Sumedha Adavade

Others Drama

3  

Sumedha Adavade

Others Drama

हिरवी मने

हिरवी मने

9 mins
1.1K


"आजोबा, असं काय करताय? काय झालं एक दिवस आजीने कोडं सोडवलं तर?"

"आज माझा चान्स होता!" आजोबा कडाडले. "ही नेहमी असंच करते. माझा चष्मा सापडत नाही म्हणून तुझं फावलं. उद्यापासून बघ पेपर तुझ्या हाती लागू देतो का?"

" आधी स्वतःच्या वस्तू सांभाळायला शिका. म्हणे पेपर हाती लागू देतो का बघ" आजी त्यांना आणखी चिडवत म्हणाली.

"तू गप्प बस्स! एक तर आज माझी पाळी असताना तू कोडं सोडवलंस. आणि वर माझा चष्मा पण लपवून ठेवतेस काय? आधी सांग कुठंय माझा चष्मा!" आजोबा आणखी जोरात ओरडले.

"सानू, ही म्हण पूर्ण कर ग, काखेत कळसा आणि गावाला ..." तीन अक्षरी शब्द आहे. सांग."

"आजी...काखेत कळसा आणि गावाला वळसा. तू जरा थांब ना. त्यांचा चष्मा शोधुदे मला."

"हम्मम. झालं माझं कोडं सोडवून. मोजून 8 मिनिटात सोडवलंय बरं का."

"हो हो, तुला आता पुरस्कार देतो त्याबद्दल. चिटर कुठली! माझा चष्मा दे आता! "

"सानु, काखेत कळसा आणि.." आजीने सानुला आजोबांच्या डोक्याकडे खूण करत म्हटलं.

"अय्या आजोबा! चष्मा तुमच्या डोक्यावरच आहे की!"

आजोबांनी त्यांच्या अर्ध टक्कल पडलेलं डोकं चाचपडलं. हाताला चष्मा लागताच ते जरासे वरमले. सानू आणि आजी खुदुखुदु हसू लागल्या.

"बरं बरं. विसरतो माणूस कधीतरी. त्यात एवढं दात काढायला काय झालं?" ते बडबडत बाहेर निघून गेले. आजी आणि सानू आता जोरजोरात हसू लागल्या.

"हे काय ग आजी..माझं एक लक्ष नव्हतं त्यांच्या डोक्याकडे .तू मघापासून का नाही सांगितलंस त्यांना?"

"अगं मग ते एवढे चिडले असते का? आता कसं माझं कोडं पण सोडवून झालं आणि कसली मज्जा आली!"

आजी पुन्हा "काखेत कळसा आणि गावाला वळसा.." म्हणत हसत हसत आत निघून गेली. त्यांच्या सर्वात मोठी नातीने,सानुने कपाळावर हात मारून घेतला.

ह्या दोघांच्या भांडणात ती नेहमीची रेफ्रि होती.

दिक्षितांचं भरलेलं घर. दोन मुलं, सुना, चार नातवंडं. आजी आजोबा घरातले सिनियर. पण घरातल्या लहान मुलांपेक्षाही सर्वात लहान असल्यासारखे वागायचे दोघे.

म्हातारं माणूस म्हणजे दुसरं लहान मुलंच! ह्या एकंदर समजुतीचे ते दोघे जिवंत उदाहरण होते. आजोबा कधी दुपारी वेळेपेक्षा अर्धा तास जरी जास्त झोपले तर आजी त्यांच्या उघड्या तोंडात ग्लासभर पाणी नेऊन ओतायची. आजोबा खडबडून जागे व्हायचे आणि खुप चिडायचे तिच्यावर. आजीला त्रास देण्यासाठी आजोबा कधी शेजारच्या पाटील आजींच्या साडीचं कौतुक घरी सुनांना सांगत तर कधी कॉलेजच्या त्यांच्या मैत्रिणींच्या आठवणी काढत. मग आजी फुरंगटून बसायची आणि आजोबांना खूप मजा यायची. त्या दोघांच्या भांडणाचे आवाज घरात आले नाही तर घरच्यांना चुकल्या सारखं व्हायचं. घरातली इतर मंडळी आमच्या घरात सहा लहान मुलं असंच सांगायची बाहेरच्यांना.

आजोबा चष्मा डोळ्यांवर चढवून जवळच्या गार्डन मध्ये वॉकला गेले. तिथे नेहमीच्या मित्र मंडळींसोबत झाडाच्या पारावर बसून गप्पा सुरू झाल्या.

"काय दिक्षीत, मघाशी आलास तेव्हा चिडलेला दिसत होतास. काय भांडण झालं का घरी? सुना.."

" माझ्या सूना चांगल्या आहेत रे. इतके वर्ष मुलगी नव्हती. देवाने आता दोन मुलीच दिल्यात त्यांच्या रुपात."

"मग काय झालं?"

"आमची ही रे. सारखी काही न काही खोड्या काढत असते माझ्या आणि चिडवत असते."

सगळे ह्यावर हसू लागले. सगळ्यांना ह्या दोघांची नेहमीची 'टॉम अँड जेरी' ची भांडणे माहीत होती. त्यातलं कारण मात्र नेहमी नवं आणि मजेशीर असायचं. त्यामुळे ते जाणून घ्यायला सगळ्यांना खुप मजा यायची. आजचा चष्म्याचा किस्सा ऐकून सगळे खो खो हसत सुटले.

सगळे हसायचे थांबल्यावर दांडेकरने दुसरा विषय काढला.

" काय रे, तुम्हाला कळलं का? दीघे डिव्होर्स घेतोय म्हणे!"

" काय सांगतोस काय..आपला दीघे!!" दिक्षीत आजोबा ओरडले.

"श्श! हळू बोल रे. सगळ्यांना कळायला नको इतक्यात. मलाही आमच्या कामवाली कडून कळलं. त्यांच्याकडे पण जाते ना ती कामाला."

"हो का..बरी आहे का? आमच्या कडे येईल का विचारशील का?" माने काका खट्याळपणे म्हणाले! सगळे त्यांच्याकडे बघू लागले

"अरे म्हणजे घरकामासाठीच म्हणतोय मी"सगळे यावर हसू लागले.

"येईल की. माने वहिनींना भेटायला पाठवतो उद्या. त्या सगळं ठरवतील नाही का..म्हणजे घरकामाचं म्हणतोय मी!"

"नको रे बाबा, तिचा घरकामासाठी हक्काचा गडी आहे ना मी!"

सगळे यावर पुन्हा हसू लागले.

"अरे ऐका रे, मी सांगत होतो ना काहीतरी." दांडेकर वैतागला

"अरे हो..बोल बोल. काय झालं दिघ्याचं?"

"अरे 30 वर्षे झाली लग्नाला. म्हणे आम्ही आधीच ठरवलं होतं. मुलांचं सगळं मार्गी लागलं की आपण वेगळं व्हायचं. एकमेकांशी पटायचं नाही अजिबात. इतकी वर्षे कशी काढली देवाला माहीत."

"आश्चर्यच आहे!"

"हो ना. ऐकावं ते नवलच!"

सगळे आपापसात चर्चा करून, आपापली मतं मांडून घरी निघून गेले.

आजोबांना रोज रात्री 8 वाजता जेवायला लागत असे. दोन्ही सुना याची आवर्जून काळजी घ्यायच्या. दोघीही नोकरी करायच्या. पण एकमेकींना सांभाळत घरातली कामं आणि मुलांचं सगळं व्यवस्थित वाटून घेऊन अटपायच्या.

त्या दिवशी आजोबा घरी आले ते जरा घामाघूम होऊनच. खूप दमलेले आणि श्वास पण लागत होता. मोठी सून प्रज्ञा त्यांना प्रथम समोर दिसली. त्यांना बघून ती घाबरलीच आधी. त्यांना डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसवून तिने त्यांना पाणी दिलं आणि सगळ्यांना हाक मारली.

" अहो काय होतंय..दम लागतोय का?" आजी त्यांच्या जवळ जात पाठीवर हात फिरवत म्हणाली. ती पण खूप घाबरली.

"दुपारच्या गोळ्या घेतल्या होतात का? मी काढून ठेवल्या होत्या." छोटी सून दक्षाने विचारले.

"हो ग. दिल्या होत्या मी." आजी उत्तरली. तिचा स्वर कापरा झाला होता. खूप घाबरली ती. आजोबा हार्ट पेशंट होते. दोन वर्षांपूवी त्यांची अँजियोप्लास्टी झाली होती. तेव्हापासून आजी सोबत सगळेच त्यांची जास्त काळजी घ्यायचे. त्यांचं जेवणातील पथ्य काटेकोरपणे पाळलं जायचं. बाहेर ते लपून छपून तळलेले पदार्थ अधून मधून खायचे, हे आजीला कळलं की दोघांची खडाजंगी व्हायची. ती म्हणायची त्यांना

"त्यापेक्षा तेलाचा ड्रम का नाही तोंडाला लावत? पाण्याऐवजी तेच प्या!" ह्यावर ते खुप हसायचे.

दोन्ही मुलं तोपर्यंत ऑफिसवरून घरी आली. आजोबांना असं बघून ते दोघेही आधी किचनमध्येच धावले.

मोठ्या अमेयने डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं. दक्षाने पंखा वाढवला. आजोबांना आता जरा दम लागायचा कमी झाला होता.

आजीने त्यांना आतल्या खोलीत नेलं आणि बेडवर झोपवलं. डॉक्टर येऊन तपासून गेले. बीपी शूट झाल्यामुळे आजोबांना त्रास झाला होता. याचं कारण विचारता ते काहीच नाही असं म्हणाले. पण दिघ्यांच्या डिव्होर्स बद्दल ऐकून त्यांना जरा त्रास झाला आणि मग हे झालं हे त्यांच्या मनाला माहीत होतं.

*********

"अगं कधीतरी नीट खेळत जा. ते बुद्धिबळ आहे, तुझा आणि बुद्धीचा काही संबंध नाही हे माहीत असून गेले वर्षभर तुला शिकवतोय. अजून तुझ्या लक्षात कसं येत नाही की घोडा अडीच घरं चालतो फक्त. नेहमी त्याला धावडवत आणतेस आणि माझ्या हत्तीला मारतेस! येड्याचा बाजार नुसता!"

" ओ. तुम्ही गप्प बसा. माझा घोडा आहे ना तो. मी मला हवं तसं त्याला चालवणार. तुम्ही कशाला सांगताय मला?"

दोघांचं पुन्हा वाजलं. सानू आली आणि तिने कसंतरी दोघांना शांत केलं.

आजोबांनी कपाळावर हात मारून घेत तिथून काढता पाय घेतला.

बाहेर आले तर धाकटे चिरंजीव घरात दाखल होत होते. चेहऱ्यावर ह्या कानापासून त्या कानापर्यंत भलं मोठं हसू आणि हातात पेढ्यांचा बॉक्स.

"आई, बाबा,दादा, दक्षा, वहिनी..सगळे बाहेर या!लवकर!"

बूट काढता काढता त्याने सर्वाना हाक मारली. मुलंही बाहेर आली हॉल मध्ये.

"काय रे सुनील? काय झालं? काय न्यूज ? दादाने विचारलं

"दादा, मला प्रमोशन मिळालंय!"

"अरे वा! अभिनंदन!" आजी आजोबा दोघे एकत्रच म्हणाले

सगळे त्याचं अभिनंदन करत पेढे खाऊ लागले.

"आणखी एक न्यूज आहे. ही नवी पोझिशन आमच्या ऑस्ट्रेलिया च्या ऑफिस मध्ये आहे. मी आता, म्हणजे आम्हाला दोन्ही मुलांसोबत आता तिकडे शिफ्ट व्हावं लागणार."

हे ऐकून क्षणभर सगळे शांत झाले. पण मग मुलं आनंदाने नाचू लागली आणि सगळे पुन्हा खुश झाले.

"आणि हो, मी आई बाबांना सुद्धा घेऊन जाणार आहे हं!"

हे ऐकून मात्र दादा नाराज झाला.

"अरे त्यांना कशाला?"

"म्हणजे काय? नवा देश आहे. सगळं नवं असणार. आम्हाला सेटल व्हायला मदत नको? ते दोघेही आता रिटायर्ड आहेत. राहतील आरामात आमच्यासोबत?"

"असं काय करतोस सुनील? ह्या घरात मोठं माणूस नको? शिवाय अख्खं आयुष्य गेलं त्यांचं ह्या घरात. आता ह्या वयात त्यांना कुठे नाचवतोस दुसऱ्या देशात वगैरे?"

"वहिनी, आम्हाला, मुलांना करमणार नाही तुमच्या सगळ्यांशिवाय, खास करून ह्या दोघांशिवाय. "

"बरं, मग फक्त आईला घेऊन जा तू. बाबांना राहूदे इथेच!" दादा म्हणाला.

"बाबा, पण आधी त्या दोघांना विचारा ना चालेल का" सानू म्हणाली.

"आई-बाबा, चालेल ना तुम्हाला?" सुनील ने आधी विचारायचा प्रश्न शेवटी विचारला.

आजी- आजोबा दोघांनी फक्त मान हलवली. त्यात मनापासून होकार नव्हता हे मात्र कोणाच्या लक्षात आलं नाही.

*******

आजी ऑस्ट्रेलियाला जाणार हे ठरल्यापासून आजोबांचं वागणं खूप बदललं. ते सर्व तिच्या मनासारखं करत. ती सांगेल ते सगळं ऐकून घेत. तिने कधी चिडवलं तर न चिडता स्वतः ही तिच्यासोबत हसत. मग तिला आता कुठला विषय काढायचा भांडायला हा प्रश्न पडत असे.

तरी अधून मधून त्यांचे वाद चालू असायचेच.

सुनीलची ऑस्ट्रेलियाला जायची जोरात तयारी सुरू झाली. त्याने आजीचा तात्काळ पासपोर्ट करून घेतला. सगळ्यांचा विसाचा इंटरव्ह्यूही व्यवस्थित पार पडला. आता विसा येताच ते निघू शकणार होते.

सामानाची बांधाबांध होत आली होती. मुलांच्या शाळेचे लिव्हिंग सर्टीफिकेटस आले होते. आणि एक दिवस सर्वांचा व्हिसा आला. तिकीट्स पण तयार होते.

आता त्यांना निघायला फक्त दोन दिवस राहिले होते. आजोबा एक दिवस आजीला देवळात जाऊया म्हणून बाहेर घेऊन गेले. खरंतर त्यांनी नाटकाची तिकीटे काढली होती दोघांची. नाटक संपलं आणि मग दोघे समुद्रावर गेली. सूर्यास्त होत आला होता. लग्ना आधी आणि नंतर मुलं व्हायच्या आधी, समुद्र किनारा हे त्यांचं नेहमीचं ठिकाण असायचं.

"मग, ऑस्ट्रेलिया हं. तिथे जाऊन मॅडम सारखा झगा घालून फोटो काढ हो एकदा. आणि मला पाठव!'

" हम्म, तुम्हाला फक्त मॅडम आणि त्यांच्या झग्यात इंटरेस्ट! स्वतःची तब्येत बघा आधी. औषधं वेळेत घ्या. "

"हं"

"जेवणाच्या वेळात जेवायचं, नाहीतर बसाल मित्रांसोबत गप्पा मारत. आणि ते बाहेरचं तेल पिता ना ते आधी बंद करा. डॉक्टरांनी जे नाही संगीतलय ते आधी करता तुम्ही! आणि हो, त्या पाटलीनीच्या साड्या बघत बसू नका मी नाहीये तर."

"त्यासाठी डॉक्टरांनी नाही कुठे सांगितलंय पण?" आजोबांचा खोडकरपणा काही त्यांना शांत बसू देत नव्हता.

"गप्प बसा हो. काळजी घ्या स्वतःची. आणि मला फोन करा. कराल ना?"

"हो तर. मला औषधासोबत तीन वेळा भांडणाचा डोस नको? तो कोण देणार?"

आजीचे डोळे आता भरु लागले.

"सुधा.." आज कितीतरी वर्षांनंतर आजोबांनी तिला ह्या नावाने हाक मारली होती. हे तिच्या माहेरचं नाव. आजोबांना खूप आवडायचं पण लग्नानंतर रितीच्या नावाखाली ते बदललं गेलं आणि मग सासरचे स्मिता नाव कायम चिकटले.

"माझी आठवण येईल ना तुला?"

आजीचे डोळे आता वाहू लागले.ती मानेने हो म्हणू शकली फक्त.

"मी हा असा हार्ट पेशंट. तू गेल्यावर माझं काही झालं तर आपण कसे भेटणार ग? तू येईपर्यंत माझा जीव तग धरून ठेवीन मी. तुला बघितल्याशिवाय गेलो तर वर पण मला चैन पडणार नाही!!"

"तुमच्या जिभेला काही हाड? तिन्हीसांजेला काहीही अभद्र बोलताय! असं नका बोलू हो, जीव थरथरतो माझा!"

आजोबांनी तिच्या खांद्या भोवती हात टाकला. त्यांच्या कुशीत शिरून ती मोकळेपणाने रडली. त्यांचेही डोळे समुद्राकडे बघत होते आणि हळूहळू नजर धूसर होत होती.

गेल्या अनेक वर्षात गिरगाव चौपाटी आता खूपच बदलली होते. ह्या बदलाचे ते दोघे साक्षीदार होते. आणि आयुष्यातल्या इतर बदलांचेही. कधी नकळत, कधी समजून उमजून, कधी नाईलाजने तर कधी फक्त नावीन्य म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्यात होणारे सगळे बदल धीटपणे स्वीकारले. पण ह्या सगळ्यात एकमेकांची चार दशकांची साथ होती. इतक्या वर्षांचा संसार झाला होता दोघांचा. पण एकमेकांपासून वेगळे राहण्याची ही तशी पहिलीच वेळ असणार होती. आणि तीही नेमकी ह्या वयात आली, जेव्हा त्यांना खरंच एकमेकांसाठी वेळ होता.

********

जायचा दिवस उजाडला. दिवसभर आजी कामात होती आणि आजोबा फक्त तिच्या हालचाली टिपत होते. तिला नजरेत साठवून घेत होते. जणू ह्याच हालचाली ते तिच्यापासून दूर असताना त्यांची सोबत करणार होत्या. रात्रीची जेवणं लवकर उरकली. सुनील, दक्षा आणि दोन्ही मुलं देवाला नमस्कार करून आणि सामान घेऊन बाहेर आली. सुनिल ने सगळं सामान बाहेर काढलं. फक्त आजीची बॅग राहिली होती. ती चौघे आजोबांच्या पाय पडली आणि मग आजीच्या पाया पडायला खाली वाकताना सुनील म्हणाला,

"आई-बाबा, चला येतो!"

सगळे गोंधळले. आजी आजोबांचा प्रश्नार्थी चेहरा बघून सुनील म्हणाला,

"अगं आई, मी तुझं तिकीट कॅन्सल केलंय. आम्ही चौघेच जातोय. "

" अरे पण काय झालं?" आजोबा अजूनही गोंधळले होते.

"बाबा, त्या दिवशी तुम्ही दोघेही ह्या रिटायर्डला तयार नव्हता हे आनंदाच्या भरात माझ्याच काय, कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं.

पण गेले काही दिवस तुमचं एकेमकांशी बदललेलं वागणं, थांबलेली भांडणे कोणाच्याही लक्षात आलं नसेल का? आणि काल तुम्ही चौपाटीला गेला होतात, तेव्हा सानूही तिथे होती मैत्रिणीसोबत. तिने लांब राहून तुम्हाला कळू न देता तुम्हा दोघांचं सगळं बोलणं ऐकलं. तिने मला आणि दक्षाला सर्व काही सांगितलं बाबा.

खरंतर त्या पोरीला जे कळले, ते आम्हाला आधीच कळायला हवं होतं.

माझ्या स्वार्थासाठी ह्या वयात मी तुम्हा दोघांना वेगळं करायला निघालो होतो. जर मी हे केलं असतं आणि देव ना करो पण तुम्हा दोघांपैकी कोणालाही ह्या कारणामुळे काही झालं असतं, तर मी आयुष्यभर स्वतः च्या चेहऱ्याकडेही बघू शकलो नसतो बाबा. मला माफ करा. मी फक्त माझाच, रादर फक्त आम्हा चौंघांचाच विचार केला. पण माझं कुटुंब हे एवढं सगळं आहे" तो सर्वांकडे हात फिरवत म्हणाला.

"आणि मला सगळ्यांचा विचार केलाच पाहिजे. आणि तुम्ही दोघे ह्या घराचे पिलर्स आहात. त्यातल्या एकाला काढून मला हे घर मोडायचे नाही बाबा. आई, बाबा आय एम सॉरी. तुम्ही दोघे इथेच रहा, एकत्र, मजेत एकमेकांसोबत!"

आजी आजोबांसोबत सगळ्यांच्या डोळ्यांत आता पाणी आलं.

"बरं झालं काका, मला टेन्शन आलं होतं, आजी नाही म्हणजे आजोबा आता भांडणार नाही. मग मी रेफ्रि कशी होऊ?" सानुने वातावरण हलकं केलं जरा. सगळे हसू लागले.

"अरे हो की. चल उद्यापासून तुला चेस शिकवतो पुन्हा. नाहीतर आता हत्तीला वाकडा चालवशील." आजोबा आजीला चिडवत म्हणाले.

"गप्प बसा हो. मला उत्तम बुद्धिबळ खेळता येतं बरं का."

घरातला "टॉम अँड जेरी" शो पुन्हा सुरू झाला आणि सगळे कौतुकाने हसत सुटले


Rate this content
Log in