दैवगती
दैवगती
पावसाळ्याचे दिवस होते. रात्रभर सोसाट्याचा वारा आणि पाऊस यांनी नुसता धुमाकूळ मांडला होता. पहाटे 5 च्या गजरा बरोबर मला जाग आली.जाऊ नये , असा एक विचार मनात येत असतानाच दुसर्या दिशेने 6 रजा झाल्याचा साक्षात्कार झाला. आणि आळस झटकून मी पटकन उठले. नित्यनेमाने सर्व कामे पार पाडून आठ च्या गाडीसाठी धावले. गाडी जरा लेटच होती. मी माझ्या मैत्रिणीसह आत घुसले. जागाही मिळाली. बऱ्याच वर्षांनी भेटलेल्या रेणूशी गप्पा मारण्यात मी गर्क झाले.
मजल दर मजल करीत, तेथे येणारे अडथळे ओलांडीत पावसाच्या साठलेल्या पाण्यावर तरंगत गाडी धीरे धीरे चालली होती. बाहेर पावसाला खंड नव्हता, गाडीत आमच्या गप्पांचा ओघ ही थंडावला नव्हता. गर्दी तर अगदी मी म्हणत होती. उकाड्याने घुसमटायला होत होते. काळोखी तर हटतच नव्हती. तरी कशाचीही फिकीर न करता आम्ही विषयांवर विषय बोलतच होतो. आजूबाजूच्या विश्वाचा जणू आम्हाला विसरच पडला होता.
एवढ्यात गर्दीत झटापटी सारखा आवाज आला. गर्दीचा लोंढा इतका वेळ एका जागी तटलेला फुटून वहावयास लागावा तसा जोर जोराने पुढे येतो आहे असे वाटले. पण प्रत्यक्षात एक बाई अगदी छोट्या मुलाला घेऊन त्या तशा गर्दीत रेटारेटी करून घुसत असलेली दिसली.सर्व जणी तिच्याबद्दल बोलत होत्या. कोणी तिला शिव्या घालीत होते ,तर कोणी परोपरीने सांगत होते .कुठलेच शब्द आमच्यापर्यंत पोहोचत नव्हते पण त्या गर्दीचा आवाज बहुदा तिला 'या गर्दीत तिने एवढ्या छोट्या बाळाला घेऊन येऊ नये 'यासंबंधी चाच असावा हा मी तर्क केला .
ती बाईपण अगदी कणखर दिसली .इतर कुणाकुणाकडे लक्ष न पुरवता ती तशीच त्या गर्दीत पुढे घुसली .जणू हजार हत्तींचे बळ तिला प्राप्त झाले होते .तिने आता आमच्याकडे मोर्चा वळविला. ते इतुकेसे चिमुकले घेऊन ती आमच्या खिडकीखाली बसली .आम्हीही अर्थातच काहिही हरकत घेतली नाही .पण इतका वेळ ते मूल बाकी शांत होते.ती स्वतः तेथे स्थानापन्न होताच आपसूक गर्दीनेही मूग गिळले व परत स्टेशन कुठले आले इकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
गाडी उशीरानेच व्ही.टी.ला पोहोचली .मध्यंतरी बरीच स्टेशने आली ,गेली .गर्दी उतरली ,परत चढली. आमचे काहीच लक्ष नव्हते .ती बाई व ते मूलही आम्ही विसरून गेलो .मी व माझी मैत्रीण रेणू अगदी शेवटी उतरलो .माझी नेहमीच सवय आहे की सर्वात शेवटी गाडीत काही राहिले नाही ना ,ते पाहून उतरायचे .त्या सवयीनुसार मी बाकाखाली डोकावले व अरे !असा उदगार माझ्या तोंडून बाहेर पडला.रेणूही जरा मागे वळून पाहात म्हणाली ,आॅ! दुपटे कुणाचे?त्या बाळाचे वाटतं? मी काहीच बोलत नाही व तिथून हलतही नाही म्हणताच ती जवळ आली व वाकून पाहू लागली. तिच्याही तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडला. अरेच्या !त्या बाईने ते मुल गर्दीचा फायदा घेऊन बाकाखाली कधी सरकवले व ती तेथून उठून कधी उतरून गेली हे काहीच आम्हाला कळले नव्हते .आता या मुलाचे करायचे तरी काय ?असा प्रश्न साहजिकच डोक्यात आला .
लवकरच काहीतरी हालचाल करावयास हवी होती. एक तर गाडी लेट झालेली ती परत सुटून गेली की हे मुलही बापडे तिच्याबरोबर कुठेतरी भटकत राहील .काय करावे बरे ?इतक्यात मी झटकन निर्णय घेतला व धावतच गाडी बाहेर आले .गार्डच्या केबिन कडे झपाट्याने जाऊन त्याला गाठले. या डब्यात असे असे एक मुल आहे हे त्याला सांगताच त्याने स्टेशन मास्तरला सांगून एका आयाला आमच्याबरोबर पाठविले.तिने ते मूल ताब्यात घेतले .दुपट्यावरून ते काठेवाडी गुजराती बाईचे असावे असे वाटत होते. मूल होतं ही व्यवस्थित .दुपटे उघडून पाहिले तर ती गुटगुटीत मुलगी होती. नाकी डोळी नीटस.काळेभोर डोळे ,डोक्यावर कुरळ्या केसांचे जावळ ,काजळ तीट लावलेली.कपडे स्वच्छ ! इतकी स्वरुपसुंदर ,चांगल्या कुळातील वाटावी अशी ही मुलगी कोण ?आणि ती त्या बाईने अशी काय म्हणून सोडली? असा प्रश्न दोघींनी आपापल्या मनाला विचारला. शेवटी असेल काहीतरी भानगड !म्हणून आम्ही निघालो. पण -----
अहो बाई, निघालात कुठे ?तुम्हाला स्टेशन मास्तर कडे यावे लागेल.असे ती आया म्हणताच आम्हाला कळून चुकले की आता आपला दीड तास जाणार .पण आम्हीच ओढवून घेतलेलं संकट होतं ते! एकदा मनात आलं की ,सांगावं,तुम्ही काय वाटेल ते करा त्या मुलीचं !पण सुसंस्कारित मनाने ह्या विचाराला बाजूला ढकलले ,व आम्ही रीतसर जाब देण्यास निघालो .आमच्या बरोबर ती आया, टी.सी., गार्ड अशी सगळीच मिरवणूक असल्याने काही संशयास्पद नजरा वळून वळूनआम्हाला पाहात होत्या. काहीही दोष नसताना आपणच गुन्हेगार आहोत असे वाटत होते. त्या बोचर्या नजरा चुकविण्यासाठी आम्ही वेगाने तिकडे न बघता स्टेशनमास्तरच्या केबिनमध्ये शिरलो.तिथे ते मुल आम्हाला कसे सापडले ,आई कोण होती ,तिचे वर्णन, उतरली कुठे ,वगैरे प्रश्न विचारून आम्हाला त्यांनी बरेच हैराण केले .शेवटी सर्व सोपस्कार ,सह्या वगैरे घेऊन एका मुलीचे आयुष्य या हातून मार्गी लागले या थोड्याफार समाधानात सुमारे दीड तासाने आम्ही बाहेर पडलो .
या सर्व गडबडीत रेणूकडे माझे लक्ष गेले नव्हते. तिला मी काही बोलणार इतक्यात तिच्या भरलेल्या डोळ्यांकडे माझे लक्ष गेले .काय ग ? एवढाच प्रश्न विचारायचा अवकाश .अश्रूंनी नयना बाहेर पाटच वहावयास सुरुवात केली. ती कशीबशी रडत म्हणाली, देव तरी बघ कसा निष्ठुर आहे ते !माझे डोळे आता खाडकन उघडले .
खरंच ! रेणूच्या लग्नाला दहा वर्षे लोटली होती. पण पाळणा हलला नव्हता .तिच्या भावना ,इतके दिवस हृदयात कोंडलेलं वात्सल्य आज उफाळून आलं होतं .ती जड अंतकरणाने मला म्हणाली ,किती सुरेख होती होती बाळी !माझी कूस उजवली नाही आणि इकडे काही जणींना नको एवढी मुलं !खरंच ! अजबच आहे याचा न्याय! मला तर ती मुलगी सांभाळाविशी वाटू लागली आहे .पण मूल सांभाळायचे तर ते माहितीचे हवे .माझ्या डोक्यात नसत्या शंका! शी! असं काय ही म्हणते! कोण दोघं! ई! कुठल्या व्यभिचारातून ही उत्पत्ती असेल कोण जाणे ?पुढे मोठी झाली की लागेल गुण उधळायला! नको ग बाई! या विचारापासून तिला परावृत्त करायला हवे! मी तिच्या भावना जाणू शकत होते. पण म्हणून ही उकिरड्यावर सापडलेली मुलगी आपली म्हणून सांभाळायची ?माझे सुशिक्षित मन याला तयार होईना. ही कल्पनाच मला पटेना !पण स्पष्टपणे बोलून तिच्या भावना दुखविण्यासही मन कचरू लागले .आता काय करावे? शेवटी तात्पुरते म्हणून मी तिला म्हणाले ,'रेणू! आत्ताच हा विचार तू करू नकोस. तुझ्या मिस्टरांना पण नको का विचारायला ? त्यांची संमती हवी !तूर्त ती मुलगी कुठल्या अनाथालयात जात आहे याची माहिती मिळवून ठेव .तूही विचार कर .विचार पक्का झाला तर तुम्ही दोघे जण तिला घरी घेऊन येऊ शकाल नाही का? मीही त्यावेळी येईन तुमच्या बरोबर !तो दिवस असाच विमनस्क अवस्थेत घालवला .
पुढचा सर्व आठवडा रेणूने घालमेलीत घालवला. तिचा विचार करता करता मीही माझे मनस्वास्थ्य हरवून बसले .तिची समजूत घालण्यासाठी धीर करून मी एकदा तिच्या घरी गेले .
बेल वाजवण्यासाठी हात वरती करते तोच आतून मला मुसमुसण्याचा आवाज आला .मी थोडी थबकले. आंत जावे की न जावे या विचारात दारावरील हाताचा दाब पडून दरवाजा लोटला गेला व मलाआत जाणे प्राप्त झाले. रेणुचे डोळे पाण्याने डबडबलेले,बराच वेळ रडत असावी बहुधा! आणि तिच्या मिस्टरांची मात्र कुठेच चाहूल लागत नव्हती. घरभर पसारा होता. टीपॉय वरील अॅश ट्रे गच्च भरलेला दिसत होता. या सर्वावरून दोघा नवरा-बायकोत काहितरी चमत्कारिक तणातणी झाली असावी असा मला अंदाज आला. पण ती तणातणी त्या अनाथ मुलामुळे निर्माण झाली असेल असे मला चुकूनही वाटले नाही. किंबहुना मी जरी त्या विषयाबद्दल तिच्या मनात काय आहे याची चाचपणी करण्यासाठी आले होते तरी रेणू तो विषय विसरली असावी अशीच माझ्या अंतर्मनाने स्वतःची सोयिस्कर समजूत करून घेतली होती. पण मी आलेली दिसताच तिने स्वतःला माझ्या कुशीत झोकून दिले व डोळे पुसतच जे सांगितले त्याने पहिल्याच झटक्यात मला एवढच कळून चुकलं की त्या दिवशीची रेणूची ती भावना नव्हती. तर त्या भावनेला मूर्त स्वरूप देण्याचा तिने चंगच बांधला होता .ती मुलगी घरी आणून तिला स्वतःची मुलगी म्हणून वाढवायची त्या विचाराशी तिचे मिस्टर सहमत नव्हते. त्यांच्या दृष्टीने अशा भावनेच्या आहारी जाऊन एकदम निर्णय घेणे चांगले नव्हते. मूल दत्तक घ्यायचे तर ते आपल्या नात्यातील एखादे घेऊ असे आपले त्यांचे मत! पण हिला आवडली होती तीच मुलगी !
नवर्यालाही तिचा मोह पडावा म्हणून रेणू त्याला घेऊन अनाथआश्रमातही जाऊन आली होती.मुलगी चांगली होती पण आपली म्हणून तिचा स्वीकार करायचा की नाही हा निर्णय होत नव्हता. त्याने परोपरीने तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या हृदयात त्या मुलीने स्थान मिळवले होते त्याला तोड नव्हती .तिच्या नव-याने तिला मायेने समजावून सांगितले कीआपला मूल दत्तक घेण्यास विरोध नाही. फक्त मुलाची निवड दोघांच्या पसंतीने व्हावी एवढीच त्याची इच्छा होती .आणि हिच्या मनात ठाण मांडून बसलेल्या मुलीमुळे ती दुसरं मूल नजरेखालून घालावयास तयार नव्हती .
विचार करून करून त्याचे डोके फिरायची वेळ आली. सिगारेटचा शिलकी साठाही संपला .शेवटी तिच्यावर भडकून जीवाला स्वस्थता मिळावी म्हणून तो नुकताच बाहेर पडला होता.
मुलीचा विषय बाजूला पडून हे कुठे गेले असतील ही चिंता तिला भेडसावत होती.मी तिला धीर दिला व आपणही दोघी जरा समुद्रावर फिरून येऊ या असे म्हणून तिलाही घराबाहेर काढले .समुद्रावर पोहोचेपर्यंत ती एक अक्षरही बोलली नाही. व मीही माझ्या परीने या कोड्याचा काय उलगडा करावा या विचारात मग्न झाले .एक चांगलीशी जागा पाहून आम्ही दोघी वाळूत बसलो .रेणूची मान खालीच होती. व ती वाळूवर रेघोट्या ओढत होती. काही अंतरावर एक माणूस पाठमोरा असा बसला होता तो काहीसा रेणूच्या नवऱ्यासारखाच दिसत होता. त्याच्या पाठमोर्या हालचालीवरून तोही अस्वस्थच वाटत होता .मी भेळ आणण्याच्या मिशाने तेथून उठले व त्या माणसाला जवळून पाहिले मात्र, भेळ न घेताच मी परत आले .कारण तो रेणूचा नवराच होता .रेणू ला हात धरून उठवून मी त्याच्या जवळ घेऊन आले .व आता शांत चित्ताने दोघे काही निर्णय घेऊ शकतील या विचाराने दोघांना तिथेच सोडून मी घरी परतले .
काही दिवसांनी परत माझे पाय त्या घराकडे वळले. मध्यंतरी दोन तीन वेळा मी तिला फोन वर भेटायचा प्रयत्न केला पण ती ऑफिसला आलेली नसल्याचे समजले .बेल दाबताच आतून आले !आले! असा हर्षोत्फुल्ल आवाज ऐकू आला व क्षणात दार उघडले गेले .मी डोकाऊन पाहते तर बाळाच्या अगत स्वागताची तयारी झालेली दिसत होती .मी अवाकच झाले .अखेर ती जिंकली .तिने मनाचा निश्चय केला होता .मी हसत हसत म्हणाले ,कुठल्या बाळराजांचे आगमन व्हायचे आहे आज? एवढ्यात आतून बाहेर येत तिच्या मिस्टरांनी उत्तर दिले. अहो ,कोणत्या काय? आमच्याच !बाळराजे नाही हं!राजकन्या! आणि ते दोघेही हसले. पण कुठली मुलगी याची उत्सुकता होतीच व मनाची प्रतिक्रिया प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे उमटून गेली माझ्या हाताच्या खुणेने कुठची?हा प्रश्न विचारताच रेणू हसतच म्हणाली, तीच गं! गाडीत सापडलेली परी! यावर मी पटकन तिच्या नवर्याच्या दिशेने पाहिलं तर त्यांचेही डोळे हसत असल्याचा मला भास झाला .माझ्या मनातील गोंधळ, उत्सुकता त्यांनी ओळखली व हसतच म्हणाला,अहो, त्यादिवशी गंमतच झाली. तुम्ही आम्हाला सोडून गेलात ,आणि आम्ही दोघेही मूकपणे वाळू शी खेळत राहिलो .वाळूशी चाळा करता करता दोघांनी एक नाव वाळूत लिहिले ,'प्राजक्ता 'आणि आमची मने सांधली गेली .खरं तर मलाही ती मुलगी फार आवडली होती. अगदी प्राजक्ताच्या फुलासारखी ,नाजूक ,प्रसन्न !पण समाज काय म्हणेल याची भीती वाटत होती .ही तर तिचा हेका सोडायला तयार नव्हती .तिला त्रास होईल या विचाराने माझा धीर होत नव्हता .पण दोघांच्या मनातले मुलाबद्दल चे भाव अचानक नामकरणाने बाहेर येताच मला नविन उमेद आली व दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही त्या अनाथाश्रमात जाऊन तिला घेऊन येण्याचा निश्र्चय कळवून आलोय .ही तयारी तिच्याच आगमनाची आहे.मी अवाक् झाले. मी काहीतरी बोलायचे म्हणून अगं, पण ,असे बोलत असतानाच मध्येच मला तोडून ती म्हणाली,' तुला ही गोष्ट पटणार नाही ,आवडणार नाही ,ते मला माहित आहे पण तू 'फुलराणी' पाहिले आहेस ना ?त्यात नाही का एका फुलं विकणारीला सुसंस्कृत बनवले आहे .असेच प्रयत्न करीन मी.ही मुलगी कोण याचा विचार न करता. तेही रत्नच आहे असे समजून तिला विचारांचे, आचारांचे ,संस्कृतीचे पैलू पाडीन.हा एक प्रयोगच म्हणेनास! नाही ,प्रयोग वगैरे ठीक आहे गं!पण यात तुझे सुख आणि मनस्वास्थ्य सर्वच हरवून बसणार नाहीस ना तिथे याची मात्र काळजी घे ! छे गं! मला मूल नाही याची खंत एवढी वाटते की ,मी माझे हरवलेले सुख व मनस्वास्थ्य परत मिळवले आहे. आपण नेहमीच वायफळ गप्पा मारीत असतो. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे .ठीक आहे ,त्यानुसार ही एक बेवारशी ,अनाथ मुलगी जर मी सांभाळली तर देशाच्या एका व्यक्तीला सुसंस्कृत केले असे व एक वाया जाणारे मुलीचे जीवन उजळविण्याचे भाग्य मला लाभले असे मी म्हणेन .तिचे आनंदाने व तृप्तीने चमकणारे डोळे व उत्साह पाहून मी मात्र लक्ष नमस्कार घालीत राहिले.