Sneha Kale

Classics Others

3  

Sneha Kale

Classics Others

रिमझिम गिरे सावन

रिमझिम गिरे सावन

6 mins
231



'रिमझिम गिरे सावन', अस गाणं म्हणत आपण पावसाचे स्वागत करतो..जून महिना सुरू झाला की आपणा सर्वांनाच पावसाचे वेध लागतात..मे महिन्याच्या उन्हाने अंगाची काहिली झालेली असताना पाऊस कधी पडतो याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो..


लहान मोठ्या सर्वांनाच पाऊस अतिप्रिय असतो..पावसाचे गार पाणी अंगावर पडल्यावरचा आनंद काही वेगळाच आहे..शेतकरी पावसाची वाट पाहत असतो..पावसामुळेच तर त्याच्या घरात सुख नांदते..पाऊस पडावा यासाठी काही ठिकाणी नवस ही केले जातात..त्याच्या आगमनाने पीक डोलू लागतात..शेताच आवार फुलत..


पाऊस पडला की निसर्गही प्रफुल्लित होऊन जातो..चारी दिशांना हिरवीगार सृष्टी पाहायला मिळते..ते पाहून मनही आनंदी होते..चार महिने आलेला हा पाहुणा धरतीला धनधान्य, भाजीपाला, फळे आणि फुले देऊन समृद्ध करतो..नद्या , नाले, तलाव तुडुंब भरून वाहतात..उन्हाळ्यातील उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याची वाफ होते ..त्यामुळे पाण्याची कमतरता भासू लागत...पावसामुळे तापमान कमी होते,गारवा वाढतो, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते आणि आपल्याला मुबलक पाणी उपलब्ध होते..


लहान मुलांची मे महिन्याची सुट्टी संपलेली असते. रेनकोट, छत्री, गमबुट घालून जाणारी आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उडया मारत, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत जाणारी मुले रस्तोरस्ती दिसू लागतात.. काही मुलं कागदाच्या होड्या बनवून वाहत्या पाण्यात सोडतात..कधी कधी जास्त पाऊस पडला तर मुलांना शाळेला सुट्टी मिळते..कदाचित म्हणूनच हा ऋतू मुलांचा आवडता ऋतू असावा..पावसाळ्यात काही ठिकाणी सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते..रानात मोर आनंदाने नाचू लागतात..बेडकांचे डराव डराव ऐकू येते..


मला देखील पाऊस खूप आवडतो..अगदी लहानपणापासून..पावसाचे थेंब मातीत पडल्यावर येणाऱ्या सुगंधाला तोड नाही.. पावसाच्या दिवसांत आभाळ भरून येत, अंधारून येत..ढगांचा गडगडाट होतो..गार वारा सुटतो..हे अस वातावरण झालं की आई लगेच खिडकीतले वाळत घातलेले कपडे काढून घ्यायला सांगायची..त्याच बरोबर मेणबत्ती शोधून ठेवायची. आम्ही राहायचो तेथे काही भागात पावसाळ्यात लाईट जात असे..


पावसाचं हे मवाळ रूप सगळ्यांना आवडत, हवंहवंसं वाटत..पण कधी कधी पाऊस रौद्र रूप धारण करतो..तेव्हा वाटते आता बस झालं..जिथे तो यावा यासाठी नवस केले गेले तेच हात पाऊस थांबवा म्हणून देवाकडे प्रार्थना करू लागतात..कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाली की त्याचा तिटकारा वाटू लागतो..पावसाचे ही तसच आहे..तो जस जीवनदायी आहे तस तो जीव घेणाराही आहे..त्याच्या आगमनाने जर पीक डोलू लागतात तर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसानही होते..कित्येक प्राणी पाण्यात वाहून जातात..घराच्या भिंती कोसळतात..त्यामुळे जीवितहानी होते..अतिवृष्टीमुळे रस्ते खचले जातात..खड्डे पडल्यामुळे पाणी साचून छोटी छोटी डबकी बनतात.. काही वेळा हे खड्डे इतके मोठे असतात की त्यात वाहन अडकून पडतात आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होते..कितीतरी माणसं या अश्या खड्यांमध्ये पडून जीवाला मुकलेली आहेत..


मी तिसऱ्या किंवा चौथ्या इयत्तेत असेन तेव्हा घडलेल्या प्रसंगाने मला पावसाबद्दल वाटणारा ओढा कमी झाला.. त्या दिवशी मी, माझी आई आणि माझा लहान भाऊ घरी एकटे होतो..सकाळपासून खूप जोराचा पाऊस सुरू होता..एका क्षणासाठी देखील थांबला नाही..संध्याकाळ झाली तरी पाऊस सुरूच होता..हळूहळू पाऊस इतका पडू लागला की आमच्या घरात कानाकोपऱ्यातून पाणी झिरपू लागलं..सर्व घरात पाणी भरू लागलं..आईने कपाटातले सर्व महत्वाची कागदपत्रे खराब होऊ नयेत म्हणून वरच्या कप्प्यात सांभाळून ठेवली..थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि पाणी ओसरू लागलं..मग मी आणि आईने घर साफ केलं..एव्हाना 7.30 - 8 वाजले...आईने ऑम्लेट पाव दिल आणि आम्ही जेवून घेतलं..8.30 च्या दरम्यान पुन्हा पाऊस सुरू झाला..पुन्हा पाणी घरात भरू लागलं..त्यात लाईट पण गेली..आम्ही तिघे खूप घाबरलो होतो..घरात पाणी वाढू लागल..आम्हाला काहीच सुचत नव्हतं..बाहेर जावं तर सगळीकडे पाणीच पाणी..मग पहिल्या मजल्यावरील एका कुटुंबाने आम्हा तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी थांबण्यास सांगितले..कसबस आम्ही तिघे बाहेर आलो आणि पहिल्या मजल्यावर गेलो..रात्रभर आम्ही तिथेच होतो..पहाटे चारच्या दरम्यान आम्ही घरी गेलो..घराची अवस्था खूप वाईट झाली होती..सगळीकडे चिखल झाला होता..पाणी ओसरून गेलं होतं..तेलाचा डबा आडवा होऊन सर्व तेल घरात सांडलं होतं..आई आणि मी मिळून घर साफ केलं.

आज इतक्या वर्षांनंतर ही हा प्रसंग अगदी काल घडल्यासारखा वाटतो..त्या दिवसापासून पाऊस म्हटलं की धडकी भरते..


मी 5-6 व्या इयत्तेत असेन.. तेव्हा आम्ही प्रतिक्षा नगर, सायन येथे चाळीत राहत होतो.एकदा असाच खूप पाऊस पडला होता ..त्यावेळी सुध्दा आमच्या घरात पाणी शिरलं होत..सगळं घर खराब झालं होतं..आमच्या घराच्या वर एक झाड होते..कौलारू घर असल्याने दर पावसाळ्यात एक विशिष्ट प्रकारचा किडा झाडावरून आमच्या घरात पडायचा..आठवलं तरी किळस वाटते..


2 जुलै 2014 रोजी माझ्या नवऱ्याच्या आत्याच्या मुलाचं लग्न होत ( त्यावेळी आमचा साखरपुडा झाला होता).हे लग्न ऐरोलीला होत..आम्ही म्हणजे मी, माझे आई आणि पप्पा दादरहून लग्नाला जाण्यासाठी निघणार होतो..त्या दिवशी सकाळपासूनच पाऊस सुरू होता..पावसाचा जोर थोडा कमी झाल्यावर निघू असा विचार केला पण पाऊस काही कमी होण्याचं नाव घेईना..शेवटी लग्नाला पोहोचायला उशीर होईल म्हणून आम्ही निघालो.. ट्रेन पकडली..मुंबईत थोडा जरी पाऊस पडला तरी ट्रेनचे ट्रक पाण्याने भरून जातात आणि मग ट्रेन हळू चालते किंवा अडकून पडते..आमची ट्रेन सुद्धा अशीच अडकून पडली..जवळजवळ 2 तास आम्ही ट्रेन मध्ये होतो आमची ट्रेन दोन स्टेशनच्या मध्ये अडकली होती.. आम्हाला लग्नासाठी बराच उशीर झाला होता..मग आम्ही ठरवलं आता ट्रेनमधून उतरून जाण्याशिवाय पर्याय नाही.ट्रेनच्या डब्याच्या साईडला खाली उतरण्यासाठी ज्या पायऱ्या असतात तिथून आम्ही खाली उतरलो..ट्रेन ट्रॅक मधून चालत गेलो आणि माटुंगा स्टेशनच्या बाहेर पोहोचलो ..तिथून रिक्षा पकडून ऐरोलीला गेलो..हा प्रवास आमच्या कायमचा लक्षात राहिला..


माझ्या माहेरी आमच्या सोसायटीत गणपतीची स्थापना केली जाते...7-8 वर्षांपूर्वी विसर्जनाच्या दिवशी आम्ही बाप्पाला घेऊन निघालो आणि वाटेत खूप जोराचा पाऊस सुरू झाला..बाप्पावर आम्ही प्लॅस्टिक धरलं होत तरी बाप्पाच्या मूर्तीवर पाणी पडत होतं.. ते बघून मी खूप घाबरले कारण मूर्ती मातीची होती.मूर्तीचा कलर निघू लागला होता...मी रडत रडत बाप्पाला मिठी मारली होती..तो क्षण आठवला की अजूनही डोळ्यात पाणी येत..


एकदा मी काही कामासाठी बाहेर गेले होते..काम संपवून घरी यायला निघाले..मी माझ्या टू व्हीलरवर होते..अर्ध्या रस्त्यात आले आणि खूप जोराचा पाऊस सुरू झाला..पाऊस इतका होता की समोरच काही दिसत नव्हतं..मी पूर्णपणे भिजले होते..डोळ्यांवर पावसाच्या पाण्याचा मारा इतका जोरात होत होता जणू काही कोणी तोंडावर दगड मारत आहेत..त्याच स्थितीत गाडी चालवत घरी आले..


दर वर्षी मुंबईत प्रचंड पाऊस पडतो.तो काही मुंबईकरांना नवीन नाही..परंतु सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस मुंबईने 26 जुलै 2005 रोजी अनुभवला होता. यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, तर 14 हजार घरं उद्ध्वस्त झाली होती. 24 तासात एवढ्या मोठया प्रमाणात पाऊस पडला होता , जो गेल्या 100 वर्षातला सर्वाधिक पाऊस होता. हजार रिक्षा, टॅक्सी आणि बेस्ट बसेसचं नुकसान झालं होतं, तर कित्येक मोठी वाहनं पाण्यात अडकली होती..लोकल रेल्वे ठप्प झाली होती, तसेच अनेक ट्रेनचं नुकसान झालं होत..शेकडो लोकांचा मदतीअभावी जीव गेला होता. पाण्यात अडकलेल्या लोकांना 24 तासांपेक्षा जास्त काळ घरी जाता आलं नव्हतं.


29 सप्टेंबर 2017 रोजी घडलेली एक घटना मुंबईकरांच्या कायम लक्षात राहील..सकाळी १०.३० च्या सुमारास प्रभादेवी आणि परळ स्टेशनमध्ये एकाच वेळी चार ट्रेन गाड्या आल्या.

 प्रभादेवी आणि परळ या स्टेशनला जोडणाऱ्या अरुंद पादचारी पुलावर अनेक लोक एकाच वेळी चढले. यावेळी पाऊस पडत होता. पूल पडत आहे अशी अफवा पसरल्यामुळे लोकांनी खूप गर्दी करत पळापळ सुरू केली.. बराच वेळ पडत असलेला पाऊस आणि अचानक वाढलेली गर्दी यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि 23 लोकांचा हकनाक बळी गेला, काही लोक जखमी झाले..रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतेक लोकांचे मृत्यू गुदमरुन आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे झाला.


मी लग्न होऊन पुण्यात आले आणि पुण्यातला पाऊस पाहिला तेव्हा मला खूप हसू आलं होतं कारण लहानपणापासून धो धो कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा अनुभव घेतलेल्या मला पुण्यातला पाऊस हा लग्नात अंगावर अत्तर शिंपडल्यावर जसे वाटते तसा वाटला होता..पण माझं मत 2019 मध्ये पडलेल्या पावसाने खोटं ठरवलं..गेल्या 6 वर्षांत मी पुण्यात असा पाऊस पाहिला नव्हता..सप्टेंबरमध्ये पडलेल्या या पावसाची नोंद नक्कीच विक्रमी पाऊस म्हणून झाली असावी..हा पाऊस इतका प्रचंड प्रमाणात पडला होता की ज्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती..10 वर्षांतील हा सर्वात जास्त पाऊस होता..या काळात 21 जण मृत्युमुखी तर 5 जण हरवले गेल्याची नोंद करण्यात आली..बरीच वाहन पाण्यात वाहून गेली.. खूप नुकसान झालं..


पावसाचं रूप कसंही असो, आपल्या सर्वांनाच तो हवाच असतो..कारण त्यावर आपलं जीवन निर्भर आहे..त्यामुळे पाण्याची कमतरता भासू नये आणि धनधान्य भरपूर यावं म्हणून दरवर्षी पाऊस मुबलक प्रमाणात पडावा, अशी देवाजवळ प्रार्थना..


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics