Sunil Khandelwal

Others

4  

Sunil Khandelwal

Others

गिरजा धोबी

गिरजा धोबी

3 mins
522


आज गावात आषाढीला पांडुरंगाची पालखी सकाळी प्रभात फेरीला निघाली पण या वर्षी यात काहीतरी कमी असल्याचं सारखं भासत होतं. पांडुरंगाचं नाव घेत दिंडी चालली होती पण पांडुरंगच हरवल्यासारखं वाटत होतं. महिनाभर आधीपासूनच या पालखीची तयारी असायची. ती तयारी, तो उत्साह कुठं तरी हरवल्याचं जाणवत होतं. यात सर्वांत कमी होती ती गिरजा तात्याची.... गेल्या दोन महिन्यापूर्वी गिरजा तात्याची पालखी वैकुण्ठाला गेली ती कायमचीच. अख्खं गांव हळहळलं व गावची चावडी ओस पडली. अरे हो, गिरजा तात्या बद्दल सांगायचे राहिले की....

गिरजा तात्या म्हणजे गावातलं चालतं फिरत विद्यापीठ. एकेरी उल्लेख करावा असं गिरजा तात्याचं वय नव्हतंच. जायच्या आधी वयाची पंच्चहात्तरी गिरजा तात्यानं गाठली होती. पण पंचविशीतल्या तरूणालाही लाजवेल असं राहणीमान होतं. पांढरं शुभ्र धोतर-सदरा, गुलाबी पटका, डोक्याला पंढरपुरी गंधटीळा, गळ्यात तुळशीची माळ, उंच शरीरयष्टी, भारदस्त आवाज, दातांच्या पुढच्या पंक्तितील ब-याच लोकांचं पलायन. असा एकंदर गिरजा तात्याचा बाज होता. राहणी होती.

माणसानं आयुष्यभर समाधानी राहून सुंदर आयुष्य कसं जगावं असंच हा अवलिया शिकवत राहिला. लग्न झालं होतं पण अर्धांगिनी लवकरच जगाचा निरोप घेऊन गेली. मुलबाळ नव्हतंच. भावाची एक पोर शहरात दिली होती तीच एक नातेवाईक. अन्यथा सर्व गावच गिरजा तात्याला घरचं होतं. वडिलोपार्जीत चार गुंठे जमीन, चार गाढंवं असं पोटपाण्याचं साधन होतं. पोटाला पाहिजे तेवढं सहज भागायचं. म्हणूनच गिरजा तात्या आयुष्यभर समाधानी राहू शकला. गावकरी लोकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन गिरजा तात्या आपलं जीवन जगत राहिला. गिरजा तात्याची गावातल्या अस्तित्वाची उदाहरणं द्यायची झाली ती लांब जंत्रीच हो सांगायला...

लग्न समारंभात स्वयंपाक करण्यासाठी गिरजा तात्या सर्वात पुढे असायचा. त्याच्या हाताचा केलेला आळनवडा हा आजही जीभेला आठवतो. आचारी यायचा तो फक्त बुंदी करायलाच अन्यथा सर्व स्वयंपाक गिरजा तात्याच्या निगराणीतच पूर्ण व्हायचा. कुणाला पोरबाळ झालं तर साखरपानं वाटायचं काम गिरजा तात्याकडेच असायचं. लहानात गेल्यावर लहान व मोठ्यात गेल्यावर मोठं असं एकंदर वागणं होतं. 

पोळा आला की लहानग्यांना मातीचे बैल बनवणे, शाळा सुरू झाली की पुस्तकांना कव्हर बसवून देणे, भंडा-याला टिप-या तयार करून देणे, गणेशोत्सवात भारूडं बसवणे, ही काही खास कामं गिरजा तात्या करायचा. स्वतःला मुलबाळ नव्हतंच पण सा-या गावची पोरसोरं सांभाळायची, त्यांच्या सोबत खेळायचं, बागडायचं, रामायण महाभारतातल्या गोष्ठी सांगायच्या हा नेहमीचा कार्यक्रम असायचा. एखादं लहानगं नवीन नवीन शाळेत जात नसेल तर उचलबांगडी करून न्या रं ह्याला असा बालगोपाळांना तात्याचा सल्ला असायचा. गिरजा तात्या तसा मनानं ही फार हळवा होता. त्यानं गावातली अफलातून नाती तयार केली होती. भाऊबीजेला तो कुणाची बहीण व्हायचा तर राखी पुनवेला कुणाचा भाऊ. ज्यांना भाऊ नसेल त्यांच्यासाठी भाऊ अन् ज्यांना बहीण नसेल त्यांच्यासाठी बहीण व्हायचा.. हे एक विशेष नातं जपलं होतं. 

राजकारण हा गिरजा तात्याचा आवडीचा विषय होता. पण हे राजकारण गावातलं नव्हे, घर परिवारातलं नव्हे तर राष्ट्रीय स्तराचं होतं अन् ते ही चावडीत, पारावर बसून असायचं. रजाकारी, आणीबाणीत कसं गाव सावरल्याच्या रंजक गोष्टी तात्या सांगायचा. जात-पात, गरीब-श्रीमंत, शिक्षित॔अशिक्षित यापलीकडे जावून तो माणसं ओळखायचा, जपायचा..."राजकारण हे आपल्यासारख्या सामान्य माणसांचं काम नव्हं" हे गिरजा तात्याचे बोल बरंच काही सांगून जायचे. कुठल्याही व्यसनाचा गंधही नसलेला हा माणूस विठ्ठलाचा परम भक्त होता. पखवाज वाजवून आपली हरीपाठ व काकडारतीत धुंद होऊन प्रभुचरणी लीन व्हायचा. तुकोबाचे अभंग असो वा गवळणी असो.. सर्व काही मुखोद्गत होते.

एका दिवाळीला गावात गेलो असता वाटेतच गिरजा तात्याची मुर्ती दिसली. "काय सुन्याभाऊ शहरात सारं मजेतच ना? बंगला बांधलाय म्हणे पुण्याला. गावाकडंही येत जा अधून मधून, बरं वाटतं म्हता-या माणसायला" इती गिरजा तात्या. ते खडे बोल अजूनही आठवतात. कदाचित ती भेट गिरजा तात्यासोबत शेवटचीच ठरली. 

मी गेल्यावर माझी ओळख हाच माझ्या वंशाचा दिवा असेल असं गिरजा तात्या नेहमी म्हणायचा. मनातली खंत अशी सकारात्मक पद्धतीने मांडायचा. कधीही दवाखाना न पाहिलेला हा देवदूत कुठल्याही आजाराशिवाय वैकुण्ठाला चालता झाला. एरव्ही सरणाची लाकडं रचणारा तात्या स्वतःच सरणावर निद्रीस्त झाला होता. सारं गावच नव्हे तर पंचक्रोशीत तात्याच्या जाण्यानं दुःखाचा डोंगर कोसळला होता. गांव सोडून दशकापेक्षा जास्त काळ लोटूनही तात्याबद्दल लिहता आलं त्यातच गिरजा तात्याला खरी श्रद्धांजली ठरली...


Rate this content
Log in