Swati Damle

Romance

3  

Swati Damle

Romance

'तो 'आणि 'ती'

'तो 'आणि 'ती'

11 mins
1.8K


गावाबाहेर एका बंगल्याचे काम पुरे होत आले होते. इंजिनियरने आपलं सारं कौशल्य आणि ज्ञान पणाला लावून एक सुंदर शिल्प उभं केलं होतं. थोड्याच दिवसात बंगल्याची वास्तुशांती होणार होती. कारागिरांचे, कामगारांचे कुशल हात बंगल्याच्या कणा कणा वरून फिरत होते. बंगला आता पुरा झाला होता. काही म्हणता काही उणीव राहिली नव्हती. एक दिवस त्याचे नामकरण झाले. बंगल्यात वावर सुरू झाला .मालक व मालकीण! दोघेच!

तो सिव्हिल इंजिनियर होता. स्मार्ट! रुबाबदार! ती, त्याची बायको रेखीव, सुंदर, नाजूक कळी! तिच्या व त्याच्या मनाचे ईप्सित पूर्ण झाले होते. अनेकांनी या सुंदर बंगल्याला अनेक सुंदर नावे सुचविली पण बंगल्याच्या मालकाने नामकरणाचे सारे हक्क मालकिणीलाच प्रदान केले होते. तिनेही खूप विचार करून सर्वांगाला साजेल असे ' रुचि ' हे नाव शोधून काढले. मालक मालकिणीच्या कलाकौशल्याला साजेलसा, कलावंताची दृष्टी दाखविणारा 'रूचि' बंगला त्या गावाचे एक भूषणच ठरला.

'ती' फारच टीप टॉप! सुव्यवस्थित! बंगल्यातील एकही वस्तू जराही इकडची तिकडे झालेली तिला खपत नसे. प्रत्येक वस्तू नीट जागेवर ठेवली जाईल याची ती दक्षता घेत असे. कोठे जराही जळमटे, धूळ साचणार नाही याची ती काळजी घेई. फरशीवर, गालिच्यांवर एवढे से ही कसले डाग पडलेले तिला चालत नसे. अतिशय व्यवस्थित, कडक इस्त्रीची अशी 'ती'! याउलट 'तो'! आधीच नव्या नवलाईने धुंदफुंद झालेला! त्यात उतावळा! तो आल्याआल्याच बूट कसे तरी ओरबाडून काढीत असे व कोपऱ्यात भिरकावत असे. बूट काढत असतानाच तिला हाका मारण्याचा सपाटा! पहिल्या दोन हाकेत ती पुढे आली नाही तर स्वारी रागावे व तशीच कोचावर आडवी होई. त्याचे हे असे वागणे तिला बिलकुल पसंत नव्हते. नकळत तिच्या कपाळावरील शीर तटतटून उठत असे. इतक्या कसोशीने सकाळपासून साफसुख ठेवलेले, नीटनेटके ठेवलेले घर याच्या आगमनाने विस्कटून जाई. आल्या आल्या कोपऱ्यात भिरकावलेले ते बूट, बुटांची संगत सोडून इकडे तिकडे आडवे झालेले ते मोजे, फराफरा कोचा जवळ ओढलेला टीपॉय, कोचावरून लोंबकळलेले ते कव्हर, अॅशट्रेला न जुमानता गालिच्यावर काढली गेलेली सिगारेट्सच्या राखेची नक्षी! हा सारा अवतार पाहून तिचा नुसता भडका उडत असे. दिवसभर खपून हसरे ठेवलेले घर तिला वाकुल्या दाखवू लागे. मग एखादे दिवशी ती म्हणे,' अहो, असे काय? बूट नीट बसून काढा की! ते असे भिरकावण्यात काय मजा वाटते तुम्हाला? आणि कोचावर बसून टीपाॅय वर पाय ठेवण्याची ही कुठली बाई तेढी पद्धत! आणि हो! अॅशट्रे ,तो काय शोपीस म्हणून ठेवलाय वाटतं आपल्या घरी? तिचा हा भडिमार ऐकत शांत बसलेला तो नुसतीच मान हलवून तिला उडवून लावी. फार तर म्हणे,' तूं बुवा भारी चिकित्सक! कामावरून घरी आलो, चांगले छान स्वागत करायचे सोडून हे इकडेच का ठेवलेत, तेथेच का ठेवता? छे बुवा! तुझ्या तंत्राने चालायचे म्हणजे' एकंदरीत कठीणच! स्वतःचे घर असून मी मोकळेपणाने वावरू शकत नाही. सारखं वाटतं,आपलं काही

चुकलं तर नाही? हो! नाहीतर येशील बोंबलत! वैताग साला!' '

पुरे पुरे ! इतकी का मी जाच करते तुम्हाला? पण तुम्हीच सांगा, हे बूट तुमचे तुम्ही नीट जागेवर ठेवलेत तर तुमच्याच पायात पायात अडमडायचे नाहीत इकडे तिकडे हिंडताना! तुम्हीच तर त्यांना अडखळता आणि मग त्यांना बिचार्‍यांना लाथ! रक्षा पात्र असताना सिगरेट ओढीत इकडून तिकडे हिंडता. समजा हातातलं थोटुक पडलं गालिच्यावर आणि धुमसू लागलं तर काय होईल? पटतयं ना मी काय म्हणते ते!' तो नुसतीच हसून मान हलवी पण वागण्यात फरक?अं हं !

परत या अशा वागण्याचं, आपल्या अव्यवस्थितपणाचं समर्थनही तो अगदी वकिली थाटाने करीत असे.' काय साली कटकट आहे. मला हल्ली कळेनासं झालंय हे घर माझ्यासाठी कां मी घरासाठी? अरे, आपल्या घरात आपण पसारा नाही टाकायचा तर कुणी? आपल्याच घरात, आपल्याच बेडवर मी नाही लोळणार तर मग दुसरे कोण? ते काही नाही. माझ्या घरात मी काय वाट्टेल तो गोंधळ घालीन आणि घर असं पसरलेलं सुद्धा किती गोड दिसतं नाही? घरात माणसांचा वावर आहे असं वाटतं तरी! नुसतं चित्रासारखं घर मला तर बाबा खायला उठतं! हं, कोणी पाहुणा बिहुणा येणार असेल तर मी ठेवीन ते आवरून नेटकं! तेवढ्या मॅनर्स नक्कीच आहेत मला. पण जेव्हा पहाव तेव्हा प्रत्येक गोष्टीची कसली मनाई? मी आता मुळीच ऐकणार नाही.'

यावर ती फणकारुन म्हणाली,' ऐकणार नाही म्हणे! इतक्या वेळात किती वेळा ऐकलं हो माझं! सांगा, आधी सांगा! नुसते त्या सिगारेटच्या धुरांच्या वेटोळ्यात माझे शब्दही हवेतच विरून जातात. तुम्ही आपले ऐकून न ऐकल्यासारखे करता! आता हेच पहा ना, पेपर वाचायला घेतलात, पानं नीट न जुळवता टाकून दिलात. बरं! तोही टीपाॅय वर नीट ठेवला का? दिलाय भिरकावून कोचाच्या आणि टीपॉयच्या मध्ये! मासिक चाळलीत तीही उघडी ठेवून दिलीत! रात्रीसुद्धा वाचता वाचता छातीवर पुस्तक उघडं, दिवा आपला जळतोय! पण मी म्हणते, एवढी वाचनाची आहे ना तुम्हाला आवड, मग नीट टेबल खुर्चीवर टेबललॅम्पचा प्रकाशात बसावं वाचत खुशाल! कंटाळा आला, की पुस्तक मिटवून रॅकमध्ये ठेवावं नि जावं झोपून! यावर तो नुसताच हसत असे. मनात म्हणत असे, पुस्तक वाचता वाचता त्या वातावरणात गुंगून आलेली गुंगी मला किती समाधान देते, हे तुला कसं कळणार? प्रत्यक्षात मात्र तो काहीच बोलत नाही कारण कुठलेही कारण सांगितले तरी तिला ते पटणार नाही हे अनुभवाने त्याला माहीत झाले होते.

खरं म्हणजे त्याची तिच्याकडून अगदी माफक अपेक्षा असे, की तो घरी येताच तिने त्याची विचारपूस करावी. त्याला भेटावयास अधीर व्हावे. बेल दाबताच अधी-या मनाने, नाचऱ्या पावलाने येऊन त्याला बिलगावे व हळूच विचारावे किती दमलात! पण ते नुसते गोड स्वप्नच असते. कदाचित कधीच पूर्ण होऊ न शकणारे!

कारण ती फक्त कडक ईस्त्रीत वावरणारी बाहुली होती. शिस्तीचा बडगा दाखविणारी मास्तरीण! तिचे प्रेम हाडामासाच्या नवर्‍यापेक्षा तिच्या घरावर, फर्निचरवर, गालिच्यांवर व तिने जमविलेल्या असल्या संग्राह्य शोपिसेस वर! त्यात आपण कुणावर अन्याय करतोय, एका भाव वेड्या माणसाच्या भावना तुडवतोय याचा विचारही तिच्या मनाला स्पर्श करीत नसे. कधीही पहा, तिची नजर सर्व काही ठीक, जागच्याजागी आहे ना हे पाहण्यातच गुंतलेली असे.

..वास्तविक पाहता तो होता इंजिनियर! त्यातून सिव्हिल! साईटवर काम करणारा! ऊन, पाऊस, वारा झेलीतच त्याला काम करावे लागे. कायम उभं राहायचं! पाय अगदी मोडून येत! उन्हाचे चटके सहन करायचे सावलीची अपेक्षा करीत! मग येणारा थकवा घरच्या उल्हासाने पळेल म्हणून धावत धावत, घाईने, ओढीने घरी यायचं! कधी एकदा तिला भेटतो असं त्याला होऊन जाई. ती उत्साहाने आपले स्वागत करील. मग आपण तिला साईट वरील गमतीजमती, मजेदार घटना ऐकवू. ती त्या ऐकेल. आपल्या कामात रस घेऊन आपल्या कामाविषयी माहिती विचारेल व मग आपण तिला समजावून सांगू. अशा कल्पना, असे मनोरथ करीतच तो घरी येई. घर येताच गाव बेलवर बोट ठेवताच त्याच्या डोळ्यापुढे ती उभी राही, ती जणूकाही हातात वेताची छडी घेऊन आलेली मास्तरीणच! मग त्याच्या साऱ्या भावना गोठून जात असत. काही बोलावे असेच वाटत नसे. समोरच्या कोचावर तसेच अंग झोकून देऊन सिगारेट शिलगावित तो विचार करीत असे.

त्याच्या प्रत्येक हालचालीवर, हिची बारीक नजर असे. दाढीचे सामान व्यवस्थित ठेवले की नाही. पाणी सांडले असल्यास ते नीट पुसून घेतले की नाही. बेडशीट्स, कव्हर्स, उषा, लोड तो व्यवस्थित ठेवतो की नाही. सिगारेटचि राख अॅशट्रे मध्येच टाकतो की नाही. नाना गोष्टी! पण बारीक बारीक बाबतीत सारखा हिचा सासुरवास! एवढेच काय जेवावयास बसल्यावर सुद्धा तो सुखाने जेवू शकत नसे. तिथेही हीचा मॅनर्स बद्दल कटाक्ष! जरा तृप्त होऊन एखादी ढेकर दिली की लगेच, 'शी ! काय हा गावंढळपणा! अहो, तुम्ही चांगले सुशिक्षित, उच्च पदवीधर, तुम्हाला शोभतं का असं आवाज काढीत जेवणं?

तरीही तो शक्यतो समजूत काढायचा प्रयत्न करी तो यावर म्हणे, हे.... हे म्हणजे तुझं काहीतरीच बर का! अगं मीही माणूसच आहे! एवढा चांगला स्वयंपाक तुझ्यासारख्या सुगरणीने केलेला! माझ्या प्रिय पत्नीच्या हातचा, अत्यंत चवीचवीने खाल्लेला. आली तृप्तीची एखादी ढेकरतर काय बिघडलं?मी कांही मुद्दाम केलयं का?आणि दिली मुद्दाम तरी काय झालं ग?त्यांत खरं तर तुझाच सन्मान आहे.नाही पटत?

पण या वक्तव्याने ही तिच्या कपाळावरची आठी कमी होत नसे. मग त्याचाही जेवणाचे पाणी होई. काहीच न बोलता भांडभर पाणी पिऊन तो उठत असे. तिला थोडे संकोचल्यासारखे होत असे. पण तिचाही नाईलाज असे. कारण तिच्या अंगी लहानपणापासूनच शिस्त, व्यवस्थितपणा, मॅनर्स कसे रक्तात भिनून गेले होते. व्यवस्थितपणा या गुणाची ती गुलाम बनली होती. अति काटेकोरपणे स्वतःही व्यवस्थित राहत होती, मॅनर्स जपत होती व आपल्याबरोबर त्यानेही तसेच वागावे असा आग्रह धरीत होती. पण याबाबतीत पहिल्यापासूनच बेफिकीर राहणाऱ्या त्याला हे जमत नव्हते गुण खरा पण तिच्या बाबतीत तोच दुर्गुण होऊ पहात होता. तिचे त्याच्यावर निस्सीम प्रेम होते. पण त्याचा गबाळेपणा ती खपवून घेऊ शकत नव्हती. तशी तीही फार भावनाप्रधान होती, भाबडी होती.

त्यालाही तिचे आश्चर्य वाटे की जेव्हा पहावे तेव्हा ही आपली दवात न्हायलेल्या मुग्ध कळीसारखी प्रसन्नच सामोरी येई. तिचे हे रुप त्याला आवडे. सोबत नाही असे नाही पण का कोणास ठाऊक, कदाचित गोडाचा ही माणसाला वीट येतो तसंच काहीसं असेल, पण रोजच ती अशी सुस्नात, प्रसन्न पाहिली की त्याला वाटे, तिला एखादे दिवशी उशीर व्हावा उठायला! मग धावपळ करत आपल्यासाठी तिने स्वयंपाक करावा. साडी वर खोचलेली, घामाघूम चेहरा ,वेणीचा अंबाडा, त्यातून चुकार बटा कपाळावर डोकावतायत! थकलेला पण समाधानी असा चेहरा. कणकेने बरबटलेल्या हातानेच खट्याळ बटीला मागे सारण्याची धडपड! ही अशी तारांबळ पाहायला मिळावी असे त्याला फार वाटत असे. पण हीचे नेहमीच सर्व अप-टु-डेट! तिला ना होई कधी घाई, ना कधी धांदल! मग हा मुद्दाम तिची गंमत करी. स्वतःचा रुमाल स्वतः लपवून ठेवी व ऐन वेळी 'माझा रुमाल ! लवकर दे,नाहीतर उशीर होईल.' अशा आरोळ्या वर आरोळ्या ठोकी, इकडे तिकडे शोधण्याचे नाटक करी व आता तरी तिची शिस्त थोडीशी बिघडेल अशा आशेने तिच्याकडे पाही. पण ती मुकाट्याने दुसरा परीटघडीचा रुमाल काढून देई. मग हिरमुसला होऊन तो तसाच बाहेर पडे. मनात म्हणे ही एवढी थंड कशी? शिस्त आणि टापटीप तिच्या एवढी कशी अंगवळणी पडली? मीही काही अगदीच गबाळा नाही. बाहेर पडताना मीही अपटुडेट पोशाक करूनच बाहेर पडतो. पण घर हे घरासारखंच असावं. तेथे माणसाने मोकळं-ढाकळं वागायचं नाही तर कुठे वागायचं? बाहेर नेहमीच सर्व प्रकारच्या मॅनर्स सांभाळतो आपण! मग घरातही तेच का? घर हा बाहेरून आलेल्याला दिलासा, विश्राम! शिस्तीला बांधलेल्याला कसला आलाय आराम? का काय कळणार सुख बेबंदशाहीतलं? आपल्या आवडत्या गोष्टी मनमुराद करायच्या त्या घरातच ना? पण हिला अनेकदा सांगूनही तिच्या मनात माझ्याविषयी अढीच आहे .काय करावे ?कसं समजावू?

हळूहळू दोघांच्यात एक दरी ,दुरावा निर्माण होऊ लागला होता. तो तर एकदम अबोलच झाला होता या कोमल भावना दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत होता. आणि एक दिवस कहरच झाला. श्रावणातला पाऊस पडत होता .मधूनच एखादी सर कोसळत होती.हवेत गारवा आला होता. पाठोपाठ सूर्याची कोवळी उन्हं हवेत उबदारपणा आणीत होती. झाडे वेली फुला फुलांनी डवरलेल्या होत्या. सुगंध वातावरणात दरवळत होता. त्या सुगंधाने, त्या निसर्ग चमत्काराने त्याच्या चित्तवृत्ती बहरून आल्या होत्या. काही झालं तरी आज आपण आपल्या राणीला खुश करायचंच असं मनोमन ठरवून तो घराबाहेर पडला. पावसामुळे रस्त्यावर भरपूर चिखल झाला होता. निसरडे झाले होते. पण त्याला त्याचे भान नव्हते. खूप वेळ घालवून, दुकानं पालथी घालून तिला शोभेल अशा रंगाची साडी घेऊन तो लगाबगा घरी आला. बूट चिखलाने बरबटलेले होतेच पण कपड्यावरही चिखलाने खडी उमटवली होती. पण त्याला त्याची पर्वा नव्हती. तो मनाने कधीच घरी पोहोचला होता. सटसट पाय उचलीत, मोठ्या खुषीत शीळ घालीतच त्याने पायऱ्या चढल्या आणि आपलं अधीर बोट बेल वर दाबलं. बेल वाजवितच राहिला. तिने दार उघडले. पावसात न्हाऊन आलेल्या त्याच्या अवताराकडे ती पाहातच राहिली. त्याने आवेगाने तिला जवळ घेतले व खोक्यातील साडी काढून तिच्या अंगाला लपेटली. 'राणी !राणी ! म्हणतच तो तिच्या प्रतिसादाची वाट पहात राहिला. पण तिच्या कपाळावरील आठ्यांचे जाळे पाहून 'आपले काय चुकले?' हेच त्याच्या क्षणभर लक्षात येईना. ती क्रोधाने म्हणाली,' शी! सगळा गालीचा खराब केलात! चिखलाचे पाय उमटवलेत त्यावर! लहान मुलाच्या वरताण आहात तुम्ही!' तिच्या त्या वाग्बाणांनी तो विद्ध झाला. त्याच्या मनाचे थुई थुई उडणारे कारंजे एकदम बंद पडले. आनंद मयूर पिसारा मिटवून गप्प झाला. पण एवढे दिवस तिचे आकांड-तांडव सहन करणाऱ्या त्याच्या मनाने आज एकदम बंड पुकारले. आंजारून गोंजारून किती वेळा तरी त्याने तिला सांगितले होते की इतकी एका टोकाला भिडणारी शिस्त बरी नव्हे. व्यवस्थितपणा जरूर असावा. पण त्याचा असा अतिरेक नसावा. पण स्वतःचे म्हणणे सोडावयास ती कधीच तयार झाली नाही. तो प्रत्येक वेळी संयम करी. कारण त्याला ती मनापासून आवडत होती, तिला दुखवणं त्याच्या जिवावर येत असे म्हणून! पण आज मात्र त्याचा तोल सुटला. इतके दिवस दाबून ठेवलेल्या भावनांचा, कोंड माऱ्याचा आज स्फोट झाला. त्याने क्रोधाने तिला म्हटले,'Get out ! I hate you !'

आपल्या नवऱ्याचा हा अवतार तिलाही नवाच होता. क्षणभर तीही बावरली. थयथयाट करीत चिखलाने भरलेल्या पायानेच तो सर्व खोल्याभर नाचत सुटला. बेड वरच्या साजरी, सुंदर पडदे, कव्हर्स सारं त्यांना विस्कटून टाकलं.अॅश ट्रे उडवून दिला. फ्लॉवर पोट फोडला. भिंतीवरची किमती चित्र फाडली. ती अगतिकतेने हा नाश पहात उभी होती. आपले काहीच चुकलेले नसताना त्याचा हा थयथयाट पाहून तीही चिडली. आपण राब राब राबून घर चित्रासारखं ठेवतो पण याला त्याची काडीचीही किंमत नाही. मग का राहायचं आपण या घरात? मनाशी काही निर्धार करून ती आत निघून गेली. पाचच मिनिटात ती बॅग घेऊन बाहेर आली. पण तोही तिला अडवायला पुढे झाला नाही. थंड डोळ्याने त्याने तिच्याकडे पाहिले. मान झटकून पटकन फाटक उघडून तीही बंगल्याबाहेर पडली व मागे वळूनही न पाहता रस्त्याला लागली.

दोन-तीन दिवस सरले. हा विमनस्क स्थितीत सिगारेटवर सिगारेट ओढीत घरातच बसून होता. खोलीभर थोटकं पसरली होती. त्याचा चेहरा ओढलेला होता. दाढी वाढली होती. फार मोठ्या आजारातून उठल्यासारखा कधी नव्हे एवढा बापुडवाणा झाला होता. घराची रया गेली होती. आता स्वतःच्या वागण्याचा तो स्वतःशीच विचार करीत होता. अंतर्मुख झाला होता. खरं तर त्याला तीची फार आठवण होत होती. स्वतःशीच तो खंतावत होता. खरंच! घरासाठी बिचारी किती कष्ट करायची. मी दिवस, रात्र घर स्वच्छ, सुंदर, नेटकं कसं राहील याच चिंतेत असायची! घरही काय सुंदर सजवायची! कितीतरी कलात्मक वस्तू हौसेने, चिकित्सक दृष्टीने दुकानच्या दुकानं पालथी घालून कुठून कुठून गोळा केल्या होत्या त्या तिलाच माहिती! आणि आता घराचा हा गलिच्छ अवतार पाहिल्यावर तिच्या कल्पकतेची त्याला जास्तच जाणीव होऊ लागली. घराचं घरपण म्हणजे काय असतो तेही त्याला समजू लागलं आणि ते काही नाही आता आपणही तिला आवडेल असंचवागण्याचा प्रयत्न करायचा. पण हा दुरावा नाही आता सहन होत. कुठे गेली असेल बरं ही! नक्कीच तिच्या माहेरी गेली असणार! जावे का तिला परत आणायला? विचारांच्या आवर्तनात मन भिरभिरू लागले.

इकडे माहेरी अचानक निघून आलेल्या तिलाही चैन कसं ते पडत नव्हतं. किती झालं तरी भावनेच्या भरात तिने घर सोडलं होतं. तिचही त्याच्यावर नितांत प्रेम होतं. तीही विचार करू लागली आणि विचारांती तिला उमगलं. खरंच! आपण ही किती वेड्यासारख्या वागत होतो. आपल्या सुखासाठी तो सतत झटत असतो. त्याच्यामुळेच तर मी या सुखाच्या गालीच्यावरुन हिंडत होते. मला हवे तसे चित्रासारखे घर, उंची फर्निचर, पडदे सारं सारं त्यानच तर आणून दिलं होतं. माझ्या आवडीनिवडींना किती जपत असे तो! पण मी त्याच्यासाठी काय केलं? त्याला दुःख देण्याव्यतिरिक्त, त्याचा वेळोवेळी हिरमोड करण्याव्यतिरिक्त? का नाही मी स्वतःला थोडी बदलवू शकत? स्वच्छता , टापटीप यांची आवड आणि अतिरेक यांची सीमारेषा मी ओळखू शकले नाही. मी त्याला माझ्या शिस्तीत ठोकून बसविण्याचा प्रयत्न केला. खरंच मी चुकले. त्याचं म्हणणंही खरंच होतं.घर हे घरासारखे असावं. घरातच आपल्याला मोकळेपणाने, शिष्टाचार बाजूला ठेवून वागता येतं. घर म्हणजे रिलॅक्सेशन! आपण त्याचा सारा विश्राम हरवून टाकला. नाही! आता आपण असं वागायचं नाही. आता प्रथम परत जायचं, त्याची क्षमा मागायची. आपला व्यवस्थितपणा आपला आपणच सांभाळू. पण त्याच्यावर सक्ती नाही करायची. नाराजी दर्शवायची नाही. वागू दे त्याला त्याच्या मनाप्रमाणे! तोही बिचारा खरोखरच उन्हातान्हात काम करून किती दमत असेल. आल्यावर खरंच पाय लांब करून जरा पडावसं वाटलं त्याला तर त्यात काय चुकलं त्याचं! मी मात्र फक्त माझाच विचार करीत होते. पण आता यापुढे मी नेहमीच फक्त त्याच्यासाठी, त्याच्या म्हणण्याप्रमाणेच जगणार आहे. इतर कुणीही हेवा करावा असं सुख लाथाडून मी घराबाहेर पडले. मी इथे येण्यात नक्कीच चूक केली आहे. परत जायलाच हवं!

मनाचा असा पक्का विचार होताच तिला स्वस्थ बसवेना. कधी एकदा परत जाते नि त्याला डोळे भरून पाहते असे तिला झाले. घराची फार ओढ वाटू लागली. तशीच उठून तिने गाडी पकडली नि ती घरी पोहोचली. फाटक उघडीत असतानाच बंगल्याच्या दाराकडे तिची नजर गेली आणि ती अवाक् झाली. कारण विस्कटलेल्या अवतारात तो कुलूप लावून पायऱ्या उतरायच्या तयारीत होता. दोघांची नजरानजर झाली. मनी शे गूज मनाला कळले. गदगदणाऱ्या या अधीर मेघाने धरित्रीला भेटण्यासाठी धाव घेतली आणि श्रावण सरी एकदम कोसळू लागल्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance