बालपण एक मजेशीर आठवण
बालपण एक मजेशीर आठवण
खुप मजेशीर किस्से आहेत माझ्या बालपणीचे.
साधारण तेव्हा मी दहा ते अकरा वर्षांची असेल. लहानपणी मी काही वर्षे आजोळीच होते. आई-वडील त्यावेळी पुण्याला रहायचे.
माझ्या आजोळी खरंच खुप सुबत्ता होती त्यावेळी. बागायत शेती, पेरुची, सिताफळाची बाग, आंब्याची डेरेदार झाडं, चिंचेची झाडं... पाडाचे आंबे, चिंचा वाह! क्या बात? नुसते नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते.
घरही शेतातच होते आमचे. घरासमोरच एक बोरीचे झाड होते. त्या झाडाची बोरं प्रचंड गोड होती आणि मला आठवतंय त्या झाडाखाली एक सापाचे वारुळ होते. आम्ही भितभितच तिथं पडलेली बोरं घेत असायचो. लिंबाच्या झाडाला एक झोका कायमचा बांधलेला असायचा.. अर्धा दिवस तर झोका खेळण्यातच जायचा. कधी-कधी शेळ्यांना चारायला मी रानात घेवून जायचे.. आणि तेव्हा जो रानमेवा खायला मिळायचा... व्वा लयभारी दिवस होते ते.
विहीरही होती शेतात आमच्या.
हां तर एकदा झालं असं.. मला पोहायला शिकायचे होते. त्यावेळी 'पांगरी' नावाच्या झाडाच्या पाच-सहा हातभर लांब लाकडांचा बिंडा दाव्याने बांधला जाई व ही एकत्र बांधलेली लाकडे ज्या व्यक्तीला पोहायला शि
कायचे आहे. त्याच्या कमरेला बांधून पोहायला शिकवले जाई. पांगरी या झाडाची लाकडं वजनाने हलकी असतात. त्यामुळे पोहायला शिकणारी व्यक्ती बुडत नसे. असाच बिंडा माझ्यासाठीही तयार करण्यात आला पण मला पोहायला शिकवायला कोणाकडेच वेळ नव्हता म्हणून एक दिवशी मीच तो बिंडा कमरेला बांधून विहिरीवर पोहायला गेले. विहिरीवर आजूबाजूला कोणीच नव्हते. मी विहिरीत डोकावून पहात मनाची तयारी करत होते उडी टाकण्यासाठी.. पण मी विचारात मग्न असतानाच मला कोणीतरी मागून धक्का दिला आणि मी धपकन विहिरीत पडले..जाम घाबरले होते त्यावेळी. नाका-तोंडात पाणी गेलं.. विहिरीतून वरती पाहिलं तर वरती कोणीच दिसेना...घाबरले होते मी पण बुडणार नाहि हेही माहित होतं म्हणून हिम्मत करुन विहिरीच्या पायऱ्यांच्या दिशेनं कशीबशी आले आणि थरथरतच विहिरीच्या काठावर बसून दीर्घ श्वास घेतला. मला विहिरीत कोणी ढकलले याचाच शोध माझी सैरभैर नजर घेत होती पण कोणीच दिसेना मग तशीच रानातल्या बांधाने घरी गेले आणि घडलेली हकिकत घरच्यांना सांगितली तर काय सगळे नुसतेच हसत होते पण मला विहिरीत ढकलले कोणी? याचे उत्तर मात्र कोणीच देईना...पण मी पोहायला शिकले नंतर ....
आजही हा किस्सा आठवला की माझे मलाच हसायला येते.. पण मला विहिरीत ढकलले कोणी? या प्रश्नाचे उत्तर मात्र आजतागायत गुलदस्त्यातच आहे.