Sumedha Adavade

Drama

4.8  

Sumedha Adavade

Drama

स्वच्छतेच्या बैलाचा ढोल!

स्वच्छतेच्या बैलाचा ढोल!

8 mins
1.4K


"अगं...त्या कोपऱ्यातल्या लादीची रेष अजुन काळीच दिसत आहे. कशी साफ करतेस तू?"

गेले दोन तास तारेच्या ब्रशने लादी घासत असलेल्या प्रज्ञाने सासुबाईंकडे वैतागलेल्या चेहऱ्याने बघितलं. एव्हाना सोफ्यावर बसुन त्यांचा सफरचंदाचा फडशा पाडुन झाला होता. गेल्या दोन दिवसांपासुन आई तिच्या घरी येऊन राहिल्या होत्या..आणि आता पुढे सहा महिने इथेच राहणार होत्या. म्हणजे आता स्वच्छतेचं जंग पछाडुन तिचं अंग मोडुन निघणार होतं. आईंना स्वच्छतेचं खुप वेड होतं. त्या सहा महिने एका सुनेकडे आणि सहा महिने दुसरीकडे रहायच्या. दोघींनाही स्वच्छता आवडायची नाही असं नाही. त्यांच्या घरांना कोणी अगदीच अस्वच्छ, गलिच्छ म्हणेल अशी काही परिस्थिती नव्हती. तरीही आई आल्यावर दोघी आपापल्या नोकऱ्या, घर आणि मुलं सांभाळत आईंचं हे वेड वेड्यासारखी साफ सफाई करत सांभाळायच्या. आई आल्यावर सगळेच दिवस गणपती-दिवाळी सारखे असत..म्हणजे ह्या सणांच्या आधीचे...साफ-सफाईचे! त्यांचा स्वच्छतेचा बैल सतत उधळलेला असे. आता ह्या वेळेस आल्या तेव्हा प्रज्ञाला दोन दिवस सुट्टीच होती. मग तर काय? तिला उसंतच मिळणार नव्हती.

कोपऱ्यातल्या लादीवर साईड टेबल येणार होतं. शिवाय त्याच्या बाजुला लाकडी अवजड सोफा. आता ह्या दोन्ही वस्तु बाजुला सारुन त्याखालच्या लादीची काळी रेष कुठला पाहुणा बघणार होता ह्याचा विचार पण करावासा प्रज्ञाला वाटला नाही! ती जोरजोरात त्या रेषेवर ब्रश घासु लागली.

" अटप लवकर. त्या नंतर वरचे कोपरे झाडायचे आहेत आणि भिंती पुसायला घ्यायच्या आहेत!"

प्रज्ञाने वर डोकं करुन उंचावरच्या सिलींगच्या कोपऱ्यातल्या छोट्याशा जलमटाकडे पाहिलं. त्याच्या दुप्पट आठ्यांचं जाळं तिच्या कपाळावर पसरलं होतं.दोन-अडीच तास ओणवं राहुन, गुडघ्यांवर बसुन प्रज्ञाची कंबर आणि पाय आता ठणकावुन स्वत:चं अस्तित्व दाखवु लागले होते. लादी घासुन हातही दु:खु लागले होते. तिला घरात मार्बल बसवल्याचा पश्चाताप होत होता. शेजारच्या नाडकर्णींकडे कशा मस्त पोर्सीलेन टाईल्स आहेत. ही अशी घासायची भानगड नाही.. नुसता फडका फिरवला तरी स्वत:चा चेहरा दिसेल इतकी स्वच्छ होते लादी. आता प्रदीपच्या पुढच्या बोनसला मी घरातली लादीच बदलुन टाकणार. ना रहेगी लादी, ना रहेगी घीसाई! हे मनाशी ठरवल्यावर तिला कामाचा आणखी उत्साह आला आणि ती काळी रेष घालवु लागली.

रविवारच्या हक्काच्या वामकुक्षीच्या दुपारी, नवरा आणि मुलगा गाढ झोपेत असताना आपल्याला स्वच्छता मोहीम सुरु करावी लागेल हे आई आल्यावर तिला वाटलंच होतं. त्यांना घरातल्या सगळ्या वस्तु अगदी जिथल्या तिथे, एकदम स्वच्छ आणि साफ लागायच्या. धुण्याचे कपडे भिजवताना प्रदीपचे ऑफिसचे कपडे वेगळे, पिंट्याचे शाळेचे युनिफॉर्म वेगळे, बाकीच्यांचे कपडे वेगळे, चादरी, उशांचे अभ्रे,पडदे हे सगळं वेगळं आणि टॉवेलं,नॅपकीन वेगळी भिजवावी लागायची. सकाळच्या घाईच्या वेळेत वेगवेगळ्या बादल्यांमध्ये असे वेगवेगळे कपडे भिजवताना प्रज्ञाचे केस डोक्यापासुन वेगळे व्हायचे!

कपडे धुताना कामवालीने एकदा खोचकपणे विचारलं होतं तिला,

"बाईसाहेब, घरात कोणी आजारी वगैरे आहे काय..म्हणजे बघा ते स्पर्शातुन,कपड्यांतुन जंतु पसरणारा आजार वगैरे.."

" ए....काही पण काय बोलतेस? कोणी आजारी वगैरे नाही!" इती प्रज्ञा.

"नाही..हे सगळे कपडे रोज वेगवेगळे भिजवताय म्हणुन विचारलं हो!"

कपडे प्रकरण इतक्यावरच थांबायचं नाही. इस्त्रीचे कपडे वेगळे काढल्यावर उरलेल्या कपड्यांच्या घड्या बरोबर चौकोनीच झाल्या पाहिजे..अन्य आकार उकार चालणार नाही! कपाटात कपडे लावायला ठेवलेल्या प्रत्येक दोन हॅंगर्सच्या मध्ये मोजुन एक इंचाचं अंतर हवं. इतर कपड्यांच्या घड्या एकावर एक रचलेल्या वीटांसारख्या व्यवस्थित ठेवायला हव्या. स्वत:च्या साड्यांच्या तर त्या स्वत:च घड्या घालत...चार पाच वेळा झटकुन, मग पलंगावर घेऊन प्रत्येक वेळी दुमडल्यावर हाताने चार पाच वेळा तिला गोंजारुन शेवटी पर्फेक्ट चौकोनी घडी तयार व्हायची. त्याच्या आत मॅचींग ब्लाऊज व परकर जायचा...तेही चौकोनी घड्यांमध्ये!

अर्धा तास रग्गड घासल्यावर ती काळी रेष अखेर बरीच पुसट झाली. प्रज्ञाचा चेहरा साबणाच्या जाहिरीतीत ब्रशने कपडे घासणाऱ्या बायकांसारखा झाला होता. त्या किती वेळा घासतात ते मोजलं जातं. आता प्रज्ञाने मोजलं असतं तर किमान हजार तरी झाला असता आकडा! त्यानंतर स्टूलवर उभं राहुन जिराफासारखी मान करुन सिलींग झाडणं, भिंती पुसणं, शोकेस मधल्या वस्तु दोन दिवसांत तिसऱ्यांदा नीट लावणं हे सगळं पार पडलं. शेजारच्या दोघीजणी येऊन, "काय गं काही कार्यक्रम वगैरे आहे वाटतं घरात?" असं विचारुनही गेल्या.

सगळं झाल्यावर प्रज्ञाने सोफ्यावर बसत जरा निश्वास टाकला.तेवढ्यात नवरोबा आणि लेक उठले. त्यांचं चहा-पाणी करताना आईंनी प्रज्ञाला पुढच्या मोहिमेत किचन साफ करायला काढुया असं सांगितलं.

रविवार असल्यामुळे चिकन बनवलं होतं. दुसऱ्या दिवशी भाजीचा वार...त्यामुळे रात्री जेवणानंतर गॅस, ओटा, टाईल्स सगळ्यांना न्हाऊ-माखु घातल्यानंतरच तिची बेडरुम कडे रवानगी झाली. दिवसभराच्या अतीश्रमाने तिला लगेच झोप लागली.

रात्री कसल्या तरी आवाजाने प्रज्ञाला जाग आली. किचनमधुनच काही पडल्याचा आवाज आला वाटतं.." बाई..मांजर नाही ना आलं.." असं म्हणत ती किचन कडे येऊन बघते तर आई होत्या! बेसिनच्या खालच्या कपाटाचा खण उघडला होता आणि त्याखाली जवळ जवळ आत शिरुन हातात टॉर्च घेऊन काहीतरी निरखुन बघत होत्या.

"काय हो आई? काय आहे तिथे?" तसा त्यांचा आजु बाजुचा परिसर नीट नेटका होता. तरी उंदराच्या कल्पनेने तिची छाती धडधडु लागली.

" अगं..मगाशी पाणी प्यायला उठले तेव्हा ओट्यावर मुंगी दिसली.त्यांचं इथेच कुठेतरी भोक पाडुन बस्थान असणार. बाईsss...सगळीकडे होतील हो मुंग्या!"

प्रज्ञाच्या डोक्याला मुंग्या येऊ लागल्या. रात्रीचे अडीच वाजले होते. त्या मुंग्यांचं घर जर कुठे असलंच तर त्याही तिथे गाढ झोपल्या असतील. आणखी अडीच तासांनी तिला उठावं लागणार होतं सकाळच्या तयारीसाठी.

"आई ते उद्या बघुया हो उजेडात. आता झोपा चला!" कसंबसं समजावत प्रज्ञाने त्यांना झोपवलं.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिसातुन आल्यावर तिला अपेक्षेप्रमाणे घरात एकदम लखलखाट दिसला. हातातल्या भाजीच्या पिशव्या किचनमध्ये ठेवायला गेली तेव्हा डोळ्यांवर कसला तरी प्रकाश पडला. क्षणभर काही कळेना. मग खाली पाहिलं तर चटईवर तिच्या मांडणीतलं प्रत्येक भांडं अगदी स्वच्छ घासुन वाळत घातलं होतं. तिला त्या भांड्याच्या साबणाच्या जाहिरीतीची आठवण झाली. पण एवढी भांडी घासुन घेतली म्हणजे कामवालीचा चांगलाच दम निघाला असणार. काम सोडुन नाही गेली म्हणजे मिळवलं. गॅस, ओटा पण लकाकत होता. फ्रीज पण बाहेरुन अगदी चकचकत होता. आतल्या सर्व वस्तु अगदी पद्धतशीरपणे लावल्या होत्या. कपाटातल्या सगळ्या बरण्या, डबे रिकामे करुन त्यातले जिन्नस वाणसामानाच्या पुड्यांपेक्षा व्यवस्थित पुड्यात बांधले होते. आता जेवण बनवायच्या आधी तिला सगळ्या वस्तु जागच्या जागी भरायच्या होत्या, लावायच्या होत्या. सध्या तरी किचनचं भांडीवाला आणि वाणी अश्या संमिश्रीत दुकानात परिवर्तन झालं होतं.

ती फ्रेश होऊन बाहेर आल्यावर तिला जाणवलं की आज पिंट्या नेहमीसारखा तिला येऊन बिलगला नाही. त्याने एका जागी बसुन पुस्तकात तोंड खुपसलं होतं. आज न सांगता अभ्यासाला बसला म्हणुन प्रज्ञाला बरं वाटलं पण जरा अश्चर्यही वाटलं. आई मंदीरात प्रवचनाला गेल्या होत्या. हा एकटा घरी असुन एवढा शांत कसा?

"माझा बच्चु आज लवकर आला खेळुन?" त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत तिने विचारलं.

"नाही. मी आज गेलोच नाही. आणि आता कध्धीच जाणार नाही!"

" का रे? काय झालं?"

"आजीमुळे!"

" काय? आता आजीने काय केलं तुझं?" ती चकित झाली. प्रज्ञाला आईंचा पिंट्यावर किती जीव आहे हे माहित होतं. त्याला कोणी बोट लावलेलंही त्यांना चालायचं नाही. मग त्यांनी ह्याला काही केलं असण्याचा तर प्रश्नच नाही.

" अगं दुपारी मी स्कूल मधुन आलो तर आजी बिल्डींगचा स्टेअरकेस झाडत होती... ते पण अगदी खालच्या फ्लोअरपर्यंत!"

"कायsss?" प्रज्ञा जवळजवळ किंचाळलीच!

"हो. वरती ट्युशनला येणारी मुलं पेपर्स वगैरे टाकुन स्टेअरकेस डर्टी करतात ना. म्हणुन ती स्वत:च झाडू घेऊन कचरा काढु लागली. नाडकर्णी आंटी म्हणाल्या पण तिला की झाडूवाली सकाळी झाडुन गेली आहे. उद्या सकाळी येईल.. तुम्ही कशाला करताय हे? तर त्यांना आजी म्हणाली ’तोपर्यंत काय जीन्यावर कचरा असाच ठेवायचा? आणखी खाली पण घाण असेल. कसे बाई राहता तुम्ही लोकं. मला कसं...सगळं स्वच्छ लागतं.’ आणि ती खालपर्यंत झाडत गेली. माझे सगळे फ्रेंड्स मला चिडवु लागले, '’तुझी आजी झाडुवाली आहे का?" विचारु लागले. मी सगळ्यांना खुप ओरडलो आणि वर आलो.

