vishwanath shirdhonkar

Inspirational

0  

vishwanath shirdhonkar

Inspirational

रडायचं नाही !!!

रडायचं नाही !!!

19 mins
2.8K


- तिची आई दोन वर्षांपूर्वीच वारली होती. आता बाबाही अचानक हार्ट अटेकने वारले . तेरावा आणि गंगापूजन आटोपले . सर्व पाहुणे पण आपापल्या गावी परतले . ती देखील आता परतायच्या तयारीत होती . आवराआवर झाल्यावर ती आपल्या भावाला म्हणाली , " रोहन , मलाही आता निघायला हवं . पोरांच्या परीक्षा , तुझ्या जीजुंचे ऑफिस . आता मला जास्त थांबता येणार नाही . तू देखील आता एक दोन दिवस इथं थांबून इथलं सर्व आवरून घे म्हणजे पुन्हा पुन्हा इथं येण्याची गरज राहणार नाही . विशेष म्हणजे बाबांचे सर्व कागद पत्र नीट बघून घे . "

- " होय ताई . " रोहन म्हणाला , " बाबांच्या दोन ब्रीफकेस आहेत . त्या ब्रीफकेस आताच आपण दोघे बघून घेतो . म्हणजे तुलाही सगळं समजेल . जे काही आहे ते इथंच निर्णय घेता येतील . "

-" चालेल . " ती म्हणाली , " पण तुझ्या बायकोलाही बोलावून घे , म्हणजे तिलादेखील सगळं कळायला हवं . "

- होय . " म्हणत रोहनने त्याच्या बायकोला आवाज देऊन बोलावून घेतले . नंतर त्याने दोन्ही ब्रीफकेस आणल्या .त्यात बरीच कागदपत्रे होती . त्यात एक जुनी डायरी देखील सापडली .

-" ताई , ही बघ यात एक जुनी डायरी आहे . "

-तिला आठवलं , आई सांगायची बाबांना बऱ्याच वर्षांपूर्वी डायरी लिहिण्याची सवय होती . पोरांच्या जन्मानंतर आणि सतत फिरतीची नोकरी असल्यामुळे त्यांचा हा छंद पुढे बंद पडला . तिनं डायरी खोलून बघितली . काही पानांनंतरच तिच्या आई-बाबांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला बाबांनी लिहिलेली पानं होती . प्रत्येक पानावर तारीख, वार आणि वेळ लिहिलेली . बरीच पानं होती एकाच तारखेची . तिला वाटलं कदाचित त्या दिवशी बाबांनी रात्रभर डायरी लिहिली असावी . त्यात तेव्हाचे वर्णन देखील होते . डायरी कसली एक कथाच वाटतं होती . तिनं वाचायला सुरुवात केली .

- 'आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस . मला रजां मिळू शकली नाही . तू तिथं इतक्या लांब बाळंतपणासाठी माहेरी गेलेली .मी इथं एकटा . आज तुझी खूप आठवण येत आहे . मागच्या वर्षी आजच्याच दिवशी आपलं लग्न झालं होतं . तुला तर सगळं आठवतच असेल ? आणि मला देखील आपल्या लग्नाचा एक-एक क्षण सुरवातीपासून चांगलाच आठवत आहे .

-आपल्या लग्नाची वेळसुद्धा मला आठवत आहे . निघण्याची देखील वेळ चांगलीच आठवते . झाल झाल्यानंतर माझ्या उपरण्याची गाठ तुझ्या शालूशी बांधण्यात आली होती . रात्रीचे 12 वाजून गेले होते . वऱ्हाडी आणि घरचे सर्व थकलेले वाटत होते . सर्वांच्या डोळ्यात झोप जाणवत होती .अजून गौरी-गणपतीची पूजा व्हायची होती . मला चांगलंच आठवतंय माझे बाबा व काका खूप घाई करीत होते आणि तू हळूहळू पुढे सरकत होती . जिथं देवदेवक बसले होते त्या तिथं जाण्यासाठी तू पुढे-पुढे चालत होती आणि मी एखाद्या मुक्यासारखा चुपचाप तुझ्या मागे होतो .माझ्या ओळखीच काहीच नव्हतं . पण तुझे सर्व ओळखीचे होते . तुझ्या बहिणी , मैत्रिणी , तुला घेरून होत्या . तुझ्यासोबत त्यादेखील हळूहळू उदास पाऊले टाकत होत्या . कदाचित त्यांना तुझ्या वियोगाची कल्पना तीव्रतेने भासत असावी . त्या सर्व फार हळव्या झाल्या होत्या . काहींच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ पाहत होते . मला सारखं असं वाटतं होतं की त्या सगळ्या कोणत्याही क्षणी जोराने रडणार आहे . त्याच कशाला कोणत्याही क्षणी तुझ्याही रडण्यासाठी आणि तुला रडताना बघण्यासाठी मी स्वत:ची मानसिक तयारी केलेली होती . खरं सांगू मी तर त्या क्षणाची वाटच बघत होतो . तुम्ही सर्व केव्हा रडणार याची कल्पना तर होतीच पण उत्सुकता देखील होती . तुझ्या बहिणींच्या व मैत्रिणींच्या गालावरून अश्रुंचे थेंब हळूहळू खाली येऊ पाहत होते . मी सज्ज होतो . तुझ्या रडताच तुझ्या खांद्यावर मला हात ठेऊन तुला धीर द्यायचा होता . सर्व समोर होते , पण खरं सांगू तू रडल्यावर मला तुझे डोळेसुद्धा पुसायचे होते . तुझा पहिला स्पर्श तो ही डोळ्यांचा आणि गालांचा. सर्व किती रोमांचक होते. ही कल्पना शहारा आणण्यासाठी पुरेशी होती . पण तसं काहीच झालेलं नव्हतं . तुझ्या डोळ्यात नव्या नवरीला पहिल्यांदा सासरी जाताना वाहणाऱ्या गंगा-यमुना नव्हत्याच. तुझा तो शांत गंभीर चेहरा. मला तर त्याचंच फार नवल वाटतं होतं .

-आपण दोघं गौरी-गणपती समोर बसलो होतो . तुझी आई तुझ्याकडून पूजा करवीत होती . ती देखील तुझ्या जाण्याच्या कल्पनेने फार हळवी झालेली होती . पूजा आटोपली . तुझ्यासकट मी ही देवांना नमस्कार केला . आपल्याकडून नमस्कारासाठी आता इतर सर्व मोठी मंडळी सज्ज झाली होती . ते वातावरण फारच गंभीर होतं . मला सारखं वाटत होतं की त्या क्षणांचा मी एखादा खलनायक असावा . कारण सर्व तुझ्याचसाठी हळवे होते आणि सर्वांचे लक्ष तुझ्याकडेच होते . तू त्या क्षणांची एखादी महानायिका दिसत होती . तुझ्या आईला आपण दोघांनी वाकून नमस्कार केला .मला तेव्हा असं वाटलं होतं की तो क्षण आता आला . तू तुझ्या आईला घट्ट मिठी मारशील आणि भडभडून रडशील . मी त्यासाठी स्वत:च्या मनाला ही तयार केलं होतं . आता  तुझ्या आईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या . रडता रडता तिनं तुला आपल्या कवेत घेतलं होतं . तुझ्या , तिच्या पासून दूर जाणाच्या वेदनेनं ती व्याकूळ होत होती . तुझ्या आईला रडताना बघून तिथं सर्वांचेच डोळे पाणावले होते.  अगं , मी पण माणूसच . माझेही डोळे तेव्हा पाणावले होतेच . फक्त मी तसं दाखवू शकत नव्हतो . तुझी आई हुंदके देत बोलत होती . तू तिचे डोळे पुसत होती . पण तू मुळीच रडायला तयार नव्हती . तुझ्या न रडण्याचे मला आश्चर्य वाटत होते . खरं तर लग्नानंतर आईवडिलांना सोडून सासरी जाताना सर्वच मुलींच्या भावना अनावर होत असतात आणि त्या खूप रडतात . अनेक वेळा मी असे बघितले देखील होते . तो प्रसंगच असा असतो . रडू तर येतंच . मग तू का रडतं नव्हती याचे मला कारण समजत नव्हते . याचं मला विचित्रही वाटत होतं .

-घरातल्या सगळ्या मोठ्या बायकांना आपण दोघांनी वाकून नमस्कार केला . सर्वांचे डोळे भरून आले होते . तू मात्र मुळीच विचलित न होता सर्वांचा निरोप घेत होती . सर्व पुरुष मंडळी बाहेर अंगणात होते . हळूहळू आपण दोघे बाहेर येत होतो . दाराजवळ आलो तेव्हा तुझी आई डोळ्यातले अश्रू पुसत कातर स्वरात मला म्हणाली होती , " जावईबापू , हिची काळजी घ्या . हिला त्रास होऊ देऊ नका . फार लाडाने वाढविली आहे आम्ही हिला . तळहाताच्या फोडासारखी जपली आहे . आता सर्व तुमच्याच हातात आहे . " तुझ्या आईच्या डोळ्यातून अश्रू येण्याचे थांबत नव्हते . मी काहीच बोललो नव्हतो . नुसती मान हलवून तुझा सांभाळ नीट करेन असे त्यांना आश्वासन दिले होते . त्याक्षणी मी तुझ्याकडे बघितले तेव्हा तू बिलकुल सहज होती . तुझ्या चेहऱ्यावर कोणताही ताण दिसत नव्हता . सर्वाना रडत सोडून तू बाहेर येत होती . तुझ्या मागोमाग मी . तुला हे असे निर्धास्तपणे बाहेर निघताना बघून सर्वाना कदाचित असा भास होत असावा जणू तू नवरा आणि मी बायको असून तूच मला माहेरहून सासरी नेत होती की काय . कमीत कमी मला तरी असाच भास होत होता . 

-बाहेर अंगणात तुझे बाबा होते . बाबा दाखवत नव्हते तरी त्यांच्याकडे बघून मला असं जाणवत होतं की तेही कुठेतरी आतून रडत असणार . आपण दोघांनी बाबांसकट सर्व मोठ्या मंडळींना वाकून नमस्कार केला होता.सगळ्यांचे डोळे पाणावले होते . प्रसंगच असा होता . तू मात्र स्थिरच होती.आणि माझं चित्त मात्र अस्थिर होत होतं . आता आपल्या निघण्याची वेळ आलेली होती , पण तू अजूनही रडली नव्हती . आईनं मला सांगितलं होतं की लग्नानंतर निरोप घेताना मुली हळव्या होतात , रडतात , म्हणून नवऱ्यानेच तिला सावरायला हवं . आईच कशाला , मला तेव्हा मला,' बम्बई का बाबू ' या हिंदी चित्रपटातलं एक गाणं देखील आठवलं होतं , ' चल री सजनी अब क्या सोचे-कजरा ना बह जाए रोते रोते.' पण तुला सावरण्याची मला संधीच तू मिळू दिली नव्हती . तुझ्या गालांची लाली तशीच सुर्ख होती . डोळ्यातलं काजळ तसचं होतं .असं वाटतं होतं डोळ्यातून एकही अश्रू बाहेर पडू न देण्याची जणू शपथ घेऊनच तू माझ्या गळ्यात माळ टाकली होती की काय ? तुझ्या आई-बाबांकडे बघून असं वाटत होतं की तेही जणू तुझ्याकडून मोकळेपणाने रडण्याची अपेक्षा करत होते . आणि त्यांच्या अपेक्षा भंग झाल्याने त्यांना जास्तच रडू येत असणार . सर्व वातावरण जास्तच भारावलेले होते म्हणून , माझे बाबा व काका लवकर तेथून निघण्याची घाई करीत होते . आपण दोघे टेक्सीत येऊन बसलो . शेवटी एकदाची वरात परतीसाठी रवाना झाली ती रेल्वे स्टेशनवरच येऊन थांबली .  

 -आपण सगळे गाडीत बसलो . ट्रेनमध्ये बसे पावेतो तुझ्या डोळ्यात मुळीच अश्रू नव्हते . माहेरचा उंबरठा शेवटचा सोडताना नवीन नवरी रडत-रडतंच बाहेर पडते . असं मी स्वत: अनेक लग्नांमध्ये बघितलेलं होतं .तुझ्या बाबतीत असं काहीच झालेलं नव्हतं . तेव्हा माझ्या मनात सारखे विचार येत होते की तू भावना शून्य तर नाही ? तुला का रडू येऊ नये , यासाठी मनात निर्मित झालेल्या अनेक प्रश्नांनी मला विचलित केलेले होते . माझ्यासाठी माझ्याच बायकोचा मिळालेला हा पहिलाच विचित्र अनुभव . एक मात्र नक्की हा अनुभव माझ्या कल्पनेप्रमाणे नव्हताच .

-गाडी सुरु झाली . तू माझ्या जवळच बसली होती . प्रत्येकाची नजर तुझ्यावरच रोखून होती . आणि तू , अप्रतिम लावण्यवती अशी नवीन नवरी संकोचाने बसलेली . भरजरी शालु घातलेली . दागिन्यांनी नटलेली . गजर्याने सजलेली . गाडीचा वेग वाढत होता तसा तुझ्या गजर्यातल्या मोगऱ्याच्या फुलांचा सुवास दरवळत होता . माझ्या मनातली उत्तेजना गाडीच्या वाढत्या वेगाबरोबर दुप्पटीने वाढत होती . तुझा मनातल्या वेगाचा मी थारा घेण्याचा प्रयत्न करत होतो . पण तुझ्या चेहऱ्यावरून त्याचा काही उलगडा होत नव्हता . तुझा चेहरा बिलकुल शांत , स्थिर होता . असं कसं होऊ शकतं ? माहेर सोडण्याचे दु:ख नाही की सासरी जाण्याची उत्सुकता किंवा आशंका नाही . चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते . यामुळे माझ्या मनात देखील अनेक प्रकारच्या शंका येत होत्या . मी गोंधळलेला होतो . खरोखरच तुझी आपल्या लग्नाला समंती होती का ?   

 -खरं तर लग्ना अगोदर आपलं असं फारसं बोलणच झालेलं नव्हतं . अगदी पहिल्या भेटीत सुद्धा आपल्याला सर्व घेरुनच होते . आणि तेव्हा फोन नव्हता की कोणत्याही सोयी देखील नव्हत्या संपर्काच्या .  तुला आठवतंय लग्न ठरण्याच्या अगोदर ,पहिल्यांदा आपण सिनेमा बघायला गेलो होतो तेव्हा तुझी आई आपल्याला टाकीज पावेतो सोडायला आली होती . खरं तर सिनेमा हा एक बहाणा होता . मला तुझ्याशी खूप बोलयाचे होते म्हणूच सिनेमाचे मी ठरविले होते . तुझ्या आईने मला बजावले होते की लग्न ठरेस्तोवर सिनेमा पाहण्याचे कोणालाही कळू द्यायचे नाही . तुझ्या आईच्या मनात कदाचित एखाद्या दुसऱ्या स्थळाचा देखील विचार असावा , म्हणून हे अर्धवट स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आले होते . सिनेमा संपताच तुझी आई लगेच तुला टाकीजवर घ्यायला आली होती .म्हणून  नंतर सुद्धा आपले एकांतात बोलणे असे झालेच नाही . सिनेमाचे विचारशील तर बालकनीमध्ये आपण जवळ जवळ बसलो जरूर होतो आणि मी तुला थट्टेने विचारले देखील होते , ' तुला माझ्याजवळ बसावे लागेल . चालेल ? '

-' पर्याय नाही . ' तू फक्त येव्हढे दोनच शब्द बोलली होती . तुझं ते उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं . म्हणजे तेव्हा पर्याय असता तर तू माझ्यापासून दहा हात लांब बसली असती . कदाचित तो तुझा विनोद असावा म्हणून तेव्हा मी काहीच बोललो नाही . तू तुझा आवडता सिनेमा पाहण्यात रमली आणि मी तुझ्यासोबत असून देखील फक्त तुझ्याच विचारांमध्ये रमलो होतो . आणि सिनेमा सुटल्यावर नंतर आपल्यामध्ये बोलण झालचं नाही कारण सिनेमा सुटल्यावर बाहेर निघताच तुझी आई तुला घ्यायला आली होती आणि तू आपल्या आईबरोबर निघून गेली .

- आमच्या घर मालकांकडे एकदाच मी तुला बघितले होते . तुझ्या सुंदरतेवर मी तेव्हाच भाळलो होतो . पण तेव्हा तसा आपल्या लग्नाचा कोणताही प्रस्ताव देखील नव्हता . पण जेव्हा काही दिवसांनी मला माझ्या घर मालकांनी लग्नासाठी विचारले होते तेव्हा मी त्यांना तुझ्याच बद्दल विचारले होते . आणि तुझ्यासाठी मी माझ्याकडून तेव्हाच त्यांना होकार देखील दिला होता . पण आपल्यामध्ये प्रेम असं प्रस्फुटीत झालेलं नव्हतं . ते होण्यासाठी सातत्याने भेटी होणे गरजेचे असते . दोघांचे कल्पनेत रमणे गरजेचे असते . संवाद गरजेचे असतात . एक दुसऱ्यांच्या डोळ्यात एक दुसऱ्यांसाठी स्वप्न रंगविणे गरजेचे असते . तेव्हा कुठे प्रेमात आकर्षण , ओढा आणि ओलावा निर्माण होतो . एक दुसऱ्याची कमतरता भासते . एक दुसऱ्याचा साथ हवाहवा सा वाटतो . तेव्हा कुठं आपण प्रेमात आहो असं वाटतं . पण आपल्यामध्ये असं काहीच घडलेलं नव्हतं . इथं मी अगोदरच होकार देऊन बसलो होतो . त्या मुळे दोन्ही कडचे लोकं आपलं लग्न ठरवून मोकळे झाले . माझ्या बाबांना मला सांगायची हिमंतच झाली नव्हती की लग्ना अगोदर एकदा मला तुझ्याशी सविस्तर मोकळेपणानने गोष्टी करायच्या आहे . मला तुझ्या स्वभावाबद्दल , तुझ्या आवडी-निवडीबद्दल माहिती घ्यायची होती . पण तसं काहीच होऊ शकलं नव्हत . म्हणून तुझ्या स्वभावाची मला जाणीव होऊ शकली नव्हती . आणि लग्नानंतर तुझं असं शांत राहणं त्यावेळी मला उदिग्न करण्यासाठी पुरेसं होतं . राहून-राहून मनात एकाच गोष्टीची खंत होती की लग्नाअगोदर एक दुसऱ्याला नीट ओळखणे राहिलेच . एकूण काय लग्नापर्यंत आपला फारसा संपर्क नव्हता आणि लग्नात सर्व तुला सतत घेरून होतेच .

 -पण जेव्हा लग्नानंतर परतताना ट्रेनच्या त्या डब्यात आपण जवळ-जवळ बसलो होतो , तेव्हा मला तुझ्याशी खूप बोलावसं वाटतं होतं . कारण त्या वेळेपर्यंत तुम्झ्या तोंडून मी फक्त दोनच शब्द ऐकले होते . ते म्हणजे सिनेमा पाहताना टाकीजमध्ये बोललेले तुझे दोनच शब्द , ' पर्याय नाही .' त्या दिवसानंतर ट्रेनच्या डब्यात आपण असे चुपचाप अनोळखी प्रवाश्यांप्रमाणे जवळ-जवळ बसलो होतो . तुझ्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते . कदाचित तुला तेव्हा सर्वांचा संकोच होत असावा , कारण डब्यात बर्थवर आई-बाबा काका-काकुंसकट आम्ही सगळेच होतो .मला जाणून घ्यायचं होतं की तेव्हा तुझ्या मनात नेमकं काय चाललं होतं . पण ते कळायला काहीच मार्ग नव्हता . तुझ्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नसल्याने माझ्या मनात अनेक शंका येत  होत्या . ' तुझा लग्नाला होकार तरी होता का ?  असं सारखं तुला विचारावस वाटतं होतं . तेव्हड्यात आईने तुला विचारलेही होते , ' सुनबाई , बाळा झोपायचं आहे का थोडं ? वरच्या बर्थवर जाऊन झोपून घे थोडयावेळ  ' आणि तू एकदाही माझ्याकडे न बघता लगेच वरच्या बर्थवर जाऊन झोपून गेली होती . मन्या आईला म्हणाला देखील होता , ' ए काय गं आई , वाहिनीला झोपायला सांगते ? '

-' अरे , झोपू दे तिला . लग्नाची गडबड . तिची झोप झाली नसणार . ' आई म्हणाली होती .

-मला आईचा राग येत होता . मी सारखा हाच विचार करत होतो की तू खरोखरच झोपली असशील का ? तुला झोप लागली असेल का ? मला तुझ्यावरही राग येत होता . माझ्याकडे एकदाही न बघता तू अशी कशी वरच्या बर्थ वर जाऊन झोपू शकली ? मला तुझ्याबरोबर गप्पा मारायच्या होत्या . आपल्या लग्नाचा पहिलाच दिवस होता . तुझ्याजवळ अगदी खेटून बसायचं होतं . एक दुसऱ्याची ओळख गप्पांमधून व्हायला हवी होती , एक दुसऱ्यांच्या आवडी-निवडी कळायला हव्या होत्या . मला तुला हे विचारायचे होते की आपल्या लग्नाने तू आनंदी आहेस की नाही ? तसा म्हणा त्या प्रशानाला उशीरच झालेला होता . मग विचार केला , जाऊ द्या तुला झोपू द्यावे . प्रश्न काय आयुष्यभर पडतात आणि संपूर्ण आयुष्यच प्रश्नांचे उत्तर शोधत निघून जातं .

-दुसऱ्या दिवशी घरात श्री सत्यनारायणाची पूजा होती . पाहुण्यांची आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची गजबज होती . या धावपळीत देखील सगळ्यांचे लक्ष तुझ्याकडेच होते . माझ्याशी कोणी बोलतच नव्हते . तुझीच थट्टा , तुझेच कौतुक , तुझीच मर्जी सांभाळत सर्वाना धन्यता वाटत होती . तू मात्र फारशी कोणाशी बोलत नव्हती . तू होय किंवा नाही सांगायची . ते ही न बोलता , फक्त मान हलवून आणि स्मित हास्य करून उत्तर द्यायची . यावर सर्वाना आश्चर्य वाटत होते . घरात जागा कमी आणि पाहुणे जास्त . आपल्याला एकांत मिळण्याचा प्रश्नच नव्हता . मला असं झालं होतं की केव्हा एकदा आपली भेट होते , केव्हा आपण बोलतो आणि केव्हा मी आपलं मन तुझ्या समोर मोकळं करतो . पण त्या दिवशी रात्रीपर्यंत पाहुणे जाता जाता , प्रत्येकाला स्टेशनवर निरोप देण्यासाठी माझी सतत ये जा सुरूच होती . मला झोपायला रात्रीचे दोन वाजले . छोट्याशा दोन खोल्यांच्या घरात ज्याला जिथं जागा मिळाली तो तिथेच झोपलेला होता . तू एका कोपऱ्यात काकूंजवळ केव्हा झोपली ते मला कळलेच नव्हते . 

-तिसऱ्या दिवशी मात्र आपल्याला फिरायला निघायचे होते . आपल्याला खराखुरा एकांत मिळणार होता . मी आनंदी-उल्हासित होतो . त्या क्षणांची वाट बघत होतो .तुझी सोबत आणि तुझ्याशी बोलणे होईल या कल्पनेने मी खूप उत्साहित होतो . प्रवासासाठी मी माझी तयारी अगोदरच करून ठेवलेली होती .

-सकाळी जेवताना आई तुला म्हणाली होती , ' सुनबाई , तुमची संध्याकाळची गाडी . सर्व तयारी करून घ्या . '

-तू त्या वेळीसुद्धा नुसती मान हलवून आपला होकर दिला होता . तुझ्या नुसत्या मान हलविण्याने तेव्हा सर्व जोरात हसले होते .

-' आई , माझी तयारी राहिली आहे . ' मी थट्टेने म्हणालो होतो .

-' आता आली ना बायको ? ' आई म्हणाली होती .

-' पण ती बोलते कुठे ? एक शब्दही तिच्या तोंडून कोणी ऐकला आहे का ? ज्याने कोणी ऐकला असेल त्याला माझ्याकडून पन्नास रुपये बक्षीस .' मी हसत म्हणालो होतो .

-' बोलेल ... बोलेल . ' आई म्हणाली होती , ' आयुष्य पडलंय बोलायला . आणि आयुष्यभर तुला आता ऐकायचंच आहे . बायकोला बोलतं करण्यासाठी दुसऱ्याला बक्षीस देण्याची गरज नाही . '

-संध्याकाळी निघण्याची वेळ आली . आपण दोघांनी आई-बाबांना वाकून नमस्कार केला . आठवतंय , बाबांनी आपल्या दोघांच्या हातात 500 - 500 रुपये ठेवले होते . आई म्हणाली होती , ' सांभाळून जा . '

-मी तोंडाने ' होय ' म्हणालो . पण तेव्हादेखील नुसती मानच हलवून तू होकार दिला होता . टांग्यात मागे तू माझ्याजवळ अगदी चिकटून बसली होती . तू आपल्या विचारत मग्न होती . माझ्यासाठी तुझ्या सोबतीचा हा पहिलाच अनुभव होता . तो मला जाणवतही होता . तुझ्या शरीराची गंध मोहक व दरवळणारी होती . मला बेचैन करत होती . मन्या पुढे बसला होता म्हणून मला काही जास्त बोलता येत नव्हतं . पण मनापासून मला तुला हे विचारायचे होते की , तू हे इतकं मोहित करणारे लावण्य कसे काय मिळविले ? इतकी मोहक दरवळणारी गंध कुठून आणलीस ? जितकी रूपवती तू आहेस तितकाच तुझा स्वभाव देखील चांगला असायला हवा ? मी तुला खरोखरच आवडतो का ? तू आपल्या लग्नाला स्वत:हून स्वखुशीने होकार दिला आहे का एखाद्या दडपणाखाली होकार दिला आहे ? थोडक्यात बरेच काही एकाच क्षणात विचारायचे होते , बरेच काही सांगायचे होते . पण मन्या बसला होता न पुढे . नाही म्हटलं तरी बायका जास्तच बोलतात , मग तू अशी गप्प गप्प का होती ? मनात विचार तर येतच होते . आणि त्यांचा वेग टांग्याच्या घोड्यांपेक्षाही जास्त वेगवान होता . तुला माझ्या कल्पनांच्या उंच आकाशात मला न्यायचे होते . आणि आपल्या आयुष्याच्या तू रंगविलेल्या स्वप्नांबद्दल तुला विचारायचे होते . पण अकरावीत शिकणारा गाढव मन्या सारखा मागे वळून वाहिनी-वाहिनी करत तुझ्याशीच बोलत होता . तू नुसती मान हलवीत होती . मला तेव्हा उमगलं होतं की तुला डोळ्यांने देखील उत्तम बोलता येते . खरच कमाल होती मन्याची , त्या गाढवाला ते ही कळत होतं . कमीत कमी तो दाखवत तरी तसच होता . तो ही तुझ्या रुपाला भाळला असावा ? मला असं झालं होतं की केव्हा एकदाचं स्टेशन येतं आणि हा गाढव मन्या घरी परत जातो . या मन्याला तर मी नंतर बघेनच , पण तुझं काय ? ते नंतर मन्या गेल्यावर .

-स्टेशन आल्यावर तुला आणि मन्याला सोडून मी तिकीट घ्यायला गेलो होतो . मी तिकीट घेऊन येओस्तोवर मन्याचे प्रश्न संपलेच नव्हते . आणि संपले नव्हते तुझे मान हालवून होकार-नकार देणे . मला आठवलं , घरी परताना मन्या मला म्हणाला होता , ' दादा , परत येशील तेव्हा वाहिनीला बोलकं करून आण . ' हे ऐकून तू नुसतं स्मित हास्य केलं होतं पण मला मात्र जोराने हसू आलं होतं . त्यावेळेससुद्धा माझ्या नशिबात तुला मोकळेपणान हसतं पाहण्याचा योग नव्हता . मन्या आपल्या दोघांना नमस्कार करून निघून गेला होता . आता आपण दोघेच होतो . प्लेटफार्मवर बरीच गर्दी होती . येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष देखील तुझ्याकडेच होते हे मला जाणवत होतं . तुझ्याशी संवाद साधावा म्हणून मी तुला विचारले होते , ' चहा घेणार का ? ' एकदा पुन्हा तू मान हलवूनच नकार दिला होता .

-आपण गाडीची वाट बघत होतो आणि कळलं की गाडी चार तास उशिरा येणार आहे . आता वेटिंगरूममध्ये बसण्याशिवाय काही पर्याय नव्हता . म्हणून आपण दोघे सामान घेऊन वेटिंगरूम मध्ये गेलो होतो . गाडीची वाट बघत एक दुसऱ्याच्या जवळ बसलेलो . मी तुझ्याकडेच पाहत होतो . पण तसे काहीच भाव तुझ्या चेहऱ्यावर नव्हतेच .मग मीच पुढाकार घेण्याचे ठरविले . तुझा हात आपल्या हातात घेतला होता . काहीच न बोलता,निरागस भावाने तू तो माझ्या हातातच राहू दिला . खरं तर रोमांचित करणारा तो पहिला स्पर्श होता .

-' गाडी चार तास उशिरा येणार आहे . आता तरी तू सहज व्हावं असं मला वाटतं . ' मी म्हणालो होतो .

-तू मात्र नुसती मान वर करून माझ्याकडे बघितले होते .

-'बरं मला सांग ....... मी तुला पसंद होतो नं ?' मी तुला विचारले होते .

-अचानकपणे विचारलेला हा प्रश्न तुझ्यासाठी कदाचित अनपेक्षित असावा . म्हणून ' होय .' असा एकच शब्द तुझ्या तोंडून निघाला होता .

-' मग लग्न झाल्यापासून तू अशी फार कमी का बोलते ? ' मी विचारले होते .

-' म्हणजे ? ' तुझा परत एकच शब्द होता .

-' म्हणजे ? ' आता मला राहवले नव्हते ,' बरं मला सांग लग्नानंतर आपण जेव्हा तुझ्याकडून निघालो तेव्हा तुझ्याकडे तुझी आई , मैत्रिणी , बहिणी , रडतं होत्या . तुझ्या बाबांचे डोळे देखील पाणावले होते . पण तू मात्र मुळीच रडली नाही . मला याच फार आश्चर्य वाटतं आहे . असं का . ? मी विचारले होते .

-' रडणं काही जरुरी होतं का ?' तू उलट मलाच विचारले होते .

-रडणं ही संवेदनशीलता असते अशी माझी आपली एक समज होती . म्हणून तुझ्याकडून मला हे उत्तर अपेक्षित नव्हतं .

-'नाही म्हणजे , निरोप घेताना सर्वच मुली रडतात ना . सिनेमात देखील आपण असंच बघतो . म्हणून माझा असा अंदाज होता की तुला देखील आपोआप रडू येईल आणि तू रडशील . आणि म्हणूनच मी तुझ्या रडण्याची वाट पाहत होतो . त्यासाठी मी माझ्या मनाची देखील खूप तयारी केली होती . पण तू रड्लीच नही .' मी म्हणालो होतो .

-तू काही क्षण माझ्याकडे बघत होती . कदाचित तुला या प्रश्नाची अपेक्षा नसावी .मग हळूच म्हणाली होती , ' मी एक दिवस अगोदरच भरभरून रडून घेतलं होतं .'

-'काय ?' आता धक्का बसण्याची पाळी माझी होती तेव्हा .मला तुझं आश्चर्य वाटत होतं .

-'एक दिवस अगोदर म्हणजे ?' मी विचारले होते .

-' म्हणजे एक दिवस अगोदर .' तू म्हणाली होती .

- आता मला हसू आलं होतं , ' नाही येव्हढ गणित मला येतं .पण एक दिवस अगोदर का ? ' मी विचारलं होतं .

-मला तेव्हा तुझी गमंत वाटली असली तरी तुझा चेहरा गंभीरच होता . शांतपणे तू म्हणाली होती , ' आपलं घर सोडताना , माहेर सोडताना रडणं हा मनाचा कमकुवतपणा असतो . घर सोडताना पाय कुठेतरी अडखळतात . त्या वेळेस भावनांना आवर घालायला हवा न ?'

-बाप रे ! मला तेव्हा धक्काच बसला होता . मी तुला काय समजत होतो आणि तू काय होतीस ? तुझ्याकडून मला असल्या उत्तारची अपेक्षाच नव्हती . आत्तापर्यंत न बोलणारी तू ,त्या वेळेस किती बुद्धिमत्तेने बोलत होती . इतका समंजसपणा . आणि मी तुझ्या रडण्याच्या कल्पनेतून बाहेरच येत नव्हतो .

-'अगं पण सर्वच मुली माहेर सोडताना रडतात .' मी म्हणालो होतो .

-'रडत असतील . पण काय होतं एक दिवस सर्व मैत्रिणी गोळा झाल्या होत्या . प्रसंग ही होता . मनाला तेव्हा आवर घालता आला नव्हता .म्हणून एक दिवस अगोदरच रडणं झालं . पण तसं ही मी ठरविलं होतं की निरोप घेताना मुळीच रडायचं नाही आणि इतरांना रडवायचं नाही . म्हणून एक दिवस अगोदर रडून माहेरचे रडणे मी कायमचे संपविले आहे . पण तुम्हाला मी रडावेसे का वाटते ? . ' तू माझीच उलट तपासणी घेतली होती .

-'नाही , असं काहीही नाही .' मी चपापलो होतो .  

-' मी शब्द देतो , मी तुला कधीच रडू देणार नाही . तू मला खूप आवडते .पण रडण्याचे प्रसंग आयुष्यात येतात . त्यावरचा माझा हा एक शोध . ' मी हसत म्हणालो होतो , ' अजून असले प्रसंग आपल्या आयुष्यात येऊ शकतात तेव्हा तुझी खरी परीक्षा असेल . ' मी सहज बोलून गेलो होतो . 

-'मी पण तुम्हाला शब्द देते माहेरप्रमाणे सासरीदेखील मी कधीच रडणार नाही . कारण तुम्ही सर्वांनी माझ्यावर जी कामगिरी सोपविली आहे ना त्यासाठी रडून चालणार नाही .' तू म्हणाली होती .

-' कामगिरी ? कोणती कामगिरी ?' मी थोडा गोंधळलो होतो ,'आपलं तर काहीच बोलण झालेलं नाही . कोणत्या कामाबद्दल बोलतेय तू . ' मी विचारले होते .

-' मी सांगते .' तू म्हणाली होती , ' मी तुमच्या घरची सून आहे .आई बाबांच्या व तुमच्यासकट इतरांच्या माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा असणार . मला त्या सर्व अपेक्षा पूर्ण करावयाच्या आहेत . त्या अपेक्षांवर खरं उतरावंच लागेल . मग रडून कसं चालेल . आणि कमजोर होऊन काय उपयोग ?; तू म्हणाली होती .

-'पण त्या कामगिरीचे काय ?' मी विचारले होते .

-' होय . ती कामगिरी म्हणजे ,मला सर्वांचे अश्रू पुसण्याचे काम दिले आहे . तुमच्या कुटुंबाने , समाजाने आणि व्यवस्थेने . म्हणून मला कधी रडता येणार नाही . आणि मी कधी रडणार देखील नाही हा माझा निर्धार आहे . पण यात मला तुमची साथ हवी आहे . ' तू म्हणाली होती .

-बाप रे ! माझी तर बोलतीच बंद केली होती तू . तुझे बोलणे ऐकून मी खूप भावुक झालो होतो . माझे डोळे पाणावले , पण लगेच मी स्वत:ला आवरले होते . इतक्या लवकर तुझा प्रभाव माझ्यावर झाला होता . माझी बायको इतकी समंजस आणि सर्वांचा विचार करणारी आहे याचा आनंद मला झाला होता . मी म्हणालो होतो , ' आज आकाश मोकळे झाले . तीन दिवसाचा माझ्या मनातला गुंता आज सुटला . माझं तुझ्यावर खूप प्रेम आहेच पण एक सांगू ....... '

-तू माझ्या कडे बघत होती .

-'....... मला तुझा खूप अभिमान वाटतो . '

-हे ऐकून तेव्हा तू आणखीनच माझ्या जवळ आली होती . 

------------

-आज बरोबर एक वर्ष झालं आपल्या लग्नाला . खरंच तू सर्वाना नीट सांभाळून घेतले . आता तू आपल्या बाळाची आई देखील होणार आहे . तू येथे समोर नाही आहेस पण मनापासून तुझे आभार . शुभ रात्री .

-----

-तिनं डायरी बंद केली . दोन मिनिटं डोळे बंद करून ती तशीच शांत बसली होती . नंतर आपल्या भावाला म्हणाली , ' रोहन ही डायरी तू वाच आणि सांभाळून ठेव . हीच खरी ठेव आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational