Swati Damle

Inspirational

3  

Swati Damle

Inspirational

प्रेरणा

प्रेरणा

4 mins
1.5K


प्रेरणा

आज लंच टाइम मध्ये योगिनी ला मुलगी झाल्याची बातमी समजली.आता तिला कधी एकदा जाऊन भेटतो असं झालं होतं.उद्या नको, परवा जाऊ करता करता शनिवारचा दिवस पक्का केला आणि आमचा ग्रुप हॉस्पिटलमध्ये जाऊन धडकला. चिमुरडीचा ताबा सर्वांनी घेतला. शुभेच्छा, शुभ आशीर्वाद देऊन व बारशाला नक्की येऊ असं सांगत आम्ही निघालो. काही दिवसांनी बारसं थाटात पार पडलं.'प्रेरणा 'असं नाव ठेवलं. रजा संपवून योगिनी ऑफिसला येऊ लागली .आता सर्वात लहान प्रेरणा म्हणून तिच्याबद्दल सारखं बोलणं होऊ लागलं .तिची प्रगती काय,कशी अशा चौकश्या व फोटो बघंण चालू झालं.मुलगी सहा महिन्याची होऊन गेली पण प्रगती शून्य! अलीकडे योगिनीसुद्धा उदास दिसू लागली .मुलीची काहीच कशी प्रगती होत नाही या विचाराने तिला काही सुचत नसे.डॉक्टरांशी संपर्क साधला असता ती एक स्पेशल चाइल्ड असल्याचं सांगण्यात आलं. मुलगी वर्षाची झाली पण प्रगती फक्त तीन महिन्याच्या बाळाएवढी! हळूहळू योगिनी ला सवय झाली व तिने कटू सत्य स्वीकारलं .तिची मनापासून काळजी घ्यायला सुरुवात केली .तिचे काका घराशेजारीच राहत असत.त्यांचा वाचनाचा गाढा व्यासंग होता या आपल्या पुतणीच्या मुलीचा त्यांना भारी लागला होता. तिला कशी सुधारावी या एकाच विचारात ते रात्रंदिवस मग्न होते. ओळखी पाळखीचे डॉक्टर गाठून ह्या अवस्थेला कारणीभूत काय होते याचा छडा लावण्याचा ते सतत प्रयत्न करीत होते .

यातच तीन वर्ष निघून गेली आणि योगिनी परत एकदा प्रेग्नेंट झाली. मनात धाकधूक! या वेळी काय होईल, सर्व नीट असेल ना! डॉक्टरांनी सर्वतोपरी काळजी घेतली आणि एके दिवशी तिला कन्यारत्न प्राप्त झालं .मुलगी झाली अस कळताच प्रथम ती बावरली ,नंतर सावरली .मुलीला उचलून घेऊन स्तत:शीच म्हणाली तू सांभाळशील ना तुझ्या बहिणीला? दुसरी मुलगी जसजशी मोठी होऊ लागली तशी तिची प्रगती पाहून योगिनी सुखावली. तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं तिला होऊन गेलं होतं .आई होण्याचा नि मुलीच्या प्रगतीचा आनंद घेण्यातलं सुख ती आता अनुभवित होती.

दुसरी मुलगी जसजशी मोठी होऊ लागली ,शाळेत जाऊ लागली तेव्हा तिला आपल्या बहिणीबद्दल आश्चर्य वाटू लागलं.ती आईला प्रश्न विचारून भंडावून सोडू लागली पण बहिणीशी ती बाहुलीशी खेळावं तशी छान खेळायची .पण तिच्या बरोबरीच्या मैत्रिणींना मात्र ती स्वतःच्या घरी कधीच बोलावीत नव्हती .ही गोष्ट काकांपासून लपून राहिली नाही.त्यांना वाटू लागलं की हिला कमीपणा वाटतो का? बहिणीची दया येते ते का लाज वाटते?अस बरोबर नाही.काहीतरी करावयास हवे .

आणि अचानक काकांच्या वाचनात एक बातमी आली.जपान मध्ये महिलेने आपल्या मुलीला विष पाजून स्वतःही आत्महत्या केली .काय झालं असावं असं वाटून अधिक माहिती वाचतांना त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. त्या बाईची मुलगी स्पेशल चाइल्ड होती .बावीस वर्षांची होती पण समज दोन वर्षांच्या मुली एवढीच होती. त्या आईला स्वतःचं मरण पुढे दिसत होतं .आपण गेल्यानंतर या मुलीचं पुढे काय होणार ?तिला कोण सांभाळणार? आणि हा समाज! त्यांच्या बुभुक्षित नजरांपासून हीच कोण रक्षण करणार? काहीच कळत नसलेल्या पण शारीरिक पूर्ण वाढ झालेल्या या मुलीचा उपभोग्य वस्तू म्हणून वापर झाला तर? नाही, नाही असं होता कामा नाही.त्यापेक्षा माझ्या मुलीला कलंकित आयुष्यापासून मीच सोडवेन. मीच तिला विश्रांती देणे योग्य म्हणून त्या आईने मुलीला विष पाजले. ती मेल्यावर स्वतःही विषय घेऊन आपलं जीवन संपवून टाकलं.

आता काकांना चैन पडेना .त्यांच्या डोळ्यापुढे सारखी प्रेरणाच येऊ लागली .मुलगी आता दहा वर्षांची झाली होती पण उताणी पडून होती .फक्त तीन महिन्याच्या बाळासारखी ! बापरे!घरात कोणी नसताना तिच्या बाबतीत असं काही होऊ शकेल ? छे! छे! हा अभद्र विचार मला सुचलाच कसा? या विचारांनी सुन्न झालेले ते विचार करू लागले आणि त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी ताबडतोब एक पत्रक तयार केलं नि वर्तमानपत्राकडे छापण्यासाठी पाठवलं. त्यांनी लिहिले होते,' सुजाण नागरिक हो! आपल्या घरात अशा प्रकारची मुले आहेत का? असतील तर पुढे काय याचा विचार करण्यासाठी एकत्र जमावे'. वेळ, तारीख, जागा सर्व काही त्यांनी ठरवून दिले आणि त्या ठराविक दिवसाची वाट पाहू लागले. ठरलेल्या दिवशी सबंध भारत वर्षातून चाळीस-पन्नास पालक जमले .त्यांची सभा झाली.प्रत्येकाला मुलांबद्दल सारख्याच समस्या भेडसावत होत्या यावर काकांनी उपाय सुचविला. आपण सर्वांनी मिळून काही ठराविक रक्कम काढूया आणि जवळपास एखादी जागा घेऊन या मुलांसाठी घरकुल उभारुया .तिथे चांगल्या सुखसोयी निर्माण करूया .या मुलांसाठी आया ,नर्सेस यांची सोय करूया. .जेणेकरून या मुलांची तिथे व्यवस्थित काळजी घेतली जाईल. महिन्यातून जमेल तसे पालकांनी त्यांना भेटावे .यामुळे घरातील इतर व्यक्तींची अडचण दूर होईल .त्यांना ओशाळेपण न वाटता मोकळेपणाने जगता येईल. बघा कसं वाटतंय ते? आणि काय आश्चर्य! सर्व पालकांनी विचार विनिमय करून निर्णय घेतला व तिथल्या तिथे पैसे गोळा झाले. पुढच्याच महिन्यात जागा शोधली गेली .कामाला गती मिळाली .आणि अशा रीतीने या स्पेशल मुलांसाठी एक संस्था स्थापन झाली .अर्थातच काकांनी या संस्थेस नाव 'आधार ' असंच ठेवलं यात काही शंकाच नाही.

' ठेविले अनंते तैसेचि रहावे

चित्ती असो द्यावे समाधान '

असे न करता एका बातमीची प्रेरणा घेऊन एका व्यक्तीला संस्था स्थापन करण्याचे स्फुरण यावे हे अघटितच !


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational