STORYMIRROR

Sukhada Rao

Drama Tragedy

3  

Sukhada Rao

Drama Tragedy

एक प्रवास असा ही

एक प्रवास असा ही

2 mins
174

अश्याच एका स्वातंत्र्यदिना दिवशी तिची माझी भेट झाली.

भरजरी साडी आणि उंची दागिने जणू साक्षात लक्ष्मीचं सालंकृत रूप. नजरेला नजर भिडली आणि एकमेकीचं अंतर प्रकर्षाने जाणवलं.

मी उत्साहाचा झरा, ती उदासीन शांत तळं. मी मुक्त मोकळी चंचला पण ती मात्र प्रतिष्ठेच्या बंधनात !!

कसनुसं आमचं संभाषण सुरु झालं खरं पण तिच्यातील ती मात्र मला अजून गवसली नव्हती. जुन्या आठवणी आणि गप्पांच्या ओघाततिच्याही नकळत हरवून गेली.

वर्षानुवर्षांचं आमच्यातील अंतर हळूहळू मिटत गेलं. जणू बऱ्याच दिवसांनी ती मोकळेपणाने हसत होती. अलगद उमलावी तश्या कळीसारखी खुलत होती.

 पण अचानक हातातला महागडा फोन किलकिलाला तशी मात्र ती सावध झाली. चालत्या गाडीचे कुणीतरी करकचून ब्रेक लावावेत अन गाडीतल्या प्रवाश्यांची तंद्री तुटावी तशी तिने निरोपाची भाषा सुरु केली. पुन्हा भेटीच्या वायद्यावर क्षणभर थबकली. "पुन्हाचं पुन्हा बघू" नजर टाळू लागली. 

एव्हाना तिची पॉश कार गेटवर तिची वाट बघत उभी होती. जाताजाता सहज मागे वळली, म्हणाली, "छान वाटलं तुला भेटून, खरंतर हेवाच वाटतोय मला तुझा. मला नाही जमलं गं तुझ्यासारखं, स्वप्नांच्या मागे धावायला, सगळी बंधन तोडून मुक्त व्हायला. संधी मिळाली तरी धाडस नाही झालं. सगळ्यांचा विचार मनात आला आणि हात पाय जाड झाले. बेगडी नात्यांचे अदृश्य जडशीळ साखळदंड कधी झुगारत आलेच नाहीत बघ. पण आता वाटतंय, मुक्त व्हावंसं, बघते प्रयत्न करून!!!"

तिच्या काजळाच्या आड लपलेली असंख्य अपुरी स्वप्न अश्रू होऊन गालांवर ओघळली. माझ्याकडे पाठ करत झटकन निघून गेली. मी मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे निश्चल होऊन बघत राहिले. आजूबाजूचा ते खेळकर वातावरण उगाच बोचू लागले. तिचा विचार मनात तसाच ठेउन मग मीही काढता पाय घेतला. 

कामाच्या धबडग्यात तिचा विचार मागे पडला. पण अचानक एक दिवस सकाळी सकाळी मी तिला पुन्हा पाहिलं. 

आता ती खऱ्या अर्थाने मुक्त झाली होती. स्वतंत्र झाली होती. मला ती त्या दिवसापेक्षाही खूप सुंदर आणि प्रसन्न वाटत होती. 

वर्तमानपत्राच्या पहिल्याचं पानावर असलेला तिचा तो राणीसारखा फोटो. आणि त्याखाली दिलेली श्रद्धांजली .... 

तिच्या मृत्यूचं गूढ सोडविण्यात मीडिया आणि पत्रकार धावपळ करा होते. पण ती मात्र वरून सगळ्यांवर हसत होती. 

तिचा आणि माझा प्रवास एकाच वेळी सुरु झाला होता. पण मार्ग खूप वेगळा होता. मी बंडखोर होऊन काटेरी वाट धुडकावून लावली पण ती मात्र त्या काट्यातून मार्ग शोधत राहिली. तिच्या संयमाने अखेर श्वास सोडला. मार्ग बदलण्याऐवजी तिने प्रवासच बदलला...... 

आज बऱ्याच वर्षांनी माझ्या माझ्या काजळाच्या आड लपलेले अनुभवांचे चटके माझ्याही नकळत अश्रू बनून ओघळले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama