मराठी कथा - पुतळा !!
मराठी कथा - पुतळा !!
-या चौरस्त्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला सुंदर असा काळ्याभोर रंगाचा भला मोठा पुतळा होता . घोडा द्खील दोन पाय वर करून , मान उंच करून जणू ऐटीत उभा होता . डावीकडे सरळ वर चढून मारुतीचे देऊळ होते . डावीकडे वळताच देवळाच्या अगोदर काही झोपडपट्टी देखील होती . माझी आपली ऑफिस मध्ये जाण्याची रोजची हीच वाट होती .
-नवीन बदलीहून या शहरात येणे झाले तेव्हापासूनच , म्हणजे पहिल्या दिवशीच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मी बघितले होते .आणि तेव्हापासूनच मला या आकर्षक अशा पुतळ्याचे आकर्षण वाटू लागले . अगदी बोलका पुतळा . श्रेष्ठ कलाकाराची श्रेष्ठ कृती आणि श्रेष्ठ कृतीची श्रेष्ठ अभिव्यक्ती ,श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वाची जाणीव करवीत होता हा पुतळा . येणाऱ्या जाणाऱ्यांना जणू संवादासाठी निमंत्रणच देत होता .
-पहिल्या दिवशी पासूनच मला या पुतळ्याने प्रभावित केले . आणि तेव्हा पासूनच मी स्कूटरवर बसल्या बसल्या , मान उंच करून गर्वाने रोज महाराजांचे दर्शन घेत असे . मला समर्थ रामदासांचे शब्द आठवायचे , ' मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा . ' स्वत:च्या मराठी माणूस होण्याबद्दल अभिमान वाटायचा आणि छाती फुलायची. सतत असं वाटायचं की येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील असाच अभिमान वाटत असेल . आता ही रोजचीच वाट झाली होती , रोज शिवरायाचे येताजाता अनायासे दर्शन घडत होते , मग काय या निर्जीव पुतळ्याशी भावनात्मक जवळीक वाढली , आपुलकी वाढली आणि मनातल्या मनात माझा शिवरायाशी संवाद होऊ लागला .
-आता ही माझी रोजचीच वाट . गोलचक्री वळण , पुतळ्याच्या चारीबाजूने गोलाकार रेलिंग . पुतळ्याच्या पायथ्याशी चार पायऱ्या, हिरवं गवत , थोडी फुलांची झाडं , पुतळ्याखाली काळ्या रंगाच्या दगडावर पांढऱ्या अक्षरात कोरीव अशी अनावरणाची माहिती, तारीख .... आणि हो ... अनावरण करणाऱ्याचे नाव मात्र मोठ्या ठळक अक्षरात होते . पण या सर्वांवर बरीच धूळ साचलेली होती . पुतळ्याची देखील हीच स्थिती होती . पुतळ्यावर पक्षांनी केलेली घाण , चिकटलेल्या पक्षांच्या पिसांबरोबर स्पष्ट दिसतं होती . पाहताचक्षणी मराठी माणसाचा अभिमान , छाती फुलणं , गर्व वगैरे सर्व बाजूला राहायचं . एक क्षण मी स्कुटर थांबायचा देखील पण मग लगेच विचार यायचा , ऑफिसात उशीर होऊ देता कामा नये . शिवरायांचे काय . त्यांना तर आता इथंच असच उभं राहायचं आहे .जिवंतपणी साम्राज्य आणि मरणानंतर नुसता चौरस्ता . मग दोन क्षण थांबून मी आपल्या पुढच्या मार्गावर असायचा . संध्याकाळी उशिरा परतणे . रोजचा हाच क्रम . शिवरायांचे मात्र सकाळ संध्याकाळ अनायास दर्शन घडत असे . हेच या नवीन शहरात माझं नवीन नातं होतं .
-पुढे चार सहादिवसांनी ऑफिसमधून संध्याकाळी परत येताना , सहज लक्ष गेलं , पुतळ्याच्या भोवती काही उनाड गुंड मुलं विड्या - सिगारेट ओढीत दारू पित आणि जुगार खेळत बसले होते . येणाऱ्या जाणाऱ्यांकडे वेगळ्याच नजरेने बघत होते . मला मुळीच आवडले नाही . मला असे वाटले की थोडे थांबावे . घरी पोहचायला रात्री उशीर झाला तरी चालेल , पण या पोरांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगावे .त्यांच्या शौर्याच्या , पराक्रमाच्या गोष्टी या पोरांना सांगाव्या . त्यांचा त्याग , स्वातंत्र्यासाठीची धडपड , हिंदवी स्वराज्या बरोबरच सुराज्यासाठीची कळकळ , प्रजाजनांच्या कल्याणासाठीची त्यांची व्यग्रता , त्यांची राजनीतिक निपुणता , चातुर्य , राष्ट्रासाठीच्या उदात्त भावना , मोगलाईच्या विरुद्ध उभारलेले बंड , त्यासाठी त्यांनी आखलेली गनिमी काव्यासारखी कार्यशैली , सगळं सगळं सांगून टाकावं . पण नको . मी स्वत:ला सावरले . उगाच या पोरांनी उर्मटपणे काही भलतंच बोलायचं आणि भलतंच करायचं . ' क्षमा असावी महाराज ' मी मनातल्या मनात महाराजांची क्षमा मागितली आणि आपल्या वाटेने घरी परतलो . त्या रात्री मला फार उशिरा झोप आली . अन्यायाच्या प्रतिकारासाठी स्वार्थ आणि माझी भीती आडवी आली होती . माझी मलाच फार ग्लानी वाटतं होती .
-आता ही माझी नेहमीचीच वाट झाली होती . पण नेहमी फारशी गर्दी नसणारा हा रस्ता आज फारच गजबजलेला होता . चारीकडे पोलीस बंदोबस्त होता . पोलिसांच्या गाड्या दिसत होत्या . कोणा एका राजकीय पक्षाचा मोर्चा निघणार होता . बहुदा डाव्या पक्षाचा असावा . आजकाल सर्व पक्ष एकसारखेच . फक्त त्यांचे वेगवेगळ्या रंगाचे झेंडे बघूनच आपण त्यांच्यात फरक करू शकतो . आठवलं सकाळी वर्तमानपत्रात वाचलं होतं , काहीशा मागण्या आणि त्यासाठी हा मोर्चा . एकूण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यापर्यंतच मजल होती . आरडाओरड , नारेबाजी . रोजचे बसणारे उनाड गुंड पोरं देखील या सगळ्यात सामील होते . मोर्च्यात असलेल्या सर्वांनी पोलिसांसकट श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती परिक्रमा घातली , आणि आले तसेच परतले . पुन्हा शांतता . मला समजेना , डाव्या पक्षधरांचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांशी काय संबंध ? अर्थात त्यांच्या मागण्यांचा देखील महाराजांशी काहीच संबंध नव्हताच म्हणा . परिक्रमा झाली . श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात काहीच बदल नव्हता . तीच धूळ ,तीच घाण , पुतळ्यावर बसलेले तेच पक्षी . तीच उनाड गुंड मवाली पोरं . मला आपलं उगीच वाटलं. कमीत कमी आजच्या दिवशी तरी पुतळ्याला स्वच्छ करायला हवं होतं .
-एक दिवस मात्र खूप बरं वाटलं . चारीकडे धो धो पाऊस होता . मी बरसाती घालून होतो . पण पाऊस खूप जोराने असल्यामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मात्र स्वच्छ धुतला जात होता . घोड्यासकट , तलवारीसकट महाराजांचा पुतळा स्वच्छ धुतलागेल्याने काळाभोर चमकत होता . महाराजांच्या शौर्याला सार्थक करत होता . त्या दिवशी मला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यावर देखील समाधान दिसतं होतं . खरं सांगू , त्या दिवशी दिवसभर माझ्या चेहऱ्यावर काहीच दडपण नव्हतं .
-लगेच दुसऱ्याच दिवशी मात्र खूप कडक ऊन होते. कालचे समाधान आज नव्हते . श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा चेहरा देखील उन्हामुळे काहीसा त्रासलेला भासत होता .माझ्या मनात सहज विचार आला , ' ऑफिसमध्ये आज उशीर झाला तरी चालेल पण स्वत: खुद्द , श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काही वेळ छत्री घेऊन उभे राहावे म्हणजे शिवरायांना कडक उन लागणार नाही . पण ते शक्य नव्हते . माझे मलाच हसू आले . ' क्षमा असावी महाराज ' म्हणतं मी स्कूटरचे एक्सिलेटर वाढविले . नंतर आपलं रोजचंच .... परत तीच धुळ ..... परत पुतळ्यावर पक्ष्यांची घाण .... तसेच पुतळ्यावर बसून घाण करणारे पक्षी .... आणि पुतळ्याच्या खालती बसणारे तेच गुंड उनाड मवाली पोरं आणि तेच त्यांचे उद्योग .
- एक दिवस पुन्हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती फार गर्दी होती . सकाळी वर्तमानपत्रात वाचलं होतं एका पक्षाचे कोणी तीन कार्यकर्ते , त्यांच्या मागण्यांसाठी या महाराजांच्या पुतळ्यासमोर म्हणे आत्मदाह करणार होते . पोलिसांचा कडक बंदोबस्त होता . एम्बुलन्स आणि अग्निशमन खात्याचे वाहनं देखील होते .कोणाला मरायचे असो किंवा नसो , पण हल्ली आत्मदाहची धमकी देणे म्हणजे हा प्रचारासाठी एक नवीनच प्रकार म्हणायचं . आत्मदाह करण्यापूर्वी आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील असा एक गैरसमज आत्मदाहाची जाहीर घोषणा करणाऱ्यांमध्ये असतो . मागण्या अवास्तव असतात म्हणून कदाचित ही वेळ येते . शिवाय स्व:तच जगात नसलो तर एकूण गरजां आणि मागण्या शिल्लकच राहणार नाही असा ही समज सर्वांचा असतो . पण या गरजांचा आणि मागण्यांचा छत्रपती श्री शिवाजी महाराजांशी काय संबंध ? कोडंच आहे . खरं तर अशा लोकांना माझ्या मते स्मशानातच आत्मदाह करायला हवा , म्हणजे व्यवस्थेचा प्रश्न सोपा होतो .पण छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या शूरवीर कर्मठ राजाच्या पुतळ्यासमोर कायरतेचे प्रदर्शन मला अस्वस्थ करत होते . मी महारजांच्या पुतळ्याकडे बघितले , आज त्यांच्या चेहऱ्यावर ती चमक दिसत नव्हती . मला देखील माझ्या असहायतेमुळे फार मानसिक त्रास होऊ लागला .
- सकाळी नऊ वाजताची वेळ आत्मदाहासाठी ठरलेली होती .काय होतं या उत्सुकतेने मी बाजूला मुद्दाम थांबलो होतो . पण दहा वाजून गेले तरी अद्याप काहीच हालचाल आढळत नव्हती . आत्मदाहासाठी अद्याप कोणीही पुढे आलेले नव्हते .माणसांची गर्दी हळूहळू आता कमी होत चालली होती . अचानक तीन माणसं कुठून तरी महाराजांच्या पुतळ्याखाली प्रकट झाले . त्यातल्या एकाने रूमाला एवढे कापड पुतळ्याखाली ठेवले , दुसऱ्याने एका अगदी छोट्याशा बाटलीतून काही थेंब रॉकेल कापडावर टाकले व तिघांवर देखील अत्तरासारखे शिंपडले . तिसऱ्याने काड्याच्या पेटीचा वापर केला .पण फक्त कापड्लाच आग लावली . कापड जळू लागले पण पुढे काही आणखीन घडण्याच्या अगोदरच पोलिसांनी तिघांचा ताबा घेतला . जणू सगळं काही अगोदरच ठरलेले . माझ्या मते याला प्रतीकात्मक आत्मदाह म्हणायला हरकत नाही . माझं मलाच हसू आलं . या जगात काहीही होऊ शकतं . आत्मदाह देखील अगदी सुरक्षित , सोपा , सोयीस्करपणे असा प्रतिकात्मकरित्या करता येऊ शकतो . आश्चर्य आहे . पण या शहराच्या प्रत्येक चळवळीत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा वापर वाढत चालला होता हे मात्र खरं .
- एकदा ऑफिस मध्ये जाताना माझी स्कूटर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळचं बंद पडली . उजव्याबाजूला एका पानवाल्याच्या शेजारी पंक्चरवाला होता , मी तिथं थांबलो . स्कूटर ठीक होईपर्यंत उभं राहणं भागचं होतं म्हणून उभा होतो . अचानक आरडा-ओरडा ऐकू आला . पुतळ्याच्या खाली चारसहा लोकं भांडत होते . तेव्हढ्यात माझ्या डोळ्यासमोर एकाने दुसऱ्याच्या पोटात सुरा भोकला .क्षणातच हाहाकार ....रक्ताच्या धारा .....चारीकडे धावपळ ....माणूस मेला . थोड्याच वेळात पोलीस आले . लोकांची धावपळ ... गर्दी .... एंबूलेन्स .. सगळ सगळच . मी तर फार घाबरलो आणि अस्वस्थ देखील झालो . छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली ही कायरता ? मनाला पटण्यासाठी नव्हती . मला काहीच करता आले नाही . किती हतबल झालो होतो मी . त्या दिवशी ते द्रष्य मी विसरू शकलो नाही . त्या दिवशी अनेकवेळा माझ्या मनात विचार आले की असली गुंडगिरी थांबविण्यासाठी , छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी परत एकदा जन्म घ्यायला हवा . . आणि त्याचप्रमाणे जिजामाता आणि समर्थ रामदासांनी देखील परत एकदा जन्म घेऊन महाराजांचे काम सोपे करायला हवे . पण तसे होणे नव्हते .मी त्यादिवशी उगाच निराश झालो होतो .
- त्या दिवशी शिवाजी जयंती होती . महाराष्ट्रात सर्वाना सुट्टी . या प्रदेशात शिवाजी जयंतीची सुट्टी नव्हती .शिवाजी जयंती निमित्त सर्व कार्यक्रम आज महाराष्ट्रात असतील हा विचार मनात आला . पण इकडे नुसता निर्जीव पुतळा . असो . ऑफिसमध्ये जाणे तर भाग होतेच . छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आलो . मनात विचार आला , कमीत कमीत आज तरी काही क्षण आपल्याला पुतळ्याजवळ थांबायलाच हवं . मनोभावे शिवरायांचे त्रिवार वंदन करून त्यांचे स्मरण करायला हवे . पण ... अरे ... हे ... काय , डोळ्यावर विश्वास बसेना . कधी नवल ते घडतं होतं . चौरस्त्यावर बरीच गजबज होती . पाण्याचे टँकर होते . दोन माणसं पुतळ्यावर पाणी टाकत होते . चार माणसं पुतळ्याला सर्व बाजूने घासून पुतळा स्वच्छ करतं होते . काही पुतळ्याच्या चारी बाजूची जागा स्वच्छ करत होते . कोणी एक अनावरणाचा काळा दगड घासून स्वच्छ करत होता . मला खूप बरं वाटलं . स्कुटर थांबवून एकाला विचारलं असता त्याने सांगितलं की थोड्याच वेळात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर माल्यार्पणाचा कार्यक्रम होणार आहे . मी विचार केला की ऑफीसमध्ये हजेरी लावून यावे आणि बघावे येथे काय होते ते . त्या प्रमाणे थोड्याच वेळात मी परतलो .
-सुमारे एका तासाने राज्याचे महामहिम राज्यपाल आले . त्यांच्या मागेपुढे बराच लावलश्कर . आता सर्व वाहतूक थांबविली गेली होती . कोणत्याही माणसाला महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊ दिले जात नव्हते . मी दुरून एका उंच जागेवरून सर्व बघतं होतो . हळूहळू थोडं पुढं सरकतं जावं असा विचार मनात चालला होता . आणि संधी मिळताच थोडा पुढे वाढलो .
-थोड्याच वेळात महामहिम राज्यपाल आपल्या सुरक्षेच्या घेऱ्यासकट महाराजांच्या पुतळ्याखाली येऊन उभे राहिले. पुतळा उंचावरच होता . वर चढण्यासाठी शिडीची व्यवस्था होती . पण महामहिम राज्यपाल खालीच थोडा वेळ उभे राहिले . शेवटी काहीसा विचार करून फुलांचा मोठा हार छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी ठेऊन मोकळे झाले . योगायोगाने तो हार अनावरणाच्या काळ्या दगडासमोर ठेवला गेला . तो मोठा हार नंतर एका सहायकाने शिवरायांच्या गळ्यात घातला . थोड्याशा टाळ्या झाल्या . बस . इतकचं . भाषण नाही , संवाद नाही , जयघोष नाही , नारे नाही . घेतले गेले ते फक्त हार घालतानाचे फोटो . सर्वच कसं शांत शांत . लगेच सर्व परतले . रस्त्यावर पुन्हा वाहतूक सुरु झाली . पुन्हा सर्व तेच ..... तीच गुंड उनाड पोरं ... आणि शांत असा उभा तोच छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा . जणू हे दोन्ही येणाऱ्या जाणाऱ्यांची ग्वाही देत असणार . काहीच बदललेलं नव्हतं . मी पण परतलो . मनातल्या मनात म्हटलं , ' छत्रपती ... श्री... शिवाजी... महाराज की जय!!!