The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Jayshree Hatagale

Romance Tragedy Others

5.0  

Jayshree Hatagale

Romance Tragedy Others

सध्या तो काय करतो? "प्रेम"

सध्या तो काय करतो? "प्रेम"

6 mins
820


       सध्या तो काय करतो?  


      निशा आणि राहुल आज खूप दिवसांनी एक मराठी सिनेमा बघून आले होते. सिनेमाचे नाव? "सध्या ती काय करते?"

   

       दोघांनाही तो सिनेमा प्रचंड आवडला होता. घरी आल्यानंतर त्या सिनेमावरंच चर्चासत्र सुरू होतं.... बोलता-बोलता राहुलने निशाला एक प्रश्न केला, ए निशा, तुझ्या लाईफ मध्ये कोणी होतं का गं असं ? सध्या तो काय करत असेल? असा प्रश्न तुला पडण्यासारखा...... 


निशा क्षणाचाही विलंब न लावता पटकन उत्तरली....अजिबात नाही. (पण, थोडी अंतर्मुख झाल्यासारखी दिसत होती) उलट, निशानेच राहुलला प्रति प्रश्न केला, तुझ्या लाईफमध्ये कोणी? आणि मिश्किल हसली. यावर राहुल मात्र सहज बोलून गेला हो होती एक कॉलेजमध्ये असताना.... खूप आवडायची मला ती आणि तिलाही मी. माझं खुप प्रेम होतं तिच्यावर आणि तिचंही. जवळ-जवळ तीन वर्ष आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. ती तीन वर्ष खूप सुंदर गेली एकमेकांच्या सोबतीने. खूप घट्ट आणि निखळ प्रेम होतं आमचं एकमेकांवर.... 

"प्रिया" दिसायला अतिशय सुंदर आणि सालस होती.... राहुल प्रिया बद्दल भरभरून बोलत होता... अचानक त्याचे लक्ष निशाच्या प्रश्नार्थक चेहर्‍याकडे गेलं.... लगेच तो भानावर आला आणि निशाची माफी देखील मागितली... सॉरी निशा मी जरा जास्तच बोलून गेलो तुला राग आला असेल ना? 


निशा निस्तेज चेहऱ्याने म्हणाली, अरे नाही, तो तुझा पास्ट होताना.... निशा तशी समजूतदार, प्रॅक्टिकल होती. प्रत्येकाचा कुठला ना कुठला भूतकाळ हा असतोच...... एवढे बोलून झाल्यावर राहुल मात्र जरा शांतच बसला होता. निशा त्याला पुन्हा म्हणाली, राहुल सांग ना थांबलास का? 

मला आवडेल ऐकायला. आणि गोड हसली. 

       राहुल मनातल्या मनात खुश होता त्याला निशा सारखी समजूतदार बायको मिळाली होती. 


राहुल : अगं नाही हे एवढंच होतं, तिच्या घरच्यांनी आधीच तिचं लग्न ठरवलं होतं.... एक दिवस तिने मला फोन करून सांगितले कि आता आपण एकमेकांना विसरायला हवं. आपल्या प्रेमाला इथेच पूर्णविराम द्यायला हवा. मी घरच्यांनी ठरवलेल्या मुलाशीच लग्न करणार आहे. फोनवरचं तिचं बोलणं ऐकून मी शॉक झालो होतो. माझ्या पायाखालची जमीनच जणू सरकली होती. आपण अंधाऱ्या खोल दरीत कोसळत असल्याचा भास झाला पण सावरलो...प्रेमभंग झाला होता पण मी खचणाऱ्यांपैकी नव्हतो....आत्महत्या तर त्याहून नाही.... 


यात आपल्या घरच्यांचा काय दोष? आपण एखादं चुकीचं पाऊल उचलून त्यांना का शिक्षा द्यायची ?त्यांच्या प्रेमाची अवहेलना का करायची? किती प्रेमाने जपलेलं असतं त्यांनी आपल्याला.... आयुष्यात असे प्रसंग येतात पण खचून न जाता खंबीरपणे अशा प्रसंगांमधून सावरता आलं पाहिजे.


निशा भान हरपून हे सगळं ऐकत होती..... 

ए निशा, अगं कुठे हरवलीस ऐकतेस ना? की मी एकटाच बडबडतोय? निशाचा हात हातात घेत राहुल म्हणाला.

अरे! नाही बोल ना मी ऐकत आहे.... निशा म्हणाली.


राहुल : चल, बास आता मला खूप झोप आली आहे सकाळी ऑफिसला जायचंय मॅडम. ए निशा पण खरंच तुला राग नाही आला ना हे सगळं ऐकताना.... नाहीतर ऐकून घेशील आणि भांडत बसशील नंतर माझ्याशी.... असं म्हणत राहुल जोरजोरात हसायला लागला. निशाही मोकळेपणाने हसली.


निशा: राहुल, झोपण्याआधी ज्युस घेणार का थोडा? मी लगेच बनवते. डिनर तर आपण बाहेरच केलंय. 


राहुल: ओके बनव थोडा.... ए पण साखर खूप नको घालूस,  नाही तर ऐकना साखर टाकूच नकोस.... नॅचरल ज्यूसच दे मला.... 


निशा ठीक आहे म्हणत किचन मध्ये गेली आणि ऑरेंज ज्यूस बनवून घेऊन आली.... टीव्हीवरच्या न्यूज बघत-बघत दोघेही ज्यूस पीत होते.


      निशा मनातल्या मनात विचार करत होती हे पुरुष कसे पटकन बिनधास्त व्यक्त होतात ना? पण स्त्रियांचं तसं नसतं.... खूप गोष्टींचा त्यांना विचार करावा लागतो.


एव्हाना, राहुलचा ज्यूस पिऊन झाला होता टिपॉयवर रिकामा ग्लास ठेवतच राहुल निशाला म्हणाला, चल, मी झोपतो गं आणि बेडरूममध्ये निघून गेला.... 


निशा: हो ठीक आहे, मी जरा किचन ओटा आवरून येतेच.... 


     निशा सोफ्यावर बराच वेळ बसुन होती तीही हरवली होती भूतकाळात, तिलाही प्रश्न पडला होता.सध्या तो काय करत असेल? 


      काही व्यक्ती काही ठराविक काळासाठीच आयुष्यात येऊन जातात. पण संपूर्ण काळ ते आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात. उठता-बसता एकच विचार रेंगाळत असतो मनात....त्याच व्यक्तीचा..... 

       राहुलने विचारले तेव्हा निशा, तिच्या आयुष्यात असं कोणीच नाही, म्हणाली खरी.... 

पण, विचारांचं वादळ घोंगावत होतं....सध्या तो....? 


       निशाच्या घराजवळच दिनेशचं घर होतं. बऱ्याचदा त्याचं निशाच्या घरी येणं-जाणं असायचं. शिवाय दोघे एकाच कॉलेजमध्ये.... कधी त्यांच्यातील जवळीक वाढली कळलंच नाही. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये रोज मस्त गप्पा मारायच्या मित्र-मैत्रिणींसोबत.... मस्त दिवस चालले होते. निशाला त्याच्याशी बोलल्याशिवाय करमतंच नव्हतं. तो दिसला नाही तर निशा बेचैन व्हायची. हळूहळू ही ओढ प्रेमात बदलली.

त्यालाही निशा खूप आवडायची. सतत तो तिला सरप्राईज देऊन नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा.... तिच्या चेहर्यावरचा तो ओसंडणारा आनंद नजरेत भरून घ्यायचा. तिचं हसणं, तिचं दिसणं पुरता पागल झाला होता तिच्यासाठी. 

        अचानक एक दिवस घराबाहेर कोणाच्यातरी भांडणाचा आवाज आला. निशा आणि निशाच्या घरातले बाहेर येऊन बघतायेत तर काय? निशाचा भाऊ विनीत आणि दिनेश यांच्यात मारामारी सुरू होती. बहुतेक निशाच्या भावाला निशा आणि दिनेशच्या प्रेमाबद्दल बाहेरून समजले होते. म्हणूनच त्या दोघांमध्ये ही भांडणं सुरू होती. दोन्हीकडच्या फॅमिली आता भांडणात उतरल्या होत्या ते सगळे भयानक दृश्य बघून निशा खूपच घाबरली होती.ती भांडणे मिटावी म्हणून निशाने पुढे येऊन सांगितले की, आमचे दोघांचे काहीही नाही.विनित अरे, तुला कोणीतरी खोटं सांगितलंय...प्लीज थांबवा भांडणं ....पण विनित ऐकायलाच तयार नव्हता. शेवटी निशाच्या आईने निशाला शपथ घ्यायला लावली. निशा खरं सांग दिनेशचं आणि तुझं खरंच काही आहे का? 

        निशा प्रचंड घाबरली होती. ही भांडणं तूर्तास थांबावी या हेतूने निशा "नाही" म्हणाली. निशा आणि दिनेश वेगळ्याच द्विधा मनस्थितीत सापडले होते. एकमेकांवर असलेलं प्रेम त्यांना यावेळी कबूल करता येत नव्हतं.... तसं केलं असतं तर, खूप भयानक परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागलं असतं. त्यामुळे दोघांनीही एकमेकांवर असलेल्या प्रेमाचा या ठिकाणी उल्लेख नाही केला. 

        दिनेशला या भयानक अवस्थेत पाहून निशाला प्रचंड त्रास होत होता.... डोळ्यातुन ओघळणारे पाणी निशा कोणाच्याही नकळत पुसत होती.... खूप हतबल होती ती..... 

        निशाने आमच्या दोघात तसं काहीही नाही असं कबूल केल्यामुळे दोन्हीही फॅमिली आपापल्या घरी परतल्या....  


        परंतु, निशा आणि दिनेशच्या घरचं वातावरण चांगलंच तापलेलं होतं..... त्याच दिवशी लवकरात लवकर निशाचं लग्न उरकण्याचा फतवा काढण्यात आला. तर इकडे दिनेशला पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला मामाकडे पाठविण्याचे ठरले. 

       निशा खूप रडत होती ती काळ रात्र सरता सरत नव्हती.निशाला वाटत होतं इथून निघून जावं आणि दिनेशच्या कुशीत खूप रडावं.आता प्रेमाला बगावत करावीशी वाटत होती पण ते इतकं सोप्पं नव्हतं....निशाच्या खिडकीतून दिनेशचं घर स्पष्ट दिसायचं, कशीतरी ती काळरात्र सरली.सूर्यकिरणं खिडकीतून आत डोकावू लागली. आपण एकाच प्रसंगावर अडून बसतो.त्याच क्षणांत गुरफटलेलो असतो, पण निसर्गचक्र अविरत सुरूच असतं. निशाची नजर खिडकीतून बाहेर गेली. दिनेश बॅगा घेऊन कुठेतरी निघण्याच्या तयारीत असल्याचं दिसलं. निशा खूप बेचैन झाली, खूप अस्वस्थ झाली.... त्याला समोर पाहून निशाला वाटत होतं दिनेशला जाऊन घट्ट मिठी मारावी.


परंतु तिच्यावर असलेल्या मर्यादा आणि बंधनांची शृंखला ती काही केल्या तोडू शकली नाही.... तिच्याकडे स्वतःचं मन मारण्या खेरीज दुसरा कुठलाही पर्याय नव्हता.... 


      दिनेशने बॅगा उचलल्या.... निशाच्या घराकडे पाहिलं तर निशा खिडकीत उभी होती. दुरून एकमेकांकडे बघतानाही..... त्याच्या मनातील प्रश्न आणि निशाच्या नजरेतील घालमेल स्पष्ट कळत होती.... एकमेकांपासून दूर जाताना मनाची होणारी तडफड दोघांनाही अस्वस्थ करत होती..... न बोलताही ते दुरूनच नजरेने खुप काही बोलून गेले..... मजबूर होता तो तिथे आणि निशा इथे दोघेही निरुत्तर.....दोघेही हताश.... 


      दिनेश बसस्टॉपच्या दिशेने चालू लागला. आणि निशा त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे व्याकूळ नजरेने पहात राहिली.... निशाला कळून चुकलं होतं, या प्रेमाचा शेवट आता इथेच झाला आहे.... दिनेशला ती हरवून बसली आहे अगदी कायमचं. घरच्यांचे ऐकण्याशिवाय निशाकडे अन्य पर्याय नव्हता.


      अगदी दोन-तीन दिवसांतच निशाला बघायला एक स्थळ आलं.... बरोबर! ते स्थळ राहुलचं होतं.

पाहताक्षणी राहुलला निशा आवडली होती आणि राहुलच्या घरच्यांना देखील.... निशाला राहुल आवडला आहे की नाही हे विचारण्याची तसदी निशाच्या घरच्यांनी नक्कीच घेतली नाही.... समोरून होकार आला आणि निशाच्या घरच्यांनी लग्नाची तयारी सुरू केली.... लग्न अगदी थाटामाटात पार पडले. 

    

      निशा तडफडत राहिली, तळमळत राहिली परंतु सो-कॉल्ड मर्यादा तिने ओलांडल्या नाहीत.... तिने स्वाधीन केलं होतं स्वतःला.... राहुलला तिने कधीच काहीच कमी पडू दिले नाही.... तिने त्याच्या हक्काचं त्याला सर्व काही दिलं.... स्वतःचं सर्वस्व त्याला बहाल केलं... राहुलला.... तिच्या अस्वस्थ मनःस्थितीचा कधीच अंदाज आला नाही.... खरंतर निशानेच त्याला कधी तसं जाणवू दिलं नाही. तिच्या जबाबदाऱ्या ती योग्य प्रकारे निभावत होती. 

       काही गोष्टी काळजावर अगदी खोल कोरल्या गेलेल्या असतात.... तसाच दिनेश अजूनही तिच्या हृदयात त्याचं अस्तित्व कुठेतरी एका कोपऱ्यात कायम टिकवून होता.

आणि ते तसंच राहणार होतं आठवणींच्या रूपात कायम.... 

        निशा, मर्यादा ओलांडणार नाही ही देखील काळ्या दगडावरची रेघ! माणूस काही नीती-मूल्यांमध्ये स्वतःला बांधून ठेवतो आणि आयुष्यभर त्या आधारावरच स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करतो.

       निशा भूतकाळातल्या त्या आठवणींमध्ये विचारांमध्ये गढून गेली होती. पण हे सगळं आठवत असताना निशाला धस्सं झालं होतं.... तो प्रसंगच खुप भयानक होता दोन जीवांना वेगळं करणारा..... दिनेश निशाचं पहिलं प्रेम होतं आणि पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही. निशानेही जपलंय ते हृदयात... कोणाच्याही नकळत.. 


"तो कुठेही असला तरी, सुखी असावा एवढंच वाटतं निशाला"


निशाने स्वतःला सावरतच डोळ्यांमधून, तिच्याही नकळत वाहणाऱ्या अश्रुंना पुसत एक दिर्घ श्वास घेतला.... आणि बंद करून टाकलं दिनेशला तिच्या हृदयाच्या कप्प्यात आठवणींच्या रूपाने... आणि पुन्हा ती वर्तमानात परतली.... मात्र, तो सध्या काय करत असेल? हा विचार तिच्या मनात घोळत राहिला.... पुढील काही दिवस तरी......  Rate this content
Log in