प्रशांत | मंजिरी
प्रशांत | मंजिरी


१..
मी जवळजवळ तसा इयत्ता नववीत होतो.. सहामाही परीक्षेत माझं रडतपडत पास होणं माझ्या घरच्यांना जवळजवळ खटकायचंच.. ह्या ही वेळी मी ऐन दिवाळीत आईच्या हातचा फराळ खायचा सोडून आईच्या हातचा जवळजवळ माझ्या अंगाला न शोभणारा आणि न सोसणारा भरपूर मार खाल्ला होता.. बाबांचं मात्र तसं काही नव्हतं.. बाबा निकालाबद्दल मला काही बोलायचे नाहीत..
ते म्हणायचे, निकालाचं टेन्शन घेऊ नकोस रे ?,
तू एक दिवस नक्कीच यशाचं समीकरण बदलून टाकशील.. मला तुझ्यावर चांगलाच विश्वास आहे..
बाबांचं माझ्यासाठी असं म्हणणं मला खूप महत्त्वाच वाटायचं.. मला नव्याने लढण्याच बळ मिळायचं आणि नकळत माझी छाती आहे त्यापेक्षा जवळजवळ दोन-तीन इंच जरा जास्तच फुगायची.. आईचा मार पडल्यानंतर नव्याचे नऊ दिवस म्हणतात तसं, मी मोजून एक आठ-नऊ दिवस अभ्यास करायचो.. त्यात नेमके मी दोनच विषय वाचायचो एक म्हणजे इतिहास आणि दुसरा विषय मराठी..
आई मला म्हणायची इंग्रजी आणि गणितं ही पण विषय आहेत त्याकडेही थोडं लक्ष देत जा, जवळजवळ जवा तवा नुसतं इतिहास आणि मराठीचं घेऊन बसतोस..
एकदा तर आईने खूपच आग्रह केला, म्हणून मी मराठी आणि इतिहासावरच्या पुस्तकांवरच कव्हर काढलं आणि त्यावर इंग्रजी आणि गणितं या नावाचं कव्हर लावलं.. फक्त कव्हर बदलले पण पुस्तक मात्र तेच ठेवले.. आई सगळं विसरुन गेली की, मी परत आपापल्या गुंगीतच असायचो..
कधी कधी आई खूश असायची, पोरगं अभ्यास करतंय म्हणून.. ते ही अवघड विषयांचा.. गणिताचा आणि इंग्रजीचा.. आईला नेहमी वाटायचं की, माझी पोरं खूप हुशार असावीत, कुठेही कधी कमी पडता कामा नयेत..
जवळजवळ दिवाळी संपलीचं होती.. प्रथम सत्र संपलं होतं.. द्वितीय सत्राची बारी होती.. द्वितीय सत्र हसत खेळत चाललं होतं.. द्वितीय सत्रात मात्र माझे बरेच किस्से घरी कळाले, त्यात माझं शाळा सोडून बोंबलत हिंडण आलं, फक्त क्लासटीचरचीचं हजेरी लावणं आलं, गपंचिप कॅन्टीनच्या कंपाउंडवरुन उड्या टाकून क्रिकेट खेळायला जाणं आलं, जवळजवळ बारा साडेबारा झाले की परत शाळेकडे येणं आलं, किंवा कधी बाकावरच्या मित्राला त्याच्या दप्तरात माझं दप्तर टाकून आणायला सांगण आलं, त्याला परत सायकलच्या पार्किंगलाच गाठणं आलं.. ह्या सगळ्या बारी भानगडी नकळत माझ्या घरी जवळजवळ कळल्याचं होत्या.. सगळं पितळ उघड पडलं होतं.. माझी जाम टरकली होती..
आता घरी आईला तोंड कोण देणार? मला यावेळेसही वाटलं की, चला बाबा आहेत ते सांभाळून घेतील आपण फक्त त्यांच्या पाठीमागे जाऊन थांबू..
पण इथे मात्र उलटच झालं,
ह्यावेळेस बाबांनीच मला जाम धुतलं.. उलट आईच मध्ये पडली होती.. आईला थोडं खरचटलं होतं.. त्याच मला खूप वाईट वाटलं..
मन लावून अभ्यास करुन मी कसंबसं नववीच द्वितीय सत्र पास झालो.. द्वितीय सत्राचा निकाल येताच बाबांनी मला दहावीला सेमीच्या वर्गात घातलं.. बाबांचं शाळेच्या संस्थाअध्यक्षासोबत चांगलंच उठणं बसणं होतं.. बाबांच्या शब्दांना अध्यक्षासमोर भरपूर वजन होतं.. बाबांनी इतका दांडगा वसीला लावून मला अखेर सेमीच्या वर्गात घातलंच..
नवीन पोरं, नवीन पोरी बघून मला माझ्या जुन्या मित्रमैफिलीची आठवण यायची.. पण नाईलाज होता.. माझं रडतपडत पास होणं घरच्यांना जवळजवळ आवडायचंच नाही म्हणून त्यांनी मला सेमीला टाकलं होतं.. ते ही असं अचानक.. माझी आताही टरकलीच.. इंग्लिशचा आणि माझा छत्तीसचा आकडा होता, त्यात मला मी यंदा दहावी कस पास होणार? जवळजवळ ही भीती होतीच..
मन कठोर करुन कसाबसा सेमीच्या वर्गात बसू लागलो.. त्याच दरम्यान तिची भेट झाली.. तिची म्हणजे मंजिरीची.. शाळेला सुरुवात होऊन जवळजवळ चार एक दिवस झाले होते.. सुरुवातीचे काही दिवस मंजिरी गैरहजर होती.. शाळेतल्या बाई आणि मास्तर वर्गात एका मुलीचं रोज नाव घ्यायचे.. ती मुलगी म्हणजे मंजिरी.. तिच्या गैरहजेरीत सगळे शिक्षक तिच नाव घेत होते, हे जवळजवळ माझ्यासाठी कुतूहलाच होतं..
बऱ्याच दिवसानंतर त्या नावाची व्यक्ती म्हणजे मंजिरी शाळेत आली.. प्रचंड वेदना होत असलेल्या पेशंटला डॉक्टरांनी बाहेर ताटकळत थांबवावं आणि अचानक एकाकी पेशंटला आत बोलावून घ्यावं अगदी तसाच आनंद मला झाला होता.. त्या दिवशी पहिल्यांदा मला मी शाळेत हजर असल्याचा आनंद झाला.. जवळजवळ तिची एन्ट्रीच तितकी जोरदार झाली होती.. मला आजही तो वार आठवतो.. वार गुरुवार.. गुरुवार म्हणजे शाळेच्या युनिफॉर्मला सुट्टी..
पिस्ता रंगाचा चुडीदार, कापसासारखी नाजूक लालबुंद ओठं, मऊ मऊ गाल, बारीक टोचलेलं नाक, अर्धवर्तुळाकार नोझ रिंग, कानात बारीक सिल्व्हर रंगी झुमके आणि चष्म्याच्या काचेसमोर येणारे ते लालसर केसं...
त्याचं केसांना कानांच्या मागे टाकत टाकत तिची वर्गात एन्ट्री झाली.. मी उचल्या नजरेने तिच्या हाताकडे बघितलं हातात टायटन वॉच.. मला पिस्ता कलर आणि टायटन वॉच आवडू लागली ती जास्त तेव्हापासूनच ते ही तिच्यासकट.. तिच्या निष्पाप डोळ्यांवर तर मी जवळजवळ पहिल्याच भेटीत फिदा झालो होतो.. दहावीत असणारी मंजिरी पहिली दुसरीत वाटावी इतके बोलके आणि सुंदर डोळे होते.. मंजिरीचं सौंदर्य म्हणजे धबधब्यासारखं वाहत आणि मोहक होतं.. यापुढे काय?
यानंतर मी प्रत्येक गुरुवारची वाट पाहू लागलो, ती मंजिरीला परत रंगीबेरंगी कपड्यात पाहण्यासाठी.. त्यानंतर मी शाळा कधीच बुडवली नाही.. रोज शाळेत जातोय म्हणून घरचे तर जवळजवळ हवेतच होते.. हजेरीपटांवर नुसतं प्रेझेंट प्रेझेंट टाकून शिक्षकवर्ग ही जाम खुश होता..
मंजिरीचं सौंदर्य आणि कंठातील मधूर आवाज ऐकून वर्गातली पोरं तिच्या मागे पिंगा घालत असायची.. पण आपल्या नावाची दहशत ह्या सगळ्या पोरांना पुरुन उरणारी होती.. आपणं तिला जेव्हा पहिल्यांदा एकटक पाहतं होतो तेव्हाच सगळ्या वर्गातल्या पोरांना कळून चुकलं होतं की, ह्या वहिनी आहेत म्हणून आणि न काळणाऱ्या पोरांना आपणं एकदाचं रुबाबात सांगून टाकलं होतं की, ही आपली आहे म्हणून.. बाबांचं शाळेच्या संस्थाअध्यक्षासमोर चांगलं वजनं होतं आणि संस्थाअध्यक्षाच्या शाळेत आपला दरारा होता..
मंजिरीला मागच्या बाकावर बसून पाहायला मला फार आवडायचं.. कारण जवळजवळ समोर नजरेला नजर द्यायची हिंमत या अंगात नव्हती, म्हणून तिच्यावर माझी चोरटी नजर ठेवण्यासाठी मी नेहमी मागच्याच बाकावर बसायचो.. जवळजवळ तिला समोरुन पाहायला मिळायचं ते इंग्लिशच्या पिरियडला.. तिचं मराठी आणि इंग्लिश दोन्हीही माझ्या अपेक्षेपेक्षा उत्तम होतं.. ती इंग्लिश मध्ये स्पीच द्यायची.. दहा दहा मिनिट एका टॉपिकवर बोलायची.. त्यावेळेसची संधी मी कधीच सोडायचो नाही.. बाजूला कितीही धिंगाणा होत असला तरी मी मात्र एकटक तिच्याकडे पाहायचो, तिचे हावभाव आणि तिची ती कानामागे केसं टाकण्याची लकब टिपत जायचो..
इंग्लिशच्या पिरियडला एकदा असचं अल्टरनेट करत करत स्पीचसाठी कुणीतरी माझ्या नकळत माझ्या नावाची चिट्टी गोखले सरांच्या हातात दिली.. चिट्टीवरच नाव ऐकून मला शेजाऱ्यानं घाबरत घाबरत जागी केलं.. तिचं भाषण संपताच सरांनी माझं नाव जाहीर ही केलं.. माझी स्टेजवर जायची पहिलीच वेळ होती.. माझी जाम टरकली.. इंग्रजीचा बेपत्ता आणि त्यात स्टेज डेरिंग ही नको.. कसाबसा स्टेजवर गेलो.. सगळ्यांना पाहिलं.. तिलासुद्धा.. अगदी डोळसपणे.. पहिल्या ओळी जवळजवळ सगळ्यांच्या सारख्याच होत्या त्या ऐकून ऐकून तोंडपाठ झाल्या होत्या, मी ही त्या ओळी तशाच बोलायचा प्रयत्न करत होतो पण मला जमेना.. अंगभर घाम फुटला.. हात पाय लटलट कापू लागले.. वेड्यासारखा एकटक वरी छताकडे पाहून बोलू लागलो..
सगळ्या वर्गाला मी दुसऱ्या तुकडीतून आलोय हे जवळजवळ माहीत होतं आणि माझ्या इंग्लिशबद्दल सुध्दा.. सगळे मला वेड्यागत फिदीफिदी हसू लागले.. त्यावेळी सगळ्यांच फिदीफिदी हसणं मला खूप लागलं.. सगळ्यांच हसणं मी सोडून दिलं पण त्यात तिच माझ्यावर हसणं मला सहन झालं नाही, मी एकाकी स्टेजवरुन खाली उतरलो आणि माझं बाकावरच दप्तर घेऊन वर्गातून असा बेभान पळत सुटलो ते घर येईपर्यंत थांबलोच नाही..
घरी काय प्रकार झाला ते कळतं नव्हतं आणि मी कुणाला फारसं जवळजवळ काही सांगितलच नव्हतं.. बाबा माझ्या परस्पर दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन आले आणि त्यांनी गोखले सरांना विचारलं काय घडलंय काल? सरांनी बाबांना सारी हकीकत एका दमात घसा कोरडा होईपर्यंत सांगून टाकली.. हा सगळा प्रकार मला जवळजवळ आईकडूनच कळाला.. बाबा शाळेत गेलेत, सरांना भेटलेत वगैरे वगैरे.. घडल्या प्रकरणानंतर मी जवळजवळ दहा दिवस शाळेत गेलो नाही.. घरी मित्र येऊन गेले, शिक्षकांनी शिपाई धाडून विचारपूस केली पण मी कुणाच्या तावडीत सापडलो नाही..
हे प्रकरण होऊन आता दहा दिवस झाले होते.. मी अकराव्या दिवशी शाळेत गेलो तो माझ्या जुन्या थाटात, तोऱ्यात अगदी बेफिकीरपणे.. माझी वर्गात एन्ट्री होताच सगळे फिदीफिदी हसायला लागले.. मी शांत बसलो.. कुणाला काही बोललो नाही.. दुसराच तास इंग्रजीचा होता.. गोखले सर आले, आणि मला त्यांनी आधी बाकावर उभा केलं.. पळत का गेलास त्या दिवशी तू? याबद्दल प्रश्नांवर प्रश्न विचारुन सरांनी मला गपगुमान शिक्षा भोगायला सांगितली.. मी तरीही शांत होतो.. मला बाकावर थांबवलं सर शांत झाले तसा मी वर्गात मोठ्यामोठ्याने स्पीच देऊ लागलो.. सगळे माझ्याकडे एकटक जवळजवळ कुण्यातरी सेलिब्रिटीला पाहत असल्यासारखं पाहत होते.. ती सुध्दा.. त्यादिवशी मला ही सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटलं.. माझं स्टेज करेज आणि शब्दांची मांडणी पाहून सगळे आश्चर्यात पडले होते.. जवळजवळ ती सुध्दा.. भाषण संपलं तसं टाळ्यांचा कडकडाट आणि नुसता कडकडाटच.. मी शांत झालो इतक्यात एकाने खालून टवाळकी केली, तो म्हणाला दहा दिवस एका विषयावर पाठांतर करुन कुणीही बोलू शकत आमच्यासारखं उत्स्फुर्त बोलून दाखव बरं तेव्हा खरं.. सगळ्यांच्या नजरा परत माझ्याकडे फिरल्या.. त्याच तिची निष्पापी नजर सुध्दा.. आणि त्याच नजरेकडे पाहून मी थाटात म्हणालो, तुम्ही हवा तो विषय द्या मी बोलीन, दुसरा विषय आला, मी पाच मिनिटं वेळ घेतला आणि त्या विषयावर दहा मिनिटं नॉनस्टॉप बोललो.. परत टाळ्या.. परत वाहवा.. परत तिची नजर.. असं वाटतं होतं जणू मला ती दाद टाळ्यांतून नाही तर तिच्या नजरेतून शाबासकी देतं होती.. ती ओठांतल्या ओठांत ही काहीतरी पुटपुटत होती..
आता मला इंग्रजीची भीती राहिलेली नव्हती.. त्या दहा दिवसात मी इंग्रजीची बरीच पुस्तकं, ग्रामर दिवस रात्र एक करुन झपाटल्यासारखं वाचून ते समजून घेतलं होतं.. इंग्लिश डिक्शनरी ही मुद्दाम डोळ्याखालून घातली होती, त्यामुळे गणिती भाषेतील शब्दांचाही आता जवळजवळ चांगलाच गुंता सुटलेला होता.. जवळजवळ दहावीचं प्रथम सत्र संपलं.. निकालही चांगला लागला.. तिचा आणि माझा सुध्दा.. माझ्या घरचे सगळे जाम खुश होते.. पण मला चिंता होती ती दहावी इतक्या लवकर का संपतेय याची? शाळेत गेलं की, दिवस न संपण्याची त्यात विशेष म्हणजे गुरुवार तर कधी संपूच नये असं वाटायचं.. असे कित्येक गुरुवार मी तिला मागे बसून एकटक पाहायचो.. मला खूप आनंद वाटायचा.. आता वर्गात उत्स्फूर्त भाषण फक्त मी आणि मंजिरीचं करत होतो.. नॉनस्टॉप.. ज्या दिवशी मी स्टेज सोडून घराकडे पळत गेलो होतो त्यादिवसापासून मला एक प्रश्न सतावीत होता तो असा की, माझा शाळेतला दादागिरी प्रवास बघून कुणी हिंमत केली असेल गोखले सरांना माझ्या नावाची चिट्टी देण्याचा.. मी तळापर्यंत जायचा खूप प्रयत्न करत होतो पण रिकाम्या हातांनीच परत येत होतो..
माझी जुनी मित्र कंपनी मला भेटली की, उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवायची.. माझं खूप कौतुक करायची.. त्यांनां माझा हा असा अचानक भयानक बदल जवळजवळ नकळण्याजोगा होता.. ते नुसत्या प्रशंसावर प्रशंसा करत होते..
२.. (प्रशांत | मंजिरी)
पुढे अचानक शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आमच्या दोघांवर येऊन पडली.. शाळेतल्या इंग्लिशच्या गोखले मास्तरनी एकाकी माझं आणि मंजिरीच नाव दिलं होतं.. ही तिची आणि माझी समोरासमोर उभं राहून बोलण्याची पहिलीच वेळ होती.. इतक्या दिवस फक्त नजरेच्या भाषेवरुनच माझ्या मनात प्रेमाची पालवी फुटत होती.. सूत्रसंचालनाच्या निमित्तानं मी आणि मंजिरी बराच वेळ रंगीत तालमीसाठी शाळेत थांबू लागलो.. मागच्या आठ-नऊ महिन्यात कधीच ती इतकी जवळ नव्हती.. मला इतक्या दिवस वाटायचं की, तिला नुसतं लांबूनच पाहतोय तिच्या बाजूला कधी बसणार, तिला जवळून कधी पाहणार?
आता मंजिरी जवळजवळ माझ्या बाजूलाच बसली होती.. मात्र माझा सगळा फोकस हलत चालला होता.. सूत्रसंचालनाच्या तयारीच्या निमित्तानं आमचं एकत्रित बसणं वाढत जात होतं.. वर्गात कधी मंजिरी मला तिच्या सुंदर नजरेनं कॅन्टीनला येण्यासाठी खुणावखुणवं करायची तर कधी मी नजरेची भाषा बोलायचो.. ही भाषा ती अचूक ओळखायची..
मला एकाकी स्टेजवर बोलून आता खूप सवय झाली होती.. भक्कम अनुभव आला होता.. आता कसलीच टरकत नव्हती.. पण मंजिरी सोबत असताना सूत्रसंचालन कसं करणार? कधी कधी हा ही प्रश्न पडायचा..
मंजिरी माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आणि तत्वांनं चालणारी सरळमार्गी मुलगी होती.. ती हसताना बिनधास्त हसायची कुणाचा विचार करायची नाही.. हसताना तिच्या गालावर पडणारी खळी तर जवळजवळ लाजवाबच होती.. तिचं निरीक्षण ही उत्तम होतं.. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन ही जवळजवळ तिच्याइतकाच सुंदर होता.. तिच्या डोळ्यात काहीतरी जादू होती.. जी जादू मला तिच्याकडे आकर्षित करत होती.. तिच्या डोळ्यात पाहिलं की, मला जग जिंकल्याची फिलींग यायची.. सूत्रसंचालन चांगलंच होणार ह्या अविर्भावात माझ्या धमन्या ना धमन्या पेटून उठायच्या.. त्या फक्त मंजिरीला पाहूनच..
मंजिरी जांभळ्या रंगाच्या
साडीत तर जाम भारी दिसत होती.. आता जांभळा रंग ही आवडू लागला होता तो ही तिच्यासकटच.. केसाला बांधलेल्या गजऱ्याचा वास स्टेजभर पसरला होता.. त्यात तिचं नाजूक अंग पाहून मी वेडा होऊन गेलो होतो.. जवळजवळ माईकच्या निमित्तानं मंजिरीच्या आणि माझ्या हातांचा नकळत स्पर्श होत होता.. तो स्पर्श ही बोलका होता तिच्या निष्पाप डोळ्याइतकाच.. वार्षिक स्नेहसंमेलन फेब्रुवारीत पार पडलं.. सूत्रसंचालन अपेक्षेपेक्षा उत्तम झालं.. शेरोशायरीसाठी नुसत्या शिट्ट्या अन् टाळ्याच टाळ्या पडत होत्या.. काही शायऱ्या तिने स्वतःच बनवल्या होत्या तर काही शायऱ्या आम्ही दोघांनी मिळून बनवल्या होत्या.. आमचं सूत्रसंचालन सगळ्यांनाच खूप खूप आवडलं.. गोखले मास्तरांनी तर खूप कौतुक केलं.. हेडमास्तरांनी तर सूत्रसंचालनासाठी मला आणि मंजिरीला सेम-टू-सेम ट्रॉफ्या पण दिल्या..
शाळा संपायला मोघम वीस-पंचवीस दिवस बाकी होते.. माझी आणि तिची ओळख चांगलीच झाली होती.. तिला प्रेमाची पत्र भरपूर लिहून झाली होती.. तिच्यावर भरपूर कविता, चारोळ्या, शायऱ्या जवळजवळ सगळं करुन झालं होतं.. रात्र रात्र जागून त्या कविता पूर्ण केल्या.. कित्येकवेळा माझ्या मित्रांनी मास्टरप्लॅन पण केला, तिला शाळेच्या मधल्या सुट्टीत एकट गाठून हे पत्रं द्यायचं.. पण माझी हिंमत झालीच नाही.. मी त्यांचे सारे प्लॅन जवळजवळ फेलच केले होते.. घरी मी एकटा असताना तिला लिहिलेली पत्रं हातात घेऊन आरशाला मंजिरी समजून तिच्याशी तासन् तास बोलायचो.. पण समोर आली की, तोंडातून शब्द बाहेर पडला तर.. बऱ्याच वेळा मित्रांना जुजबी कारणं सांगून मी तिच्या घरापर्यंत ही जाऊन आलो.. तिच्या माझ्यात तिला न दिसण्याइतकं अंतर ठेवून तिचा पाठलाग करु लागलो.. त्यात सायकलची चैन पडायची.. मी परत चैन बसवायचो.. परत चैन पडायची.. मी परत बसवायचो.. दोन-तीन प्रयत्नानंतर तिच्या घरचा पत्ता जवळजवळ मिळालाच.. मंजिरीचं घर खूप मोठं होतं.. अंगणात नुसती झाडीच झाडी होती..
ह्या सगळ्या कुटाण्यात शाळा संपायला आलेल्या वीस-पंचवीस दिवसाचे आता फक्त चार-पाच दिवस झाले होते.. शाळेत स्कूल डे होता.. ती हेडमास्तर झाली होती आणि मी तिच्या केबिनचा पिऊन..
माझ्या पाहण्यातली सर्वात सुंदर मंजिरी कोणती तर ती स्कूल डेची मंजिरी.. नावाइतकीच गोड दिसत होती..
निळ्या आणि हिरव्या रंगाच कॉम्बिनेशन असणारी पैठणी, काठावर आणि पदरावर मोराचं केलेलं बारीक नक्षीकाम, कानाला मॅचिंग बारीक झुमके, केसं एकत्र बांधून मागे पाठीवर सोडलेले होते पण केसांची कपाळाजवळची बट बांधलेल्या केसांतून बाहेर पडत समोर लटकत होती.. डोळ्यावरच्या चष्म्यानं तर कमालच केली होती, त्या चष्म्यामुळे मंजिरी आणखी जास्तच गोड दिसत होती..
स्कूल डेला मला गोखले सरांनी शिक्षक व्हायला सांगितलं होतं, पण मी सरांच्या परस्पर पिऊनसाठी नाव दिलं होतं.. कारणं मंजिरी..
मंजिरीने पहिली बेल मारली तसा मी आता गेलो आणि तिला पाहिलं.. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या.. ती म्हणाली, तू इथे कसा काय? मस्करी करु नकोस बाहेर कोण आहे त्याला पाठव.. मी तिला सांगितलं, फक्त मीच आहे मंजिरी बाहेर शिपाई म्हणून.. ती म्हणाली, वेडा आहेस का? कशासाठी? पिऊन का झालायस तू?
