का दिला, तसा तो पलंगाखाली पडला. त्याची नजर पलंगाकडे गेली. एक मुलगी केस मोकळे सोडून त्याच्याकडे पाहत होती.पण वरून च्या चेहऱ्यावर रागा ऐवजी स्मित हास्य होते.कारण ती मुलगी सारा होती व ती त्याच्याकडे मादक नजरेने बघत होती.सारा पलंगावरून उतरून दरवाजाच्या दिशेने जाऊ लागली . तिच्या मागे वरून जावू लागला . खोलीच्या बाहेर पडतात वरून च्या डोक्यावर जबरदस्त प्रहार झाला तो जागेवर च बेशुद्ध पडला.राजू प्रमाणे त्याचाही बली दिला गेला होता व त्याच्या रक्ताने तीने एका दरवाजावर वर्तुळ काढले. मग तिने त्या वर्तुळात खाली टोक असलेला एक त्रिकोण काढला. पुढे त्या त्रिकोणाला आडवी रेख ओढली. आता त्या आकृतीत एकूण पाच भाग झाले. सर्वात वरच्या भागात अग्नि , डावीकडच्या भागात हवा, उजवीकडच्या भागात पाणी व मधल्या आडव्या रेषेत वरच्या बाजूस आकाश व खालच्या बाजूस धरती असे तिने रक्ताने अक्षर कोरली.
समीराने साराच्या मदतीने आता दुसरा बळी दिला होता . आता तिला फक्त एका बळी ची गरज होती सम्राटला जागे करण्यासाठी.
सकाळचे सात वाजून गेले होते. अमोल आरशासमोर केस फनी करत होता. त्याला असे जाणवले की त्याची आरशातील प्रतिमा हलत नाही . थोड्याच वेळात ती प्रतिमा जोरात हसू लागली. अमोल पूर्णपणे गोंधळून गेला. आरशात आता वसंत ची प्रतिमा दिसू लागते.
अमोल: बोल वसंत येथे का आलास
वसंत : मी तुला ही जादुई अंगठी द्यायला आलो आहे. ह्या अंगठीने तू कोणतेही भली मोठी वस्तू उचलू शकतो. आणि एका जागेहून दुसर्या जागी फेकू शकतो. बस असच आमच काम करत राहा तुला ह्याहून अजून शक्तिशाली बनवू.
आणि ह्या अंगठीचा वापर आम्ही सांगू त्यावेळी कर
दोघेही स्मित हास्य करतात. थोड्याच वेळात अमोलची आरशातील प्रतिमा दिसू लागते.
बाहेर गोंधळ झालेला बघून सर्वजण घराबाहेर पडतात. लोकांचा जमाव वडाच्या झाडाखाली जमलेला होता. सर्वजण टक लावून वड्यांच्या फांदी कडे बघत होते. वडाच्या फांदीवर एक एका मुलाचा निर्जीव देह लटकत होता. सोमनाथ यांनी तो देह खाली काढण्यास सांगितले तसे काही जणांनी तो देह खाली उतरला. तो निर्जीव देह बघून दिपाली व तिचे मित्र रडू लागले कारण तो देह वरूनचा होता. सर्व बोटे कापलेली, गळ्यावर वार देहाची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. सोमनाथ पुढे येवून लवला बोलले नक्कीच सैतान ची पूजा कण्यासाठी त्याचा बळी दिला आहे.घाई करा आणखी बली जावू देवू नका.लवकर जा आणि त्या सैतानाचा खात्मा करा.
अरुण चा देह एक प्रायव्हेट गाडी करून पुण्याला त्याच्या घरी पाठवण्याचा बंदोबस केला.लव आणि त्याचे मित्र पुढच्या प्रवासासाठी निघाले पण दीपली त्यांच्यावर घेण्याचा हट्ट करू लागली. कारण तिला मित्राचा खुनाचा बदला घ्यायचा होता. तिच्या हट्टापुढे कोणाचाही काही चालेना. तिलाही घेऊन द्यायला सगळे तयार झाले. तेवढ्यात सोमनाथ येथे आले आणि लवला बोलले तुम्ही या शंकरला ही घेऊन जा तुम्हाला त्याची मदत होईल. कारण त्याला कवडी खेडचा काना कोपरा माहित आहे. शंकर हा सोमनाथ यांचा थोरला मुलगा होता. मजबूत बांधा अगदी सोमनाथ यांची झेरॉक्स कॉपी होती.