प्रज्ञाला पिंट्याची दया आली...त्या सातवीतल्या पोरालाच एवढं लाजल्यासारखं झालं..ती असती तर काय झालं असतं? कदाचित आईंनी तिलाच जीना झाडायला लावला असता. मग पिंट्याला पोरं "तुझी आई झाडुवाली आहे का?" म्हणुन विचारु लागली असती. "ईईईई..." प्रज्ञाला विचार करुनच कसंसंच झालं!

"मी बोलते हं पप्पांशी. ते सांगतील आजीला. पण तू खेळायला जायचं बंद करु नकोस. ती मुलं नाही चिडवणार तुला. त्यांना पण ओरडते मी!" प्रज्ञा एवढंच त्याला समजावु शकली.

" एवढंच नाही मम्मा. संध्याकाळी मी क्लासवरुन आल्यावर मला म्हणाली समोरच्या मंदीरात जायचंय.तर तू मला सोडुन ये तिथे आणि नंतर आठ वाजता न्यायला ये. मी तिला घेऊन निघालो. तर सोसायटीमधुन जाताना रस्त्यात पडलेले कागद, कचरा ती सगळं पायाने साईडला करत करत चालत होती. सगळे आमच्याकडे बघत होते आणि आजीचा कचऱ्याशी फूटबॉल चालु होता!"

प्रज्ञाच्या डोळ्यांसमोर हे चित्र आल्यावर तिला हसु आलं. तिने कसंनुसं हसुन पिंट्याला समजावुन खेळायला पाठवलं.

रात्री सगळं आटपुन बेडरूम मध्ये गेल्यावर प्रज्ञाने प्रदीपला आज घडलेला किस्सा सांगितल्यानंतर तो खो खो हसत सुटला.

" अरे हसतोस काय? किती रागवलेला माहिती आहे पिंट्या. आणि साहजिक आहे..किती ऑक्वर्ड वाटलं असेल त्याला. आणि उद्या मला पण नाडकर्णी वहिनी नाहितर कोणीतरी "तुझी सासु बिल्डींग झाडत होती’ असं सांगणारच. मला बाई मेल्याहुन मेल्यासारखं होईल. आम्हाला काय स्वच्छता आवडत नाही का ठेवायला? पण आईंचं नेहमी काहीतरी वेगळंच लॉजिक असतं. परवा बाजारात घेऊन गेले तर कुठल्या बाईच्या ओढणीला समोर कसलासा बारीकसा डाग पडला होता. तर ह्या तिला जाऊन सांगतात, समोर बागेत माळी झाडांना पाणी घालतोय. त्याच्याकडुन पाणी घेऊन धुवुन टाक. चहाचा डाग दिसतोय. लगेच धुवायचा असतो नाहीतर निघत नाही. वर तुम्ही आजकालच्या ऑफिसवाल्या बायका किती आळशी असता, स्वच्छतेत कसा हलगर्जीपणा करता ह्यावर मला आणि तिला लेक्चर देऊ लागल्या. ती बिचारी तिथुन निघत होती तर तिला जबरदस्ती बागेत घेऊन गेल्या आणि समोर उभं राहुन डाग धुवायला लावला. बिचारी "कोण मेलं म्हणतं ’दाग अच्छे है’ त्याला चहाने भरलेल्या पिंपातच बुचकळून काढते असं काहीतरी पुटपुटत निघुन गेली!"

हे ऐकुन प्रदीपला पुन्हा हसु आलं.

"तुला चेष्टा वाटते का रे? त्या शिल्पा वहिनी पण कंटाळलेल्या ह्या स्वच्छतेच्या बैलाला. काय तर म्हणे, घरात बेडरूममध्ये सुद्धा कोणीच केसांमध्ये कंगवा घालायचा नाही, कोणाचेही केस गळुन कुठेही उडुन जेवणात येऊ शकतात. सगळ्यांनी केस विंचरायला बाहेर जायचं. बाकीच्यांचं ठीक आहे पण वहिनींचे लांब केस..त्यात त्यांना आरशात बघुन केस बांधायची सवय...बिचाऱ्यांनी गॅलरीत आरसा बसवुन घेतला. एकदा त्या रात्रीच्या नखं फाईल करत होत्या..फक्त फाईल करत होत्या, कापत नव्हत्या. तर त्यांना आईंनी बाहेर जायला लावलं..का तर त्यातला एखादा कण बिण उडुन किचन मध्ये जाऊन जेवणात आला तर...आता तीनशे स्क्वेअर फीटच्या हॉलला पार करुन किचन मध्ये उडत जायला नखाचा कण म्हणजे काय मिसाईल आहे? ते जाऊदे. तुला सांगते मी. एक तर आपण इथे काही महिन्यांपुर्वीच रहायला आलोय. अजुन सगळ्यांशी नीट ओळखही नाही. काहीतरी करायला हवं. नाहीतर ह्या स्वच्छतेच्या नादात रोज काहीतरी करणार अ‍ॅण्ड वुई विल फेस सच एम्बॅरसिंग सिच्युएशन्स ऑलवेज! नाही..त्यांच्यी ह्या वयातही स्वच्छतेसाठी राबण्याची जिद्द आणि धडपड नक्कीच कौतुकास्पद आहे. पण ’'अती झालं नी हसु आलं’ असं झालंय हे."

" हम्म्म. मला वाटतं तिला दुपारच्या वेळेस जरा एन्गेज्ड ठेवलं तर तिच्या हे सगळं डोक्यात येणार नाही. आपल्या सोसायटीतच सिनियर सिटीझन्स क्लब आहे. त्यात तिला जायला सांगुया. तिथे योगासनं, सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रम, रुटीन हेल्थ चेकप्स असं रोज काही ना काही होत असतं. ती बिझी राहिल. शिवाय तिथे तिच्या वयाच्या बायका भेटतील त्यांच्यात रमेलही. सोसायटीतच आहे त्यामुळे लांब नको जायला, लक्ष नको ठेवायला. मी बोलतो तिच्याशी आणि उद्याच त्या क्लबचा फॉर्म घेऊन येतो."

"खरंच! बरं होईल बाई!" प्रज्ञाने सुस्कारा टाकला.

आईंचा क्लबातला पहिला दिवस होता. दुपारी घरात त्या नसणार त्यामुळे आज काही त्या नसतं झेंगट अंगावर घेणार नाहीत हे माहित असल्याने प्रज्ञा निश्चींत होती. संध्याकाळी घरी येऊन ती जेवणाच्या तयारीला लागली. पिंट्या खाली खेळत होता. आठ वाजता प्रदिप ऑफिसमधुन आला तरी आई क्लबातुन परत आल्या नव्हत्या.

"काय गं? आई कुठंय?"

"नाही आल्यात अजुन"

"अगं पण तो क्लब तर सात वाजता बंद होतो. आता आठ वाजले!"

" काय सांगतोस? कुठे गेल्या असतील ह्या? रस्ता तर चुकल्या नसतील?"

" अगं इथे समोर तर आहे क्लब. हा काय त्या समोरच्या बिल्डींग मध्ये दुसऱ्या फ्लोअरवर ती खिडकी दिसते ना?" प्रदीप तिला किचनच्या खिडकीतुन समोरच्या क्लबची खिडकी दाखवु लागला.

"अगं ते बघ.तिथले लाईट्स चालु आहेत. म्हणजे अजुन क्लब चालु आहे. थांब मी जाऊन बघतो आणि घेऊन येतो तिला."

प्रदीप समोरच्या बिल्डींगमध्ये गेला. क्लबच्या दारासमोर आल्यावरच त्याला आईंचा आवाज ऐकु आला.

" हा तिथे तिथे..त्या कोपऱ्यात बघा..केवढी जलमटं झालीत. जरा लक्ष देत जा हो. सगळं कसं साफ स्वच्छ असलं पाहिजे. हात फिरेल तिथे लक्ष्मी वसेल!"

समोर क्लबचा पोरगेलसा संयोजक हातात मोठा झाडु घेऊन सिलींगवरती फटके मारत होता...आणि प्रदीपने स्वत:च्या कपाळावरती हात मारला!


Rate this content
Log in