श्रद्धा की अंधश्रद्धा ?
श्रद्धा की अंधश्रद्धा ?
विज्ञानाने इतकी झपाट्याने प्रगती केली की त्याचा अंधश्रद्धेवर विश्वास नाही. विज्ञान सत्यावर विश्वास ठेवते. प्रत्यक्ष कृतीतून आलेले अनुभव मान्य करते. तरीपण आपण भोंदूबाबांवर विश्वास ठेवतो. आपले आर्थिक, शारीरिक नुकसान करून घेतो.
शिक्षण हे आपले जीवन परिवर्तन करत असते. तरीसुद्धा आपण इतके मानसिक गुलाम बनलेले असतो की आपण आपल्यात बदल करण्यासाठी तयार नसतो. आपल्या पोटच्या मुलांची भोंदूबाबांच्या सांगण्यानुसार हत्या करतो. स्वतःच्या पोराला भूत म्हणून जीवे मारतो व भोंदूबाबाना देव मानतो. भोंदूबाबांनी खोटे चमत्कार दाखविण्यासाठी काही ठराविक मंडळी हाताशी धरून प्रचार चालू केला आहे. यात लाखोने लोकांची फसवणूक होत आहे.
लग्न, नोकरी, मुले, उत्तम यश येण्यासाठी बाबांचे चरण धरले जातात. त्यांनी स्वतःची पुस्तके छापून अनुभव देखील लिहिले आहे.
काही लोक त्यासाठी आपले नाव, पत्ता, फोटो देऊन रंगवत आहे. पण त्या बाबांची देशाला गरज आहे. देशाच्या सीमेवर जावून शत्रुशी लढावे. आपल्या सैनिकांचे प्राण वाचतील. पण तेवढी हिम्मत त्यांच्यात नाही. ते देशातील लोकांना लुटून खातात. त्यांचे, आर्थिक, लैंगिक शोषण करतात.
महाराष्ट्र हा साधूसंतांचा वारसा आहे. त्यांचे विचार वाचले, ऐकले तर आपल्याला कोणत्याही भोंदूबाबांकडे जायची गरज नाही. भोंदूबाबा गरीब लोकांना, अशिक्षित लोकांना जास्तीत जास्त लुटतात. यौनशोषण करतात. अंगारा, धूपारा ही त्यांची कमावण्याची साधने. त्यात हे लोक एखादा प्रसिद्ध व्यक्ती आणून आपले प्रस्थ अधिक माजवतात व लोकांना आकर्षित करतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने कुणालाही दान देताना योग्य व्यक्तीचा विचार करा. दान, वर्गण्या, दादागिरी वाढत आहेत. सर्वसामान्य लोकांना मारहाण होत आहे.