STORYMIRROR

Sukhada Rao

Romance Tragedy Classics

3  

Sukhada Rao

Romance Tragedy Classics

सांग सखे कळणार कधी

सांग सखे कळणार कधी

3 mins
253

वॅलेन्टाईन डे चे फॅड निघायच्या आधीपासूनच त्यांच नातं. रोजची भेट कधीच चुकली नव्हती. आधी शाळेत जाताना, मग कॉलेज नंतर नोकरीला जाताना त्याच्याशी गुजगोष्टी केल्याशिवाय तिचा दिवस संपत नव्हता. आज लग्नाला २०वर्ष झाली तरी ती रोज त्याला भेटते. तिच्या संसाराच्या कटकटी, नवऱ्याच्या, मुलांच्या तऱ्हांचे रडगाणे गाते. तो देखील शांतपणे ऐकून घेतो. सांत्वनासाठी हळुवार तिच्या डोक्यावर हात ठेवतो. चार देखणी फुलं तिच्या केसात माळतो.

ती तेवढ्यानेच खुश होते. मग उशीर होतोय म्हणून घराकडे पळते. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत खिन्न होऊन हसतो. नेहमी असंच होतं....

मग त्याला त्यांची पहिली भेट आठवते. पावसाच्या धारा, चिंब भिजलेली ती आणि दूरवर कुठेतरी सुरु असलेले ते सुंदर प्रेम गीत. "सांग कधी कळणार तुला .....

तेव्हापासून हा सिलसिला सुरूच झाला . काही ना कारणानं तिने तिथे यावं त्याच्याशी गप्पा माराव्यात. मनातलं सारं त्याला सांगून मोकळं व्हावं आणि त्यानेही तिची प्रत्येक तक्रार ऐकून घ्यावी, तिच्या प्रत्येक रूपावर भरभरून प्रेम करावं..

तिचं पाहिलं प्रेम त्याच्याच साक्षीनं फुललं होतं. लग्नाच्या अक्षता सर्वप्रथम त्यानेच उधळल्या होत्या त्या दोघांवर. वर्ष लोटली पण तो अजूनही तिथेच होता. फक्त तिच्यासाठी... 

तिच्या प्रत्येक प्रसंगात तो सोबती होता. तिच्या सुख -दुःखाचा सहप्रवासी होता. तिच्यावर निःस्वार्थ प्रेम करणारा जगावेगळा प्रेमी होता. 

आज सकाळीच त्याला भेटल्या आली. ती खूप सुंदर दिसत होती. केसांत मोगरा आधीच सजला होता. गालावरची लाली त्याला सगळं सांगून गेली.लग्नाचा २० वा वाढदिवस होता. नवऱ्यासोबत फिरायला जायचा प्लॅन बनला होता. खूप खुश होती. उठल्यापासून पासून काय काय घडलं ते सगळं सांगून मोकळी झाली. अगदी तिच्या एकांतातले क्षण सुद्धा. गोड लाजली. तो ही मनापासून हसला. तिला शुभेच्छा दिल्या. नेहमी प्रमाणे आजही चार फुलं तिच्या केसांत माळली. 

गडबडीने उठली, म्हणाली जाते आता... 

तो गडबडला, क्षणभर घाबरला, नेहमी येते आता म्हणणारी आज जाते आता कसं म्हणते??? 

पण त्याची काळजी तिला उमगलीच नाही. आज तिचं फुलपाखरू झालं होतं. अगदी अल्लड पहिल्या भेटीसारखं... 

ती निघाली आणि तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. त्याने क्षणभर डोळे मिटले आणि एक जोराचा आवाज झाला. 

त्याने डोळे उघडले पण ती दिसत नव्हती. आजूबाजूला गर्दी वाढली होती. त्याने गर्दीत डोकावून पाहिलं, ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली. पाय घसरून पडली आणि अगदी त्याच्या पासून काही अंतरावर असलेल्या भल्या मोठ्या दगडावर डोकं आपटलं. तो सावरायच्या आत लोकं तिला घेउन गेले. मग बरेच दिवस ती आलीच नाही. 

तो कासावीस होत होता पण अगतिक होता. त्याची जागा तो सोडू शकत नव्हता. वाईटाच्या भीतीने तो पोखरला जात होता. 

तिच्या आठवणीत तो डोळे गच्च मिटून तासनतास तसाच बसून राही. 

आज अचानक काही हालचाल जाणवली. तीच असावी म्हणून त्याने आनंदाने डोळे उघडले... 

तिचा नवरा होता. त्याच्या हातात तिचा फोटो होता. 

ती अत्यावस्थेत होती. त्याचीच आठवण काढत होती. तिची अंतिम ईच्छा म्हणून तिनेच नवऱ्याला त्याला भेटायला पाठवले होते. 

तिचा निरोप नवऱ्याने जसाच्या तसा सांगितला. पण ते शब्द त्याच्या कानापर्यंत पोचत नव्हते. अश्रूंची पानगळ थांबत नव्हती.

नवरा जायला निघाला. नेहमीप्रमाणे त्याने ४ फुलं त्याच्याही ओंजळीत टाकली शेवटची... 

नवऱ्याने निरोप घेतला. तोच हातातला फोन किंकिणीला. ती तिच्या अंतिम प्रवासाला निघून गेली होती. 

अचानक एक मोठा आवाज झाला. नवऱ्याने मागे वळून पहिले. 

तो प्रचंड गुलमोहर मुळासकट उन्मळून पडला होता. तो अवाक झाला. असं जगावेगळं प्रेम ना त्याने कधी पाहिलं होत ना ऐकलं होतं... 

तिचा तो जगावेगळा प्रियकर तिच्यासोबत अनंतात विलीन झाला. आता नववधू च्या वेशात ती तिच्या प्रियकराच्या बाहुपाशात विसावली होती आणि अग्नीच्या प्रचंड ज्वाळा त्यांचे मिलन पूर्णत्वाला नेत होत्या. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance