STORYMIRROR

Sunil Khandelwal

Comedy

3  

Sunil Khandelwal

Comedy

सायकल चोरी झाल्याचं सुख

सायकल चोरी झाल्याचं सुख

4 mins
432

सकाळी सायकलवर कॉलेजमध्ये गेलेल्या गण्याला पायी-पायी येतांना पाहून चौकातल्या चहावाल्या अब्दुलला काहीतरी विपरीत घडले असल्याची शंका आली आणि त्याने क्षणाचाही विलंब न लावता.... "तोंड बारीक करायला काय झालं रे गण्या....! सायकल कुठाय तुझी, वाढदिवस ना सायकलचा आज! अन तू असा पायी पायी रे का?" अब्दुल ने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. गण्या आधीच चालून थकलेला, प्रचंड तहान लागलेली, कसाबसा अब्दुलच्या दुकानात आला. शांत डोळे बंद करून बसला, दोन घोट पाणी पिऊन थोडा बोलता झाला..."माझी रामप्यारी कोणीतरी चोरली अब्दुल भाऊ"...."म्हणजे".... अब्दुल ही उद्गारला.थोडक्यात गण्याने सायकल चोरी झाल्याचा वृतांत अब्दुलला सांगितला.


थोड्याच वेळात ही खबर साऱ्या सोसायटीच्या घराघरात पोहचली. गण्या घरी पोहचतो न पोहचतो सर्व लोकं गण्याच्या घरी गर्दी करू लागले. सायकल चोरी गेल्याची ही कदाचित पहिलीच वेळ होती. एक सोसायटीचा सभासद हरवल्यासारखी परिस्थिती होती. सर्व जण गण्याचं असं सांत्वन करू लागले जसं कोणी स्वर्गवासी झालं होतं.शेवटी काय तर एकेकाची सांत्वना बघून गण्याला अनावर झाला अन तो आईच्या कुशीत जाऊन धायमोकलून रडला. शेवटी मनमोकळे रडल्यावर गण्याच येणाऱ्या प्रत्येकाला सायकल परत मिळेल असं सांगू लागला विश्वास देऊ लागला पण ऐकतील ते सोसायटीकर कसले?

सायकल चोरी गेल्याचे कळताच सोसायटीचे सेक्रेटरी श्री.ज.रा. उठबसे यांनी रात्री ९.३० वाजता शोकसभेचे आयोजन केले. या सभेत मात्र जी धमाल झाली ती अफलातूनच.

ठरलेल्या वेळेत सर्व क्लब हाऊसमध्ये जमले.

ज्येष्ठांना मान देत सोसायटीचे चेअरमन श्री विठ्ठलआप्पा कणकवलीकर यांना अध्यक्ष म्हणून मान देण्यात आला. यावर डी विंगच्या सौ.ठेंगडी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नंतर पुढच्या मिटिंग ला अध्यक्ष पदाची माळ घेत अनुमोदन केले.

भिका नाना जोशी ( गोदावरी दुग्धपान गृहाचे मालक यांनी) प्रमुख पाहूणेपद भूषवले.

सभेला सुरुवात होताच सर्वांनी दोन मिनिटं मौन पाळून गण्याच्या सायकलला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सेक्रेटरी श्री उठबसे यांनी गण्याच्या वडिलांना सायकल विषयी दोन शब्द बोलण्यास विनंती केली. विनंतीस मान देत गण्याचे वडील श्री शेकू आप्पा यांनी माईक हातात घेतला....

"सर्वांचं गोंधळकर परिवाराच्या वतीने हार्दिक आभार!"गोंधळकर हे गण्याचं आडनाव. पुढे शेकू आप्पा म्हणाले "गेल्या वर्षी गण्याच्या मामानं त्याला आजच्या दिवशी सायकल घेऊन दिली होती. कॉलेजला जायला यायला गण्याला तिची फार मदत व्हायची. सारं शहर तिनं पालथं घालत गण्याला गल्ली न गल्ली दाखवली होती. गण्या तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा.रोज तिला आंघोळ घालून पुसायचा. नव्या नवरी सारखी ती सजलेली होती. याचाच फायदा घेत चोराने तीला चोरली असावी" असा विश्वास शेकू आप्पांनी व्यक्त केला.हे एका प्रास्ताविक केल्यासारखं सर्व झालं. प्रमुख पाहुणे भिका नाना जोशी यांनी गण्याला आलिंगन देत डोळे पुसले.(स्वतः चे)लवकरच एक नवीन सायकल सोसायटी फ़ंडातून गण्याला घेऊन देण्याचा प्रस्ताव मांडला. भिका नानांचं भाषण मधेच थांबवत सेक्रेटरी उठबसे यांनी सायकल चोरी घटनाबाह्य असल्याने शक्य नसल्याचे जाहीर केलं.भिका नानांनी मग प्रस्ताव पास होत नसल्यानेअपमान होत असल्याचे सांगत सभात्याग करने पसंत केले.

शेवटी विठ्ठल आप्पा कणकवलीकरांची बारी आली. विठ्ठल आप्पा भाषण करतांना इतके भावूक झाले की त्यांच्या सौ.त्यांना सावरायला मंचावर भिका नांनाच्या खाली झालेल्या खुर्चीवर आसनस्थ झाल्या. मंचावर स्त्री सदस्याला बहुमान मिळाल्याचं पाहून सर्व महिला वर्गाने जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केले.विठ्ठल अप्पांच्या सौ.मंदा काकूंनी मग अप्पांना डोळ्यानेच इशारा करत माईकवर कब्जा केला.आप्पांनी मग रडण्याचे सुस्कारे देत आसन ग्रहण केले.

मंदा काकू म्हणाल्या...."सर्व बंधू भगिनींनो आज आपल्या गणोबा गोंधळकर यांचा फारच गोंधळ उडाला आहे.त्यांची रामप्यारी रामाला आज खरंच प्यारी झाली आहे. तेव्हा आपण सर्व या ठिकाणी गोंधळकर परिवाराच्या गोंधळात सहभागी होऊ या...." गोंधळात ऐवजी दुःखात सहभागी होण्याचे म्हणायचे असल्याचे नंतर मंदा काकूंनी स्पष्टीकरण दिले.

सोसायटीचे ज्येष्ठ नागरिक श्री केसरीलाल पसारी यांनी पोलिसांत तक्रार नोंदवण्याची सूचना केली त्याला सर्वांनी एकमुखाने मान्यता दिली. खोटे वकील साहेबांनी यात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

वेगवेगळ्या सूचना ठराव पास होत होते. रात्र झाली होती. गण्याला मात्र हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. एकंदर सर्व गोंधळ उडाला होता. कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नाव शोकसभेच होतं पण सर्व वेळ एकमेकांची उणी दुणी काढण्यात चालला होता.

तेवढ्यात कोणीतरी सोसायटीच्या गेट मधून आत येतांना दिसले. सर्वांचे लक्ष त्या व्यक्तीकडे वेधले गेले. कारण त्या व्यक्तीच्या हातात गण्याची सायकल होती. अनपेक्षितपणे आपली सायकल पुन्हा बघून गण्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. जसा गण्या खूश तसे सर्व सोसायटीकर ही आनंदी झाले. क्लब हाऊस मधून उडी घेत सायकल जवळ जाऊन तीला मिठी मारता झाला.

त्या आलेल्या व्यक्तीचे आभार मानत सायकल कुठे भेटल्याची माहिती विचारायला सुरुवात केली. पुन्हा एकदा सभेत शांतता पसरली व सर्वजण त्या व्यक्तीला ऐकण्यासाठी अधीर झाले. त्या व्यक्तीला ती सायकल चोरायची होती पण त्याला सायकलच्या कॅरिअर ला एक चिठ्ठी अडकवलेली मिळाली व ती वाचून त्या चोर मोहद्यांनी चोरीचा विचारच सोडून दिला. असं काय होतं त्या चिठ्ठीत...

प्रिय गणू,

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण मला माहित आहे की तुला जर सर्वात जास्त प्रिय कोणी असेल तर ती तुझी सायकल. तू तीला जीवापाड जपतो. मामानं दिलेली सायकल म्हणजे ती मामाची पोरगी भाच्याला दिल्या सारखी आहे. तुझं तिच्याशिवाय जगणं अशक्य. म्हणून मी आता तुला कायमची विसरायचं ठरवलं आहे.आज तुझ्या रामप्यारी चा वाढदिवस... तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा!

तुझी,

सुनी....


हे पत्र वाचून त्या चोरालाही गहिवरून आले व आपण करत असलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याने निर्णय बदलत सर्व मान्य करून सायकल गण्याच्या ताब्यात द्यायची ठरवून तो ती येथे घेऊन आला. शेवटी अभिनंदनाचा ठराव पास करून सभा बरखास्त केली गेली!

आणि सायकल चोरी झाल्याचं सुख घेत गण्याही घरी रवाना झाला......!


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy