शनी अमावस
शनी अमावस


सतिशला मागच्या महिन्यात प्रमोशन मिळून तो आता पुणे पाटबंधारे विभागात एक्सिकेटिव्ह इंजिनिअर म्हणून रुजू झाला होता. त्यामुळे त्याची बायको वर्षा, तिची बहीण ,मेव्हणे विद्या व विकास त्याचप्रमाणे सतिशची बहीण, मेव्हणे श्वेता व रोहित पार्टी साठी सारखा लकडा लावत होते. खूप दिवस झाले कुठे एकत्र ट्रीपला गेलो नाही, त्यानिमित्य ट्रिपही होईल. पण सतिशला कामातून वेळ मिळत नव्हता. पण आज अचानक योग जुळून आला. त्याला ऑफिस इन्स्पेक्शन साठी कोल्हापूरला जायचे होते. काम एकदिवसाचेच होते आणि त्याला लागून शनिवार, रविवार आणि सोमवारी सार्वजनिक सरकारी सुट्टी जोडून आली होती. सतिशला एकदम आठवले पाच वर्षा पूर्वी कोल्हापूर पासून साधारण साठ-सत्तर कि.मी वर सारन पाडा एक लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाहणी साठी ते गेला होता. तेथून पुढेच ऐंशी की. मी. वर रतनगड म्हणून बऱ्यापैकी हिल स्टेशन आहे.
सतिशने ही कल्पना वर्षाला, त्याचप्रमाणे दोन्ही कुटुंबाला सांगितली आणि सर्वजण एकदम खुश होऊन त्यांनी संमती दिली होती. शुक्रवारी कोल्हापूरला देवीचे दर्शन घेऊन लगेच सारन पाडा गेस्ट हाऊसवर मुक्काम ठरला. सप्टेंबर महिना असल्याने धरण पूर्ण भरले होते, त्यामुळे मासे खाणाऱ्यांची एकदम चंगळ होती. रविवारी सकाळी रतनगड साठी निघायचे असा सर्व प्लॅन पक्का ठरला. सर्वांची बच्चे कंपनी तर आनंदाने नुसती नाचत होती.
शुक्रवारी सकाळी सहा वाजताच दोन गाड्यातून ही सर्व मंडळी निघाली. प्रत्येकी दोन मुले ह्याप्रमाणे सहा मुलांसह विकास एक गाडी चालवत होता तर दुसरी गाडी वर्ष, विद्या, श्वेता, रोहितसह सतिश स्वतः चालवत होता.
सतिश दुपारी कोल्हापूरला पोहचल्यावर डायरेक्ट ऑफिस मध्ये गेला व ह्यांना देवदर्शन करून सारन पाडा गेस्ट होऊसला जाण्यास सांगितले.तो संध्याकाळी काम आटोपून ऑफिसची जीप घेऊन सारन पाड्यावर पोहचणार होता. ठरल्या प्रमाणे सर्व झाले, संध्याकाळी सात वाजता सतिश सारन पाडा गेस्ट हाऊसवर पोहचला. सर्व मंडळी त्याच्या दोन तास आधीच तेथे पोहचली होती व फ्रेश होवून ती सतिशची वाट पाहात होती. रात्री सगळ्यांनी माशांवर येथेच्छ ताव मारला, गप्पा- गोष्टी, पत्त्यांचे डाव झाले. मुले खेळून दमली आणि झोपी गेली. आज सतिशची ऑफिसची कामे पूर्ण झाली नसल्याने त्याला उद्या परत कोल्हापूरला जावे लागणार होते. तशी त्याने ही कल्पना सर्वाना दिली. तोपर्यंत तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा, बोटींग करा मी येतोच दुपारी चार-पाच वाजेपर्यंत म्हणून त्याने सर्वांची व्यवस्था लावली.
शनिवारी सकाळी नऊ वाजता चहा नाष्टा करून सतीश ऑफिसची जीप घेऊन कोल्हापूरला गेला.
इकडे सर्व मंडळी चहा नाष्टा करून बोटींग आणि धरण परिसरात फिरायला निघाली. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेले छोटे छोटे आदिवासी पाडे घनदाट जंगलांनी वेढले होते. संरक्षित वनक्षेत्र असल्याने अनेक पशु पक्षी हिंस्रश्वापदे, वन्यप्राणी, सरपटणाऱ्या प्राण्यांची चांगली रेलचेल होती. निसर्ग पर्यटना साठी अतिशय उत्तम स्थळ असल्याने सगळे एकदम खुश होते.
दुपारी गेस्ट हाऊसचा वॉचमन सखाराम त्याच्या बायको तीन मुलांसह जेवण घेऊन आला होता. जवळच आऊट हाऊसमध्ये तो राहात होता... जसा हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा पासून तोच हे गेस्ट हाऊस सांभाळत आहे. येणाऱ्या जाणाऱ्याची खाण्या पिण्याची व्यवस्था तो व त्याचे कुटुंब पहात असे. तेव्हढाच त्याला आर्थिक हातभार.... पण एकदा संध्याकाळ झाली की सखाराम ठिकाणावर सापडणे अवघड आणि सापडलाच तर तो शुद्धीवर असण्याची श्यक्यता नाही. आता त्यांनी भाकरी, मसाल्याची आमटी भात असा पाड्यावरील चवदार जेवण बनवले होते. सगळे जेवण करून दुपारच्या विश्रांतीला गेले.
संध्याकाळचे पाच वाजले होत... आकाशात काळ्या ढगांची गर्दी होवू लागली होती... सहा वाजता पूर्ण अंधारून आले होते.. केव्हाही पाऊस सुरु होण्याची चिन्ह होती. सखाराम चहा घेऊन गेस्ट हाऊसला आला होता...
"सखाराम... केवढे अंधारून आले आहे, खूप जोराचा पाऊस येणार असे चिन्ह आहे.".... वर्षा म्हणाली
"बाईसाहेब येथे पावसाचा कुणी मालक नाही... केव्हा येईल, किती येईल, कधी येईल काही सांगता येत नाही... एकदा सुरु झाला की रात्रभर थांबायचे नाव घेत नाही. आणि त्यात लाईट गेले की काही हाल विचारू नका?
वारा एकदम बंद झाला आहे म्हणजे तो आज रात्रभर कहर करणार."
सर्वांच्या चेहऱ्याचे रंगरूप एकदम बदलेले होते... मुले एकदम आज्ञाधारक मुलांप्रमाणे शांत बसली होती. मनातून खूप भेदरली होती. सतिशला फोन करण्यासाठी वर्षा फोन जवळ गेली पण फोन डेड होता आणि जवळपास पाच किलोमीटर परिसरात रेंज नसल्याने लॅण्डलाईनशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. त्यामुळे तिला आता सतिशची काळजी भेडसावू लागली होती... आज दिवसभरात त्याचा फोन नव्हता आणि आता सात वाजले तरी अजून त्याचा पत्ता नव्हता. हळू हळू पावसाला सुरुवात झाली होती....
सखाराम व त्याची बायको आज रात्री काय स्वयंपाक करायचा हे विचारण्या साठी आले होते. मुले कॅरम खेळत होती तर वर्षा, विद्या, श्वेता ह्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. कुणीही जेवणाच्या मूड मध्ये नव्हते... सतिश आल्याशिवाय त्यांना चैन पडणार नव्हती. विकास आणि रोहित ह्यांनी सतिशला घेऊन येण्यासाठी कोल्हापूरला जाण्याचे ठरवले पण वर्षाने त्याला हरकत घेतली. आम्हला इकडे सोडून कुणी जावू नका.. मुलांचे चेहरे पहाण्यासारखे झाले होते.
आपणसार्व येथेच थांबू, कारण येथे आपण सुरक्षित आहोत. कुणीही बाहेर जाणार नाही. राहिला प्रश्न सतिशचा तर कदाचित कोल्हापुरात पाऊस जोरात सुरु झाला असेल म्हणून त्याने तेथेच राहणे पसंद केले असेल. असे आपण गृहीत धरून चालू.... कारण दुसरा काही पर्याय आता नाही. पावसाचा जोर वाढत होता.
"सखाराम... असं कर.. आज रात्री खिचडी कढीच कर फारतर पापड भाज जोडीला आणि तोपर्यंत आले खालून कडक चहा पाज सर्वाना" हवेत गारवा वाढला आहे. .... विद्याने फर्मान सोडले."
सखाराम व त्याच्या बायकोने मान डोलावली व चहासाठी ते वळाले इतक्यात ज्याची भीती होती तेच झाले... घडाळ्यात रात्री आठचे ठोके सुरु झाले आणि सर्वत्र वीज प्रवाह खंडित झाला...
बाहेर पावसाचा जोर मी मी म्हणता वाढत होता... त्याच्या जोडीला सोसाट्याचा वारा सुरु झाला. पाऊस आडवातिडवा खिडकीतून आता येत होता... वाऱ्यामुळे खिडक्या कर्र कर्र् कर्र् करत होत्या , ह्या भयान वातावरणात तो आवाज काळजावर चरे पाडत होता. वर्षा अंधारात चाचपडत खिडकी बंद करण्यासाठी उठली. ती खिडकी बंद करणार तोच खिडकीतून एक काळ्या मांजराने मोठ्याने म्याऑवsss असा आवाज करत वर्षाच्या अंगावर झेप घेतली. वर्षा जोरात किंचाळून खाली पडली... मांजर तिच्या छातीवर बसले होते... काळ्याकुट्ट अंधारात त्या मांजराचे निळेशार डोळे फार भयानक दिसत होते. वर्षाने मांजरीला जोरात दूर ढकलत काशीतरी धडपडत उभी राहिली... हा प्रकार पाहून मुलांनी मोठमोठ्यानी रडायला सुरवात केली. विद्या, श्वेताची बोबडी वळली होती...
हा सारा गोंधळ ऐकून आतल्या रुममध्ये बसलेले विकास, रोहित मोबाईल टॉर्च लावून धावत बाहेर आले.. ह्या गोंधळात त्यांची नाशा पूर्ण उतरली... बाहेर गेलेला सखाराम व त्याची बायको धावत आत आले... तेव्हा कुठे सर्वांच्या जीवात जीव आला पण सर्वांचे उर अजूनही जोरजोरात धपापत होते. सखाराम व त्याच्या बायकोला अश्या परिस्थितीची सवय असल्यामुळे त्यांना काही वाटले नाही.
"आता कुणी ही कुठे जावू नका सर्वजण येथे हॉलमध्येच बसा"... रोहित म्हणाला.
"आज साहेबांनी कोल्हापूरला जायला नको होते, असे पावसाचे दिवस आणि संध्याकाळी प्रवास खूप जीवावरचा असतो... त्यात आज शनी आमावस्या!..."
हे ऐकताच सर्व जण एकदम भेदरले...
श् श् श् sss शनी आ..मावस्या? ..... वर्षा म्हणाली
"हो.. मी सकाळी साहेबांना बोललो सुद्धा!... नका जावू आज म्हणून. पण साहेब नुसतेच हासले. तुम्ही शिकली सवरली माणसे असल्या गोष्टींवर नाही विश्वास ठेवत, त्याला आम्ही तरी काय करणार?"..... सखाराम
"नाही पण माझा आहे विश्वास.. तू मला का नाही सांगितले सखाराम?,
मी नसते जावू दिले त्यांना.".... वर्षा कशीतरी बोलली.
"बाई... दर शनी अमावस्येला आणि सर्वपित्री अमावस्येला येथे काही तरी अघटित नक्की घडते. घाटाच्या रस्त्यावर ती हडळ तर किती तरी लोकांनी पाहीली आहे... ती रात्री लोकांना लिफ्ट मागते." हे साऱ्या पाड्यातील लोक सांगतात.... सखाराम बोलला
"माझी बायको सुद्धा पाच वर्षा पूर्वी अश्याच पावसात येथेच अंगावर ते समोर पिंपळाचे झाड अंगावर पडून मेली...
"तुझी बायको? मग ही कोण आहे?"... आश्चर्याने विकासने विचारले
"वाटलेच मला साहेब तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून... ही माझी दुसरी बायको आहे. सखू पाच वर्षा पूर्वी मेली त्यानंतर हिला केली... सखूचे पोरग खूप लहान होत त्यावेळी फक्त सहा महिन्याचे.
त्या पिंपळावर मुंजाचा वास असायचा आणि सखूचा ह्यावर अजिबात विश्वास नसल्याने ती नेहमी त्याची हेटाळणी करायची, संध्याकाळी दिवा लावायची नाही आणि मलाही लावू द्यायची नाही, आणि त्यादिवशी मुंज्याने बरोबर डाव साधला.
गेस्ट हाऊसवर कोल्हापूरचे एक साहेब, आमदार आणि गावाचा सरपंच ह्याची पार्टी रंगली होती...पाऊस धुवांधार चालू होता आमदारांनी मला दारूसाठी वेगळे पैसे दिले होते, मी मासे घेऊन आलो आणि दारूपीवून घरात पडलो होतो...रात्रीचे आकार वाजले असतील सखूने माश्यांचे कालवण घेऊन गेस्ट हाऊसवर जात असताना त्या मुंज्याने तिच्यावर झडप घातली. तो मोठ्ठा पिंपळ तिच्या अंगावर पडला आणि सखू गेली.... त्या पिंपळाच्या जागी आता नवीन पिंपळ उगवला आहे, ...अजूनही माझी सखू अधून मधून लोकांना पिंपळाखाली दिसत असते... शनी अमावस्येला तर नक्की. ह्या बायकोला तर खूप वेळा दिसली आहे... ती तिच्या मुलाला भेटायला येत असते... तिचा जीव गुंतला आहे त्या पोरात.
सखारामने सविस्तर वृतांत कथन केल्यावर सगळ्यांची पाचावर धारण बसली. कुणी कुणाशी बोलत नव्हते.. मुले आपल्या आई वडलांना मिठी मारून बसली होती. घड्याळात दहाचे ठोके पडले.. आणि सर्वांचे मोबाईल एकदम बंद झाले. त्यामुळे मोबाईल टॉर्चपण आता बंद पडले होते. काय होते आहे कुणाला काहीच कळत नव्हते....
काळा कुट्ट अंधार... कोसळणाऱ्या पावसा बरोबर घोंगावणाऱ्या वऱ्याचा आवाज भीषणता वाढवत होता.गेस्ट हाऊस मधील कुत्रा दारा समोर येऊन करुण आवाजात रडत होता... सखाराम मेणबत्ती व कंदील आण्यासाठी आऊट हाऊसमध्ये गेला. तशी दार लावण्यासाठी सखारामाची बायको उठली ती दार लावून हॉल मध्ये येत असताना खिडकी हवेने खाडकन उघडली, तिचे लक्ष समोर त्या पिंपळाच्या झाडाकडे गेले आणि ती जोरात किंचाळली....
"बा... ई... बा... ई.... त त त ती ती.. पहा.... सखूsss"
सर्वजण ताडकन उभे राहिले.. एव्हढ्या गाराठ्यातही सगळे घामाने ओले झाले होते... विलास सर्व मुलांना घेऊन आधीच आतल्या रुममध्ये गेल्याने फार मोठा अनर्थ टळला होता.
सर्वांची बोबडी वळाली होती, हॉल मध्ये पूर्ण अंधार... सगळे त्या पिंपळाकडे पहात होते.... एवढ्या अंधारात नऊवार साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेली एक बाई हातात फडफडता कंदील घेऊन उभी असलेली सर्वाना दिसली... ती एकटक इकडेच बघत असल्याच जाणवत होते... थोड्यावेळाने ती हळू हळू चालत मुले ज्या रूममध्ये होती त्या दिशेने सरकताना दिसली....
कर्रssssss आवाज करत हॉलचा दरवाजा हळू हळू उघडताना दिसला... सखाराम त्या अंधारात हातात कंदील घेवून आत आला... ते दृश्य इतके भयानक होते की सर्वजण मटकन खालीच बसले. मुले घाबरतील ह्या भीतीने कुणी आवाज करत नव्हते इतकेच काय ते.
सखाराम जसा आत आला, ती पिंपळाखालची बाई अचानक गायब झाली....
सर्वांनी सखारामला पहिल्यांदा ती खिडकी बंद करायला लावली. आता तू इथून हालू नको रात्रभर आपण सर्व येथेच बसून राहू असे ठरले.
"सखाराम... तुला कशी नाही दिसत रे सखू? तू समोर आला की ती गायब होते?".... वर्षाने प्रश्न केला.
"बाईसाहेब... मी जेष्ठ देवगणाचा आहे असे खालच्या पाड्यावरील मांत्रिक सांगत होता, त्यामुळे माझ्या समोर येत नाही ती.... आता हे तुम्हाला कितपत पटते ते देवच जाणो..."
"मला पटते... मला पटते, सखाराम... तू असे कर, तुझ्या तिन्ही मुलांना घेऊन येथेच ये हॉल मध्ये आमच्या सोबत"..... वर्षा म्हणाली.
सखाराम त्याची बायको मुलांना घेण्यासाठी त्यांच्या आऊट हाऊस मध्ये गेले. सखाराम आऊट हाऊस जवळ पोहचत असतानाच त्या घरातून कुणी तरी बाहेर पळताना त्याच्या बायकोला दिसले, सखारामला हे सांगितल्यावर तो म्हणाला ...
"अगं ती सखू असेल... तिच्या मुलाला भेटायला आली असेल."
सखाराम, त्याची बायको तीनही मुले व ही सर्व मंडळी रात्रभर हॉल मधेच बसून होती ... कुणालाही झोप लागत नव्हती... सतीश कोल्हापूरलाच मुक्कामी राहिला अशी साऱ्याची समजूत झाली. पहाटे पहाटे चार नंतर हळू हळू एकएक जण पेंगायला लागला, बसल्या जागी पेंगत सगळ्यांचे डोळे लागले.
इकडे सतिशचे ऑफिसचे काम लांबले आणि तो रात्री दहा वाजता पार्टी ,जेवण करून सारन पाड्याकडे जाण्यासाठी निघाला, तसे काहींनी त्याला इथेच मुक्काम करण्यास सुचविले कारण पावसाची लक्षणे दिसत आहे पाऊस केव्हाही सुरु होईल, पण सर्व कुटुंब तेथे माझ्यासाठी काळजीत असतील आणि मुख्य म्हणजे लॅण्ड लाईन किंवा मोबाईलवर कॉन्टॅक्ट होत नाही त्यामुळे मला जाणे भाग आहे. संध्याकाळ पासून वातावरण असेच आहे, पाऊस काही येत नाही, तुम्ही नका काळजी करू मी जातो आरामात आणि रेंज मिळाली तर तुम्हाला पोहोचल्याचा फोन करतो असे म्हणत सतिशने गाडीला चावी दिली.....
सतिश सारन पाड्याच्या दिशेने निघाला होता रात्रीचे आता अकरा वाजले होते... रस्ता एकदम सुनसान होता, गाडीत गाणी सुरु होती... घाट पूर्ण चढून झाल्यावर उतरणीला त्याला पावसाने गाठले, व्हायपर खर्र खर्र खर्र करत आवाज करत होते, पावसाचा जोर वाढल्याने पुढचे दिसणे अवघड जात होते, त्यामुळे गाडीचा वेग मंदावला होता... आता सतिशचे लक्ष गाण्या ऐवजी रस्त्यावर जास्त होते.. तो अंदाज घेत घेत चालत होता... त्यालाही आता मनात भीतीने ग्रासले होते.. पण अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता पार केला आहे तेव्हा आता मागे फिरण्यापेक्षा पुढेच गेलेले चांगले असा विचार करत तो गाडी चालवत होता... समोर दूरवर एका झाडा खाली कुणीतरी उभे आहे असे अस्पष्ट जाणवत होते... गाडी जसजशी जवळ येत होती तसं तसं ती घोंगटी पांघरलेली कुणी बाई असावी अशी श्यक्यता त्याला वाटू लागली.
एक नऊवारी साडी नेसलेली बाई आहे हे आता नक्की झाले, पण इतक्या रात्री ऐकटी एवढ्या पावसात येथे का उभी असेल असे त्याच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर सुरु झाले. जवळ येताच त्या बाईने थांबण्यासाठी हात केला. थांबू की नको असा विचार करत असतानाच गाडी त्याबाईच्या पुढे पाच पन्नास मीटर जावून अचानक थांबली. सतीशला कळेना मी तर ब्रेक लावला नाही तरी गाडी थांबली कशी?
तो मनात भेदरला होता.. त्याने एक्सलेटरवर पाय दिला.... गाडी जागच्या जागी घुर्रर्र घुर्रर्र घुर्रर्र करत होती पण गाडी काही पुढे हाले ना.
इतक्यात ती बाई गाडीचे दार स्वतः उघडून न विचारताच पुढील सीटवर सतिशच्या शेजारी येऊन बसली.
पूर्ण भिजलेल्या त्या बाईने एक कटाक्ष सतिशकडे टाकला....
बाई तरुण आणि देखणी होती....
"साहेब ... बरं झालं तुम्ही थांबला...
पाऊस लई जोराचा कव्हाचा सुरु आहे..
सारन पाड्याच्या अलीकडं माझा पाडा हाय....
तिथवर सोडा की साहेब मला, तुम्ही सज्जन मानूस दिसून राहिला म्हणून म्हणलं".... ती बाई बोलली..
सतीशकडे कुठलाच दुसरा पर्याय शिलक्क राहिला नाही. ...
त्याने घाबरत घाबरत गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण गाडी खर्र ss खर्र sss करत बंद पडायची.तशी ती बाई बोलली...
"साहेब तुमच्यापेक्षा तुमची गाडीच लई घाबरली असं वाटून राहिलंय मला".... म्हणत ती एवढ्या रात्री हृदयद्रावक हासली.
सतिशने खिश्यातून रुमाल काढून चेहऱ्यावरचा घाम पुसला..
"चला की साहेब म्हणत ती बाई परत बोलली... गाडी सुरु होत नसलं तर धक्का मारू का?"
सतिशला ही नामी संधी वाटली, धक्काच मारावा लागेल असे वाटते... जरा उतरून धक्का मारता का?... . सतिशने सांगितले
तशी ती बाई खाली उतरली आणि उतरता उतरता म्हणाली.. "साहेब पळून जावू नका बरं" आणि दात काढत मोठ्यानं हासली.
त्याबाईने फक्त पाठीमागून फक्त गाडीला पाय लावला आणि गाडी सुरु झाली... तशी संधी साधत सतिशने गाडी जोरात पुढे काढली, पण शंभर मीटर पुढे जाऊन गाडी परत आपोआप थांबली आणि घुर्रर्र घुर्रर्र घुर्रर्र करू लागली.
ती बाई परत आरामात गाडीत येवून बसली. सतिशकडे तिने फक्त एक तीक्ष्ण नजर टाकली.... सतिशला हे नक्की काय प्रकरण आहे ते आता उमजू लागले होते पण तो आता त्या सापळ्यात पूर्णपणे अडकला होता. नाईलाजाने त्याने गाडी सुरु केली. हळूच चोरून तो त्या बाईच्या हालचालीवर नजर ठेवत होता. पण ती बाई एकदम शांत नजरेने सरळ पुढे पाहत होती.
"कुठं.... सारन पाडा गेस्ट हाऊसवर का साहेब?" समोरची नजर न हलवता ती म्हणाली
तुम्हाला कसे समजले? मला सारन पाडा गेस्ट हाऊसवर जायचे आहे ते?.... सतिशने मोठ्ठा आवंढा गिळत भीती भीती विचारले...
"बस्स sssss का साहेबss...
स्मशान घाटावर गेले होते... म्हणत तिने एक नजर तिरप्या डोळ्याने सतीशकडे टाकली....
नंदोयीच्या मौतील गेले होते...
पोरग घरी शेजारिनीकडे ठेवून आली म्हणून निघावं लागलं बघा एवढ्या पावसात...
आणि रातची म्हणलं तर आम्हा आदिवाशीना नाय भ्याव वाटत रातचं आमची रातीशी दोस्ती हाय ...... तीने खुलासा केला.
साहेब जरा सांभाळून इकडं निमुळंत वळण हाय लई अक्सिडेंट होता बघा इथं...
इतक्यात सतिशला गाडीच्या मागे एक पाच- सहा वर्षांचा मुलगा रडत पळत आहे असा भास झाला आणि तो मुलगा आई.... आई ... म्हणत गाडी मागे पळतो आहे असे दिसले...
येवढ्या रात्री एवढ्या पावसात? त्याला खूप विचित्र वाटले, उत्सुकते पोटी त्याने गाडी थांबवली.
"काय झालं साहेब?"
"तुम्हाला लहान मुलांचा आई आई असा रडण्याचा आवाज ऐकू येतो का?"... सतीशने त्या बाईला प्रश्न केला.
ती फक्त हसली आणि म्हणाली... "साहेब खूळ लागलंय तुम्हास्नी ?...
इतक्या सुनसान जागी पोर रडण्याचा आवाज? ...
मला तर नाही आला... चला गुमान पुढं......
सतिशने परत गियर टाकला... थोडं पुढे गेल्यावर परत तसेच... लहान मुलगा गाडीच्या मागे आई... आई करत रडत पळण्याचा आवाज..
आता त्याने नीट कानोसा घेतला, तो भास नक्कीच नव्हता...
त्याने फक्त एक नजर त्या बाईकडे टाकली....
ती फक्त त्याच्या कडे पाहून हसली आणि म्हणाली... साहेब मला नाही येत आवाज... चला आता नाहीतर इथंच सकाळ व्हायची.
सतिशने आता काय व्हायचे ते होवो, असा विचार करत गाडी पुढे नेली. एका मोठ्या वळणावर गाडी वळाली... पुढचे काहीच दिसत नव्हते....
गाडी थांबवा साहेब... ती बाई जोरात ओरडली....
समोर रस्त्यावर झाड पडलंय बघा आडवं...
असे म्हणताच सतिशने करकचून ब्रेक मारला, आणि तोंडावरून घाम पुसण्यासाठी रुमाल काढला.
"बापरे... आता कसे जायचे पुढे? रात्रभर ह्या पावसात बसावे लागेल काय? सतिश म्हणाला....
"मी आहे ना साहेब कश्याला घाबरता आहे?.... गाडी थोडी मागं घ्या... डाव्या हाताला एक कच्चा रस्ता हाय.. तो पुढं ह्या रस्त्याला जावून भेटतो... जरा जंगलातील हाय, पण दुसरा मार्ग नाही आता... पाऊस थांबायचं नाव घेईल असं नाय वाटत बघा...... चला घ्या मागं गाडी.
सतिशने निमूटपणे गाडी रिव्हर्स मध्ये टाकली आणि डाव्य बाजूने तो कच्च्या रस्त्याला लागला.. पावसामुळे खूप चिखल झाला होता ... गाडी खूप हळुवार चालवावी लागत होती... बाजूला दाट जंगल... पावसा बरोबर झाडांची सळसळ विचित्र आवाज करत होती.. गाडी चिखलात रुतण्याची भीती वेगळीच... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे... ही बाई आपल्याला नक्की कुठे नेते आहे ही शंका त्याला खूप भेडसावत होती... तो गाडी चालवतच आहे किती वेळ झाला माहीत नाही, हातातील घड्याळ ही बंद पडले होते पण दुसरा पर्याय तरी कुठे होता?
गाडी आता चिखलात पूर्णपणे रुतली होती... पुढे जाणे अश्यक्य होते.
"साहेब आता एक काम करू ती समोर झाडाखाली झोपडी दिसते ना? ते आमच्या शेतातील खोपट आहे.. रातच्याला राहू तिथं मग सकाळी निघू घरच्याला..... घाबरू नका साहेब....
गाडीचे हेडलाइट सुरु ठेवत.. पुढे ती बाई आणि मागे सतिश चिखल पाणी तुडवीत कसे तरी त्या झापापर्यंत आले. तिने खोलीतील चिमणी शोधत.. तेथे प्रकाश केला. सतिशने हातातील की चे बटण दाबत गाडीचे हेड लाईट बंद केले. दोघेही पावसात चिंब भिजले होते...
तिने उभी असलेली खाट आडवी केली आणि सतीशला बसायला सांगितले... ती आत जाऊन लुगडं बदलून आली आणि सतिशला एक कापड दिल ...
"साहेब ह्याला पुसा डोकं, लई भिजलात.. सर्दी पकडलं."
सतिशच्या मनातील भीती आता हळू हळू कमी होवू लागली होती .. ती बाई त्याला काही अपाय करणार नाही ह्याची त्याला खात्री पटत चालली होती.
तिने घरातील काही काटक्या चुलीत सरकवून जाळ केला.... एका पातेल्यात बाहेर पडत असलेल्या पावसाचे पाणी गोळा करून तिने गुळ आणि थोडी चहापत्ती टाकून बिन दुधाचा चहा केला ... सतिशकडे त्या कोऱ्या चहाचा ग्लास सरकावात म्हणाली....
"घ्या साहेब चहा .... जरा हुशारी येईल ह्याने"....
"सतिशने चहा घेतला त्याला थोडी तरतरी आली"
"साहेब .... एक वर्षांपूर्वी इथला आमदार असाच पावसात निघाला होता रातच्याला.. आणि पडलं की झाड त्याच्या गाडीवर ....
गचकला ना जागच्या जागी"
हे ऐकताच सतीशने उर धपापात तिच्याकडे पाहिले .... ती एकदम स्थिर होती... आता त्याला त्या बाईचे पाय पाहायचे होते, पण ती मांडी घालून चुलीच्या निखाऱ्यावर अंग शेकत होती.
"कोण झालके- पाटील आमदार?" जवळजवळ सतीश किंचाळला
"हाव साहेब त्योच.. शनी अमावसच होती त्या दिवशी"... आणि त्याचा मैतर, सारनपाड्याच्या सरपंच? ....
त्यो बी असाच मेला एका शनी आमावसला... रात्री ओट्यावर झोपला होता अन् पडलं नं पिंपळाच झाड त्याच्या बोकांडी.... खेळ खल्लास..
सतिश डोळे विस्फरुन तिच्याकडे पाहात होता...
पोरामध्ये जीव गुंतला आहे बाईचा साहेब... सावत्र आई लई पाण्यात पाहते पोराला, लई छळ करते त्याचा... सखारामला दारूच्या नशेतून फुरसत नाही.
कुठंतरी त्याची चांगली व्यवस्था व्हायला हवी म्हणजे त्याच्या आईचा जीव सुटलं.
नक्की काय होतंय हे आता सतिशचा चांगले लक्षात आले होते. ... तो फक्त इतकंच म्हणाला...
"सखूबाई काळजी सोड आता.. पोराची जबाबदारी मी घेतो आहे. त्याला पुण्याला चांगल्या हॉस्टेलमध्ये ठेवेल, शिक्षण करेल. निश्चिंत राहा"......
तिने हलके हसत चुलीवर हात शेकत सतिशकडे पाहिलं...
"लई उपकार होतील साहेब तुमचे..... चला पहाट होत आली... निघावं म्हणते आता... तेवढी काळजी घ्या... म्हणत ती जंगलात पाठमोरी अदृश्य झाली....
सतिशच्या आकलन शक्तीपलीकडे होते हे सारं... कुणाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण होत खरं...
बाहेर उजेडायला लागले होते, पाऊस ही थांबला होता... त्याने झाप्या बाहेर येवून पाहिले तर काय? .... गेस्ट हाऊस समोर दिसत होते... त्याने एकदा झाप्याकडे, एकदा सखुबाई अदृश्य झाली त्या जंगलाकडे पाहिले आणि तो गेस्ट हाऊसच्या दिशेने चालू लागला...
त्याने गेस्ट हाऊसचा दरवाजा तीन चार वेळा ठोठावला.... साखरामने दार उघडले... सर्व मंडळी बसल्या बसल्याच झोपी गेली होती.... सतिशच्या आवाजाने सगळ्यांना जाग आली.. सतिशला दारात पाहून सगळ्यांच्या जीवात जीव आला..... हॉलमधील सर्व दृश्य पाहून सतिशला अंदाज आला होता नक्की येथे काय घडले असेल, पण त्याच्या बरोबर जे झाले ते सगळ्यांना कसे काय सांगावे हा प्रश्न होता...
सगळ्याचा सतिशला प्रश्नांचा भडिमार सुरु झाला... कुठे होता रात्रभर?....
सतिशने आगदी शांतपणे सांगितले.... खूप पाऊस सुरु असल्याने मी कोल्हापुरातच मुक्काम केला, तुम्ही काळजी कराल म्हणून पहाटे पाऊस थांबल्यावर निघालो....
सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. प्रत्येकाने घडलेला सारा प्रकार सतिशला सांगितला. सतिश शांतपणे सर्व ऐकत होता... ह्यावर तो इतकंच म्हणाला....
"ह्या जगात काही गोष्टी आपल्या आकलन शक्तीच्या बाहेर असतात, त्यावर ज्यास्त विचार करू नये." ....
घडल्या प्रकारामुळे सगळ्यांचा आता ट्रिपचा मूड ओसरला होता... चहा नाष्टा करून आजच आपण पुण्याला निघू या असा सर्वांचा सूर होता... मुले आतल्या रूममध्ये झोपली होती...
सगळे आंघोळ करून चहा नाष्ट्यासाठी डायनींग टेबलवर जमले होते... चहा नाष्टा झाला सगळे आपापल्या बॅग भरून तयार झाले.
सतीशने सखारामला व त्याच्या बायकोला बोलावले...
"सखाराम.... माझ्या डोक्यात एक कल्पना आहे... सखूबाईच्या मुलाला मी पुण्यात शाळेत शिक्षणासाठी घेवून जातो... त्याची जबाबदारी माझी, त्याला चांगल्या हॉस्टेल मध्ये ठेवेन.. तुला जेव्हा आठवण येईल तेव्हा तू येत जा भेटायला आणि दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्टीत तो येत जाईल येथे तुझाकडे"....
अनपेक्षित प्रश्नांने सखाराम चक्रावला... साहेब पण हे कश्यासाठी?
"अरे काही नाही आमची सामाजिक संस्था आहे ती हे काम करते आणि तुझ्या तुटपुंज्या पगारात हा संसाराचा गाडा चालवन जाड जात असेल म्हणून... तेवढाच तुला आधार"...
सखारामच्या बायोकोला तर सोन्याहून पिवळे झाले होते.. ती आनंदाने तयार झाली... सखाराम तिच्या रोजच्या कटकटीला त्रासाला होता.. मुलाचे भले होते हे पहात तो तयार झाला. वर्षा मात्र ह्या साऱ्या मुळे चक्रावून गेली होती, तिने थोडी धुसफूस, आदळआपट केली....
सतिशने तिला बाजूला घेऊन फक्त इतकेच सांगितले... मी तुला गाडीत सर्व काही सांगतो, तुला जर पटले नाही तर त्या मुलाला आपण परत येथे आणून सोडू... चालेल? तेव्हा कुठे वर्षाने संमती दिली.
सगळ्यांनी गाडीत सामान ठेवले सखारामही मुलाला सोडायला त्यांच्या बरोबर पुण्याला निघाला होता... दोन गाड्यात ही सर्व मंडळी आणि ऑफिसच्या जीप मध्ये फक्त सतिश आणि वर्ष असे दोघेच बसले. गाडया रस्त्याला लागल्या.... वर्षाच्या मनात कुतूहलाचे काहूर स्पष्ट तिच्या चेहऱ्यावर दिसत होते... सतीशने वर्षाकडे पाहात सुरुवात केली....
पाच वर्षा पूर्वी आपण कोल्हापुरला असताना एकदिवस मी ह्या प्रकल्पावर इन्स्पेक्शनसाठी आलो होतो, त्यावेळी प्रकल्प नुकताच पूर्ण झाला होता, मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होता, त्याच्या तयारीसाठी आलो होतो. असेच पावसाचे दिवस होते. येथील आमदार झालके-पाटील, सरपंच आणि मी रात्रीची बैठक बसली, दारू पिऊन सखाराम घरात शुद्ध हरपून पडला होता....
वर्षा कानात प्राण आणून सतिशचा शब्दन शब्द ऐकत होती...
सखूबाईने छानपैकी मासे शिजवून आणले होते, आमदार व सरपंचाला दारू आता चांलीच चढली होती.. सखूबाईंचे तारुण्य पाहून त्यांची नियत फिरली. त्यांनी तिच्या पदराला हात घालण्याचा प्रयत्न केला. सखूबाईने प्रतिकार केला, त्या तिघांत खूप झटापट झाली... मी ती सोडविण्याचा प्रयत्न करत होतो. आमदार व सरपंचाला असे करू नका म्हणून विनवत, समजावत होतो, पण ते दोघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्या झटापटीत सखुबाई जोरात भिंतीवर आदळली गेली... त्या भिंतीवर एक टोकदार खिळा होता, तो खिळाच सखूबाईचा डोक्यात घुसला... बाई जागीच गेली... सखारामला पत्ताच नाही... आमदार आणि सरपंच ह्यांची नशा खाडकन उतरली
आता काय करायचे? दोघे विचारात पडले... मी काही न करता ह्या साऱ्यात गुंतलो होतो... त्या दिवशी असाच मुसळधार पाऊस पडत होता आणि शनी आमावस्याच होती. ह्या धुवांधार पावसामुळे गेस्टहाऊसमधील जुने पिंपळाचे झाड रात्री कोसळले होते... आमदाराच्या डोक्यात युक्ती सुचली... सखुबाईच्या अंगावर झाड पडले आणि त्यात ती गेली असा बनाव रचला... मी काही न करता त्यात गोवलो गेलो होतो. मला त्याची साथ देणे गरजेचे होते नाहीतर त्यांनी मला त्या अटकवले असते आणि स्वतः नाम निराळे सुटले असते... राजकारणी लोक काय करतील काही भरवसा नाही. आम्ही तिघांनी मिळून त्या झाडाची एक मोठी फांदी खुप प्रयत्नाने वर उचलली, त्या खाली सखूबाईची बॉडी अशी ठेवली की तिच्या डोक्याला मार लागून ती गेली असा आभास निर्माण केला. नंतर आमदाराने पोलीस बळावर केस दाबली, पण सर्वत्र सखुबाईच्या अंगावर झाड पडून ती गेली हेच चित्र उभे केले गेले. त्यानंतर सतिशने काल रात्री त्याच्यासोबत जे जे घडले ते सर्व सविस्तर वर्षाला सांगितले...
वर्षा अवाक होवून आता फक्त शून्यात बघत होती..... तिला सतिशने घेतलेला निर्णय आता पटला होता, साखरामच्या मुलासाठी एवढे करणे जरुरीचे होते...