मी तिच्या डोळ्याकडे एकटक पाहत माझ्या डोळ्यांनीच उत्तर दिलं.. फक्त तुझ्यासाठी..
मंजिरी म्हणाली, मला तुला काहीतरी सांगायचं..
मी परत डोळ्यांनीच बोलून गेलो.. मला ही..
"तू सेमी इंग्लिशच्या वर्गात आलास, हे मला आधीच कळलेलं होतं.. त्या दिवशी तुझ्या बाबांनी मलाच फॉर्म भरायला सांगितला होता.. तू मला आधीपासून माहीत होतास.. मी तुला चांगलच ओळखते.. बहुधा तू मला याआधी पाहिलं नसावं.. पण मी तुला खूपदा पाहिलंय.. चोरुन चोरुन.. मला तुझी खूप भीती वाटायची.. तुझं ते बेफिकीरीचं वागणं मला नकळण्यापलीकडे होतं.. तू आयुष्याबद्दल इतका अजाणता कसा काय असू शकतोस असं वाटायचं"..
तिला नेमकं काय बोलायचंय हे मला जवळजवळ नकळणारं होतं..
"तुझ्या अजाणतेपणाच्या रणांगणात मी कशाला शहाणपणाची तलावार घेऊन मिरवत बसू म्हणून मी तुला बोलायचं टाळत होते पण नंतर तू माझ्याच वर्गात आल्याचं मला जाम आवडलं.. मी सुरुवातीला मुद्दाम शाळा बुडवली होती.. मला तुझ्यासमोर डायरेक्ट प्रेसेंट व्हायचं नव्हतं, तुला माझी वाट पाहायला लावायची होती.. तुझी इंग्लिश पाहून सगळे हसायचे.. त्याच मला फार वाईट वाटायचं.. तुला खरं सांगू त्यादिवशी अंकिताला तुझ्या नावाची चिट्टी मीच गोखले सरांच्या हातात द्यायला सांगितली होती..
मी म्हणालो, हे तू केलं होतंस? पण का? माझी कितीss
ती म्हणाली, काही बोलू नकोस तो दिवस पाहा आणि आजचा दिवस पाहा.. मला हेच पाहिजे होतं.. ते मला मिळालं"..
"अपमानाच्या काट्यातून घळाघळा निघालेल्या रक्ताची किंमत त्यालाच कळते, ज्याच्याकडे संयम व सहनशीलता असते आणि काहीतरी करुन दाखवण्याची धडपड असते"...
ती किती पटकन तिच्या मनातलं बोलून मोकळी झाली होती.. पण मी गेल्या सात-आठ महिन्यात तिला साधं पत्रं ही देऊ शकलो नव्हतो.. आज धाडस करुन कसबस घड्या करुन करुन फाटत आलेलं पत्रं मी तिच्या हातात दिलं..
प्रिय मंजिरी,
मी तसा आजपर्यंत कुणाच्या प्रेमात जवळजवळ पडलोच नव्हतो.. पण काय माहीत तुला पाहिलं आणि माझ्या कित्येक रात्र ह्या दिवस झाल्या.. तुला पत्रं लिहायच्या नादात मी बऱ्याच प्रेम कविता केल्यात, आणि त्या प्रत्येक कवितेतल्या मंजिरीला मी पुस्तकांच्या पानात मोरपीस ठेवावा अगदी तसचं कपाटतल्या प्रत्येक पुस्तकात आणि पुस्तकाच्या पानापानात कविता म्हणून जपून ठेवलंय..
प्रत्येक कविता आणि प्रत्येक पत्रं मी माझ्या अंतकरणातून लिहिलेली आहेत.. कधी कधी ती पत्रं आणि त्या कविता तू स्वतः माझ्या स्वप्नात येऊन माझ्याकडून लिहून घेतल्याचा मला भास होतोय.. तुझी पाठमोरी आकृती पाहत पाहत तुझ्या घरापर्यंत येऊन माझे पाय आता थकलेत.. तुझ्या घराकडे जाणारा रस्ता आता मी डोळे झाकून सुध्दा पार करु शकतो.. इतका तोंडपाठ होऊन गेलाय तो रस्ता..
पाण्याइतकच निर्मळ आणि शुद्ध प्रेम केलंय मी तुझ्यावर, करतोय आणि करत राहीन.. आता याचं पाण्यात तुझ्या ही प्रेमाचा रंग मिसळून टाक आणि त्या रंगात मला नाहवून टाक..
आता हे पत्रं वाचून मला होकाराची वाट पाहायला लावू नकोस म्हणजे झालं.. आता वाट पाहणं शक्य नाही..
तुझाच,
प्रशांत...
तिचं पत्रं वाचून झालं, तिने ते पत्रं तिच्या हृदयाशी घट्ट धरुन ठेवलं.. तिच्या डोळ्यात पाणी होतं.. ती माझ्या जवळ आली आणि तिने मला हेडमास्तरच्या केबीनमध्येच घट्ट मिठी मारली.. हेडमास्तरांच्या बाजूच्या दालनातील कारकून, शिपाई मंडळी आमच्याकडे वेड्यासारखं बघत होती.. तिने मारलेली ती घट्ट मिठी मी उगाच सोडवायचा जवळजवळ खोटा प्रयत्न करत होतो.. मी तिचे डोळे पुसले.. आणि अलगद तिच्या कपाळावर माझे ओठं ठेवले.. ती आणखी जास्त रडू लागली.. तिचं असं रडणं मला कळत नव्हतं.. मी तिला शांत केलं.. तशी ती म्हणाली, का आलास तू माझ्या आयुष्यात? अगदी जवळजवळ हे सिनेमासारखंच.. आपलं काही होऊ शकत नाही.. तीच रडणं परत चालू झालं..
मी जाम खुश होतो.. दिवस मस्तच गेला.. प्रेमाची मिठी फक्त कारकूनांनी आणि तिथल्या जवळजवळ उपस्थित शिपायांनी पाहिली होती.. त्यांनी आम्हाला पाहिलंय हे मला माहीत होतं.. इतक्यात ती म्हणाली, खूप अभ्यास कर.. शाळेत फक्त तुझं आणि माझंच नाव यायला पाहिजे..
प्रशांत - मंजिरी...
फोटो ही फक्त आपल्याच दोघांचा दिसायला हवा..
स्कूल डे संपला.. फोटोग्राफी झाली.. भरपूर फोटो काढले.. गोखले सरांसोबत ही खूप फोटो काढले.. फोटोग्राफरला तिचे आणि माझे तर मी खूप फोटो काढायला सांगितले..
परीक्षेच्या दिवसाला सुरुवात झाली.. तिचा कुठल्या शाळेत नंबर आलाय हे जाणून घेतलं.. माझा प्रत्येक पेपर संपला की, मी तिच्या परिक्षाकेंद्रावर जायचो पण ती तिथे दिसायची नाही.. शेवटच्या पेपरला मी तिची खूप वाट पाहिली पण ती त्या ही दिवशी दिसली नाही.. मला वाटायचं ती मला मुद्दाम वाट पाहायला लावत असेल.. कारणं तिला मी तिच्यासाठी नेहमी वाट पाहत बसावं असं सारखं वाटायचं.. आणि तिला ते जाम आवडायचं.. शेवटी ती काही आली नाही तिची मैत्रीण अंकिता मला भेटली आणि
ती म्हणाली, तुला सरांनी शाळेत तुरंत यायला सांगितलंय..
मी सायकल काढली आणि तसाच्या तसा शाळेकडे निघालो.. सरांना बहुधा शाळेतल्या कारकूनांनी, शिपायांनी मिळून माझं आणि मंजिरीच सगळं सांगितलेलं असावं.. असे खूप सारे विचार माझ्या डोक्यात धावपळ करत होते.. शाळेत पोहचलो.. सरांच्या केबीनला गेलो.. तिथेच मंजिरी उभी होती.. स्तब्ध.. मी तिच्या डोळ्यात पाहिलं, ती खूप घाबरली होती.. इतक्यात गोखले सर माझ्याजवळ आले आणि सरांनी जोरदार माझ्या कानाखाली दिली.. माझी जाम टरकली.. इकडे सरांचा हात थांबत नव्हता आणि तिकडे मंजिरीच्या डोळ्यातल पाणी.. इतक्यात रडतरडत मंजिरी म्हणाली,
बाबा मला माफ करा, मी पुन्हा असं करणार नाही पण प्लिज याला सोडून द्या..
मंजिरीच्या तोंडून गोखले सरांसाठी बाबा हा ऐकून मी खूपच हाय खाल्ली.. पूर्वीपेक्षा जास्तच टरकली.. सरांनी खोली बंद केली आणि मला खूप धुतलं.. मी सरांना माफी वगैरे काही मागत नव्हतो मी ठाम होतो.. मंजिरीची विनंती पाहून मला सरांनी कसंबसं सोडून दिलं... सरांची शाळेत चांगलीच वट होती.. त्यामुळं कुणाची डेरिंग नव्हती की, हे घडलं प्रकरण शाळेत चघळत बसण्याची.. मी मंजिरीला पाहिलं तीही मला पाहत होती.. आता मला नजरेची भाषा कळत नव्हती कारणं गोखले सरांची नजर आमच्यामध्ये होती..
मी तिथून घरी गेलो.. थोड्या दिवसांनी शाळेत परत जाऊन आलो.. मला तिथे शाळेतल्या एका पिऊनकडून असं कळलं की, मंजिरीच्या आईच दुसरं लग्न झालंय.. मंजिरीचे वडील अपघातात गेले होते.. मंजिरीच्या आजी-आजोबांनी तिच्या आईच दुसरं लग्न लावलं ते गोखले सरांशी.. गोखले सरांशी मंजिरीचं कसलंच जमायचं नाही.. गोखले सरांचा स्वभाव मंजिरीला आवडायचा नाही, त्यामुळे मंजिरी तिच्याच वडिलांच नाव सगळीकडे वापरत होती.. आणि यामुळेच शाळेत कुणालाही मंजिरी आणि गोखले सरांच्या नात्याबद्दल कसलीच खबर नव्हती..
३.. (प्रशांत | मंजिरी)
मी गोंधळून गेलो.. घरी आलो.. खोली बंद केली.. बाहेर कुणाला आवाज जात नाही याचा अंदाज घेतला, आणि खुर्चीवर बसून ढसाढसा रडायला लागलो.. मला आता लक्षात येतं होती ती मंजिरीची घट्ट मिठी, तो स्पर्श न बोलता किती बोलून गेला होता, आपलं काही होऊ शकत नाही हे तिचं असं म्हणणं.. सारं सारं आठवत होतं.. पण मला हा ही प्रश्न पडत होता की, इतक्या दिवसात मंजिरीने मला ही गोष्ट का सांगितली नसावी? त्याच प्रश्नाच्या उत्तरासाठी मी अधूनमधून मंजिरीच्या घरी जायचा खूप प्रयत्न केला पण अर्ध्यातूनच परत आलो.. कारणं तिने त्यादिवशी जाता जाता माझ्या हातात एक चिट्टी दिली होती, त्या चिट्टीत लिहिलं होतं..
प्रेम?.. शपथ?.. आणि भविष्य?..
दहावीचा निकाल लागला.. घरी खूप गुलाब पुष्प, नारळ, पेढे येऊ लागले.. बाबांनी ही भरपूर पेढे वाटली.. सगळ्या गावात माझ्या नावाची चर्चा चालली होती.. शाळेत ही माझ्या नावाची चर्चा चालू होती सोबत आणखी एक नाव चर्चेत होत ते म्हणजे मंजिरी... प्रशांत - मंजिरी हेच नाव शाळेतल्या सगळ्यांच्या तोंडावर बसलं होतं.. मला शाळेतून बोलावणं आलं, वाटलं ती ही येईल.. शाळेत गेलो.. चेअरपर्सन झालो.. आई बाबा ही चेअरपर्सन होते.. तिथे सत्कार झाला तो माझा, आईचा आणि बाबांचाही.. या सत्काराला कारणीभूत मंजिरीच होती.. मी तिला शोधत होतो ती कुठेच दिसत नव्हती.. गोखले मास्तर ही दिसत नव्हते.. मी बऱ्याच शिपायांना विचारलं पण कुणालाच काही कल्पना नव्हती..
सत्काराची ट्रॉफी मिळताच मी बाबांच्या आणि आईच्या पाया पडलो.. शाळेत आलेल्या फोटोग्राफरने माझा आणि मंजिरीचा निकाल ऐकून मला सगळ्या फोटो फ्री देऊन टाकल्या.. त्यात तिच्या ही सगळ्या फोटो त्याने माझ्याकडेच देऊन टाकल्या..
मी ते फोटो कुणाला दिसू न देता गपचिप शर्टाच्या आत टाकल्या.. घरी आल्यानंतर खोलीत गेलो.. कोंडी लावली.. सगळे फोटो काढून पाहिले.. प्रत्येक फोटोत ती सुंदर आणि नवीन दिसत होती.. मला ते फोटो पाहून माझं मन स्वस्थ बसू देतं नव्हतं.. दुसऱ्या दिवशी मी तिच्या घराकडे एक चक्कर टाकूनच आलो तिथे गोखले सर त्या उंच झाडांना पाणी घालत होते.. मला बरं वाटलं मी सकाळी गेलेला रात्री आठ-नऊ वाजले तरी मंजिरीच्या घराकडे एकटक बघत लाईट पोलच्या मागे उभा होतो.. मंजिरीला पाहण्यासाठी गेलो पण इथेही मंजिरी कसलीच दिसली नाही.. तिच्याबद्दल कुणाला विचारायला आजूबाजूला जवळजवळ कुणी ओळखीचं ही नव्हतं.. मी तसाच माघारी फिरलो..
आज ही उगाच शाळेच्या गेटवर जाऊन मी तासन् तास उभा असतो.. तिच्या घरासमोर आज ही जाऊन उगाच थांबलेला असतो.. तिचं मला असं वाट पाहायला लावणं मला ही आता आवडू लागलंय.. रोज नवी आशा घेऊन तिची मी सगळीकडे वाट पाहत असतो..
काय माहीत, ह्या वाट पाहण्याच्या नादात एकदिवस माझीच वाट बदलून गेली तर.. वाट बदलून गेली तर बेशक जाऊ देत, पण हा वाटसरु बदलणार नाही.. कितीही वाटा बंद होऊ देतं, ह्या वाटसरुचं इथे येऊन तिच्यासाठी वाट पाहणं कधीच बंद होणार नाही..
जवळजवळ आताच कळलंय की, ती सध्या तिच्या मामाच्या गावाकडे असते.. मी तिच्या मामाच्या गावाचा जवळजवळ सगळाच अचूक पत्ता घेतलाय.. आता मी निश्चय केलाय, तो तिच्या मामाच्या गावाकडे जायचा...
ती सध्या काय करते ते पहायला!..