सोमनाथ यांचा निरोप घेऊन ते सात जन बाभळी तलवार च्या दिशेने जावू लागले. दुपारच्या बाराच्या सुमारास ते लोक कवटी खेड गावात पोहोचले . आता त्यांना डोंगराच्या पायथ्याशी जायचे होते. रस्ता एकदम भयानक वाटत होता.रस्त्याच्या एका बाजूला शांतपणे वाहणारी नदी व दुसऱ्या बाजूला घनदाट झाडे. रस्ता एकदम शांत होता. एवढ्या शांत रस्त्यावरून चालताना त्यांना एकमेकाच्या पायांचा सुद्धा आवाजात जाणवत होता. मधेच एखाद्या कोल्ह्याचा रडण्याचा आवाज येत होता तर कधी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता आणि शांत असलेले वातावरण भीतीदायक होतं होते आणि थोड्याच वेळात पुन्हा शांतता पसरत होती.लवला जाणवत होते कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे.की जसे कोणीतरी त्याला बघत आहे. लव मागे, डाव्या व उजव्या बाजूला पाहिले तर अनोळखी अशी व्यक्ती त्याला दिसली नाही. लवची नजर एका मोठ्या वृक्षांवर पडली. तसा त्याच्या काळजाचा ठोका वाढू लागला. समोर दृश्यच तसे होते. त्या झाडावर जळकी हाडळ बसली होती व ती त्यांच्याकडेच पाहत होती. तिने पटकन एका हाताने आगीचा गोळा केला व जमिनीच्या दिशेने फेकला. तसा जमिनीत फार मोठा खड्डा झाला व त्या खड्ड्यातून पांढऱ्या रंगाचे मुद्दे बाहेर येऊ लागले. आता त्या सात जणांना पुढे जळली हडळ ची मुद्द्यांची सेना त्यांच्या दिशेने येऊ लागली.
लवने मुलींना मागे सरकायला सांगितले
त्यांनी हात वरती करून गदा प्रकट केली व समोरून येणाऱ्या तीन मुद्द्यांवर गदेचा प्रहार केला तसे त्यांचे अर्धातून दोन दोन तुकडे झाले आणि जमिनीवर पडतास त्यांची माती होऊ लागली. इकडे शंकर ही एक एक करून समोरून येणाऱ्या मुडद्याला संपत चालला होता. शंकर काठी गरगर फिरत होती आणि मुद्द्यांची माती होते.लव आणि शंकर चे हे रूप बघून बाकीचे पाच जण थोडे घाबरले होते. जवळ जवळ अर्धा तास ते दोघे मुद्द्यांची झुंज देत होते. पण मूर्तींची संख्या काही कमी होत नव्हती ते जमीन फोडून निघत होते. आता हळूहळू ते दोघे दमून लागले होते. जळकी हाडळ झाडाच्या फांदीवर बसून पाय हलवत त्यांच्या दमन्याची वाट बघत होती. त्यांची लढण्याची गती कमी झाली होती.आता त्या दोघांना चारी बाजूने मुद्द्यांनी घेरले तर काही मुद्दे त्या पाच जणांच्या दिशेने जाऊ लागले. परंतु ते मुर्दे त्या पाच जणांना पर्यंत पोहोचण्याआधीच एक निळा रंगाचा गोळा त्यांच्याकडे फेकला गेला तसे ते मातीत मिळाले. सगळेजण आश्चर्यचकित झाले कारण ती निळ्या रंगाची ऊर्जा संदेश फेकत होता आणि त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते. संदेश ला बघून लव आणि शंकर मध्ये नवीन ऊर्जा संसार झाली व ते परत जोमाने लढू लागले. पण मुरदे येणे थांबत नव्हते. अचानक लव ने एक मोठी उडी मारली आणि त्या खड्या या पर्यंत पोहोचला त्या खड्ड्यातून मुरदे बाहेर पडत होते मग त्याने एक हात पुढे घेऊन हिरव्या रंगाचे एक कवच त्या खड्ड्यावर बनवले. जेणेकरून ते मुद्दे त्या खड्ड्यातून बाहेर पडू नये. आणि तसेच झाले ते मुरदे आता कवच भेदून शकत नव्हते.
लवला आता वेळ वाया घालवायचा नव्हता. त्याने एक हात वरती करून आगीचा गोळा तयार केला व त्याने ते गोळी जळक्या हडळ च्या दिशेने फेकले. ते हडळ वर पडणार तोच ती तिथून गायब झाली. ते गोळे त्या फांदीवर लागले आणि ती फांदी जळाली. आणि आजूबाजूला तिच्या हसण्याचा आवाज घुमत होता. आता तुम्ही सगळे लोक मारणार ती जोरजोरात हसत बोलत होती. अचानक हडळ लव समोर प्रकट झाली. तिने लव च्या दिशेने एक काळी ऊर्जा फेकली तशा लव थोडा दूर जाऊन पडला. लवणे लगेच स्वतःला सावरले आणि आता तो हवेत तरंगू लागला. लवणे दहा-बारा आगीचे गोळे त्या हडळ वर फेकले. त्यातील काही गोळे हडळ लागले. दुसरीकडे संदेश पांढरी दोरखंड हडळ दिशेने फेकली तशी ती त्या दोरखंडात फसली गेली. लगेच लवणे आगीच्या गोळ्यांचा वर्षाव हडळ चालू केला. थोडाच वेळात हडळ जळून खाक झाली.
लव पुढे येऊन संदेशला मिठी मारली " वाचवलेस मित्रा आम्हाला पण तुझ्याकडे एवढी शक्ती आली कुठून.
संदेश : खरंच मलाच नाही समजत अजून हे सगळं मी कसे केले ते.
मी सांगतो मागून कोणाचा तरी बोलण्याचा आवाज आला.
सगळेजण मागे वळून बघतात.
(क्रमशः)