सख्या रे, घायाळ मी हरीणी
सख्या रे, घायाळ मी हरीणी
आज जे काही झालं, ते अकल्पनीय होतं. त्याच्या शरीर आणि मनाला असंख्य वेदना होत होत्या. हॉस्पिटलच्या बेड वर पडून तो सकाळचा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत होता. जे घडलं ते सत्य होत कि एखादं भयानक स्वप्न?
कॉलजेच्या 2nd इयरला असताना त्याने २ वर्ष जुनिअर असलेल्या माधवीला प्रपोज केलं होतं. नाकी डोळी नीटस आणि तरतरीत माधवी इतर मुलींसारखी सुंदर नसली तरी आकर्षक होती. त्यापेक्षा ही जास्त ती समंजस आणि सोशिक होती. त्याने प्रपोस केल्यावर हरखून गेली होती. अनेक देखण्या आणि सुंदर मुलींमधून त्याने तिला प्रपोज केलं होतं, तेही सगळ्यांच्या समोर. ती त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करत होती. त्याची हर इच्छा, हट्ट सर-आँखोंपर..
त्याला देखील अशीच मुलगी हवी होती जी त्याच सगळं ऐकेल.
जुन्या बुरुजावर.. त्यांची भेटण्याची ती खास जागा. गेली ५ वर्ष रोज न चुकता ती दोघे इथेच भेटत.
आज ते दोघे त्या ठिकाणीच भेटत होते ...
ती: "झालं का बोलून तुझं? निघते मी "...,
तो: "थांब ना थोडा वेळ...
ती: मला उशीर होतोय, घरी पाहुणे येणार आहेत. मला वेळेत गेलं पाहिजे..
तो: पाहुणे???? (त्याच्या कपाळावर आट्या पडल्या) तुझी मावशी नाही तर आत्या तर नेहमीच येते आज काय एवढं विशेष... थांब ना थोडा वेळ...
ती: नाही, लग्नाची बोलणी करायला आनंद आणि त्याची फॅमिली येतेय ... मी निघते, आणि इथून पुढे मला फोन करू नकोस. मी तुला भेटायला येणार नाही.
तो: काय???? तू लग्न करतेयस?? हे सगळं कधी ठरलं?? मला का नाही सांगितलंस?? आणि माझ्यावर प्रेम असताना तू दुसर्याशी लग्न कशी करू शकतेस???
जवळ जवळ ओरडतच तो प्रश्नावर प्रश्न विचारत होता... ती मात्र शांत होती. जणू त्याचा त्रागा, घालमेल तिला कळतच नव्हती..
तो: अगं, बोल ना, अशी काय शांत मठ्ठासारखी बसून आहेस. काय चाललंय हे सगळं ? कोण आहे हा आनंद? कुठे भेटला? अचानक त्याच्याशी लग्नाला कशी तयार झालीस?
ती तरीही शांतच होती. आता मात्र त्याचा संयम सुटला. त्याने तिला हलविण्यासाठी हात खांद्यावर ठेवला. तशी ती मागे सरकली. तिच्या या वागण्याचा त्याला प्रचंड राग येत होता. पण नेहमी गायीसारखी खाली मान घालून त्याची प्रत्येक गोष्टी मनात नसताना सुद्धा लगेच मान्य करणारी आज ती इतकी कोरडी कशी? हे कोड त्याला सुटतं नव्हतं.
तो: (थोडा नरमाईने घेत) हे बघ, घरी काही प्रॉब्लेम आहे का? तुझ्या आईबाबांना कळलं आहे का आपल्या बद्दल? अशी गडबडीत आणि दबावात येऊन काही करू नकोस. फक्त ६ महिने तुझ्या घरच्यांना थांबायला सांग, माझं कामाचं स्थिर झालं की मग मी स्वतः येईन तुझ्या घरी.
मोबाईल वाजला तशी ती उठली आणि चालू लागली. त्याला तीच हे तुटक वागणं असह्य झालं.
तो कर्कश आवाजात ओरडला, " थांब, कुठे निघालीस, मी अजून जायला सांगितलं नाहीए. आणि काही गरज नाहीय घरी जायची. तू वेळेत नाही गेलीस की ते समजतील सगळं.
ती मात्र एक -एक पायरी उतरत होती. आता मात्र त्याच्यातील पुरुष पुन्हा जागा झाला. त्याने रागाने तिच्या मागे जाऊन तिला जोरात मागे ओढायचा पर्यंत केला. पण यावेळी त्याचा अंदाज साफ चुकला. ज्या वेगाने त्याने तिला मागे ओढले त्यापेक्षा दुप्पट ताकतीने तिने त्याला मागे ढकलले.
ती: माझ्या अंगाला हात लावायचा नाही. (ती चढ्या आवाजात ओरडली. तिचे हे रूप त्याच्यासाठी नवीन होतं. ) कुणाच्या दबावात येऊन नाही स्वखुशीने मी लग्न करतेय. पुन्हा माझ्या वाटेत आडवा येऊ नकोस.
तो: अरे, इतका आवडला का तो? एका भेटीत लग्नाला तयार झालीस? असं काय केलास की त्याच्याशी लग्न करते आहेस?
ती: त्याने काहीच केलं नाहीय, जे केलंस ते तू केलंयस. ... माझ्यावर प्रेम करतोस ना मग स्वतःच्या प्रेमावर विश्वास नाही??? सतत डोक्यात संशयाचं भूत.. माझ्यापासून माझे मित्र-मैत्रीण तोडल्यास, घरातून बाहेर पडताना सतत भीती कि कुठल्या कोपऱ्यातून तू नजर ठेऊन असशील.प्रेमाच्या नावावर माझ्या जगण्यावर तू इतकी बंधन घालिस कि आता गुदमरायला लागलाय मला. तुझ्या प्रेमात आंधळी झालेले ना मी .. तुझ्या संशयी आणि हट्टी स्वभावाला प्रेम समजत होते. आणि तीच मोठी चूक केली. वेळीच तुला जाणीव करून द्यायला हवी होती.
काय आहे ना, आपल्या नात्यात फक्त तू होतास, मी कुठेही नाही. तुझे अहंकार कुरवाळायला तुला माझ्यासारखी गरीब मुलगी हवी होती त्यामुळे इतक्या सुंदर आणि देखण्या मुली तुझ्या मागे असताना तू मला प्रपोज केलंस. खूप नशीबवान समजत होते मी स्वतःला.. पण त्या गोड चेहऱ्यामागचा विद्रुप चेहरा मी गेले ५ वर्ष सहन करत आलेय. आता बास.. तू आणि तझं प्रेम, तुला लखलाभ...
तो: सॉरी माऊ, तुझ्याकडे कोणी बघितलेलं मला सहन होत नाही. त्यामुळे त्यादिवशी माझा संयम सुटला. परत असं नाही करणार... अशी रुसू नकोस ना...
त्याच्याकडे रागाने बघत ती पुन्हा ओरडली...
बास कर हि नाटकं, आजपर्यंत खूप वेळा विरघळले आहे तुझ्या फसव्या गोडं बोलण्याला. पण आज नाही... आपल्यातलं नातं त्या दिवशीच संपलं, ज्या दिवशी तू त्या निष्पाप जीवाला निष्ठुरपणे मारलस. आज त्याला मारलस, चुकून जर तुझ्याशी लग्न झालं तर, एखाद्या दिवशी जीव घेशील माझा. आतापर्यंत किती वेळा तुझा राग व्यक्त करताना मला जखमा दिल्या आहेस.
खरं तर तू विकृत आहेस, तुला उपचारांची गरज आहे. तुला वेड्यांच्या दवाखान्यात पाठवून पिंजयात कैद करायला हवं.
तो: ओह्ह, आज कुणी नवीन भेटलं म्हणून मी विकृत! उद्या अजून एखादा भेटला तर तो आनंद बावळट वाटेल, तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखतो... बघतो ना मला सोडून कशी जातेस ती? आणि लग्न करतेस त्या मुलाशी..
लग्नाच्या मांडवात येऊन तमाशा करीन, आनंदच काय पण रस्त्यावरच भिकारी सुद्धा तुझ्याशी लग्न करणार नाही अशी अवस्था करून ठेवेन...
ती: असं, प्रयत्न करून बघच, आज पर्यंत मी शांत होते ते तुझ्यावरच्या प्रेमासाठी. आता तू काहीही करायचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे.
तो कुत्सितपणे हसला... " तू?? काय करणार आहेस? विसरलीस का, तुझ्याकडे बघणाऱ्या त्या मुलांची मी काय अवस्था केली होती...आणि तुझ्या अंगावरच्या या छोटी-छोट्या जखमा माझ्या उत्कट प्रेमाची साक्ष आहेत."
ती: नाही, अजिबात नाही, ते लक्षात आहे म्हणूच आज हे नातं संपवतेय.
ती मागे वळून पुन्हा चालू लागली. अपमान सहन न होऊन त्याने पळत जाऊन तिला मागून धक्का दिला, पण त्याच्या ओळखून असलेली ती क्षणांत बाजूला झाली. तो मात्र तोल जाऊन त्या दगडी पायऱ्यांवरून खाली गडगडत गेला.
सहा महिन्यांपूर्वी असाच दुखावलेला तिचा पाय आज समाधानाने चालू लागला होता. तो व्हिहळत खाली पडला होता. ती त्याचा बाजूला येऊन उभी राहिली.
"काही आठवला का तुला? सहा महिन्यांपूर्वी, माझाही पाय असाच घसरला होता या पायऱ्यांवरून...तू आधार देताना... "
त्याच्या डोळ्यांत अंगार होते. पण दुखावलेल्या शरीरामुळे हलता ही येत नव्हतं. त्याच्या दुखऱ्या हातावर आपल्या चप्पलची टाच रुतवत ती बोलू लागली ...
ज्याला यार समजून तू मारलस, तो माझा भाऊ होता. आणि तुला ते माहिती होतं पण फक्त मला तुझी भीती रहावी म्हणून तू त्याला मारलस.. त्याची हि शिक्षा..
आणि विसरू नकोस, ५ वर्षांच्या आपल्या नात्यात तू किती खालच्या थराला जाऊ शकतोस हे मी अनुभवलं आहे. त्यामुळे तुझ्या प्रत्येक वार तुझ्यावर उलटवून टाकण्याची कला मी तुझ्याकडूनच शिकले आहे. आता राहिला प्रश्न माझं लग्न, ते तर होणारच ज्याच्याशी ठरलं आहे त्याच्याशीच, पण इथून पुढे तुझं कसं होणार याची काळजी कर...
काकुळतीला येऊन तो म्हणाला, " का करतेयस असं? मी काय कमी केलं तुला? आतापर्यत किती महागड्या गिफ्ट्स मी दिल्यात तुला? माझ्याइतकं प्रेम कोणी करणार नाही तुझ्यावर..आणि तू सुखी राहशील एका अनोळखी माणसासोबत??? प्रेम करतेस ना माझ्यावर, मला सोडून काय मिळवशील?
ती हसत त्याच्या शेजारी येऊन बसली, ज्या क्षणी तुला सोडायचा निर्णय घेतला, त्याक्षणी तुझ्याशी स्पष्ट बोलण्याचं धाडस केलं. तुला सोडून जाताना मी माझ्यातील स्वाभिमान कमावला.. फक्त तुला सोडण्याचा विचार केला तर तुझ्यासारख्या खुनशी माणसाला हात ही न लावता जायबंदी करू शकले, विचार कर तुला सोडल्यावर मी काय-काय करू शकेन...
कधी कधी प्रेमातून मिळणाऱ्या ताकदीपेक्षा प्रेमातून निर्माण झालेल्या तिरस्काराची ताकद जास्त असते....
एक सांगू, तुझ्यातील संशयाच्या राक्षसाला मारून टाक, बघ सगळं स्वच्छ आणि सुंदर होईल... कदाचित त्यानंतर तुला कळेल जिथे प्रेम असतं तिथे संशयाला जागा नसते. प्रेमाला विश्वासच बंधनच पुरेस असतं...
त्याच्या हातावरून पाय उचलून ती निघून गेली. तिनेच बोलावलेल्या ऍम्ब्युलन्स मधून तो हॉस्पिटल मध्ये दाखल झाला होता.
खूप काही गमावल्याची सल मनात होती पण वेळ निघून गेली होती..
ती निघून गेली होती, कायमची...
एका नवीन प्रवासासाठी....

