श्यामची आई
श्यामची आई
रात्र सातवी
पत्रावळ
"कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पध्दत आहे. साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते. ताटांना ती कल्हई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे. बायकांनासुध्दा त्रास कमी. ताटे घासावयास नकोत. वडील सकाळी शेतावर जावयाचे. इकडे तिकडे फिरून, कामधाम करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असत. येताना फुले, पत्रावळीसाठी पाने, कोणा कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यावयाचे. वडील मग स्नान करून संध्या, पूजा वगैरे करावयास बसत. आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण.
मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कोकणात एक म्हण आहे: 'पत्रावळी आधी द्रोणा। तो जावई शहाणा ॥' पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे!
घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत. कधी कधी प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्या, असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देई. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पाने, पळसाची पाने, कुडयाची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढ-या चाफ्याची पाने, सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राध्दाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे!
'श्याम! तू पत्रावळ लावावयास शीक. नाही तर आज जेवावयास मिळणार नाही.' असे आईने मला बजावले.
'मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही,' मीही रागानेच म्हटले.
माझी बहीण माहेरी आलेली होती, ती मला म्हणाली, 'श्याम! ये तुला मी शिकविते. कठिण का आहे त्यात काही?'
"मला नको तू शिकवायला जा.' मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावीत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिध्द होते. आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जावयाचे. चांगलेच पान पाहिजे, हे येथे नीट बसणार नाही, वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत. कसेही पान असो, रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे लग्नमुंज असली, प्रयोजन वगैरे असले की, गावातील मंडळी त्यांच्याकडे जमावायाची व पत्रावळी लावीत बसावयाची. गप्पागोष्टी करीत सहकार्याने कामे करावयाची. अलीकडे ती पध्दत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले; परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही.
मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही. 'ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे', असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारीजणे हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. 'उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शीक हो माझ्याजवळ. आई, उद्या तो लावील हो. वाढ आज त्याला,' असे अक्का म्हणू लागली, परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो.
"मी नाहीच लावणार जा. नका वाढू मला जेवायला. माझे अडले आहे खेटर. मी तस्सा उपाशी राहीन.' असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर भूक लागली होती. कोणी आणखी समजूत घालावयाला येते का, याची वाट मी पाहात होतो.
शेवटी माझी थोर निरभिमानी अक्का, तीच पुन्हा मजजवळ आली. ती म्हणाली, 'श्याम! चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेल्ये म्हणजे थोडीच येणार आहे समजवावयास! ऊठ, चल, लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवावयास.' तीन पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात. चार पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात. पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू. एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे. चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात भरपूर पाने असतात, त्यात काटकसर कशाला? 'विस्तीर्णपात्र भोजनम्' 'जेवावयास मोठे पान घ्यावे', असे ते म्हणत.
अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणा-या भावाजवळ आली असती! दोन दिवस ती आली होती; तरी मी तिच्य
ाशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले व डोळयांत पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले. 'हे खाली आधाराला लाव,' असे ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली व टाका लावला; परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटेना. 'श्याम! ही दुसरे घे चोय. ही चांगली आहे.' असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली. कसे तरी मोठेमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले.
'ही माझी पत्रावळ, वाढ मला.' मी आईला म्हटले.
'हातपाय धुऊन आलास का पण?' आईने विचारले.
'हो; केव्हाच हातपाय धुतले. मी काही घाणेरडा नाही.' मी म्हटले.
'घाणेरडा नाहीस; परंतु सू सू तर करतो आहेस. नाक नीट शिंकरून ये, तो मी इकडे वाढते.' आई म्हणाली.
मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो.
'पोटभर जेव चांगला. उगीच हट्ट करतोस. तो शेजारचा वासू एवढासा आहे; पण कशी छान लावतो पत्रावळ.' आई बोलत होती.
मी रागाने भराभर जेवत होतो, पत्रावळ कशीतरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा. 'टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव. मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव.' मी रागाने म्हणाले.
'आमच्या घशात नाही जात ते? तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल.' आई म्हणाली.
मी दुस-या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते, ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालावयाची असते. ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे. त्यात गर्व कशाला? प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. 'जे जे करीन ते उत्कृष्ट करीन' असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो, वा शेला विणणे असो. माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत. टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करीत. ते इतकी छान धुणी वाळत घालीत की, पाहात बसावे. माझे वडील भाजीच्या दळयांना पाणी शिंपीत. त्या वेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत; परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे. सौंदर्य असले पाहिजे.
माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकविले. प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील. जर ती नीट नसेल तर जेवणाराच्या घशात टाका जावयाचा! पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, 'कोणीही हिच्यावर जेवो नीट जेवता येईल. घशात टाका जाणार नाही. फटीतून अन्न खाली जाणार नाही.' मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो.
एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, 'चंद्रये ! तुझी का ग पत्रावळ?'
अक्का म्हणाली, 'नाही. ती श्यामने लावलेली आहे.'
वडील म्हणाले, 'इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली?'
आई म्हणाली, 'त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल, असे सांगितले म्हणून नीट शिकला लावायला.'
मी आईला म्हटले, 'आता मागचे कशाला सांगतेस ? भाऊ ! आता चांगली येते की नाही मला?'
'आता काय सुंदरच लावता येते; पण द्रोण कुठे लावता येतो?' वडील म्हणाले. 'द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी साधला. मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन.' मी सांगितले.
माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांस दाखविला. 'चांगला आहे, परंतु येथे चुकला. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत.' असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखविला.
'आता कोण रागे भरेल?' उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. मनात मात्र हवे. चंद्रये, याला एक जर्दाळू दे. शिकल्याबद्दल खाऊ.' आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला! समुद्रमंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे.'